Wednesday, 4 September 2024

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 04.09.2024 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजताचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 04 September 2024

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – ०४ सप्टेंबर २०२४ सायंकाळी ६.१०

****

·      महिलांच्या क्षमता ओळखून त्यांची स्वप्नं साकार करण्यासाठी पुरुषांनी पूर्ण सहकार्य करावं-उदगीरच्या महिला सक्षमीकरण मेळाव्यात राष्ट्रपतींचं आवाहन

·      देशात विजेवर चालणाऱ्या वाहनांचा वापर वाढावा यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील

·      लातूर जिल्ह्यात अतिवृष्टीने झालेल्या नुकसानाची मुख्यमंत्र्यांकडून पाहणी-तत्काळ पंचनाम्यांची ग्वाही

आणि

·      पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेत सांगलीच्या सचिन खिलारीला गोळाफेक प्रकारात रौप्यपदक

****

महिलांच्या क्षमता ओळखून त्यांची स्वप्नं साकार करण्यासाठी पुरुषांनी पूर्ण सहकार्य करण्याचं आवाहन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं आहे. त्या आज लातूर जिल्ह्यात उदगीर इथं महिला सक्षमीकरण मेळाव्यात बोलत होत्या. प्रत्येक क्षेत्रात महिलांची सक्रीय भागीदारी वाढवण्यासाठी बचत गटांची भूमिका महत्त्वाची असल्याचं त्यांनी नमूद केलं. महिला शिक्षित झाली, तर पूर्ण कुटुंब आणि भावी पिढी शिक्षित होते, हेच समीकरण आर्थिक सक्षमीकरणासाठी देखील लागू होतं, असं राष्ट्रपतींनी यावेळी सांगितलं. राज्य सरकार महिलांचं आरोग्य आणि पोषण सुधारण्यासाठी अनेक प्रयत्न करत असून महिलांनी आपल्या आरोग्याकडे लक्ष देण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं. त्या म्हणाल्या

प्रायः मातायें और बहनें परिवार के स्वास्थ का ध्यान तो देती है, लेकिन अपने भोजन और स्वास्थ का ध्यान नही रखती है। मै सभी बहनों से कहना चाहती हूं, की आप लोग अपने स्वास्थ पर भी ध्यान दें। बच्चों और परिवार की देखभाल करने मे अपने स्वास्थ को अनदेखा नही करना है। आपको आपने और आपके परिवार के भविष्य के लिये भी अपने स्वास्थ का ध्यान रखना होगा।

 

राजमाता जिजाबाई, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि सिंधुताई सपकाळ यांच्यासारख्या महान स्त्रियांचा महाराष्ट्राला वारसा लाभला आहे, त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन महिला निरंतर वाटचाल करत राहतील, आणि देशाची विकासगाथा लिहितील, असा विश्वास राष्ट्रपतींनी व्यक्त केला.

महाराष्ट्र सरकारने २५ कोटी महिलांना लखपती दीदी बनवण्याचं उद्दीष्ट ठेवलं, हे कौतुकास्पद असल्याचं त्या यावेळी म्हणाल्या. राज्यपाल सी पी राधाकृष्णन, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, लातूरचे पालकमंत्री गिरीश महाजन, मंत्री संजय बनसोडे, महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यावेळी उपस्थित होते. यावेळी राष्ट्रपतींच्या हस्ते मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण, तसंच मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतल्या लाभार्थींना लाभाचं वाटप करण्यात आलं.

उदगीर इथं उभारण्यात आलेल्या विश्वशांती बुद्ध विहाराचं लोकार्पण राष्ट्रपतींच्या हस्ते करण्यात आलं. तणावपूर्ण जीवनात ध्यानधारणेचं महत्त्व अनन्यसाधारण असून, या बुद्ध विहारात उभारलेल्या ध्यान कक्षाबद्दल त्यांनी राज्य सरकारचं कौतुक केलं.

हा कार्यक्रम आटोपल्यानंतर त्या हेलिकॉप्टरने नांदेड रवाना झाल्या. सायंकाळच्या सुमारास राष्ट्रपतींनी नांदेड इथं तख्त श्री सचखंड हुजूर साहिब गुरुद्वाऱ्याला भेट दिली. यावेळी झालेल्या विशेष प्रार्थनेतही त्या सहभागी झाल्या. यानंतर काही वेळातच, आपला तीन दिवसांचा महाराष्ट्र दौरा आटोपून नांदेड विमानतळावरुन राष्ट्रपती दिल्लीकडे प्रयाण करत आहेत.

****

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांनी गुरु ग्रंथ साहिबच्या प्रकाश पर्वानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. गुरु ग्रंथ साहिबची शिकवण ही जगातल्या लाखो लोकांना एकमेकांची सेवा करण्यास प्रवृत्त करत असल्याचं त्यांनी आपल्या सामाजिक माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. ही शिकवण जगाला सर्वोत्तम करण्यासाठी नेहमीच मार्गदर्शक ठरेल अशी आशा पंतप्रधानांनी व्यक्त केली आहे.

****

देशात विजेवर चालणाऱ्या वाहनांचा वापर वाढावा यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील असल्याचं केंद्रीय अवजड उद्योग मंत्री एचडी कुमारस्वामी यांनी म्हटलं आहे. विकसित भारत-इलेक्ट्रिक मोबिलिटी केंद्र या संकल्पनेवर नवी दिल्ली इथं पार पडलेल्या इलेक्ट्रिक मोबिलिटी अर्थात विजेवर चालणाऱ्या वाहनांच्या राष्ट्रीय परिषदेला ते संबोधित करत होते. देशात २०७० पर्यंत कार्बन उत्सर्जनाचं प्रमाण शून्य व्हावं हे सरकारचं उद्दिष्ट असल्याचंही ते यावेळी म्हणाले.

दरम्यान, हरीत हायड्रोजन आंतरराष्ट्रीय परिषदेची दुसरी फेरी येत्या ११ ते १३ सप्टेंबर दरम्यान नवी दिल्ली इथं होणार आहे. नवीन आणि पुर्ननवीकरणीय ऊर्जा विभागाचे मंत्री प्रल्हाद जोशी यांनी आज परिषदेच्या पूर्वतयारीचा आढावा घेतला. जागतिक पातळीवर विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्राशी संपर्क वाढवण्याच्या दृष्टीनं, या परिषदेत मिळणारी माहिती उपयुक्त ठरेल, असं ते यावेळी म्हणाले.

****

उपराष्ट्रपती तथा राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांनी राज्यसभेच्या पाच नवनिर्वाचित सदस्यांना आज संसद भवनात सदस्यत्वाची शपथ दिली. यामध्ये महाराष्ट्रातले भाजपचे धैर्यशील पाटील यांचा समावेश होता.

****

एसटी कर्मचाऱ्यांनी संप करु नये, असं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. राज्यातल्या एसटी कर्मचाऱ्यांनी कालपासून बेमुदत संप पुकारला आहे, त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री बोलत होते. एसटी कर्मचारी कृती समितीच्या सदस्यांसोबत आज मुंबईत होत असलेल्या चर्चेतून मार्ग काढू, असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं आहे. शनिवारपासून सुरू होत असलेल्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची गैरसोय होईल, अशा प्रकारे कोणतीही कृती करू नये, असं आवाहन, राज्य मार्ग परिवहन महामंडळनंही आपल्या कर्मचाऱ्यांना केलं आहे.

****

लातूर जिल्ह्यात उदगीर तालुक्यातील हेर आणि लोहारा शिवारात अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पाहणी केली. यावेळी त्यांनी बांधावर जावून शेतकऱ्यांशी बांधवांशी संवाद साधला. नुकसानग्रस्त शेतपिकांचे पंचनामे तत्काळ करण्यात येतील तसंच सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं असून त्यांना योग्य ती मदत त्वरीत दिली जाईल असे आश्वासन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी यावेळी दिले.

****

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानाचे पंचनामे तत्काळ करावे अशा सूचना जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी प्रशासनाला दिल्या आहेत. सत्तार यांनी आज दुरदृष्यप्रणालीद्वारे यासंदर्भात आढावा बैठक घेतली, त्यावेळी ते बोलत होते. अतिवृष्टीने बाधित शेतकऱ्यांना मदतीच्या अनुषंगाने प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी संबंधितांना दिल्या.

****

धाराशिव जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे २८५ गावातल्या ६ हजार ५४० शेतकऱ्यांचं सहा हजार ६७ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचं नुकसान झालं आहे. कृषी विभागाच्या प्राथमिक अंदाजात ही माहिती देण्यात आली आहे. यामध्ये सोयाबीन, मका, कांदा, डाळिंब, यांसारख्या पिकांचं मोठं नुकसानं झालं आहे.

****

बीड जिल्ह्यात ६११ गावांत दोन लाख ३ हजार ४१५ हेक्टरवरील पिकांचं पावसामुळे नुकसानं झालं आहे. याबाबतच्या नुकसानीचा प्राथमिक अहवाल जिल्हा कृषी अधीक्षक बाबासाहेब जेजुरकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सादर केला आहे.

****

परभणी जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाची कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी आज पाहणी केली, तसंच तत्काळ पंचनामे करण्याचे निर्देश दिले. मुंडे यांनी गावागावांना भेटी देऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला तसंच सर्वोतपरी मदत करण्याचं आश्वासन दिलं.

****

पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेत आज गोळाफेक एफ ४६ प्रकारात भारताच्या सचिन खिलारीनं रौप्यपदकाची कमाई केली आहे. सचिन हा महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातल्या करगणी इथला रहिवासी आहे. त्याने १६ पूर्णांक ३२ मीटर अंतरावर गोळा फेकत रौप्य पदक पटकावलं. या कामगिरीबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्याचं अभिनंदन केलं आहे. या स्पर्धेत भारताने आतापर्यंत तीन सुवर्ण, नऊ रौप्य आणि नऊ कांस्य पदकं, अशी एकूण २१ पदकं जिंकली आहेत. पॅरालिम्पिक स्पर्धेतल्या या खेळाडूंची कामगिरी ही शाश्वत उत्कृष्टतेची उदाहरणं असून त्यांचं यश इतर खेळाडूंना प्रेरणा देईल, असं राष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलं आहे.

****

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत पुढच्या टप्प्यात ५ लाख उद्योजक घडवणार असल्याचं महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी म्हटलं आहे. ते आज छत्रपती संभाजीनगर इथं महामंडळ कर्जमेळावा आणि उद्योजकीय प्रदर्शनाच्या उद्धाटनप्रसंगी बोलत होते. महामंडळाच्या योजनेचा लाभ घेऊन राज्यात एक लाख तर जिल्ह्यात १० हजार उद्योजक तयार झाल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. मराठा समाजातील तरुणांनी व्यवसायाचे अर्थकारण समजून घेवून अर्थकारणात प्रगती करावी असं ते यावेळी म्हणाले.

****

धाराशिव इथं प्रौढ बीसीजी लसीकरण मोहिमेचं जिल्हास्तरीय उद्घाटन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सतीश हरिदास यांच्या हस्ते करण्यात आलं. ६० वर्षावरील सर्व व्यक्तींना ही लस देण्यात येणार असून १८ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या निवडक व्यक्तींचाही लसीकरणात समावेश असेल. गेल्या पाच वर्षात उपचार पूर्ण झालेले क्षयरुग्ण, त्यांच्या सहवासातल्या व्यक्ती, कुपोषित, मधुमेही आणि धूम्रपान करणारे अशा व्यक्तींना त्यांची संमती घेऊन लस देण्यात येणार आहे.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 26.04.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 26 April 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...