Thursday, 5 September 2024

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 05.09.2024 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजताचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 05 September 2024

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – ०५ सप्टेंबर २०२४ सायंकाळी ६.१०

****

·      शिक्षकी पेशा हे मानव निर्माणाचं पवित्र अभियान-राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्रदान सोहळ्यात राष्ट्रपतींचं प्रतिपादन-राज्यशासनाचे क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले शिक्षक गुणगौरव पुरस्कार प्रदान

·      कोकणातलं अतिरिक्त पाणी मराठवाड्यात वळवण्यासाठीच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता

·      मराठवाडा आणि विदर्भासह राज्यात १ लाख कोटी रुपये गुंतवणुकीच्या चार प्रकल्पांना मान्यता

आणि

·      आदिवासी समाजाच्या विविध मागण्यांसाठी हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

****

शिक्षकी पेशा ही फक्त नोकरी नाही, तर मानव निर्माणाचं पवित्र अभियान असल्याचं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं आहे. आज शिक्षक दिनी, नवी दिल्लीत राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान करण्यात आले, त्यावेळी त्या बोलत होत्या. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना स्त्रियांचा सन्मान राखण्याची शिकवण देण्याची आवश्यकता राष्ट्रपतींनी नमूद केली.

विद्यार्थ्यांची कामगिरी खालावत असेल, तर शिक्षण व्यवस्था आणि शिक्षकांची जबाबदारी वाढत असल्याचं मत, राष्ट्रपतींनी व्यक्त केलं. त्या म्हणाल्या

 

कोई बच्चा यदी अच्छा प्रदर्शन नही कर पाता है तो, इसमे शिक्षण व्यवस्था और शिक्षकों की ज्यादा जिम्मेदारी बनती है। किसी भी शिक्षा प्रणाली की सफलता में सबसे महत्वपूर्ण भूमिका शिक्षकों की होती है। शिक्षक की केवल एक नौकरी नही है, ये मानव निर्माण का पवित्र अभियान है। शिक्षकों को प्रत्येक बच्चे की नैसर्गिक प्रतिभा को पहचानकर उसे उसी तरह की मदत देना चाहीये और आगे बढाना चाहिये।

 

या कार्यक्रमात देशभरातल्या ८२ शिक्षकांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातले कलाशिक्षक सागर बगाडे आणि गडचिरोली जिल्ह्यातले मंतैय्या बेडके यांचा समावेश आहे. ५० हजार रुपये, रौप्य पदक आणि प्रशस्तीपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप आहे.

 

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्ण यांना अभिवादन करत, शिक्षक दिनानिमित्त सर्व शिक्षकांना शुभेच्छा दिल्या. कोवळ्या मनाला घडवणाऱ्या सर्व शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस, असल्याचं त्यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे.

****

मुंबई इथं क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार आज प्रदान करण्यात आले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधानसभेचे अध्यक्ष विधीज्ञ राहुल नार्वेकर, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांनी यावेळी बोलतांना, शिक्षकांच्या योगदानाशिवाय देश प्रगतीपथावर जाऊ शकत नाही. शिक्षक दिन हा शिक्षकांचं समर्पण, योगदान आणि मार्गदर्शनाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस असल्याची भावना व्यक्त केली.

तर केसरकर यांनी यावेळी बोलतांना, राज्यातल्या शिक्षणाचा दर्जा वाढून गुणवंत महाराष्ट्र घडवण्यात शिक्षकांचे योगदान मोलाचे असेल, यासाठी शासनामार्फत विद्यार्थी, शिक्षक आणि शाळांना सर्व सोयी सुविधा पुरविण्यात येत असल्याचं सांगितलं. या कार्यक्रमात १०९ शिक्षकांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं.

****

दिव्यांग प्रवाशांना महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ एसटी मध्ये सर्व प्रकारच्या बसमध्ये आरक्षित आसन कायमस्वरूपी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दिव्यांग प्रवासी कोणत्याही थांब्यावर बसमध्ये चढल्यानंतर त्यांना ते आसन तातडीने उपलब्ध करुन देण्याची जबाबदारी संबंधित वाहकाची असणार आहे. दिव्यांगांना बसमध्ये चढणे तसंच उतरतांना चालक वाहकांनी सर्वतोपरी मदत करावी असे निर्देश संबंधित विभागाकडून देण्यात आले आहेत.

****

कोकणातील अतिरिक्त पाणी मराठवाड्यात वळवण्यासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. जलसंपदा विभागाकडून आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ही माहिती देण्यात आली. कोकण खोऱ्यातून एकूण ५४ पूर्णांक ७० टीएमसी अतिरिक्त पाणी वळवणे शक्य असून, याकरिता सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी ६१ कोटी ५२ लाख रुपये किमतीस प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. या प्रकल्पामुळे मराठवाड्यात सुमारे दोन लाख ४० हजार हेक्टर आणि कोकणातील सुमारे ३५ हजार हेक्टर क्षेत्रास सिंचन, पेयजल तसंच औद्योगिक वापरासाठी पाणी उपलब्ध होणार आहे

****

राज्यातील मराठवाडा आणि विदर्भासह पुणे तसंच पनवेल इथं १ लाख १७ हजार २२० कोटी रुपये गुंतवणुकीच्या उच्च तंत्रज्ञानावर आधारित ४ विशाल प्रकल्पांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मान्यता दिली. उद्योग विभागाच्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या प्रकल्पांमुळे राज्यात सेमीकंडक्टर आणि इलेक्ट्रीक वाहन निर्मितीमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक, तसंच सुमारे २९ हजार रोजगार निर्मिती होणार आहे, यामुळे महाराष्ट्राची ओळख ही इलेक्ट्रिक वाहन निर्मिती क्षेत्रामध्ये अग्रेसर राज्य अशी होणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

****

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात, विधी आणि न्याय विभागा अंतर्गत, पैठण आणि गंगापूर इथं जिल्हा अतिरिक्त न्यायालयाची स्थापना तर हिंगोली इथं स्वतंत्र न्यायिक जिल्हा न्यायालय स्थापन करण्यात येणार आहे. आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यासोबतच पुणे-छत्रपती संभाजीनगर सध्याच्या राष्ट्रीय महामार्गाची सुधारणा करण्यात येईल, अंगणवाडी केंद्रांना सौर ऊर्जा संच देण्यात येतील, थकबाकी देणाऱ्या कुक्कुटपालन संस्थांना दंडनीय व्याजाची रक्कम माफ करण्यात येईल, विहिरी, शेततळे, वीज जोडणीसाठी भरीव अनुदान देण्यात येईल, अहमदनगर जिल्ह्यात शेवगाव तालुक्यातल्या सोनेसांगवी पिंगला सहकारी सूतगिरणीस शासकीय अर्थसहाय्य, तसंच बीड जिल्ह्यात धारुर तालुक्यातल्या सुकळी या गावाचं विशेष भाग म्हणून पुनर्वसन करण्याचा निर्णय आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.

राज्यात उजनी, कोयना आणि जायकवाडीसह मोठी धरणे २०१८ नंतर प्रथमच १०० टक्के भरत असल्याची माहिती जलसंपदा विभागानं मंत्रिमंडळ बैठकीत दिली. गेल्या वर्षी याच सुमारास या धरणांमध्ये सुमारे ६५ टक्के पाणी साठा होता.

****

श्री चक्रधर स्वामी यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून महानुभाव पंथाच्या रिद्धपूर, भिष्णूर, जाळीचा देव, पोहीचा देव, पांचाळेश्वर या देवस्थानांसह राज्याच्या ग्रामीण भागातील ८ देवस्थानांच्या सुमारे २७५ कोटींच्या विकास आराखड्यांना आज झालेल्या शिखर समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.

****

महाराष्ट्र इमारत तसंच इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या नोंदणी आणि नूतनीकरणासह सर्व सुविधा एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यासाठी राज्यात तालुका कामगार सुविधा केंद्रांचं आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते, दूरदृश्य प्रणालीद्वारे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी बांधकाम कामगारांच्या सुविधेकरिता तयार करण्यात आलेल्या माहिती पुस्तिकेचं प्रकाशनही करण्यात आले.

****

 

महानुभाव पंथाचे संस्थापक, चक्रधर स्वामी यांची आज जयंती. यानिमित्त राज्यात विविध कार्यक्रमातून त्यांना आदरांजली वाहण्यात येत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात चक्रधर स्वामींना आदरांजली अर्पण केली आहे.

****

जातीव्यवस्था कायम राखण्याचा भारतीय जनता पक्षाचा उद्देश असल्याचा आरोप लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केला आहे. सांगली जिल्ह्यात कडेगाव इथं माजी मंत्री दिवंगत पतंगराव कदम यांच्या पुतळ्याचं अनावरण केल्यानंतर ते आज बोलत होते.

दरम्यान, राहुल गांधी यांनी आज नांदेड जिल्ह्यात नायगाव इथं काँग्रेसचे दिवंगत खासदार वसंतराव चव्हाण यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन, सांत्वन केलं. यावेळी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विरोधी पक्ष नेते विजय वड्डेट्टीवार आदी नेते उपस्थित होते.

****

मुंबईत मालाड इथं आज एका २३ मजली निर्माणाधीन इमारतीचा २० साव्या मजल्यावरील छताच्या काही भाग कोसळला. यात घटनेत तीन जणांचा मृत्यू झाला तर तीन जण जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

****

हिंगोली इथं आदिवासी समाजाच्या वतीनं विविध मागण्यांसाठी आज मोर्चा काढण्यात आला. राज्यात विविध शासकीय कार्यालयांमधील अनुशेषाची ५५ हजारांवर असलेली रिक्त पदे तातडीने भरावीत, १२ हजार ५०० अधिसंख्य पदं विशेष मोहिमेद्वारे भरावी, यासह अन्य मागण्या यावेळी करण्यात आल्या. माजी आमदार डॉ. संतोष टार्फे, आदिवासी युवक कल्याण संघाचे जिल्हाध्यक्ष डॉ. सतीश पाचपुते यांच्या नेतृत्वात, शहरातल्या छत्रपती शिवाजी महाराज पुतळा इथून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला तसंच मागण्यांचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं. हिंगोली तालुक्यासह, कळमनुरी, सेनगाव, औंढा नागनाथ, वसमत तालुक्यातील आदिवासी बांधव मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी झाले होते.

****

जालना जिल्ह्यातल्या सर्व शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणीची नोंदणी तातडीने करावी, असं आवाहन जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी केलं आहे. जे शेतकरी ई-पीक पाहणी अॅप प्रणालीवर त्यांचा पीक पेरा नोंदणी करतील, त्यांनाच पीक कर्ज, पीक विमा, नुकसान भरपाईसह इतर शासकीय योजनाचा लाभ असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.

****

सातारा जिल्ह्यातल्या कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पाण्याची आवक वाढत आहे. धरणातून ५२ हजार ५४२ घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. यामुळे काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पैठण इथल्या जायकवाडी धरणात पाण्याची आवक मंदावली आहे.

****

No comments:

Text - آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر‘علاقائی اُردو خبریں: بتاریخ: 28 اپریل 2026‘ وقت: صبح 09:00 تا 09:10

  Regional Urdu Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 28 April-2026 Time: 09:00-09:10 am آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر علاقائی خبریں...