Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 06 September
2024
Time 7.10
AM to 7.20 AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०६ सप्टेंबर २०२४ सकाळी ७.१० मि.
****
·
शिक्षकी पेशा हे मानव निर्माणाचं पवित्र अभियान-राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्रदान सोहळ्यात राष्ट्रपतींचं प्रतिपादन-राज्यशासनाचे क्रांतिज्योती
सावित्रीमाई फुले शिक्षक गुणगौरव पुरस्कार प्रदान
·
मराठवाडा आणि विदर्भासह राज्यात एक लाख कोटी रुपये गुंतवणुकीच्या चार प्रकल्पांना मान्यता
·
राज्यात नोव्हेंबर २०२३ ते जुलै २०२४ या कालावधीत झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीपोटी ३०७ कोटी २५ लाख रुपयांचा निधी मंजूर
·
कोकणातलं अतिरिक्त पाणी मराठवाड्यात वळवण्यासाठीच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता
आणि
·
लातूर मधला मराठवाडा रेल्वे डबे निर्मिती कारखाना कार्यान्वित
****
शिक्षकी पेशा ही फक्त नोकरी नाही, तर मानव निर्माणाचं पवित्र अभियान असल्याचं प्रतिपादन, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं आहे. काल शिक्षक दिनी, नवी दिल्लीत राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान करण्यात आले, त्यावेळी त्या बोलत होत्या. या कार्यक्रमात देशभरातल्या ८२ शिक्षकांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातले कलाशिक्षक सागर बगाडे
आणि गडचिरोली जिल्ह्यातले मंतय्या बेडके यांचा समावेश
आहे. ५० हजार रुपये, रौप्य पदक आणि प्रशस्तीपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. मंतय्या बेडके यांनी, या पुरस्काराबाबतच्या आपल्या भावना या शब्दांत व्यक्त केल्या..
‘‘आमच्या शाळेमध्ये शाळा डिजीटल करणे, विद्यार्थ्यांना मातृभाषेकडून प्रमाण भाषेकडे नेणे, आणि शाळेमध्ये विविध उपक्रमांचे आयोजन करून विद्यार्थ्यांना
गुणवत्तापूर्ण शिक्षण देणे, हा जो आमचा निविण्यपूर्ण उपक्रमाचा उद्देश होता आणि तो उद्देश सफल झाला.’’
****
मुंबई इथं क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार काल प्रदान करण्यात आले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांनी यावेळी बोलतांना, शिक्षकांच्या योगदानाशिवाय देश प्रगतीपथावर जाऊ शकत नसल्याची भावना व्यक्त केली. या कार्यक्रमात १०९
शिक्षकांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील १२८ शाळांना काल शिक्षक दिनी नवोपक्रमशील तसंच गुणवत्तापूर्ण शाळा पुरस्कार प्रदान करण्यात आले.
****
राज्यात एक लाख १७ हजार २२० कोटी रुपये गुंतवणुकीच्या, उच्च तंत्रज्ञानावर आधारित चार विशाल प्रकल्पांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्यता दिली आहे. मुख्यमंत्र्यांच्या
अध्यक्षतेखाली उद्योग विभागाच्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या प्रकल्पांमुळे सुमारे
२९ हजार रोजगार निर्माण होणार आहेत. छत्रपती संभाजीनगर इथं २१ हजार २७३ कोटी रुपये
गुंतवणुकीच्या वाहन प्रकल्पातून १२ हजार रोजगार निर्माण होतील. सेमीकंडक्टर निर्मितीचा
प्रकल्प पनवेलमध्ये होणार असून, यात एकूण ८३ हजार ९४७ कोटी रुपये गुंतवणुक आणि १५ हजार रोजगार निर्माण होणार आहेत.
पुण्यातल्या इलेक्ट्रीक वाहन निर्मिती प्रकल्पात एकूण १२ हजार कोटी
रुपयांची गुंतवणूक होणार असून, एक हजार
रोजगार निर्माण होतील, तर अमरावती जिल्ह्यात
नांदगाव इथं वस्त्रोद्योगात १८८ कोटी एवढी गुंतवणूक
आणि ५५० रोजगार निर्मिती होणार आहे.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पैठण आणि गंगापूर इथं जिल्हा अतिरिक्त
न्यायालयाची स्थापना, तर हिंगोली इथं स्वतंत्र न्यायिक जिल्हा न्यायालय स्थापन करण्यात येणार आहे. काल राज्य मंत्रिमंडळ बैठकीत हे निर्णय घेण्यात आले. पुणे-छत्रपती संभाजीनगर राष्ट्रीय महामार्गाची सुधारणा, अंगणवाडी केंद्रांना सौर
ऊर्जा संच वाटप, थकबाकी अदा करणाऱ्या
कुक्कुटपालन संस्थांना दंडनीय व्याज माफी, विहिरी-शेततळे-वीज जोडणीसाठी भरीव अनुदान, तसंच बीड जिल्ह्यात धारुर तालुक्यातल्या सुकळी या गावाचं विशेष भाग म्हणून पुनर्वसन करण्याच्या निर्णयाला काल राज्य मंत्रिमंडळानं
मान्यता दिली.
यंदा राज्यात १२१ टक्के
पाऊस झाला, तसंच १०२ टक्के पेरण्या पूर्ण
झाल्या आहेत. उजनी, कोयना आणि जायकवाडीसह मोठी धरणे २०१८ नंतर प्रथमच १०० टक्के भरत असल्याची माहिती जलसंपदा विभागाने मंत्रिमंडळ बैठकीत दिली. गेल्या वर्षी याच सुमारास या धरणांमध्ये सुमारे ६५ टक्के पाणी साठा होता.
****
राज्यात नोव्हेंबर २०२३ ते जुलै २०२४ या कालावधीत अवकाळी पाऊस तसंच अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीपोटी ३०७ कोटी २५ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. याबाबतचा शासन निर्णय काल जारी करण्यात आला. हा निधी थेट लाभ हस्तांतरणाद्वारे लाभार्थींच्या बँक खात्यात जमा केला जाणार असल्याचं, या निर्णयात म्हटलं आहे.
****
राज्यातल्या विविध
देवस्थानांच्या २७५ कोटी रुपयांच्या विकास आराखड्यांना मान्यता देण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या शिखर समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. श्री चक्रधर स्वामी यांच्या जयंतीचं औचित्य साधून महानुभाव पंथाच्या रिद्धपूर, भिष्णूर, जाळीचा
देव, पोहीचा देव, पांचाळेश्वर
या देवस्थानांसह ग्रामीण भागातल्या आठ देवस्थानांच्या विकास
आराखड्यांना मंजुरी देण्यात आली आहे.
****
कोकणातील अतिरिक्त पाणी मराठवाड्यात वळवण्यासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. कोकण खोऱ्यातून एकूण ५४ पूर्णांक ७० टीएमसी अतिरिक्त पाणी मराठवाड्यासाठी वळवणं शक्य असून, याकरता सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी ६१ कोटी ५२ लाख रुपये किमतीस प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. या प्रकल्पामुळे मराठवाड्यात सुमारे दोन लाख ४० हजार हेक्टर क्षेत्रास सिंचन, पेयजल तसंच औद्योगिक वापरासाठी पाणी उपलब्ध होणार आहे.
****
दिव्यांग प्रवाशांना राज्य परिवहन महामंडळ - एसटीच्या सर्व प्रकारच्या बसमध्ये आरक्षित आसन कायमस्वरूपी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दिव्यांग प्रवासी कोणत्याही थांब्यावर बसमध्ये चढल्यानंतर
त्यांना ते आसन तातडीने उपलब्ध करुन देण्याची जबाबदारी संबधित वाहकाची असणार आहे. दिव्यांगांना बसमध्ये चढता-उतरतांना चालक वाहकांनी सर्वतोपरी
मदत करावी असे निर्देशही देण्यात आले आहेत.
****
चालू शैक्षणिक वर्षामधल्या विविध शैक्षणिक संस्थांमधल्या
प्रवेशासाठी इतर मागास प्रवर्गाचं जात प्रमाणपत्र प्राप्त झालेल्या उमेदवारांना
सद्य:स्थितीत जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास सहा महिन्यांची मुदत देण्यात आली
आहे. उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी ही माहिती दिली. विद्यार्थ्यांना
जात वैधता प्रमाणपत्र मिळण्यास अडचणी येत असल्याच्या
तक्रारी विद्यार्थी, पालक, सामाजिक संघटनांकडून प्राप्त झाल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला.
****
लातूर इथला मराठवाडा
रेल्वे डबे निर्मिती कारखाना आता कार्यान्वित
झाला आहे. या कारखान्याला वंदे भारत रेल्वे गाड्यांचे
शयनयान व्यवस्था असलेले १ हजार ९२० डबे बनवण्याचं आणि पुढील ३५ वर्ष त्यांच्या देखभालीचं काम सोपवण्यात आलं आहे.
****
जातीव्यवस्था कायम
राखण्याचा भारतीय जनता पक्षाचा उद्देश असल्याचा आरोप, लोकसभेचे विरोधी पक्षनेते
राहुल गांधी यांनी केला आहे. सांगली जिल्ह्यात कडेगाव इथं माजी मंत्री दिवंगत पतंगराव कदम यांच्या स्मारकाचं तसंच पुतळ्याचं अनावरण काल गांधी यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत
होते. दरम्यान, राहुल गांधी यांनी काल नांदेड जिल्ह्यात नायगाव इथं काँग्रेसचे दिवंगत खासदार वसंतराव चव्हाण यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन, सांत्वन केलं.
****
आगामी गौरी-गणपती सणानिमित्त
पात्र शिधापत्रिकाधारकांना आनंदाचा शिधा उपलब्ध करून देण्यात आला आहे. सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत अंत्योदय अन्न योजना, प्राधान्य
कुटूंब, छत्रपती संभाजीनगर आणि अमरावती विभागातले सर्व जिल्हे तसंच नागपूर विभागातल्या वर्धा, अशा १४ शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांतल्या केशरी शेतकरी शिधा
पत्रिकाधारकांसाठी आनंदाचा शिधा देण्यात येतो. पात्र शिधापत्रिका धारकांनी हे शिधासंच हस्तगत करावेत, असं आवाहन परभणीच्या जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयानं केलं आहे.
****
आगामी गणेश उत्सव आणि ईद-
ए -मिलाद हे दोन्ही सण साजरे करतांना सर्व धर्मीयांनी परस्पर सौहार्द कायम ठेवत
एकोप्याने, आनंदाने सण साजरे करावेत, असं आवाहन नांदेडचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केलं आहे. शांतता समितीच्या बैठकीत ते काल बोलत होते.
****
पुणे महानगर परिवहन मर्यादितच्या व्यवस्थापकीय संचालक तसंच बीडच्या तत्कालीन जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांना स्कॉच या नामंकित संस्थेचा "स्कॉच २०२४ राष्ट्रीय पुरस्कार" जाहीर झाला आहे. बीड जिल्ह्यात बाल विवाह निर्मुलन कार्यक्रम उत्कृष्टपणे राबवल्याबद्दल मुंडे यांची या पुरस्कारासाठी निवड झाली आहे. येत्या २२ सप्टेंबरला नवी दिल्लीत हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे.
****
धाराशिव जिल्ह्यात तुळजापूर
तालुक्यातल्या मंगरूळ इथल्या अंगणवाड्यांच्या परिसरात अंगणवाडी सेविका आणि गावकऱ्यांच्या
मदतीने परसबाग उभारण्यात आली आहे. या परसबागेतल्या विविध भाज्या आणि फळे अंगणवाडीत
शिकणाऱ्या लहानग्यांना पोषण आहारात दिले जातात. यामुळे बालकांमधल्या कुपोषणाचं प्रमाण कमी होण्यास मदत होत असल्याचं, पालकांमधून समाधान व्यक्त होत आहे.
****
जालना जिल्ह्यातल्या सर्व
शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणीची नोंदणी तातडीने करावी, असं आवाहन जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी केलं आहे. जे शेतकरी ई-पीक
पाहणी अॅप प्रणालीवर त्यांचा पीक पेरा नोंदणी करतील, त्यांनाच पीक कर्ज, पीक विमा, नुकसान भरपाईसह इतर शासकीय योजनाचा लाभ असल्याचं
त्यांनी स्पष्ट केलं आहे.
****
धाराशिव जिल्ह्यात मुख्यमंत्री वयोश्री
योजनेचे अर्ज ग्रामपंचायतीत जमा करुन समाजकल्याण विभागाकडे देण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात दहा हजार अर्ज प्राप्त झाले असून, यापैकी दीड हजारावर अर्ज छाननीअंती पात्र ठरले आहेत.
****
No comments:
Post a Comment