Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 04 September 2024
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०४ सप्टेंबर २०२४ दुपारी १.०० वा.
****
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत लातूर इथं महिला सक्षमीकरण मेळावा होत आहे. राज्यपाल सी पी राधाकृष्णन, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, लातूरचे पालकमंत्री गिरीष महाजन, मंत्री संजय बनसोडे, महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यावेळी उपस्थित आहेत. यावेळी राष्ट्रपतींच्या हस्ते मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण, तसंच मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतल्या लाभार्थींना लाभाचं वाटप करण्यात आलं.
तत्पूर्वी राष्ट्रपतींनी उदगीर इथं विश्वशांती बुद्ध विहाराचं उद्घाटन केलं.
राष्ट्रपती मुर्मू यांचं आज सकाळी नांदेड विमानतळावर राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन, खासदार अशोक चव्हाण जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, यांनी स्वागत केलं.
सायंकाळी साडे चार वाजेदरम्यान, राष्ट्रपती पुन्हा नांदेडला येणार असून, सव्वा पाच वाजता त्या तख्त श्री सचखंड हुजूर साहिब गुरुद्वाऱ्याला भेट देणार आहेत. सायंकाळी सहा वाजेदरम्यान नांदेड विमानतळावरून राष्ट्रपती दिल्लीकडे प्रयाण करतील.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ब्रुनेईचे सुलतान हाजी हसनल बोलकीया यांच्यात आज शिष्टमंडळस्तरीय चर्चा झाली. भारत आणि ब्रुनेई यांच्यात सामंजस्य करारांवर स्वाक्षरी आणि देवाणघेवाण झाली. दोन्ही नेत्यांनी संरक्षण, व्यापार आणि गुंतवणूक, ऊर्जा, अंतराळ तंत्रज्ञान, आरोग्य आणि औषधनिर्माण, क्षमता निर्माण, संस्कृती आणि लोकांशी संबंध या क्षेत्रांसह द्विपक्षीय संबंधांचा आढावा घेतला. परस्पर हिताच्या प्रादेशिक आणि जागतिक मुद्यांवरही दोन्ही नेत्यांनी विचार विनिमय केला. भारत विस्तारवादाच्या नाही तर विकासवादाच्या धोरणाचं समर्थन करतो, भारत आणि ब्रुनेई या उभय देशांदरम्यान व्यापारी आणि वाणिज्यीक संबंधांचा विस्तार करण्यात येईल, असं पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले. दोन्ही देशांदरम्यान सांस्कृतिक संबंध अधिक दृढ होत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं. ब्रुनेईच्या दौऱ्यानंतर पंतप्रधान मोदी सिंगापूरला रवाना झाले.
****
देशाची निर्यात जर वाढवायची असेल तर आपल्याला लॉजिस्टिक खर्च कमी करावा लागेल, त्यासाठी आपल्याला इंधनाचे इतर पर्याय निवडायला लागतील, असं केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीत फिक्कीच्या वतीनं आयोजित दुसऱ्या टनेलिंग इंडिया परिषदेत ते बोलत होते. समुद्राजवळ पूल उभारताना बांधकामात गंजरोधक स्टेनलेस स्टिलचा वापर व्हायला हवा, असं सांगून गडकरी यांनी, राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवरायांचा पुतळा तयार करण्यासाठी स्टेनलेस स्टिल वापरलं असतं तर तो कधीच कोसळला नसता, असं मत व्यक्त केलं.
****
राज्य परिवहन महामंडळ - एसटी कर्मचाऱ्यांना राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन मिळावं यासह अन्य मागण्यांसाठी राज्यातल्या एसटी कर्मचाऱ्यांनी कालपासून बेमुदत संप पुकारला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कृती समितीच्या सदस्यांसोबत आज मुंबईत बैठक बोलावली आहे. आज होणाऱ्या चर्चेतून मार्ग काढू, कर्मचाऱ्यांनी संप करु नये, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं आहे. तसंच ऐन सणासुदीच्या तोंडावर प्रवाशांची गैरसोय होईल, अशा प्रकारे कोणतीही कृती करू नये, असं आवाहन, राज्य मार्ग परिवहन महामंडळनं आपल्या कर्मचाऱ्यांना केलं आहे.
****
धाराशिव जिल्ह्यात तुळजापूर तालुक्यातल्या नळदुर्ग इथल्या मंडळ अधिकाऱ्याला दहा हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आलं. जयंत गायकवाड असं त्याचं नाव असून, तक्रारदाराच्या शेतात सपाटीकरण करण्यासाठी किरकोळ रॅायल्टी भरुन घेऊन कोणतीही कारवाई न करण्यासाठी, त्यानं ही लाच मागितली होती.
****
नांदेड जिल्ह्यातली पूर परिस्थिती ओसरू लागली आहे. विष्णुपुरी प्रकल्पाचे आता सहा दरवाजे उघडे आहेत. ६२ हजार २९४ घनफूट प्रतिसेकंद वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. गोदावरी नदीची पाणीपातळीही ३५५ मीटरवरून ३५० मीटरवर आली आहे. त्यामुळे नांदेड शहरात गोदावरी काठावरील अनेक सखल भागातलं पाणी आता ओसरत आहे.
हिंगोली जिल्ह्यात उर्ध्व पैनगंगा प्रकल्पाचा पाणीसाठा ९० टक्क्याच्या वर गेला आहे.
वाशिम जिल्ह्यात सततच्या पावसामुळे वाशिम शहराजवळील केकतउमरा शेत शिवारातील एकबुर्जी हा लघु जलसंचय प्रकल्प १०० टक्के भरला आहे. या प्रकल्पाच्या सांडव्यावरून पाणी वाहत असल्यानं नागरिकांनी सतर्कता बाळगण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत.
सातारा जिल्ह्यातलं कोयना धरण आज सकाळी शंभर टक्के भरलं आहे. यामुळे धरणाचे सहा वक्र दरवाजे एका फुटानं उघडण्यात आले असून, नदीपात्रात पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे.
****
No comments:
Post a Comment