Thursday, 28 November 2024

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 27.11.2024 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजताचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 27 November 2024

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २७ नोव्हेंबर २०२४ सायंकाळी ६.१०

****

·      शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांचा मुख्यमंत्रीपदाबाबत भाजपच्या शीर्ष नेतृत्वाने घेतलेल्या निर्णयाला पाठिंबा जाहीर

·      निवडणुका मतपत्रिकेवर घेण्याच्या मागणीसाठी कॉंग्रेस पक्षाची सह्यांची मोहीम राबवण्याची घोषणा

·      विरोधकांच्या गदारोळामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहाचं कामकाज आज बाधित

·      बालविवाह मुक्त भारत अभियानाला देशभरात सुरुवात

आणि

·      छत्रपती संभाजीनगर इथल्या खाम नदी पूर विश्लेषण अहवालाचं विमोचन

****

शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाबाबत भाजपच्या शीर्ष नेतृत्वाने घेतलेल्या निर्णयाला पाठिंबा जाहीर केला आहे. मुख्यमंत्रीपदाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी घेतलेला निर्णय मान्य असेल, आणि भाजपश्रेष्ठींच्या निर्णयाला शिवसेनेचा पाठींबा असेल, असं शिंदे यांनी आज मुंबईत वार्ताहर परिषदेत सांगितलं.

भारतीय जनता पक्ष वरीष्ठ नेतृत्व जो निर्णय घेईल मुख्यमंत्री बनवण्यासाठी त्याला पूर्णपणे शिवसेनेचं समर्थन आहे. तुम्ही घेतलेला निर्णय हा जसा भारतीय जनता पक्षासाठी अंतिम असतो तसा आम्हालाही तो अंतिम आहे.

 

मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात राज्यात केलेल्या विविध कामांचा यावेळी शिंदे यांनी आढावा घेतला.

राज्यात सरकार स्थापन करण्यासंदर्भात उद्या दिल्लीत भाजप नेते, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत बैठक होणार असून, या बैठकीला भाजप नेत देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार उपस्थित राहतील, असं त्यांनी सांगितलं.

दरम्यान, शिवसेना खासदारांनी आज दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. राज्यात विधानसभा निवडणुकीत महायुतीला मिळालेल्या यशाबद्दल अमित शहा यांचं अभिनंदन आणि आभार व्यक्त करण्यासाठी ही भेट घेतल्याचं, शिवसेना खासदार प्रतापराव जाधव यांनी सांगितलं.

****

महाराष्ट्राच्या १४ कोटी जनतेला स्थिर सरकार देण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी भाजपच्या शीर्ष नेतृत्वाने घेतलेल्या निर्णयाला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्याबद्दल भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांचे आभार मानले आहेत. ते आज नागपूर इथं वार्ताहरांशी बोलत होते. मुख्यमंत्रीपदाबाबत भाजपचं शीर्ष नेतृत्व असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा आणि केंद्रीय कार्यकारणी निर्णय घेतील, असं त्यांनी स्पष्ट केलं. एकनाथ शिंदे यांनी महायुती सरकारमध्ये केलेल्या विकास कार्याचा उल्लेख करून बावनकुळे यांनी, त्यांचं कौतुक केलं.

****

यापुढे निवडणुका मतपत्रिकेवर घ्याव्यात या प्रमुख मागणीसाठी कॉंग्रेस पक्षाकडून दोन दिवसानी सह्यांची मोहीम राबवली जाणार असल्याची माहिती कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले यांनी दिली. ते आज मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. राज्यात स्पष्ट बहुमत मिळूनही अद्याप सरकार बनलं नाही, यावर त्यांनी टीका केली. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, आमदार विजय वडेट्टीवार यांच्यासह कॉंग्रेसचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. निवडणुका मतपत्रिकेवर घेण्यासंदर्भात देशभरात आम्ही जनआंदोलन करणार असून, कोट्यवधी सह्या घेऊन मतपत्रिकेवर मतदान घेण्याची मागणी राष्ट्रपती, पंतप्रधान, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आणि निवडणूक आयोग यांच्याकडे करणार असल्याचं, पटोले यांनी सांगितलं.

****

एका खासगी उद्योग समूहाच्या लाचखोरी प्रकरण आणि विविध मुद्यांवरून विरोधकांच्या गदारोळामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहाचं कामकाज आज बाधित झालं.

लोकसभेचं कामकाज सुरु झाल्यानंतर सभागृहात खासगी उद्योग समुहाचं लाचखोरी प्रकरण तसंच उत्तर प्रदेश आणि मणिपूरमधला हिंसाचार या मुद्यांवरून गदारोळ झाला. लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सदस्यांना सदनाचं कामकाज चालवण्यासाठी सभागृहाचे शिष्टाचार आणि प्रतिष्ठा राखण्याची वारंवार विनंती केली. प्रश्नोत्तराच्या तासानंतर सर्व मुद्यांवर चर्चा केली जाईल, असं आश्वासन त्यांनी दिलं. मात्र, विरोधकांनी सभागृहाच्या हौद्यात उतरून घोषणाबाजी सुरू ठेवली. त्यामुळे सभागृहाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं.

राज्यसभेत, सभागृहाचं कामकाज सुरू झाल्यानंतर सभापती जगदीप धनखड यांनी अदानी लाचखोरी प्रकरण, तसंच उत्तरप्रदेशातल्या संभल आणि मणिपूर हिंसाचार प्रकरणी विरोधकांनी मांडलेला स्थगन प्रस्ताव फेटाळला. धनखड यांनी सदस्यांना चर्चा करून सभागृहाचं कामकाज सुरु ठेवण्याचं आवाहन केलं, मात्र गोंधळ सुरुच राहिल्यानं राज्यसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं.

****

भारतीय रेल्वेनं हायस्पीड रेल्वेच्या निर्मिती आणि उत्पादनाचं काम सुरू केलं असल्याचं सरकारनं म्हटलं आहे. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी लोकसभेत लेखी उत्तरात ही माहिती दिली. इंटिग्रल कोच फॅक्टरीच्या सहकार्यानं हाय स्पीड रेल्वेची रचना तयार करत असल्याचं त्यांनी सांगितलं.

दरम्यान, समाज माध्यमावर प्रसारित होणारा अश्लील मजकूर रोखण्यासाठी सध्याचे कायदे आणखी मजबूत करणं गरजेचं असल्याचं, वैष्णव यांनी पुरवणी प्रश्नांना उत्तर देताना सांगितलं. समाज माध्यम हे आजघडीला वृत्तपत्रीय स्वातंत्र्याचं मोठं माध्यम असलं, तरी त्यावरच्या आशयाचं संपादन होत नसल्यामुळे अनेक प्रकारचे अश्लील मजकूर देखील प्रकाशित केले जातात, असं ते म्हणाले.

****

विकसित भारत २०४७ च्या संकल्पाला जोडूनच बालविवाहमुक्त भारताचं लक्ष्य असल्याचं, केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री अन्नपूर्णा देवी यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीत बालविवाह मुक्त भारत अभियानाची सुरुवात केल्यानंतर त्या आज बोलत होत्या. गेल्या दहा वर्षात महिला सक्षमीकरणासाठी सरकारनं लिंग समानतेसाठी जेंडर बजेटसारखी विविध पावलं उचलली आहेत, असं त्या म्हणाल्या. या कार्यक्रमात बालविवाह मुक्त भारत पोर्टलची सुरुवात करण्यात आली. जागरुकता वाढवणं, तसंच बालविवाहासारख्या घटनांची त्वरीत माहिती मिळण्यासाठी या पोर्टलचा उपयोग होणार आहे.

****

बालविवाह मुक्त भारत मोहिमेच्याअंतर्गत धुळे जिल्ह्यात ग्रामपंचायतींनी बालविवाह प्रतिबंधक ठराव मंजूर केले. बालविवाह होणार नाही अशी सामुहिक प्रतिज्ञाही घेण्यात आली. निमगुळ या गावात ग्रामपंचायतीसमोर राबवलेल्या अभियानात ग्रामस्थांनी बालविवाह मुक्त भारत अभियानाची शपथ घेतली.

****

पंचावन्नाव्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा उद्या समारोप होत आहे. गोवा इथं दिग्दर्शक तथा निर्माते आशुतोष गोवारीकर यांच्या अध्यक्षतेखाली सुरु असलेल्या या महोत्सवात तपन सिन्हा यांच्या हार्मोनियन या चित्रपटासह जवळपास ७० चित्रपट आज दाखवले जात आहेत.

****

राज्य आपत्ती व्यवस्थापनाच्या बळकटीकरण कार्यक्रमाअंतर्गत छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या वतीने खाम नदी पूर विश्लेषण अहवाल तयार करण्यात आला असून, या अहवालाचं आज महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या हस्ते विमोचन झालं. पूर आराखडा तयार करण्यात निष्णात असलेल्या ॲल्यूबियम या संस्थेनं हा अहवाल तयार केला असून, यामुळे पूर परिस्थिती नियंत्रणासाठी मोठी मदत होणार आहे. या संस्थेनं छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेतले अधिकारी आणि तज्ञ मंडळींशी वेळोवेळी सल्लामसलत करून खाम नदीच्या सात किलोमीटर परिसराचा अभ्यास केला. तसंच खाम नदीच्या पात्रात कसे बदल घडून येतात यावरही अहवालात नमूद करण्यात आलं असून, पूर व्यवस्थापनासाठी वेब पोर्टल तयार करण्यात आलं आहे.

****

लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी अहिल्यानगर इथल्या मेकॅनाइज्ड इन्फंट्री सेंटर अँड स्कुल मध्ये आज एका समारंभात मेकॅनाइज्ड इन्फंट्रीच्या चार बटालियन्सना प्रतिष्ठित राष्ट्रपती ध्वज प्रदान केले. हा कार्यक्रम त्यांच्या अनुकरणीय आणि राष्ट्रासाठी केलेल्या गुणवत्तेचा गौरव होता. मेकॅनाईज्ड इन्फंट्री रेजिमेंटच्या सव्वीसाव्या आणि सत्तावीसाव्या बटालियनला आणि ब्रिगेड ऑफ द गार्ड्सच्या वीसाव्या आणि बावीसाव्या बटालियनला प्रेसिडेंट कलर्स प्रदान करण्यात आला.

****

बीड जिल्ह्यातल्या १४ प्राथमिक आरोग्य केंद्राकरता सार्वजनिक आरोग्य विभागाकडून नवीन रुग्णवाहिका देण्यात आल्या आहेत. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदित्य जिवने यांचे हस्ते या केंद्रांना रुग्णवाहिका हस्तांतरीत करण्यात आल्या.

****

केंद्र पुरस्कृत पंचवार्षिक २१ वी पशुगणना सुरु असून, ती २८ फेब्रुवारी २०२५ पर्यंत सुरु राहणार आहेत. पशुसंवर्धन विभागामार्फत नेमलेले प्रगणक घरी आल्यानंतर पशुपालकांनी त्यांच्याकडील पशुधनांची अचूक माहिती प्रगणकांना द्यावी, असं आवाहन बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदित्य जीवने आणि पशुसंवर्धन विभागामार्फत छत्रपती संभाजी नगरचे प्रादेशिक पशुसंवर्धन सहआयुक्त गणेश देशपांडे यांनी केलं आहे.

****

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा पूर्व परीक्षा-२०२४ येत्या एक डिसेंबर रोजी बीड जिल्हा केंद्रावरील एकूण १० उपकेंद्रामधून २ सत्रात घेण्यात येणार आहे. परीक्षेच्या कालावधीत उपकेंद्रावर कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

****

क्रीडा आणि युवक सेवा संचालनालय आणि बीड जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने बीड इथं येत्या चार आणि पाच डिसेंबर रोजी जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. या महोत्सवात संकल्पनांवर आधारित स्पर्धा, समूह लोकनृत्य, लोकगीत, कौशल्य विकास कार्यक्रम अशा स्पर्धांचं आयोजन करण्यात येणार आहे. युवकांनी या महोत्सवात सहभागी होण्यासाठी दोन डिसेंबरपर्यंत अर्ज करण्याचं आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयानं केलं आहे.

****

 

शासकीय वसतीगृहात प्रवेश न मिळालेल्या अनुसूचित जाती आणि नवबौद्ध घटकांतल्या विद्यार्थ्यांसाठी राज्य शासनानं भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत अर्ज करण्याची अंतिम तारीख ३० नोव्हेंबर आहे.

****

No comments: