Wednesday, 22 February 2023

आकाशवाणी औरंगाबाद संक्षिप्त बातमीपत्र 22 फेब्रुवारी 2023 सकाळी 11.00 वाजता

 

आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

२२ फेब्रुवारी २०२ सकाळी ११.०० वाजता

****

राज्यातल्या सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड, यांच्या अध्यक्षतेखालच्या पाच सदस्यीय घटनापीठापुढे सुरु असलेल्या सुनावणीत आजही ठाकरे गटाचा युक्तिवाद सुरू राहणार आहे.

दरम्यान, शिवसेना पक्षनाव आणि धनुष्यबाण हे पक्षचिन्ह शिंदे गटाला देण्याच्या केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या ठाकरे गटाच्या याचिकेवर आज दुपारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.

***

कोरोनाचा अडथळा येऊनही भारताची अर्थव्यवस्था चालू आर्थिक वर्षात अपेक्षित सात टक्के दरानं वाढत आहे आणि जगातल्या सर्वाधिक वेगानं वाढणाऱ्या अर्थव्यवस्थांपैकी एक आहे, असं मत आशियाई विकास बँकेचे अध्यक्ष मासात्सुगू आकासावा यांनी काल व्यक्त केलं. आकासावा भारत दौऱ्यावर आले असून, त्यांनी काल नवी दिल्ली इथं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची भेट घेतली, त्यानंतर ते बोलत होते.

***

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व देशवासियांना विशेषतः युवकांना व्हिलेज टुरिझम अर्थात ग्राम पर्यटन योजनेत हिरिरीनं भाग घेण्याचं आवाहन केलं आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून आपल्या देशाच्या पर्यटन क्षमतेचं उत्तम सादरीकरण युवकांनी केलं पाहिजे, असं त्यांनी आपल्या ट्विट संदेशात म्हटलं आहे. स्थानिक कला, संस्कृती आणि जीवनशैलीचं जतन आणि संवर्धन करणाऱ्या गावांचा सन्मान करणं हा या स्पर्धेचा मुख्य उद्देश आहे.

***

राज्यात येत्या दीड वर्षांत रोरो सेवेचे मुंबई ते मोरा, मुंबई ते काशीद, मुंबई ते दिघी आणि  मुंबई ते रेवस कारंजा असे चार प्रकल्प सुरू केले जाणार आहेत. केंद्रीय जहाज आणि परिवहन मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुंबईत भेट घेतली त्यावेळी ही माहिती देण्यात आली.

***

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून परीक्षेचा नवीन अभ्यासक्रम २०२५ पासून लागू करण्यात यावा या मागणीकरता पुण्यात सुरु असलेल्या आंदोलनाच्या ठिकाणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल रात्री भेट दिली. येत्या 2 दिवसात विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळासह मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेऊन तोडगा काढू असं आश्वासन त्यांनी दिल्यानंतर विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेतलं.

//************//

 

No comments: