Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 01 February
2023
Time 7.10 AM
to 7.25 AM
Language
Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक
०१ फेब्रुवारी २०२३ सकाळी
७.१० मि.
****
· २०२३-२४ आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प आज संसदेत सादर होणार
· वाढत्या सामर्थ्यासह भारत जागतिक समस्यांवर तोडगे
काढणारा देश म्हणून उदयाला येत आहे- राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
· चालू आर्थिक वर्षात भारतीय अर्थव्यवस्था सात
टक्क्यांनी वाढण्याची आर्थिक सर्वेक्षणात अपेक्षा
· ‘जय जय महाराष्ट्र माझा’ गीत, महाराष्ट्र राज्य गीत म्हणून स्वीकार करण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय
· राज्यात दूध उत्पादन वाढीस चालना देण्यासाठी दुधाळ
जनावराच्या खरेदी किंमतीत वाढ करण्यास राज्य सरकारची मंजुरी
· राज्यातल्या अभिमत विद्यापीठांमध्ये सामाजिक आणि
आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्क शिष्यवृत्तीची योजना
सुरू करण्यास मान्यता
· भरडधान्य उत्पादन क्षेत्र वाढीसाठी
२०० कोटी रूपयांची तरतूद
· औरंगाबाद अणि उस्मानाबाद शहरांच्या नामांतर प्रकरणी येत्या १५ तारखेपर्यंत माहिती सादर करण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला निर्देश
आणि
· भारत - न्यूझीलंड
यांच्यात आज टी-२० क्रिकेट मालिकेतला
तिसरा आणि अंतिम सामना
****
केंद्रीय अर्थ मंत्री निर्मला सीतारामन आज सकाळी ११ वाजता लोकसभेत २०२३-२०२४ या आर्थिक
वर्षाचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. त्यानंतर लगेच अर्थसंकल्प राज्यसभेच्या
पटलावर ठेवण्यात येईल. त्या आधी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत अर्थ संकल्पाला
मंजुरी दिली जाईल.
दरम्यान, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या
अभिभाषणानं काल संसदेच्या अर्थसंकल्पीय
अधिवेशनाला सुरुवात झाली. वाढत्या सामर्थ्यासह भारत जागतिक
समस्यांवर तोडगे काढणारा देश म्हणून उदयाला येत आहे, असं राष्ट्रपतींनी
आपल्या अभिभाषणात सांगितलं. गेल्या नऊ
वर्षांच्या कार्यकाळात सरकारच्या कामगिरीचं कौतुक करताना, जगात
देशाची प्रतिमा उंचावल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं.
डिजिटल तंत्रज्ञानाच्या मदतीनं देशाला
भ्रष्टाचारापासून मुक्ती मिळत आहे. प्राप्तिकर भरल्यावर काही दिवसांतच परतावा मिळत
असून वस्तु आणि सेवा कर -जीएसटी
संकलनाबरोबरच करदात्यांची प्रतिष्ठाही उंचावत आहे, असं त्या
म्हणाल्या. विकासाच्या वाटेवर चालताना सरकार देशहिताला सर्वोच्च प्राधान्य देत
आहे. ईशान्य भारत आणि सीमावर्ती क्षेत्रांना विकासाच्या नव्या वेगाची प्रचीती येत
असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं. आज भारतीय स्रिया जगात आत्मविश्वासानं पुढे जात आहेत, सक्षम होत आहेत, असं सांगत सरकारच्या प्रयत्नांना यश येत आहे, असं
त्या म्हणाल्या.
‘‘मेरे सरकारने पीएम आवासयोजना
के तहत मिलनेवाली घरोंकी रजिस्ट्रीभी महिलांओंके नाम पर होनेसे महिलाओंका आत्मविश्वास
बढा है. जनधन योजनासे पहिली बार देश में बँकींग सुविधामें महिला और पुरुषोंके बीच अब
बराबरी आ गई है. अब इस समय ८० लाख से ज्यादा स्वयंसहायता समुह भी काम कर रहे है. जिनमें
करीब नौ करोड महिलांए जुडी हुई है. इन महिला स्वयंसहायता समुहोंको सरकार द्वारा लाखो
करोड रुपयोंकी मदत दी जा रही है.’’
राष्ट्रपतींच्या अभिभाषणानंतर त्याची प्रत लोकसभा आणि राज्यसभेच्या संयुक्त
सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात आली.
****
आगामी आर्थिक वर्षात पायाभूत सकल राष्ट्रीय उत्पादन वाढीचा दर साडेसहा टक्के राहिल,
असा अंदाज, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत
सादर केलेल्या आर्थिक सर्वेक्षणात व्यक्त केला आहे. चालू आर्थिक
वर्षात भारतीय अर्थव्यवस्था सात टक्क्यांनी वाढेल, अशी
अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. येत्या
मार्चमध्ये सकल राष्ट्रीय उत्पादन सुमारे साडेतीन हजार अब्ज
अमेरिकी डॉलर इतकं असेल, आणि भारत ही जगातली झपाट्यानं वाढत
असलेली प्रमुख अर्थव्यवस्था राहिल, असंही त्यात म्हटलं आहे.
ग्राहक किमंत वाढ लक्षणीय रित्या मंदावली आहे, महागाईचा
वार्षिक दर सहा टक्क्याच्या खाली असून, घाऊक किंमतीतल्या
वाढीचा दर पाच टक्क्याच्या खाली आहे. देशाच्या कृषी क्षेत्रात गेल्या सहा वर्षात
मोठी वाढ झाली असून, या क्षेत्रात वर्षाला चार पूर्णांक सहा दशांश टक्क्यांची वाढ नोंदवली
गेल्याचं या अहवालात नमूद केलं आहे. सरकारच्या कृषी आणि पशुपालन क्षेत्राला
दिलेल्या प्रोत्साहनामुळे हे शक्य झाल्याचंही यात म्हटलं आहे. पीएम किसान योजनेमुळे एप्रिल ते जुलै २०२२ - २३ या काळात, ११ कोटी तीन लाख शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळाली असून, गेल्या वर्षी कृषी क्षेत्रात साडेअठरा लाख कोटी रुपयांचे कर्ज उपलब्ध
करण्याचं लक्ष्य ठेवलं असल्याचही या आर्थिक सर्वेक्षण अहवालात म्हटलं आहे.
****
प्रसिद्ध कवी राजा बढे यांचं ‘जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा’ हे गीत, महाराष्ट्र राज्य गीत
म्हणून स्वीकार करण्याचा निर्णय, राज्य मंत्रिमंडळाचा बैठकीत घेण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली काल ही
बैठक झाली. येत्या एकोणीस फेब्रुवारीपासून, छत्रपती शिवाजी
महाराजांच्या जयंतीचं औचित्य साधून हे गीत राज्य गीत म्हणून स्वीकारण्यात येणार आहे. शासनाच्या सर्व सार्वजनिक कार्यक्रमात सुरुवातीस राज्यगीताचे
गायन, वादन हे ध्वनीमुद्रीत आवृत्तीसोबत अथवा स्वतंत्रपणे
करण्यात यावं, राज्यातल्या शाळांमध्ये
दैनिक सत्र सुरु होण्यापूर्वी, परिपाठाच्या वेळी राष्ट्रगीतानंतर राज्यगीत वाजवलं किंवा गायलं जाईल, राज्य शालेय
शिक्षण मंडळाच्या पाठ्यपुस्तकामध्ये या राज्यगीताचा समावेश पुढील शैक्षणिक
वर्षापासून करण्यात यावा, आदी सूचनाही यावेळी देण्यात आल्या.
राज्यातल्या अनुसूचित क्षेत्रातल्या ज्या गावांमध्ये
आदिवासींची लोकसंख्या पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त आहे, अशा सगळ्या गावांमध्ये, सतरा संवर्गातली सरळसेवेची शंभर टक्के पदं स्थानिक आदिवासींमधून भरण्याचा
निर्णयही, काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. या
निर्णयामुळे आदिवासी युवक - युवतींना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. ज्या
गावांमध्ये आदिवासींची लोकसंख्या पंचवीस ते पन्नास टक्यांदरम्यान आहे, अशा गावांमध्ये, सतरा अधिसूचित संवर्गातली सरळसेवेची
पन्नास टक्के पदं, तर पंचवीस टक्क्यांपर्यंत आदिवासी
लोकसंख्या असणाऱ्या गावांत पंचवीस टक्के पदं, स्थानिक आदिवासींमधून भरण्यात येणार आहेत.
राज्यात दूध उत्पादन वाढीस चालना देण्यासाठी दुधाळ
जनावरांचे गट वाटप करण्याच्या विविध राज्यस्तरीय तसंच जिल्हा वार्षिक योजनांमधल्या प्रति
दुधाळ जनावराच्या खरेदी किंमतीत वाढ करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात
आला. या निर्णयानुसार आता गाईसाठी ७० हजार रुपये, म्हशीसाठी
८० हजार रुपये खरेदी किंमत राहणार आहे.
राज्यातल्या अभिमत विद्यापीठांमध्ये सामाजिक आणि
आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्क शिष्यवृत्तीची योजना
सुरू करण्यास मंत्रिमंडळानं
मान्यता दिली. याशिवाय, महिला आणि बालविकास
विभागाच्या बालसंगोपन योजनेच्या परिपोषण अनुदानात एक हजार दोनशे पंचाहत्तर
रुपयांची वाढ करून, ते अडीच हजार रुपये करण्याचा निर्णयही
मंत्रिमंडळांनं घेतला आहे. फलटण-पंढरपूर या नवीन ब्रॉडगेज रेल्वेमार्गाकरता राज्य
शासनाच्या आर्थिक सहभागालाही कालच्या बैठकीत मान्यता देण्यात
आली.
महाराष्ट्र आग प्रतिबंधक आणि जीवसंरक्षक उपाययोजना
अधिनियम २००६ मध्ये, अग्निसुरक्षेच्या
अनुषंगानं सुधारणा करण्याचा निर्णयही याबैठकीत घेण्यात आला. यामध्ये, शैक्षणिक इमारतींची उंची तीस मीटरवरून पंचेचाळीस मीटर करणं, तसंच आग परिक्षण किंवा सल्लागार नेमणं या तरतुदी करण्यात आल्या आहेत.
****
राज्यात भरडधान्य उत्पादन क्षेत्र वाढवण्यासाठी
शेतकऱ्यांना प्रोत्साहन, आणि त्या
उत्पादनांना योग्य हमीभाव मिळेल यासाठी राज्य शासन आग्रही आहे, म्हणून महाराष्ट्र मिलेट मिशनसाठी २०० कोटी रूपयांची तरतूद केली असल्याचं, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. मुंबईत महाराष्ट्र
मिलेट मिशनचा प्रारंभ करताना ते काल बोलत होते. या निधीतून
तृणधान्य प्रक्रिया उद्योगांना अर्थसाहाय्य करण्यात येणार असून, प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया, मुख्यमंत्री
अन्न प्रक्रिया योजना, स्मार्ट प्रकल्प यांची सांगड घालून
शेतकरी उत्पादक कंपन्यांना अर्थसहाय्य करण्यात येणार आहे, असं
मुख्यमंत्री म्हणाले. यावेळी पौष्टिक तृणधान्याच्या उत्पादनात उल्लेखनीय काम
करणाऱ्या शेतकरी आणि कृषि उद्योजकांचा सत्कार करण्यात आला. याशिवाय, शेतकरी मासिक पौष्टीक तृणधान्य विशेषांक, महाराष्ट्र
मिलेट मिशन पुस्तिका आणि महाराष्ट्र मिलेट मिशन पोस्टरचं प्रकाशन तसंच महाराष्ट्र
मिलेट मिशन संकेतस्थळाचं अनावरण देखील यावेळी करण्यात आलं.
****
राज्य शासनाच्या वतीनं देण्यात येणाऱ्या
‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराची रक्कम दहा लाख रुपयांवरून पंचवीस लाख रुपये करण्यात
आली आहे. या पुरस्काराच्या अनुषंगानं काल मुंबईत झालेल्या
बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही घोषणा केली. या बैठकीला सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार तसंच राज्याचे
मुख्य सचिव विकास खारगे उपस्थित होते, तर पुरस्कार समितीचे
सदस्य दृकश्राव्य माध्यमातून सहभागी झाले होते.
****
औरंगाबाद अणि उस्मानाबाद शहरांच्या नामांतर प्रकरणी येत्या १५ तारखेपर्यंत माहिती सादर करण्याचे निर्देश, मुंबई
उच्च न्यायालयानं राज्य सरकारला दिले आहेत. राज्य सरकारनं औरंगाबादचं छत्रपती संभाजीनगर
तर उस्मानाबादचं धाराशिव असं नामांतरन करण्याचा ठराव विधीमंडळात केला असून, या नामांतराला
विरोध करणाऱ्या तीन याचिका न्यायालयात दाखल झाल्या आहेत. या याचिकांवर
काल संयुक्त सुनावणी झाली. त्यावेळी न्यायालयानं याबाबत सरकारला
भूमिका स्पष्ट करण्यास सांगितल. या माहितीसह,
नागरिकांच्या हरकतींबाबत माहिती देण्यासाठी सरकारच्या वकिलांनी वेळ
मागितला. यावर, न्यायालयानं येत्या पंधरा तारखेला माहिती सादर
करण्याचे निर्देश दिले.
****
महापुरुषांबद्दल बेताल वक्तव्य करणाऱ्यांसाठी सरकारनं
नवीन कायदा करावा, अशी मागणी
विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली आहे. ते काल मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. महत्वाच्या
मुद्द्यांवरून लक्ष हटवण्यासाठी काही लोक जाणीवपूर्वक असं करतात, असा आरोप त्यांनी केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील
यांनी आज आमदारांची विधानभवनात बैठक आयोजित केली आहे. त्यात
पोटनिवडणुकांबाबत चर्चा केली जाईल असं सांगत, चिंचवड आणि
कसबा या दोन्ही जागांवर पोटनिवडणूक लढवण्यावर आम्ही ठाम आहोत, असं अजित पवार यांनी यावेळी सांगितलं.
****
राज्य सेवा मुख्य परीक्षा वर्णनात्मक पद्धतीनं
घेण्याचा निर्णय २०२५ च्या परीक्षेपर्यंत पुढं ढकलावा, अशी विनंती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला केली आहे. ही परीक्षा वस्तुनिष्ठ पर्यायांऐवजी
वर्णनात्मक पद्धतीनं घेण्याच्या निर्णय महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं घेतला आहे. हा
निर्णय लगेच, २०२३ पासून लागू केला तर या परीक्षेची तयारी
करणाऱ्या विद्यार्थ्यांवर अन्याय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तो पुढं ढकलण्याची
आग्रही मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी आयोगाला तशी
विनंती पत्राद्वारे केली असून, आयोग यावर तातडीनं निर्णय
घेऊन राज्यातल्या लाखो तरुण-तरुणींना दिलासा देईल, असा
विश्वासही व्यक्त केला आहे.
****
आकाशवाणीवरून
प्रसारित होणाऱ्या, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मन की बात या
कार्यक्रमाच्या शंभराव्या भागासाठी माय जी ओ व्ही अॅपद्वारे एक नाद मधुर कविता
अर्थात जिंगल स्पर्धेचं आयोजन केलं आहे. समजायला सोपी आणि आपलंसं करेल अशी २५ ते
३० सेकंदांची धून या स्पर्धेसाठी अपेक्षित आहे. सर्वोत्कृष्ट जिंगलला अकरा हजार
रुपयांचं रोख पारितोषिक दिलं जाणार आहे. स्पर्धेत सहभागी
होण्यासाठी २८ फेब्रुवारीपर्यंत प्रवेशिका देता येतील.
मन की बात कार्यक्रमाच्या शंभराव्या भागाच्या
औचित्यानं, आकाशवाणीनं लोगो
अर्थात बोधचिन्ह स्पर्धाही आयोजित केली आहे. आज या
स्पर्धेसाठीच्या प्रवेशिका पाठवण्याचा अखेरचा दिवस आहे. या
बोधचिन्हामध्ये शंभरावा भाग अधोरेखीत होणं गरजेचं असून, तो
डिजिटल स्वरुपात असणं अपेक्षित आहे. विजेत्या स्पर्धकाला एक लाख रुपयांचं रोख
बक्षीस दिलं जाणार आहे. या स्पर्धेचा अधिक तपशील माय जी ओ व्ही डॉट इन या
संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
****
आजादी का अमृतमहोत्सवाच्या औचित्यानं उस्मानाबाद
विभागातल्या सगळ्या टपाल कार्यालयांमध्ये येत्या नऊ आणि दहा फेब्रुवारीला “सुकन्या समृद्धी योजना’ खाती उघडण्याकरता विशेष अभियान राबवण्यात येणार आहे. डाकघर अधीक्षक भगवान नागरगोजे यांनी ही माहिती दिली. या योजनेबाबत ग्राम पंचायत, अंगणवाडी आणि बाल विकास प्रकल्प
अधिकारी या ठिकाणी टपाल कर्मचारी माहिती देतील. जिल्ह्यातले आठवडी बाजार, मंदिरं, यात्रा आणि शाळा अशा ठिकाणी पालक मेळाव्यांच्या माध्यमातून ही योजना
जनसामान्यांपर्यंत पोहोचावी असे प्रयत्नही केले जाणार असल्याचं, त्यांनी सांगितलं.
****
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातल्या तीन टी-२० क्रिकेट
मालिकेतला तिसरा आणि अंतिम सामना आज अहमदाबाद इथं होणार आहे. संध्याकाळी सात वाजता सामन्याला सुरुवात होईल. या मालिकेतला पहिला सामना न्यूझीलंडनं, तर दुसरा
सामना भारतानं जिंकल्यामुळे दोन्ही संघ १-१ असे बरोबरीत आहेत.
****
औरंगाबाद शहरात फेब्रुवारी महिन्यात जी २० अंतर्गत महिला सभासदांच्या बैठकीच्या
पार्श्वभूमीवर औरंगाबाद स्मार्ट सिटी बस विभागाच्या वतीनं औरंगपुरा
ते चिकलठाणा मार्गावर महिलांसाठी विशेष बस सेवा आजपासून सुरु
होणार आहे. सकाळी नऊ वाजता मुकुंदवाडी इथल्या स्मार्ट सिटी बस डेपोवर या बसचं
उद्घाटन करण्यात येईल. ही बस दररोज सकाळी साडेनऊ ते संध्याकाळी साडे सहा
वाजेपर्यंत या मार्गावर प्रत्येकी पाच फेऱ्या करणार असल्याची माहिती स्मार्ट शहर बसचे मुख्य चालन व्यवस्थापक राम पावनिकर
यांनी दिली आहे.
****
राज्य विधानपरिषदेच्या औरंगाबाद विभाग शिक्षक
मतदारसंघाच्या निवडणुकीची मतमोजणी उद्या चिकलठाणा औद्योगिक वसाहतीतल्या कलाग्राम समोरील मराठवाडा रिअल्टर्स या
कंपनीत होणार आहे. ५६ टेबलवर ही मतमोजणी केली जाईल, यासाठी
७०० अधिकारी - कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती
प्रशासनानं दिली आहे.
****
परभणी जिल्ह्यात बाल विवाह थांबवण्यात जिल्हा
प्रशासनाला यश येत असून, बाल विवाहमुक्तीसाठी
सर्वांनी अधिक सक्रिय होऊन संवेदनशीलतेनं काम करावं, असं आवाहन,
जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी काल केलं आहे. ‘बालविवाहमुक्त परभणी’ या मोहिमेची काल त्यांच्या
अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली, त्यावेळी त्या बोलत
होत्या. नागरीकही या उपक्रमात सहभागी होऊ शकतात, त्यासाठी एक
शून्य नऊ आठ या निशुल्क क्रमांकावर गावात होणाऱ्या बालविवाहाची
माहिती द्यावी, असं आवाहन त्यांनी यावेळी
केलं.
****
No comments:
Post a Comment