Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date
– 06 September 2024
Time
18.10 to 18.20
Language
Marathi
आकाशवाणी
छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक
बातम्या
दिनांक
– ०६ सप्टेंबर २०२४
सायंकाळी ६.१०
****
·
जलसंचयाचा थेट संबंध आर्थिक
प्रगतीशी असून, पाण्याचं योग्य व्यवस्थापन गरजेचं
असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन
·
देशातल्या एकूण गुंतवणुकीच्या
५२ पूर्णांक ४६ टक्के परकीय गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात
·
राज्यात सर्वत्र गणेशोत्सवाची
धामधुम
आणि
·
पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेत
उंच उडी प्रकारात प्रवीण कुमारनं पटकावलं सुवर्ण पदक, पदकांची संख्या २६ वर
****
जलसंचयाचा
थेट संबंध आर्थिक प्रगतीशी असून, पाण्याचं
योग्य व्यवस्थापन गरजेचं असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे.
गुजरातमधे सूरत इथं, जल
संचय जन भागीदारी, या
अभियानाचा प्रारंभ आज पंतप्रधानांनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून केला, त्यावेळी ते बोलत होते. भारतात पाण्याला ईश्वराचं रूप मानलं
असून, पाण्याच्या साठवणीच्या अनेक
शास्त्रशुद्ध पद्धती भारतात परंपरेनं विकसित झाल्या आहेत. काही ठिकाणी अतिवृष्टी तर
काही ठिकाणी पाण्याची टंचाई या समस्यांवर जल संचयानेच तोडगा निघू शकतो, असं पंतप्रधान म्हणाले.
दरम्यान, पंतप्रधानांनी आज नवी दिल्लीत राष्ट्रीत शिक्षक पुरस्कारप्राप्त
शिक्षकांशी संवाद साधला. मातृभाषेतून शिक्षण घेण्याच्या आवश्यकतेवर त्यांनी भर दिला.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या प्रभावावर पंतप्रधानांनी यावेळी चर्चा केली.
****
नुकत्याच
संपलेल्या ऑगस्ट महिन्यात देशभरात चाळीस लाखांहून अधिक नवीन डिमॅट खाती उघडण्यात आली
आहेत. यामुळे देशातल्या डिमॅट खात्यांची संख्या १७ कोटी १० लाखांवर पोहोचली आहे. ऑगस्ट
महिन्यात बाजारात विक्रमी संख्येनं आय पी ओ दाखल झाले आणि विविध कंपन्यांनी त्यांच्या
माध्यमातून सुमारे १७ हजार कोटी रुपयांचं भांडवल उभारण्याचा मार्ग निवडला, त्यामुळे डिमॅट खात्यांमध्येही वाढ झाली, असं सेबीनं सांगितलं.
****
देशातील
एकूण गुंतवणुकीच्या ५२ पूर्णांक ४६ टक्के परकीय गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात आल्याची
माहिती, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
यांनी दिली आहे. राज्यात २०२४-२५ या चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत सुद्धा
सर्वाधिक गुंतवणूक आली असल्याचं, त्यांनी
आज समाजमाध्यमावरील संदेशात सांगितलं. एप्रिल ते जून २०२४ या पहिल्या तिमाहीत एकूण
सत्तर हजार सातशे पंच्याणव कोटी रुपयांची गुंतवणूक आली आहे. दुसऱ्या क्रमांकावर कर्नाटक
राज्य असून, तिथं १९ हजार ५९ कोटी तर दिल्ली
राज्यात १० हजार ७७८ कोटी इतकी गुंतवणूक झाल्याचं फडणवीस यांनी सांगितलं.
****
आदिवासी
समाजाच्या उन्नतीसाठी राज्य सरकारने १५ हजार ३६० कोटी रुपयांची तरतूद केली असून, या समाजावर कधीही अन्याय होऊ देणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. गडचिरोली जिल्ह्यात
आलापल्ली इथं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आयोजित जनसन्मान यात्रेत ते आज
बोलत होते. सरकारने विविध समाजांसाठी तसंच महिला आणि मुलांसाठी राबवलेल्या विविध योजनांची
त्यांनी यावेळी माहिती दिली. भारतीय संविधान हे कुणीही बदलू शकत नाही, असं देखील पवार यांनी स्पष्ट केलं.
****
पंचायत
समितीच्या इमारती ग्रामीण विकासाच्या केंद्रबिंदू आहेत, या विकासाच्या मंदिराचं पावित्र्य जपण्याची जबाबदारी सर्वांची असल्याचं, महसूल, पशुसंवर्धन
आणि दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलं आहे. अहमदनगर जिलह्यातल्या
राहाता पंचायत समितीच्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या लोकार्पण सोहळ्यात ते आज बोलत होते.
राज्याच्या विकासासाठी शासन प्रयत्नशील असून, विविध कल्याणकारी योजनांच्या माध्यमातून महिलांच्या जीवनात नवी पहाट आणणं हे शासनाचं
उद्दिष्ट आहे, असं विखे पाटील म्हणाले.
आमदार
पंकजा मुंडे, आशुतोष काळे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन शिवाजीराव कर्डिले
आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
****
महाराष्ट्र, मराठी माणसाचा स्वाभिमान याच्याशी महाविकास आघाडीला काहीही देणंघेणं
नाही, छत्रपती शिवाजी महाराजांचा वारंवार
अवमान करणाऱ्या काँग्रेस नेतृत्वाला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेण्याचाही अधिकार
नाही, अशी टीका भारतीय जनता पक्षाचे
प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. ते आज मुंबई इथं पत्रकारांशी बोलत
होते. महाराष्ट्र विकासाच्या वाटेवर मार्गक्रमण करत असताना, राज्यात अशांतता पसरवण्याचा महाविकास आघाडीचा कट आहे, अशी टीका त्यांनी केली.
****
निवडणुकीच्या
तोंडावर महागाई कमी करण्याचं आश्वासन देऊन भारतीय जनता पक्ष महिलांची फसवणूक करत असल्याची
टीका, महिला काँग्रेसच्या राष्ट्रीय
अध्यक्ष अलका लांबा यांनी केली आहे. त्या आज मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होत्या. महागाईमुळे
सण, उत्सावाचा रंग फिका पडला असून, जनता त्रस्त आहे, म्हणून सरकारला जाग आणण्यासाठी महिला काँग्रेस राज्यभरात ‘खर्चे पे चर्चा’ अभियान
राबवणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. महाराष्ट्रात युती सरकारने निवडणुकीच्या
तोंडावर ‘लाडकी बहीण’ योजना सुरु केल्याची टीका त्यांनी यावेळी केली.
****
राष्ट्रवादी
काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील सरकारच्या
लाडकी बहिण योजनेवर टीका केली आहे. त्या आज मुंबईत पत्रकारांशी बोलत होत्या. केवळ आपली
राजकीय पोळी भाजण्यासाठी सुरु केलेली ही योजना असून, त्यांना राजकीय फायदा घ्यायचा असल्याचं त्या म्हणाल्या. केंद्रीय संस्थांची भिती
दाखवत महाविकास आघाडीचं सरकार पाडलं गेलं, मात्र, महायुतीमध्ये प्रचंड अडचणी असल्यामुळे
हे सरकार पडेल, असं मत सुळे यांनी व्यक्त केलं.
****
राज्यात
सर्वत्र गणेशोत्सवाची धामधुम सुरू झाली आहे. गणेश चतुर्थीच्या दिवशी उद्या सर्वत्र
श्री गणेशाची स्थापना होणार असून, गेल्या
दोन दिवसांपासूनच अनेक ठिकाणी गणेश मूर्तींचं आगमन होत आहे. तसंच गणरायाचं स्वागत करण्यासाठी
घरोघरी लगबग सुरू आहे. उत्सवासाठी आवश्यक सामानानं सर्वत्र बाजारपेठा फुलल्या असून
भाविकांची खरेदीसाठी झुंबड उडाली आहे. गणेशोत्सवानिमित्त राज्यात विविध ठिकाणी पर्यावरणपूरक, प्लास्टिकमुक्त स्पर्धेसारख्या अनेक स्पर्धांचं आयोजन करण्यात
आलं आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये बचत गटांमार्फत गणेश मूर्ती आणि सजावटीच्या साहित्याची
विक्री केली जात आहे.
****
शेतकऱ्यांना
सिंचनासाठी दिवसा अखंडित वीजपुरवठा करण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेच्या
दुसर्या टप्प्याअंतर्गत राज्यात नऊ हजार २०० मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात
येत असून, त्यापैकी तीन मेगावॅट क्षमतेचा
पहिला सौरऊर्जा प्रकल्प छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वैजापूर तालुक्यातल्या धोंदलगाव
इथं कार्यान्वित झाला आहे. या प्रकल्पामुळे एक हजार ७५३ शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा
उपलब्ध होणार आहे. या प्रकल्पांतर्गत संपूर्ण क्षमता डिसेंबर २०२५ पर्यंत टप्प्याटप्प्याने
कार्यान्वित केली जाणार असल्याचं, महावितरणचे
अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी सांगितलं.
****
नांदेड
जिल्ह्यात पूर प्रभावित गावांमध्ये साथ रोग पसरणार नाही यासाठी जिल्हा आरोग्य विभाग
विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना करत असल्याची माहिती, जिल्हा परिषदेच्या जिल्हा आरोग्य अधिकारी संगीता देशमुख यांनी दिली. जिल्ह्यात
२८ गावं पूर प्रभावित झाली होती. या गावामध्ये आता आरोग्य सेवा सुरळीत राहावी, साथ रोग पसरू नये, यासाठी विशेष वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं.
घरोघरी आरोग्य सेवकांमार्फत सर्वेक्षण केलं जात असून, ज्या ठिकाणी डासांची घनता जास्त आहे, तिथे घरामध्ये फवारणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
****
नांदेड
जिल्ह्यात अवैध धंद्यांचा बिमोड करण्यासाठी सुरू असलेल्या ऑपरेशन फ्लश आउट अंतर्गत
किनवट पोलिसांनी आज १३ लाख ८० हजार रुपयांचा गुटखा जप्त केला. या कारवाईत २० लाख ३८
हजारांचा एकूण मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. एका गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी
ही कारवाई केली.
****
भंडारा
पोलिसांनी देखील काल मध्यरात्री केलेल्या एका कारवाईत १६७ किलो गांजा पकडला. याप्रकरणी
एका चारचाकीसह दोघांना ताब्यात घेण्यात आलं आहे.
****
वाशिम
जिल्ह्यात आडोळी ते वाळकी दरम्यान असलेल्या ३५ टोलवरची १८० मीटर विद्युत तार चोरणाऱ्या
४ चोरट्यांना पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत आज पोलिस प्रशासनाने माध्यमांना माहिती
दिली. हिंगोली रस्त्यावरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जवळ असलेल्या घरकुलातून
चारचाकी वाहन आणि मुद्देमालासह एकूण ६
लाख रुपयांचा मुद्देमाल स्थानिक गुन्हे शाखेने जप्त केला.
****
पॅरिस
पॅरालिम्पिक स्पर्धेत आज उंच उडी प्रकारात प्रवीण कुमारनं सुवर्ण पदकाला गवसणी घातली.
या स्पर्धेतलं हे भारताचं सहावं सुवर्ण पदक आहे.
नौकायन
स्पर्धेत भारताचे यश कुमार आणि प्राची यादव उपान्त्य फेरीत पोहोचले आहेत. महिलांच्या
२०० मीटर टी - 12 धावण्याच्या शर्यतीत सिमरन शर्माने
देखील उपान्त्य फेरीत प्रवेश मिळवला. पुरुषांच्या ४०० मीटर टी - 47 स्पर्धेत दिलीप गावितनं अंतिम फेरी गाठली आहे. या स्पर्धेत भारत
सहा सुवर्ण, नऊ रौप्य आणि ११ कांस्य पदकांसह एकूण २६ पदकं जिंकून पदकतालिकेत १७ व्या स्थानावर आहे.
****
२०
वर्षांपेक्षा कमी वयोगटासाठीच्या जागतिक महिला कुस्ती स्पर्धेत भारताच्या ज्योती बरवालने
सुवर्णपदक पटकावलं आहे. स्पेनमधे पोंतेवेद्रा इथं ही स्पर्धा झाली.
****
गुजरात
इथं झालेल्या योनेक्स सनराइज् पश्चिम विभागीय अंतरराज्य बॅडमिंटन स्पर्धेत संभाजीनगरच्या
सोनाली मिरखेलकर हीनं महिला दुहेरी गटात सुवर्णपद पटकावलं, तर मिश्र खुल्या गटात उपविजेतेपद पटकावण्याची कामगिरी केली आहे.
****
No comments:
Post a Comment