Wednesday, 27 November 2024

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक: 27.11.2024 रोजीचे सकाळी: 11.00 वाजताचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date 27 November 2024

Time 11.00 to 11.05 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक २७ नोव्हेंबर २०२४ सकाळी ११.०० वाजता.

****

आपत्ती प्रतिरोधक भारत घडवण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेला गती देत, महाराष्ट्रासह १५ राज्यांसाठी भूस्खलन जोखीम निवारण आणि नागरी संरक्षण क्षमताबांधणीसाठी एकूण १ हजार ११५ कोटी ६७ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. 

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केलेल्या उच्चस्तरीय समितीने हा निधी मंजूर केला असून याद्वारे महाराष्ट्रासाठी १०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

यासोबतच, सर्व राज्यांतील नागरी संरक्षण स्वयंसेवकांच्या प्रशिक्षण आणि क्षमताबांधणीसाठी सुमारे ११५ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. आपत्ती व्यवस्थापनासाठी तसंच अनुषंगिक कामांसाठी केंद्रीय गृह मंत्रालयाने या वर्षांतर्गत २१ हजार ४७६ कोटी रुपयांहून अधिक निधी विविध राज्यांना वितरित केला आहे. यामध्ये राज्य आपत्ती प्रतिसाद निधी, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधी, राज्य आपत्ती निवारण निधी आणि राष्ट्रीय आपत्ती निवारण निधी यांतील तरतुदींचा समावेश आहे.

****

काँग्रेस खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या भारतीय नागरिकत्वासंदर्भात अलाहबाद उच्च न्यायालयात दाखल याचिकेवर काल सुनावणी झाली. याप्रकरणी न्यायालयाच्या आदेशानुसार केंद्र सरकार येत्या १९ डिसेंबर रोजी उच्च न्यायालयाला माहिती देणार आहे. 

राहुल गांधी यांच्या ब्रिटीश नागरिकत्वाच्या आधारावर त्यांचं भारतीय नागरिकत्व रद्द करण्याच्या मागणीची माहिती मिळाली असून,  यावर प्रक्रिया सुरु असल्याचं देशाचे डेप्युटी सॉलिसिटर जनरल एस.बी. पांडे यांनी उच्च न्यायालयाला सांगितलं आहे. यापूर्वी राहुल गांधींच्या नागरिकत्वा विरोधातील याचिकेवर लखनऊ खंडपीठात २४ ऑक्टोबर रोजी सुनावणी झाली होती. राहुल गांधी यांच्याकडे एकापेक्षा जास्त देशांची नागरिकत्व असल्याचा दावा या याचिकेत करण्यात आला आहे. 

****

भारतीय निवडणूक आयोगाने राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणुकीची अधिसूचना जारी केली आहे. येत्या २० डिसेंबर रोजी ही निवडणूक होणार आहे आणि त्याच दिवशी निकालही जाहीर होणार आहेत. आंध्र प्रदेशातील तीन, ओडिशा, हरियाणा आणि पश्चिम बंगालमधील प्रत्येकी एका जागेवर ही निवडणूक होणार आहे.

****

बृहन्मुंबई महानगरपालिकेतील कर निर्धारण आणि संकलन खात्‍यातील निरीक्षक पदासाठीची परिक्षा येत्या १० डिसेंबर रोजी होणार आहे. राज्यातील ३६ जिल्ह्यांमधील विविध केंद्रांवर ऑनलाईन पद्धतीनं या परीक्षेचं आयोजन करण्यात आलं आहे. ऑनलाईन परीक्षेसाठी उमेदवारांच्या नोंदणीकृत ई-मेल तसंच भ्रमणध्वनी क्रमांकावर प्रवेशपत्राबाबतच्या सूचना देण्यात आल्या आहेत. उमेदवारांनी वेळापत्रकानुसार, संबंधित केंद्रावर निश्चित वेळेत उपस्थित राहावं, असं बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून कळवण्यात आलं आहे.

****

त्रेसष्ठाव्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचं काल सायंकाळी रत्नागिरीच्या स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहात उद्घघाटन झालं. 'नाटक ही मराठी माणसांची सांस्कृतिक चळवळ आहे. सलग ६३ वर्षं महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे घेतल्या जाणाऱ्या या स्पर्धेतला उत्साह आणि नाटकांची संख्या वाढणं आवश्यक आहे. त्यामुळे आपल्या सांस्कृतिक चळवळीलाच चालना मिळणार आहे,' असं प्रतिपादन मराठी नाट्य परिषदेचे रत्नागिरीचे जिल्हाध्यक्ष समीर इंदुलकर यांनी या वेळी केलं. 'पुढच्या स्पर्धांमध्ये नाटकांची संख्या वाढावी यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेतर्फे उत्सवी नाटकांचा महोत्सव घेण्यात येणार आहे,' अशी माहितीही इंदुलकर यांनी दिली. या स्पर्धेत रत्नागिरी जिल्ह्यातल्या विविध संस्थांकडून आठ नाटकं सादर होणार आहेत.

****

राज्याच्या विविध भागांमध्ये पारा घसरुन १० ते १२ अंश सेल्सियसच्या दरम्यान आला आहे. अहमदनगर इथं काल सर्वात कमी ९ पूर्णांक ७ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली.

दरम्यान किमान तापमानात आणखी घट होईल अशी शक्यता राज्यातल्या हवामान विभागाने वर्तवली आहे.

****

सिंगापूरमधील जागतिक बुद्धिबळ स्पर्धेतील दुसरा सामना भारताचा डी. गुकेश आणि चीनचा डिंग लिरेन यांच्यात २३ चालीनंतर अनिर्णित राहिला. गतविजेता डिंग लिरेन दीड गुणांसह स्पर्धेत पुढे आहे. गुकेश १४ चालीनंतर सुमारे ५० मिनिटांनी मागे पडला, परंतु नंतर त्याला बरोबरी साधण्यात यश आलं. या स्पर्धेचं विजेतेपद मिळवण्यासाठी एकूण साडेसात गुण आवश्यक आहेत. विजय मिळवल्यास एक गुण आणि सामना अनिर्णित राहील्यास दोन्ही स्पर्धकांना अर्धा-अर्धा गुण दिला जातो. यंदाच्या स्पर्धेत दोन आशियाई खेळाडू १३८ वर्षांनंतर विजेतेपदासाठी स्पर्धा करत आहेत.

****


No comments: