Wednesday, 22 February 2023

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 22.02.2023 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date : 22 February 2023

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक : २२ फेब्रुवारी २०२ दुपारी १.०० वा.

****

राज्यातल्या सत्तासंघर्षावर आज सलग दुसऱ्या दिवशी सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यीय घटनापीठासमोर सुनावणी सुरू आहे. शिवसेना नेता निवड प्रक्रिया, एकनाथ शिंदे यांची गटनेते म्हणून निवड, प्रतोद नियुक्ती आदी मुद्यांवर ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद सुरू आहे. ठाकरे गटाच्या युक्तिवादानंतर शिंदे गटाचे वकील युक्तिवाद करतील. उद्या देखील ही सुनावणी सुरू राहणार आहे.

दरम्यान, शिवसेना पक्षनाव आणि धनुष्यबाण हे पक्षचिन्ह शिंदे गटाला देण्याच्या केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या ठाकरे गटाच्या याचिकेवर आज दुपारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.

***

ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे त्यांच्या सुरक्षेसाठी एक पोलीस उपनिरीक्षक आणि दोन पोलीस कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान राऊत यांनी काल केलेल्या आरोपानंतर ठाणे पोलिसांच्या विशेष पथकानं आज नाशिक इथं राऊत यांचा जबाब नोंदवून घेतला. राऊत यांनी मंगळवारी आपल्याला जीवे मारण्याचा कट असल्याचा गंभीर आरोप करणारं पत्र मुंबई आणि ठाणे पोलीस आयुक्तांना पाठवलं होतं. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली.

***

उत्तम संसदीय कामगिरीबद्दल देशातल्या १३ खासदारांना ‘संसद रत्न पुरस्कार जाहीर झाले आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील डॉ. अमोल कोल्हे, हिना गावित, फौजिया खान आणि गोपाळ शेट्टी यांचा समावेश आहे. येत्या २५ मार्च रोजी हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुरस्कार विजेत्या खासदारांचं अभिनंदन केलं आहे.

***

गुढीपाडवा तसंच डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त शिधापत्रिकाधारकांना १०० रुपयांत आनंदाचा शिधा देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं घेतला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज ही बैठक झाली. याचा लाभ एक कोटी ६३ लाख शिधा पत्रिकाधारकांना होईल. यापूर्वी दिवाळीत हा आनंदाचा शिधा देण्यात आला होता.

 

अंत्योदय अन्न योजना, प्राधान्य कुटुंब तसंच औरंगाबाद आणि अमरावती विभागातल्या सर्व आणि नागपूर विभागातल्या वर्धा अशा १४ शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातल्या दारिद्र्य रेषेवरील केशरी शेतकरी शिधा पत्रिकाधारकांना, एक किलो रवा, एक किलो चना डाळ, एक किलो साखर आणि एक लिटर पामतेल असा आनंदाचा शिधा गुढी पाडव्यापासून पुढील एक महिन्याच्या कालावधीसाठी ई -पॉसद्धारे १०० रुपये प्रतिसंच असा सवलतीच्या दरात दिला जाईल. ई-पॉसची व्यवस्था नसलेल्या ठिकाणी ऑफलाईन पद्धतीने हा शिधा दिला जाईल.

अहमदनगर जिल्ह्या अकोले तालुक्यातल्या उर्ध्व प्रवरा प्रकल्पाच्या कामास गती देण्यासाठी पाच हजार १७७ कोटी रुपये खर्चास सुधारित मान्यता देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. यामुळे ६८ हजार हेक्टर जमिनीला सिंचनाचा थेट लाभ होणार आहे.

***

जी-20 देशांच्या कृती गटाची पहिली बैठक आजपासून मध्य प्रदेशच्या खजुराहो इथं सुरू हो आहे. २५ फेब्रुवारीपर्यंत चालणाऱ्या या बैठकीत जी-20 गटाच्या सदस्य देशांचे १२५ पेक्षा जास्त प्रतिनिधी हजेरी लावतील. याअंतर्गत भारताच्या प्राचीन खजिन्याचं दर्शन घडवणारं प्रदर्शन आयोजित करण्यात आलं आहे.

***

सातवा वेतन आयोग लागू करण्याचे राहून गेलेल्या एक हजार ४१० शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग तात्काळ लागू करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. त्यामुळे विद्यापीठातील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी पुकारलेला बेमुदत संप आज मागे घेतला आहे.

***

औरंगाबाद इथल्या देवगिरी महाविद्यालयात आजपासून फुले-शाहू-आंबेडकर व्याख्यानमालेला सुरुवात होआहे. रायगड इथले शिवव्याख्याते प्रशांत देशमुख हे आजजगणं सुंदर आहेया विषयावर व्याख्यानमालेचं पहिलं पुष्प गुंफतील. उद्या विधिज्ञ उज्ज्वल निकम हे न्यायव्यवस्था आणि जनतेच्या अपेक्षा, या विषयावर आपले विचार मांडतील, तर परवा २४ फेब्रुवारीला ज्येष्ठ विचारवंत किशोर ढमाले हे फुले - शाहू -आंबेडकर यांच्या विचारांची प्रासंगिकता, या विषयावर तिसरं पुष्प गुंफणार आहेत. महाविद्यालयाच्या सभागृहात दररोज संध्याकाळी साडेपाच वाजता ही व्याख्यानमाला होणार आहे.

***

इजिप्तची राजधानी कैरो इथं सुरु असलेल्या आयएसएसएफ नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत भारताच्या रुद्रांक्ष पाटीलनं दहा मीटर एअर रायफल प्रकारात सुवर्णपदक पटकावलं. तिलोत्तमा सेन हीनं महिलांच्या दहा मीटर एयर रायफल प्रकारात कांस्य पदक जिंकलं. या स्पर्धेत भारत तीन सुवर्ण पदकांसह पदक तालिकेत पहिल्या क्रमांकावर आहे.

***

दक्षिण आफ्रिकेत सुरु असलेल्या महिला टी - ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारताचा उपान्त्य फेरीचा सामना उद्या ऑस्ट्रेलियासोबत होणार आहे. भारतीय वेळेनुसार संध्याकाळी साडे सहा वाजता सामन्याला सुरुवात होईल. तर स्पर्धेतला दुसरा उपान्त्य सामना परवा २४ तारखेला इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान होणार आहे.

//*************//

 

 

No comments: