Thursday, 5 September 2024

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 05.09.2024 रोजीचे दुपारी 01.00 वाजताचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date 05 September 2024

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०५ सप्टेंबर २०२ दुपारी १.०० वा.

****

सिंगापूर दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सिंगापूरचे पंतप्रधान लॉरेंस वाँग यांच्यात बैठक झाली. दोन्ही देशांमधल्या प्रतिनिधिमंडळ स्तरीय चर्चेनंतर, काही सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या झाल्या. यामध्ये डिजिटल तंत्रज्ञान, आरोग्य आणि औषधं, शिक्षण आणि कौशल्य विकास आदी क्षेत्रांचा समावेश आहे. तसंच भारत - सिंगापूर सेमीकंडक्टर परिसंस्था भागीदारी बाबतही सामंजस्य करार झाला.

प्रत्येक विकसनशील देशासाठी सिंगापूर हे प्रेरणास्थान असून, भारतात अनेक सिंगापूर करण्याची आमची इच्छा असल्याचं पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले.

तत्पूर्वी आज सकाळी पंतप्रधान मोदी यांचं सिंगापूरच्या संसद भवनात स्वागत झालं. या दौऱ्यात पंतप्रधान विविध उद्योगकंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी संवादही साधणार आहेत.

****

जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्याची अधिसूचना आज जारी झाली. या टप्प्यात चार विधानसभा मतदरासंघांमध्ये एक ऑक्टोबरला मतदान होणार आहे. निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात अर्ज दाखल करण्याची मुदत आज संपत आहे.     

हरियाणा विधानसभा निवडणुकीची अधिसूचना देखील निवडणूक आयोगानं आज जारी केली. विधानसभेच्या ९० जागांसाठी येत्या पाच ऑक्टोबरला एकाच टप्प्यात मतदान होणार आहे.

****

 

माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती आज देशभरात शिक्षक दिन म्हणून साजरी होत आहे. यानिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज नवी दिल्ली इथं राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारांचं वितरण केलं जाणार आहे. देशभरातल्या ८२ शिक्षकांना हे पुरस्कार प्रदान केले जातील. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातले कलाशिक्षक सागर बगाडे आणि गडचिरोली जिल्ह्यातले मंतैय्या बेडके यांचा समावेश आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्ण यांना अभिवादन करत, शिक्षक दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.

****

मराठी चित्रपट धोरण निर्मितीसाठी सांस्कृतिक विभागाच्या वतीने समिती गठित करण्यात येणार आहे. सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मराठी चित्रपट अनुदानासंदर्भात आयोजित बैठकीत ही माहिती दिली. मराठी चित्रपटांना व्यापक व्यावसायिक संधी मिळण्याच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे. यासोबतच नागपूर इथं शंभर एकर परिसरात भव्य चित्रनगरी निर्माण करण्यासाठी आवश्यक कार्यवाही सुरु करण्याची सूचना मुनगंटीवार यांनी संबंधित विभागाला दिल्या आहेत. अनुदानास पात्र ठरलेल्या चित्रपटात महिला दिग्दर्शिका असल्यास, चित्रपटाला अतिरिक्त पाच लाख रुपयांची प्रोत्साहनपर रक्कम देण्यात येईल, असं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.

****

काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी आज नांदेड जिल्ह्यात नायगाव इथं काँग्रेसचे दिवंगत खासदार वसंतराव चव्हाण यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन, सांत्वन केलं. यावेळी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विरोधी पक्ष नेते विजय वड्डेट्टीवार आदी उपस्थित होते.

****

मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाद्वारे रूग्णांच्या मदतीसाठी दोन वर्षात ३२१ कोटी रुपये अर्थसहाय्य वितरित करण्यात आलं आहे. सहायता कक्षाच्या मुंबई कार्यालयामधून २९२ कोटी, तर नागपूर कार्यालयाद्वारे २८ कोटी रुपयांचं अर्थसहाय्य रुग्णांना करण्यात आलं. याचा फायदा चाळीस हजारहून अधिक रुग्णांना झाला आहे. दुर्धर आजारांनी ग्रस्त रुग्णांनी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीचा लाभ घेण्याचं आवाहन कक्ष प्रमुख मंगेश चिवटे यांनी केलं आहे.

****

जालना जिल्ह्यातल्या सर्व शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणीची नोंदणी तातडीने करावी, असं आवाहन जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी केलं आहे. जे शेतकरी ई-पीक पाहणी अॅप प्रणालीवर त्यांचा पीक पेरा नोंदणी करतील, त्यांनाचं पीक कर्ज, पीक विमा, नुकसान भरपाईसह इतर शासकीय योजनाचा लाभ मिळणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.

****

सार्वजनिक गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर, छत्रपती संभाजीनगर इथं मंडपांची तसंच ध्वनिप्रदुषण नियमांची अंमलबजावणी होण्याच्या दृष्टिने तपासणी करण्यासाठी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. काल याबाबत झालेल्या बैठकीत, उपविभागीय दंडाधिकारी डॉ. व्यंकट राठोड यांनी ही माहिती दिली. या पथकांमध्ये महानगरपालिकेचे वार्ड अधिकारी, महसूल विभागाचे अधिकारी, पोलीस अधिकारी यांचा समावेश करण्यात आला आहे. दरम्यान, गणेशोत्सव काळात कायदा तसंच सुव्यवस्थेचे पालन करण्याचं आवाहन राठोड यांनी नागरिकांना केलं आहे.

****

तुळजापूर इथं श्री तुळजाभवानी मातेच्या मंदिर आणि परिसराच्या विकासासाठी ५८ कोटी १२ लाख रुपयांना मान्यता देण्यात आली आहे. पुरातत्व विभागाने या कामांची निविदा प्रसिद्ध केल्याची माहिती, जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांनी दिली.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 27.04.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 27 April 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...