Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date : 22 February
2023
Time : 07.10
AM to 07.25 AM
Language
Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक : २२ फेब्रुवारी २०२३ सकाळी ७.१०
मि.
****
ठळक
बातम्या
· शिवसेनेच्या
मुख्य नेतेपदी एकनाथ शिंदे यांची निवड, पक्षप्रमुख आणि कार्याध्यक्ष पद रद्द
· घटनेतल्या
दहाव्या सुचीप्रमाणे विधानसभा अध्यक्षांचे अधिकार, पक्ष, पक्षाध्यक्ष आणि बंडखोरांच्या
अधिकारांसह अनेक मुद्द्यांवर ठाकरे गटाचा घटनापीठासमोर जोरदार युक्तीवाद
· अन्न
महामंडळामार्फत २० लाख टन गव्हाची ई-लिलावाद्वारे खुल्या बाजारात विक्री करण्याची केंद्र
सरकारची घोषणा
· राज्य
माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावीच्या परीक्षेला प्रारंभ
· राज्यातल्या
अंगणवाड्यांमध्ये तीस हजारांहून जास्त मदतनीस आणि सेविकांची भरती प्रक्रिया सुरु
· बीड
जिल्ह्यात डोमरी इथल्या सोमदरा गुरुकुलचे संस्थापक सुदाम भोंडवे यांच्यासह चार जणांचं
अपघाती निधन
आणि
· द
काश्मीर फाईल्स चित्रपटाचा दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय फिल्मोत्सव पुरस्कार देऊन
गौरव
सविस्तर
बातम्या
केंद्रीय निवडणूक आयोगानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा
गट अधिकृत शिवसेना असल्याचा निर्णय दिल्यानंतर शिवसेनेच्या मुख्य नेतेपदी एकनाथ शिंदे
यांची निवड करण्यात आली आहे तर पक्षातील पक्षप्रमुख आणि कार्याध्यक्ष पद रद्द करण्यात
आलं आहे. काल मुंबईत झालेल्या शिवसेनेच्या कार्यकारिणीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात
आला. शिवसेनेत आजवर चालत आलेलं पक्षप्रमुख आणि कार्याध्यक्ष पद रद्द करण्यात आलं आहे.
पक्षविरोधात काम करणाऱ्यांना शिस्तपालन समितीला सामोरं जावं लागेल, असं यावेळी ठरवण्यात
आलं. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना भारतरत्न सन्मान द्यावा, राज्यात येणार्या
उद्योगांमध्ये स्थानिकांसाठी ८० टक्के नोकऱ्या द्याव्यात, वीरमाता अहिल्याबाई होळकर,
छत्रपती संभाजीराजे यांचं नाव राष्ट्रीय महापुरुषांच्या यादीत समाविष्ट करावं, मराठी
भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, मुंबईतील चर्चगेट स्टेशनला चिंतामणराव देशमुख यांचं
नाव द्यावं, आदी ठराव या बैठकीत करण्यात आले. पक्षाच्या शिस्तपालन समितीच्या प्रमुखपदी
मंत्री दादा भुसे यांची तर सदस्यपदी शंभुराज देसाई आणि संजय मोरे यांची नियुक्ती करण्यात
आली आहे. पक्षाचे सचिव म्हणून सिद्धेश कदम यांची नियुक्ती करण्याचा निर्णयही या बैठकीत
घेण्यात आला.
****
राज्यातल्या सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीश
धनंजय चंद्रचूड, यांच्या अध्यक्षतेखालच्या पाच सदस्यीय घटनापीठापुढे कालपासून पुन्हा
सुनावणी सुरु झाली. काल ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी दहा मुद्दे उपस्थित केले.
दहाव्या सुचीप्रमाणे विधानसभा अध्यक्षांना आमदारांच्या अपात्रतेचा अधिकार, पक्ष म्हणून
शिवसेनेचे अधिकार, पक्षाध्यक्ष म्हणून उद्धव ठाकरे यांचे अधिकार, एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासमवेत
आमदारांची बंडखोरी, त्याची वैधता अशा अनेक मुद्द्यांवर काल सिब्बल यांनी युक्तीवाद
केला. पक्षचिन्हावर निवडून आलेले आमदार वेगळा निर्णय घेऊ शकतात का, एकनाथ शिंदे यांच्यावर
पक्षाकडून अपात्रतेची कारवाई सुरू अस्ताना राज्यपालांनी शिंदे यांना सत्तास्थापनेसाठी
बोलावणं नियमबाह्य नाही का, एखाद्या आमदाराला अपात्र ठरवण्याच्या विधानसभा अध्यक्षांच्या
निर्णयात न्यायालय हस्तक्षेप करू शकतं का, पक्षांतर्गत वादाची समीक्षा न्यायालयाकडून
केली जाऊ शकते का, आदी मुद्यांवर सिब्बल यांनी यावेळी जोर दिला. आजही ठाकरे गटाचा युक्तिवाद
सुरू राहणार आहे.
दरम्यान, शिवसेना पक्षनाव आणि धनुष्यबाण हे पक्षचिन्ह शिंदे
गटाला देण्याच्या केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या ठाकरे गटाच्या
याचिकेवर आज दुपारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.
***
संसदेतलं शिवसेना संसदीय पक्षाचं कार्यालय शिंदे गटाला
देण्यात आलं आहे. निवडणूक आयोगानं शिवसेना हे नाव शिंदे गटाला दिल्यानंतर या गटाला
संसदेतलं शिवसेना कार्यालयही मिळावं, यासाठी गटनेते राहुल शेवाळे यांनी लोकसभा सचिवालयाला
पत्र दिलं होतं. लोकसभा सचिवालयानं शेवाळे यांना पत्र पाठवून शिवसेना पक्ष कार्यालयाचा
ताबा शिंदे गटाकडे सोपवला.
****
यंदाच्या अर्थसंकल्पात पायाभूत सुविधांचा विकास आणि भांडवली
खर्चावर भर देण्यात आला असून, सर्व क्षेत्र आणि सर्व राज्यांसाठी कुठलाही भेदभाव न
करता निधी दिला असल्याची माहिती केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांनी दिली आहे.
मुंबईत दूरदर्शनच्या अमृतकाळातील अर्थसंकल्प या डीडी कॉन्क्लेव्ह मध्ये ते काल बोलत
होते. अर्थसंकल्पात महाराष्ट्रासाठी केलेल्या तरतुदींची त्यांनी यावेळी माहिती दिली.
अर्थसंकल्पात सर्व राज्यांसाठी एक लाख ३० हजार कोटींची तरतूद, ६५ हजार प्राथमिक कृषी
सहकारी संस्थांसाठी तरतूद केली असून, आरोग्य क्षेत्राच्या तरतुदींमध्ये अडीच हजार कोटींची
वाढ केल्याचं कराड यांनी सांगितलं.
****
अन्न महामंडळामार्फत २० लाख टन गव्हाची ई-लिलावाद्वारे
खुल्या बाजारात विक्री करण्याची घोषणा केंद्र सरकारनं केली आहे. राखीव किंमतीमध्ये
कपात आणि अतिरिक्त २० लाख टन गव्हाच्या विक्रीमुळे गहू तसंच गव्हाच्या उत्पादनांचा
बाजारभाव कमी होण्यासाठी मदत होईल. गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखालच्या समितीनं
पीठ गिरण्या, खाजगी व्यापारी, खरेदीदार आणि गहू उत्पादनांचे उत्पादकांसाठी ई-लिलावाद्वारे
३० लाख टन गव्हाची विक्री करण्याचा निर्णय घेतला होता. खुल्या बाजार विक्री योजना धोरण
२०२३ नंतर, गहू आणि गव्हाच्या पिठाची किंमत कमी झाल्याचं ग्राहक व्यवहार मंत्रालयानं
म्हटलं आहे.
****
राज्य माध्यमिक
शिक्षण मंडळाची बारावीची परीक्षा कालपासून सुरू झाली. या परीक्षेसाठी राज्यभरातून १४
लाख ५७ हजाराहून अधिक विद्यार्थ्यांनी अर्ज भरले आहेत. या परीक्षेत माहिती तंत्रज्ञान
आणि सामान्यज्ञान या विषयांची परीक्षा ऑनलाईन पद्धतीनं होणार आहे. काल पहिल्याच इंग्रजीच्या
प्रश्नपत्रिकेत चूक आढळल्यानं विद्यार्थ्यांना सहा गुण देण्यात येणार आहेत.
औरंगाबाद जिल्ह्यात काल शांततापूर्ण वातावरणात विद्यार्थ्यांनी
इंग्रजी विषयाची परीक्षा दिली. जिल्ह्यातल्या दुर्गम भागातल्या सिरसाळा तांडा, सोयगाव,
सिल्लोड, अजिंठा इथं शिक्षणाधिकाऱ्यांच्या पथकानं विद्यार्थ्यांची तपासणी केली. पहिल्याच
दिवशी कॉपी करताना ३२ विद्यार्थ्यांना पकडण्यात आलं.
नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा
ठाकूर-घुगे यांनी काल जिल्ह्यातल्या विविध परीक्षा केंद्रांना भेटी दिल्या. जिल्हा
प्रशासनाच्या वतीनं सुरु असलेल्या कॉपीमुक्त अभियानाचं सर्व स्तरावर स्वागत झालं. या
वातावरणात परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचं घुगे यांनी फुलं देऊन स्वागत केलं. जिल्हाधिकारी
अभिजित राऊत यांनीही वाघाळा माध्यमिक आश्रमशाळा आणि पाणभोसी इथल्या परीक्षा केंद्रांना
भेट दिली.
जालन्याचे जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी तीन परीक्षा
केंद्रांना अचानक भेट दिली. सेवली इथल्या लोकमान्य विद्यालयात सहा आणि जिल्हा परिषद
शाळा या केंद्रात, तसंच गोषेगाव इथल्या सत्यशोध विद्यालयात कॉपी करणाऱ्या एका विद्यार्थ्यावर
कारवाई करण्यात आली.
****
राज्यातल्या एक लाख दहा हजार अंगणवाड्यांमध्ये तीस हजारांहून
जास्त मदतनीस आणि सेविकांची भरती प्रक्रिया सध्या सुरु आहे. सुरवातीला पदोन्नतीची प्रक्रिया
पूर्ण करण्यात येत असून, येत्या दहा मार्चनंतर नव्यानं सेविका आणि मदतनीस होऊ इच्छिणाऱ्या
महिलांसाठी अर्ज उपलब्ध होणार आहेत. यंदा प्रथमच सेविका पदासाठी बारावी उत्तीर्ण असण्याची
अट घालण्यात आली आहे.
****
आंतरराष्ट्रीय पौष्टिक भरडधान्य वर्षाचा एक भाग म्हणून
पणन विभागातर्फे आजपासून भरडधान्य महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. मुंबईत नरिमन पॉईंट
इथल्या यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये हा "मिलेट महोत्सव" आयोजित करण्यात आला
असून, या महोत्सवाचं उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
यांच्या हस्ते होणार आहे.
****
राज्य शासनाच्या महसूल आणि वन विभागाच्या वतीनं अहमदनगर
जिल्ह्यातल्या राहता तालुक्यात लोणी इथं आज आणि उद्या राज्यस्तरीय महसूल परिषद होणार
आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत परिषदेचं उद्घाटन तर उपमुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत समारोप होणार आहे. राज्याचे महसूल, पशुसंवर्धन आणि
दूग्ध व्यवसाय विकास मंत्री तथा अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील
यांनी काल लोणी इथं पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. नागरिकांची कामं पारदर्शकपणे आणि
निर्धारित मुदतीत पूर्ण करणं तसंच सर्वसमावेशक शासकीय धोरण निश्चित करण्यासाठी महसूल
परिषद महत्त्वाची ठरणार आहे, असं ते म्हणाले.
****
नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात विद्यार्थी केंद्र बिंदू
असेल तर त्याला त्याच्या मातृभाषेत परीक्षा देण्याची मुभा दिली पाहिजे, असं मत शिक्षा
संस्कृती उत्थान न्यासचे सचिव अतुल कोठारी यांनी व्यक्त केलं आहे. ते काल औरंगाबाद
इथं पश्चिम विभागीय कुलगुरु परिषदेच्या उद्धाटनपर भाषणात बोलत होते. ३६५ दिवसांच्या
शिक्षणाचं मूल्यांकन अवघ्या तीन तासांच्या परीक्षेत केलं जातं. या दरम्यान एखादा विद्यार्थी
आजारी पडला, अपघात झाला तर त्याचं पूर्ण वर्ष वाया जातं. त्यामुळे परीक्षा आणि मूल्यांकन
पद्धतीत बदल करणं आवश्यक आहे. नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात या बाबीचा विचार केला
पाहिजे, असं कोठारी यावेळी म्हणाले. भारतीय विद्यापीठ संघ आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर
मराठवाडा विद्यापीठाच्या वतीनं भरवण्यात आलेल्या या दोन दिवसीय परिषदेत सहा सत्रात
उच्च शिक्षणातील मूल्यमापन सुधारणांवर विचार मंथन केलं जाणार आहे.
****
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आपल्यावर हल्ला
करण्याचा कट रचला जात असल्यासंदर्भातलं पत्र ठाण्याच्या पोलिस आयुक्तांना दिलं आहे.
खासदार श्रीकांत शिंदे यांनी ठाण्यातल्या एका गुंडाला हल्ला करण्याची सुपारी दिली,
असा आरोप राऊत यांनी केला आहे. त्यांनी काल ट्विटरवर ही माहिती दिली.
****
बीड जिल्ह्यात पाटोदा तालुक्यातल्या डोमरी इथल्या सोमदरा
गुरुकुलचे संस्थापक सुदाम भोंडवे यांच्यासह चार जणांचं काल अपघाती निधन झालं. काल दुपारच्या
सुमारास पुणे-अहमदनगर रस्त्यावर, कारेगावनजीक रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कंटेनरवर
भोंडवे यांची काल आदळून हा अपघात झाला. मृतांमध्ये सुदाम भोंडवे यांच्यासह त्यांच्या
पत्नी सिंधुताई भोंडवे, सून अश्विनी भोंडवे आणि नात आनंदी भोंडवे यांचा समावेश आहे.
तर वाहन चालवत असलेला भोंडवे यांचा मुलगा अश्विन जखमी झाला. या अपघाप्रकरणी रांजणगाव
एमआयडीसी पोलिसांनी कंटेनर चालक बबलू लहरी चौहान याला अटक केली आहे.
****
द काश्मीर फाईल्स या चित्रपटाला दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय
फिल्मोत्सव पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं आहे. मुंबईत झालेल्या दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय
फिल्मोत्सव २०२३ या कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. आर आर आर या चित्रपटाला
इंटरनॅशनल फिल्म ऑफ द इयर पुरस्कार मिळाला. गंगूबाई काठियावाडी चित्रपटातल्या भूमिकेसाठी
आलिया भट हिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा तर ब्रह्मास्त्र चित्रपटातल्या भूमिकेसाठी
रणबीर कपूरला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार देण्यात आला. चित्रपट सृष्टीतल्या
योगदानासाठी ज्येष्ठ अभिनेत्री रेखा यांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं.
****
शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा बंद काल दुसऱ्या दिवशीही सुरू
राहिला. प्रमुख मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांनी वारंवार पाठपुरावा करूनही शासनानं कोणत्याही
प्रकारचा ठोस निर्णय घेतला नाही, असा आरोप करत, आजपासून हा संप आणखी तीव्र करण्यात
येणार असल्याचा इशारा कर्मचारी महासंघाचे राज्य उपाध्यक्ष डॉ. कैलास पाथ्रीकर यांनी
दिला आहे. दरम्यान, विद्यार्थी आणि प्राध्यापकांच्या दहा संघटनांनी या संपाला पाठिंबा
जाहीर केला आहे.
****
मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त
उद्या या संग्रामातले पहिले हुतात्मा वेदप्रकाश आर्य यांचा वीर बलिदान दिन साजरा करण्यात
येणार आहे. वीर बलिदान दिनाच्या अनुषंगाने उस्मानाबाद जिल्ह्यात सकाळी अकरा वाजता सगळी
शासकीय कार्यालयं, शाळा, महाविद्यालयं, ग्रामपंचायत कार्यालयं या ठिकाणी एक मिनीटाचं
मौन पाळून हुतात्मा वेदप्रकाश आर्य यांना अभिवादन करण्यात यावं, असं जिल्हाधिकारी सचिन
ओम्बासे यांनी सूचित केलं आहे.
****
औरंगाबाद इथं जी - २० परिषदेसाठी येणारे प्रतिनिधी आणि
पाहुणे ज्या रस्त्यांचा वापर करणार आहेत त्या रस्त्यांवर सगळ्या मोठ्या आणि जुन्या
झाडांवर विद्युत रोषणाई करण्याचे निर्देश, महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉक्टर
अभिजीत चौधरी यांनी दिले आहेत. विमानतळ, हर्सूल टी पॉईंट आणि ताज हॉटेल ते बीबी का
मकबरापर्यंतचे जुने आणि वापरात नसलेले बस थांबे त्वरित काढून घेण्याची निर्देशही प्रशासकांनी
दिले आहेत.
****
येत्या पंचवीस आणि सव्वीस तारखेला पैठण इथं सर्वोदय स्नेह
संमेलन होणार आहे. ज्येष्ठ सर्वोदयी कार्यकर्ते शिवाजी कांगणीकर यांच्या हस्ते या संमेलनाचं
उद्घाटन होणार असून, अध्यक्षस्थान निवृत्त न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी भूषवणार
आहेत. या संमेलनात तज्ज्ञांची व्याख्यानं, कार्यकर्त्यांची मनोगतं आणि सांस्कृतिक कार्यक्रम
होणार आहेत. या संमेलनाचं हे अमृतमहोत्सवी वर्ष आहे.
****
लातूर जिल्ह्यात मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजनेंतर्गत
वैयक्तिक शेततळ्याचा लाभ देण्यात येणार आहे. जिल्ह्यात तीनशे पंचाण्णव शेततळी निर्माण
करण्याचं उद्दिष्ट शासनानं निश्चित केलं आहे. यासाठी जास्तीत जास्त पंचाहत्तर हजार
रुपयांपर्यंत अनुदान मिळणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी ‘महाडीबीटी’ पोर्टलवर अर्ज करण्याचं आवाहन लातूरचे जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी दत्तात्रय
गावसाने यांनी केलं आहे.
****
परभणी इथं राज्य शासनाच्या जिल्हा कौशल्य विकास रोजगार
आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्राकडून सुशिक्षित बेरोजगारांसाठी 'पंडित दीनदयाल उपाध्याय
ऑनलाइन रोजगार मेळाव्याचं' परवा २४ फेब्रुवारीला आयोजन करण्यात आलं आहे. जिल्ह्यातल्या
जास्तीत-जास्त सुशिक्षीत बेरोजगार उमेदवारांनी मेळाव्यात सहभागी व्हावं, असं आवाहन
कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागाचे सहायक आयुक्त प्र. सो. खंदारे यांनी केलं
आहे.
****
औरंगाबाद जिल्ह्यात फुलंब्री इथं काल बनावट दारु बनवण्याचं
दोन हजार लीटर स्पिरीट घेऊन जाणारा ट्रक पोलिसांनी पकडला. या कारवाईत सुमारे २३ लाख
रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ट्रकचालक आणि त्याच्या सहकाऱ्याला पोलिसांना
ताब्यात घेतलं असून या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
****
लातूर महानगरपालिकेनं उर्वरित फेरीवाल्यांचं सर्वेक्षण
सुरू केलं आहे. पथविक्रेत्यांचं सर्वेक्षण पूर्ण न झाल्यामुळे सुरू करण्यात आलेलं हे
सर्वेक्षण येत्या अठ्ठावीस तारखेपर्यंत चालणार आहे. सर्वेक्षण न झालेल्या फेरीवाल्यांनी
या मोहिमेत सहभाग घ्यावा, असं आवाहन लातूर महानगरपालिकेनं केलं आहे.
****
धुळे नजिक लळिंग इथल्या पथकर नाक्याचा वित्तीय अधिकारी
हरीश सत्यवली याला सात लाख रुपयांची लाच घेताना काल पकडण्यात आलं. या पथकर नाक्याची
निविदा कोरल असोसिएट या कंपनीनं भरली असून, ती निविदा मंजूर व्हावी आणि परताव्याचे
३२ लाख मिळावे यासाठी कोरल कंपनीचे अधिकारी सत्यवली याच्याकडे पाठपुरावा करत होते.
त्यासाठी सत्यवली याच्यासह त्याच्या इलकॉम सोमा टोल वे प्रायवेट लिमिटेड या कंपनीच्या
अधिकार्यांनी ही लाच मागितली होती. या टोल कंपनीच्या दिल्ली इथल्या संचालकाविरुद्धही
गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
****
No comments:
Post a Comment