Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 21 February 2023
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २१ फेब्रुवारी २०२३ सायंकाळी
६.१०
****
·
राज्यातल्या
सत्तासंघर्षावरची सुनावणी अखेरच्या टप्प्यात; गुरुवारपर्यंत घटनापीठासमोर दोन्ही गटांचा
सलग युक्तिवाद.
·
बारावीच्या
परीक्षेला सुरवात; औरंगाबाद जिल्ह्यातल्या दुर्गम परीक्षा केंद्रांना पथकांच्या भेटी.
·
औरंगाबाद
इथं पश्चिम विभागीय कुलगुरुंच्या दोन दिवसीय परिषदेला प्रारंभ.
आणि
·
दीडशे
टी ट्वेंटी क्रिकेट सामने खेळणारी हरमनप्रीत कौर ठरली पहिली क्रिकेटपटू.
****
राज्यातल्या सत्तासंघर्षावर गेल्या आठ महिन्यांपासून सुरू
असलेली सुनावणी आता अखेरच्या टप्प्यात पोचली आहे. सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीश
धनंजय चंद्रचूड, यांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यीय घटनापीठापुढे आजपासून सुरू झालेल्या
तीन दिवसांच्या सलग सुनावणीत आज ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी दहा मुद्दे उपस्थित
केले. पक्षचिन्हावर निवडून आलेले आमदार वेगळा निर्णय घेऊ शकतात का, एकनाथ शिंदे यांच्यावर
पक्षाकडून अपात्रतेची कारवाई सुरू अस्ताना राज्यपालांनी शिंदे यांना सत्तास्थापनेसाठी
बोलावणं नियमबाह्य नाही का, एखाद्या आमदाराला अपात्र ठरवण्याच्या विधानसभा अध्यक्षांच्या
निर्णयात न्यायालय हस्तक्षेप करू शकते का, पक्षांतर्गत वादाची समीक्षा न्यायालयाकडून
केली जाऊ शकते का, आदी मुद्यांचा यामध्ये समावेश होता. आजचं कामकाज संपलं असून, उद्याही
ठाकरे गटाचा युक्तिवाद सुरू राहणार आहे. त्यानंतर शिंदे गटाचे वकील युक्तिवाद सुरू
करतील, असं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
संसदेतलं शिवसेना संसदीय पक्षाचं कार्यालय शिंदे गटाला
देण्यात आलं आहे. निवडणूक आयोगानं शिवसेना हे नाव शिंदे गटाला दिल्यानंतर शिंदे गटाला
संसदेतलं शिवसेना कार्यालयही मिळावं, यासाठी गटनेते राहुल शेवाळे यांनी लोकसभा सचिवालयाला
पत्र दिलं होतं. यावर लोकसभा सचिवालयानं शेवाळे यांना पत्र पाठवून शिवसेना पक्ष कार्यालयाचा
ताबा दिला.
****
केंद्र सरकारनं वीस लाख टन गहू खुल्या बाजारात आणण्याची
घोषणा केली आहे. फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या माध्यमातून येणाऱ्या या गव्हाची विक्री
ई-लिलावाद्वारे होईल. या निर्णयामुळे गहू आणि गव्हाच्या पदार्थांच्या बाजारभावात घट
होऊन ग्राहकांना दिलासा मिळेल.
****
बारावीची परीक्षा आजपासून सुरू झाली. या परीक्षेसाठी राज्यभरातून
१४ लाख ५७ हजाराहून अधिक विद्यार्थ्यांनी अर्ज भरले आहेत. मराठवाड्यातल्या आठ जिल्ह्यांमधून
दोन लाख ६० हजार विद्यार्थी बारावीची परीक्षा देणार आहेत. पेपरफुटीचे प्रकार टाळण्यासाठी,
विद्यार्थ्यांना दहा मिनिटं आधी प्रश्नपत्रिका देण्याचा निर्णय मंडळानं यावर्षीपासून
रद्द केला असून, त्याऐवजी परीक्षेच्या नियोजित वेळेनंतर विद्यार्थ्यांना अतिरिक्त दहा
मिनिटं देण्यात येणार आहेत. राज्यातल्या तीन हजारांहून अधिक केंद्रांवर ही परीक्षा
पार पडणार असून, परीक्षेतले गैरप्रकार टाळण्यासाठी संपूर्ण राज्यात दोनशे एक्काहत्तर
भरारी पथकं नेमण्यात आली आहेत. या परीक्षेत माहिती तंत्रज्ञान आणि सामान्यज्ञान या
विषयांची परीक्षा ऑनलाईन पद्धतीनं होणार आहे.
औरंगाबाद जिल्ह्यात आज शांततापूर्ण वातावरणात विद्यार्थ्यांनी
इंग्रजी विषयाची परीक्षा दिली. जिल्ह्यातल्या दुर्गम भागातल्या सिरसाळा तांडा, सोयगाव,
सिल्लोड, अजिंठा इथं शिक्षणाधिकाऱ्यांच्या पथकानं विद्यार्थ्यांची तपासणी केली.
****
राज्यातल्या एक लाख दहा हजार अंगणवाड्यांमध्ये तीस हजारांहून
जास्त मदतनीस आणि सेविकांची भरतीप्रक्रिया सध्या सुरु आहे. सुरवातीला पदोन्नतीची प्रक्रिया
पूर्ण करण्यात येत असून, येत्या दहा मार्चनंतर नव्यानं सेविका आणि मदतनीस होऊ इच्छिणाऱ्या
महिलांसाठी अर्ज उपलब्ध होणार आहेत. यंदा प्रथमच सेविका पदासाठी बारावी उत्तीर्ण असण्याची
अट घालण्यात आली आहे.
****
राज्य शासनाच्या यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्गमय पुरस्कार
स्पर्धेसाठी प्रवेशिका आणि पुस्तकं पाठवण्यासाठी मुदत वाढ देण्यात आली आहे. आता येत्या
दोन मार्चपर्यंत या स्पर्धेच्या प्रवेशिका आणि पुस्तकं स्वीकारली जातील.
****
नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात विद्यार्थी केंद्रबिंदू
असेल तर त्याला त्याच्या मातृभाषेत परीक्षा देण्याची मुभा दिली पाहिजे, असं मत शिक्षा
संस्कृती उत्थान न्यासचे सचिव अतुल कोठारी यांनी व्यक्त केलं आहे. ते आज औरंगाबाद इथं
पश्चिम विभागीय कुलगुरु परिषदेच्या उद्धाटनपर भाषणात बोलत होते. ३६५ दिवसांच्या शिक्षणाचं
मूल्यांकन अवघ्या तीन तासांच्या परीक्षेत केलं जातं. या दरम्यान एखादा विद्यार्थी आजारी
पडला, अपघात झाला तर त्याचं पूर्ण वर्ष वाया जातं. त्यामुळे परीक्षा आणि मूल्यांकन
पद्धतीत बदल करणं आवश्यक आहे. नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात या बाबींचा विचार केला
पाहिजे असं अतुल कोठारी यावेळी म्हणाले. भारतीय विद्यापीठ संघ आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर
मराठवाडा विद्यापीठाच्या वतीनं भरवण्यात आलेल्या या दोन दिवसीय परिषदेत सहा सत्रात
उच्च शिक्षणातील मूल्यमापन सुधारणांवर विचार मंथन केलं जाणार आहे.
****
भारतीय महिला क्रिकेटपटू हरमनप्रीत कौर ही आंतरराष्ट्रीय
क्रिकेट जगतात दीडशे टी ट्वेंटी क्रिकेट सामने खेळणारी पहिली क्रिकेटपटू ठरली आहे.
या क्रमवारीत तिने भारतीय क्रिकेटपटू रोहित शर्मालाही मागे टाकलं आहे. रोहित आजपर्यंत
१४८ टी ट्वेंटी सामने खेळला आहे. त्यानंतर न्यूझीलंडची सुझी बेट्स १४३, इंग्लंडची डेनी
वॅट १४१, पाकिस्तानचा शोएब मलिक १२४ तर न्यूझीलंडच्या मार्टिन गुप्टीलने १२२ टी ट्वेंटी
सामने खेळले आहेत.
****
‘द काश्मीर फाईल्स’ या चित्रपटाला दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय
फिल्मोत्सव पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं आहे. मुंबईत झालेल्या दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय
फिल्मोत्सव २०२३ या कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. आर आर आर या चित्रपटाला
इंटरनॅशनल फिल्म ऑफ द इयर पुरस्कार मिळाला. गंगूबाई काठियावाडी चित्रपटातल्या भूमिकेसाठी
आलिया भट हिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा तर ब्रह्मास्त्र चित्रपटातल्या भूमिकेसाठी
रणबीर कपूरला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार देण्यात आला. चित्रपट सृष्टीतल्या
योगदानासाठी ज्येष्ठ अभिनेत्री रेखा यांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं.
****
औरंगाबाद इथ जी-२० परिषदेसाठी येणारे प्रतिनिधी आणि पाहुणे
ज्या रस्त्यांचा वापर करणार आहेत त्या रस्त्यांवर सगळ्या मोठ्या आणि जुन्या झाडांवर
विद्युत रोषणाई करण्याचे निर्देश महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉक्टर अभिजीत चौधरी
यांनी दिले आहेत. विमानतळ, हर्सूल टी पॉईंट आणि ताज हॉटेल ते बीबी का मकबरापर्यंतचे
जुने आणि वापरात नसलेले बस थांबे त्वरित काढून घेण्याचे निर्देशही प्रशासकांनी दिले
आहेत.
****
येत्या पंचवीस आणि सव्वीस तारखेला पैठण इथे सर्वोदय स्नेह
संमेलन होणार आहे. ज्येष्ठ सर्वोदयी कार्यकर्ते शिवाजी कांगणीकर यांच्या हस्ते या संमेलनाचं
उद्घाटन होणार असून अध्यक्षस्थान निवृत्त न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी भूषवणार
आहेत. या संमेलनात तज्ज्ञांची व्याख्यानं, कार्यकर्त्यांची मनोगतं आणि सांस्कृतिक कार्यक्रम
होणार आहेत.या संमेलनाचं हे अमृतमहोत्सवी वर्ष आहे.
****
देशातल्या भरडधान्य उत्पादक शेतकऱ्यांच्या या शेतमालाची
आधारभूत किंमत निश्चित करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याची मागणी इंडिया अगेन्स्ट करप्शनचे
राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांनी केली आहे. यासंदर्भात लवकरच पंतप्रधानांनाही पत्र
पाठवणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. याशिवाय बेकरी पदार्थ, ब्रेड, नूडल्स अशा पदार्थात
किमान पंधरा ते वीस टक्के पौष्टिक भरडधान्याचा वापर बंधनकारक करायला हवा, अशी मागणीही
पाटील यांनी केली आहे.
****
लातूर जिल्ह्यात मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजनेंतर्गत
वैयक्तिक शेततळ्याचा लाभ देण्यात येणार आहे. जिल्ह्यात तीनशे पंचाण्णव शेततळी निर्माण
करण्याचं उद्दिष्ट शासनानं निश्चित केलं आहे. यासाठी जास्तीत जास्त पंचाहत्तर हजार
रुपयांपर्यंत अनुदान मिळणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी ‘महाडीबीटी’
पोर्टलवर अर्ज करण्याचं आवाहन लातूरचे जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी दत्तात्रय गावसाने
यांनी केलं आहे.
****
खाशाबा जाधव चषक या राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेला आजपासून
धुळे इथं सुरुवात होत आहे. फ्री स्टाईल, ग्रीको रोमन आणि महिला अशा तीन प्रकारांमध्ये
ही स्पर्धा होत असून, या स्पर्धेत देशभरातून सुमारे तीनशे साठ कुस्तीपटू सहभागी होत
आहेत.
****
No comments:
Post a Comment