Monday, 25 November 2024

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक: 25.11.2024 रोजीचे दुपारी: 01.00 वाजताचे मराठी बातमीपत्र

 

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date - 25 November 2024

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक नोव्हेंबर २०२ दुपारी १.०० वा.

****

संसदेचं हिवाळी अधिवेशन आजपासून सुरु झालं. लोकसभेत कामकाज सुरु होताच माजी खासदार वसंतराव चव्हाण, हरिश्चंद्र चव्हाण यांच्यासह सदनाच्या दिवंगत सदस्यांना आदरांजली अर्पण करण्यात आली.

राज्यसभेतही कामकाज सुरु झाल्यावर दिवंगत सदस्यांना आदरांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर अदानी ग्रूप विरोधात असलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपावरुन विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं.

दरम्यान, अधिवेशनापूर्वी संसद भवन परिसरात वार्ताहरांशी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, संसदेत चांगली चर्चा झाली पाहिजे, अधिकाधिक खासदार चर्चेत सहभागी झाले पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली. सदनात नवीन सदस्यांना बोलण्याची संधी मिळत नसल्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली. संसदेचं हे सत्र अनेक प्रकारे विशेष असून, संविधानाच्या ७५व्या वर्षात आपण पदार्पण करत असल्याचं पंतप्रधान म्हणाले. 

या अधिवेशनात वक्फ दुरुस्ती विधेयकासह १६ महत्त्वाची विधेयकं मांडण्याचं नियोजन आहे. वायूयान, आपत्ती व्यवस्थापन, रेल्वे, बंदरे आदी विधेयकांवरही या अधिवेशनात चर्चा होण्याची शक्यता आहे. हे अधिवेशन २० डिसेंबरपर्यंत चालणार असून, उद्या संविधान दिनानिमित्त सदनाचं कामकाज होणार नाही.

****

नवी दिल्लीत आयोजित आंतराष्ट्रीय सहकार संमेलनाचं उद्घाटन आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. आंतरराष्ट्रीय सहकार वर्षानिमित्त एका टपाल तिकीटाचं प्रकाशनही यावेळी होईल. गेल्या १३० वर्षांत प्रथमच आय सी ए अर्थात आंतरराष्ट्रीय सहकार आघाडीच्या बैठकीचं आणि संमेलनाचं आयोजन, भारतात होत आहे. या संमेलनात भारताच्या प्रतिनिधी म्हणून इफकोच्या संचालिका डॉ. वर्षा कस्तुरकर देखील सहभागी होणार आहेत. 

****

केंद्र सरकारचं महिला आणि बालविकास मंत्रालय, ग्रामीण विकास मंत्रालय यांच्यातर्फे, आजपासून अब कोई बहाना नही, या अभियानाचा प्रारंभ होत आहे. या अभियानात नागरीक, सरकार तसंच प्रमुख संबंधितांना लिंगाधारित हिंसा समूळ नष्ट करण्यासाठी प्रयत्न करण्याचं आवाहन करण्यात येणार आहे. लिंगाधारित हिंसेला समाप्त करण्यासाठी नागरीकांमध्ये जागरुकता निर्माण करणं, हा या अभियानाचा उद्देश आहे. दरवर्षी २५ नोव्हेंबर हा दिवस जागतिक महिला हिंसा निर्मूलन दिवस म्हणून पाळण्यात येतो.

****

रेल्वे मध्ये कुठल्याही प्रकारे खाजगीकरण होणार नसल्याचं संसदेच्या पटलावर सांगितल्याचं रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटलं आहे. नागपूर इथं आज अखिल भारतीय अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती रेल्वे कर्मचारी संघटनेच्यावतीने आयोजित वार्षिक सर्वसाधारण सभा आणि राष्ट्रीय अधिवेशनाचं उद्घाटन आज वैष्णव यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. रेल्वेच्या सामान्य डब्याचं विशेष उत्पादन सुरु असून, त्याअंतर्गत साडे बारा हजार डबे तयार केले जात असल्याची माहिती त्यांनी दिली. या कार्यक्रमात संविधानाची शपथ घेण्यात आली, ही संविधानाप्रतिची एकनिष्ठा असल्याचं वैष्णव यांनी नमूद केलं.

****

राज्यात विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. भाजप विधीमंडळ पक्षाची बैठक आज होणार असून, त्यात पक्षाचा विधीमंडळ पक्ष नेत्याची निवड करण्यात येईल. विधानसभा निवडणुकीत १३२ जागा जिंकत भाजपा सगळ्यात मोठा पक्ष ठरला आहे. १४ व्या विधानसभेचा कार्यकाळ उद्या समाप्त होणार आहे.

****

आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार, राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज कराड इथं प्रितीसंगम या त्यांच्या समाधीस्थळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी अभिवादन केलं. ज्यांच्या विचारधारा आणि आदर्शांवर आम्ही लोकसेवेचा वारसा पुढे नेत आहोत, त्या चव्हाण साहेबांच्या दूरदृष्टीतील समृद्ध महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी लोकसेवेच्या माध्यमातून योगदान देण्याचा दृढ संकल्प आपण केला असल्याचं, पवार यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, यानंतर वार्ताहरांशी बोलताना पवार यांनी, मुख्यमंत्रिपदासंदर्भात महायुतीतले तिनही पक्ष मिळून ठरवू आणि राज्याला स्थिर सरकार देऊ, असं सांगितलं.

****

क्रिकेट

बॉर्डर - गावस्कर चषक कसोटी मालिकेच्या पहिल्या सामन्यात विजयाच्या उंबरठ्यावर आहे. सामन्याच्या आजच्या चौथ्या दिवशी ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावात आठ बाद २२७ धावा झाल्या आहेत. जसप्रित बुमराह आणि मोहम्मद सिराजने प्रत्येकी तीन, तर वॉशिंग्टन सुंदर आणि नितीश कुमार रेड्डी यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. भारताला सामना जिंकण्यासाठी आणखी दोन गडी बाद करण्याची, तर ऑस्ट्रेलियाला ३०७ धावांची आवश्यकता आहे.

****

मुंबईत छत्रपती शिवाजी महराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या गुप्तचर विभागाने दोन कोटिहून अधिक किमतीचं चार किलो सोनं जप्त केलं. हे सोनं पावडरच्या स्वरुपात ठेवलं होतं. संबंधित प्रवासी मुंबईहून माले इथं जाण्याच्या तयारीत होता. 

****

अंबाजोगाई इथल्या श्री यशवंतराव चव्हाण स्मृती समितीच्या वतीने तीन दिवसीय यशवंतराव चव्हाण स्मृती समारोह आजपासून सुरु होत आहे. मुंबई इथले विचारवंत तुषार गांधी यांच्या हस्ते या महोत्सवाचं उद्घाटन होणार असून, अध्यक्षस्थानी सिने कलावंत किरण माने असतील. या महोत्सवात कवी संमेलन, शालेय चित्रकला स्पर्धा, बाल आनंद मेळावा, गझल गायन महफिल, शेतकरी परिषद आदी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं असून, विविध क्षेत्रातल्या मान्यवरांना यशवंतराव चव्हाण स्मृती पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.

****

No comments: