Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 07 September
2024
Time 11.00 to 11.05
AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: ०७ सप्टेंबर २०२४ सकाळी ११.०० वाजता.
****
राज्यात आज श्रीगणरायाचं
आगमन होत आहे. सर्वत्र धुमधडाक्यात बप्पांचं स्वागत करण्यात येत असून सार्वजनिक
मंडळासह घरोघरी गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात येत आहे. मुंबईत गणपती बाप्पा मोरयाच्या
जयघोषात जवळबपास सव्वा दोन लाख घरगुती आणि १२ हजार सार्वजनिक मूर्तींची मोठ्या
भक्तीभावानं प्रतिष्ठापना झाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा बंगल्यावर
बाप्पाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना झाली. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे लालबागच्या
राजाचे आज दर्शन घेणार आहेत. लालबागच्या राजासह मोठ्या सार्वजनिक मूर्तींच्या
दर्शनासाठी आजपासूनच दर्शन रांगा लागणार आहेत.
दरम्यान, छत्रपती संभाजीनगर इथंही गणरायाचं आगमन होत असून ढोल, ताशा आणि वाद्यांच्या गजरात बप्पांचं स्वागत केलं जात आहे. तर सांगली आणि मिरज शहरात काही सार्वजनिक गणेश मंडळांच्या गणेश मुर्त्यांचं जल्लोषात आगमन झालं. सांगलीतील गणेश मंदिरावर गणेश चतुर्थी निमित्त आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.
****
गणेशोत्सवानिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व
जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत, तर उपमुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पर्यावरण पुरक गणेशोत्सव साजरा
करण्याचं आवाहन केलं आहे. सामाजिक एकता, समता आणि बांधिलकीचा संदेश देणारा हा सण सर्व समाजघटकांना सोबत घेऊन सर्वांनी एकोप्यानं आनंदानं साजरा करावा, असं आवाहन अजित पवार यांनी केलं आहे.
****
भारताचं परकीय चलन भांडार ३० ऑगस्ट रोजी संपलेल्या आठवड्यात दोन अब्ज डाँलरनं वाढून जवळपास ६८४ अब्ज डाँलर इतक्या उच्च पातळीवर पोचलं आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेनं काल जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, परकीय चलन भांडारात मागील तीन आठवड्यात १३ कोटी ९० लाख डाँलरची वाढ नोंदवण्यात आली. या दरम्यान, सोने भांडार ८६ कोटी २० लाख डाँलरने वाढून ६१ अब्ज ८६ कोटी डाँलर इतका झाला आहे.
****
सारथी संस्थेमार्फत लक्षित गटातील विद्यार्थ्यांसाठी मोडीलिपी प्रशिक्षण प्रकल्प राबवण्याच्या हेतूनं कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठामध्ये एक सामंजस्य करार केला आहे. छत्रपती शाहू महाराज मराठा इतिहास अध्ययन केंद्र, शिवाजी विद्यापीठ आणि सारथी उपकेंद्र यांच्यादरम्यान हा करार झाला आहे.
****
सन १९८८-८९ पासून सातत्यानं नफा मिळवणाऱ्या वन विकास महामंडळानं सन २०२२-२३ या आर्थिक वर्षात आतापर्यंतचा सर्वाधिक ५ कोटी ८२ लाख रुपयांचा लाभांश राज्य शासनाला दिला आहे. या रकमेचा धनादेश राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य आणि मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नुकताच सुपूर्द केला.
****
परभणी जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना सन २०२१ मधला सोयाबीन पिकाचा थकीत विमा मिळण्यास सुरुवात झाली आहे. केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान मराठवाड्याच्या दौऱ्यावर आले असता त्यांनी २२५ कोटी रुपये आठ दिवसांत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचं आश्वासन दिलं होतं. या आश्र्वासानाची पूर्ती आठ दिवसात होत असल्यानं शेतकऱ्यांनी चौहाण यांचे आभार मानले आहेत. सणासुदीच्या काळात आणि शेतकामासाठी विम्याची रक्कम मिळत असल्यानं शेतकरी वर्गात आनंद व्यक्त होत आहे.
****
नंदुरबार जिल्ह्यातल्या शहादा तालुक्यातील लांबोळा गावातल्या दोन कुटुंबातील जवळपास दहा जणांना अतिसारसदृश्य आजाराची लागण झाली आहे. यामुळं गावातील एकाचा मृत्यू झाला असून चौघांवर जिल्हा सामान्य रुग्णालयात तर दोन महिलांवर शहादा इथल्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहे. दरम्यान अन्य रुग्णाची प्रकृती स्थिर असल्याचं आरोग्य यंत्रणेकडून सांगण्यात आलं आहे.
****
येत्या कांही दिवसात कोकण तसंच मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी विजा आणि सोसाट्याच्या वाऱ्यांसह मध्यम पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
****
पॅरिसमधील पॅरालिम्पिक स्पर्धेत भारताची पदकांची घोडदौड काल नवव्या दिवशीही कायम राहिली. प्रवीण कुमारनं पुरुषांच्या उंच उडीत सुवर्णपदक पटकावलं, तर होकुटो होतेज सेमा यानं पुरुषांच्या शॉटपुट स्पर्धेत कांस्यपदक जिंकून देशाला पदकतालिकेत १७ व्या स्थानावर नेलं. भारताच्या नावावर आता सहा सुवर्ण, नऊ रौप्य आणि १२ कांस्य अशी एकूण २७ पदके आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्पती जगदीप धनखर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पदक विजेत्या खेळाडूंचं अभिनंदन केलं आहे.
आज, दहाव्या दिवशी, भारतीय खेळाडूंचं लक्ष्य पोहणे, सायकलिंग, कॅनो आणि ऍथलेटिक्स आदी प्रकारातील स्पर्धांवर असेल.
****
No comments:
Post a Comment