Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 05 September
2024
Time 11.00 to 11.05
AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: ०५ सप्टेंबर २०२४ सकाळी ११.०० वाजता.
****
माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती आज देशभरात शिक्षक दिन म्हणून साजरी होत आहे. यानिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज नवी दिल्ली इथं राष्ट्रीय
शिक्षक पुरस्कारांचं वितरण केलं जाणार
आहे. देशभरातल्या ८२ शिक्षकांना हे पुरस्कार
प्रदान केले जातील. यामध्ये कोल्हापूर
जिल्ह्यातले कलाशिक्षक सागर बगाडे आणि गडचिरोली
जिल्ह्यातले मंतैय्या बेडके यांचा समावेश आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी
यांनी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्ण यांना अभिवादन करत, शिक्षक दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.
दरम्यान, शिक्षक दिनानिमीत्त राष्ट्रपती भवनाच्या आवारातलं अमृत उद्यान आज सर्व शिक्षकांसाठी खुलं आहे.
****
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव सोहळ्याचं आज
मुंबईत आयोजन करण्यात आलं आहे. यामध्ये राज्य सरकार तर्फे १०९ शिक्षकांचा सन्मान केला जाणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या
शिक्षकांना सन्मानित करण्यात येणार आहे.
****
मुंबईत आयोजित २७ व्या
राष्ट्रीय ई- गव्हर्नन्स परिषदेचा काल समारोप झाला. केंद्रीय मंत्री डॉ जितेंद्र
सिंग यांनी दूरदृश्यप्रणालीच्या माध्यमातून या कार्यक्रमात मार्गदर्शन केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या
कारकीर्दीत देशात वेगानं महत्वाच्या सुधारणा झाल्या, असं
त्यांनी सांगितलं. केवळ दहा वर्षांच्या काळात अनेक जुने कायदे रद्द करणं आणि
व्यवस्था सुलभ करणं शक्य झालं. या
सर्व प्रवासाचा उद्देश सरकारला लोकांपर्यंत आणणं आहे, असं
जितेंद्र सिंग म्हणाले.
****
केंद्रीय कृषी
मंत्रालयाच्या कृषी पायाभूत सुविधा निधी योजनेअंतर्गत देण्यात येणारा यंदाचा कृषी पायाभूत निधी सर्वोत्कृष्टता
पुरस्कार महाराष्ट्राला मिळाला आहे. तसंच २०२२-२३ या वर्षासाठी राज्याला दुसऱ्या क्रमांकाचा
पुरस्कार मिळाला. नवी दिल्लीत काल झालेल्या
समारंभात केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या हस्ते हा पुरस्कार
प्रदान करण्यात आला.
****
महिला आणि अल्पवयीन
मुलींसंदर्भातल्या गुन्ह्यांसाठी ज्या गुन्हेगारांना फाशीची शिक्षा सुनावली आहे, असे
गुन्हेगार अनेकदा दयेचा अर्ज करतात. त्यांचा दयेचा अर्ज नाकारण्यात यावा, अशी विनंती
विधानपरिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोऱ्हे यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना केली आहे. गोऱ्हे यांनी
काल मुंबईत राष्ट्रपतींची भेट घेऊन त्यांना याबाबतचं निवेदन सादर केलं. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर आरोपींकडून
आलेले दयेचे अर्ज अनेकदा प्रलंबित
राहतात आणि त्यामुळे आरोपीला फाशीची शिक्षा सुनावल्यानंतरही त्याची अंमलबजावणी करता येत नाही. तसंच अशा
खटल्यांच्या निकालाला लागणारा वेळ कमी करण्यासाठी
कमिशनर ऑफ विमेन राइट्स म्हणजेच महिलांच्या संदर्भातले आयुक्त हे विधी आणि न्याय विभागाचे नेमावेत, असं या निवेदनात म्हटलं आहे.
****
महायुतीनं रिपब्लिकन
पक्षाच्या कार्यकर्त्यांना सत्तेत सहभाग द्यावा
आणि सन्मान द्यावा अशी अपेक्षा, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले
यांनी व्यक्त केली आहे. केंद्रीय
मंत्रीमंडळात तिसऱ्यांदा सहभागी
झाल्याबद्दल रिपब्लिकन कार्यकर्त्यांनी काल
मुंबईत आठवले यांचा सत्कार केला, त्यावेळी ते बोलत होते. रिपब्लिकनच्या कार्यकर्त्यांना ‘महायुती सरकार आपल्या दारी’ आणि ‘लाडकी बहिण’ योजनेच्या
कार्यक्रमांमध्ये डावललं जातं, इतर शासकीय कार्यक्रमांनाही निमंत्रित केलं जात नाही, याबद्दल आठवले यांनी नाराजी व्यक्त केली. रिपब्लिकन कार्यकर्त्यांना महामंडळं, जिल्हा
नियोजन समिती यासारख्या ठिकाणी नेमणूक
देऊन सत्तेत सहभागी करुन घ्यावं, अशी सूचना त्यांनी केली.
****
व्हेल माशाच्या उलटीच्या
तस्करीप्रकरणी रत्नागिरी जिल्ह्यात चिपळूण
तालुक्यातल्या मौजे वालोपे इथं चार जणांना वन विभागानं ताब्यात घेतलं आहे. त्यांच्याकडून सुमारे पावणेतीन किलो अंबरग्रीस आणि दोन दुचाकी वाहनं जप्त
केली आहेत. या चौघांविरुद्ध वन्यजीव संरक्षण कायद्याअतर्गत कारवाई केली असून, अधिक तपास
सुरू आहे. व्हेल माशाच्या उलटीला
अंबरग्रीस म्हटलं जातं. सुगंधी उत्पादनांमध्ये
नैसर्गिक घटक म्हणून तिचा वापर होत असल्यानं
तिला मोठी किंमत असते.
****
तुळजापूर इथं श्री तुळजाभवानी मातेच्या मंदिर आणि परिसराच्या विकासासाठी ५८ कोटी १२ लाख रुपयांना मान्यता देण्यात आली आहे. पुरातत्व विभागाने या कामांची निविदा प्रसिद्ध केली आहे. मंदिर संस्थानचे
अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांनी काल पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. पुरातत्त्व खात्याच्या
मार्गदर्शनाखाली या विकास कामांना सुरुवात करण्यात येणार आहे.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पैठण इथल्या जायकवाडी धरणात पाण्याची आवक मंदावली आहे. धरणाचा पाणीसाठा ९२ टक्क्यापर्यंत पोहोचला आहे.
****
तिरुपती इथून आदिलाबाद कडे
येणारी कृष्णा एक्स्प्रेस उशिरा धावत असल्यामुळे, आज
आदिलाबाद-नांदेड आणि नांदेड - आदिलाबाद
इंटर सिटी एक्स्प्रेस रद्द करण्यात आली आहे.
****
No comments:
Post a Comment