Saturday, 30 November 2024

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 30.11.2024 रोजीचे दुपारी 01.00 वाजताचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date - 30 November 2024

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ३० नोव्हेंबर २०२४ दुपारी १.०० वा.

****

नैऋत्य बंगालच्या उपसागरावरील फेंगल चक्रीवादळ काल मध्यरात्रीपासून ताशी पंधरा किलोमीटर वेगानं वायव्येकडे सरकत आहे. चक्रीवादळ आज रात्री पुद्दुचेरी इथं धडकण्याची शक्यता आहे. सध्याच्या परिस्थितीमुळं किनारी भागातील जिल्ह्यांमध्ये जनजीवन विस्कळीत झालं आहे. सखल भागात राहणाऱ्या लोकांना खबरदारीचा उपाय म्हणून छावण्यांमध्ये हलवण्यात आलं आहे. त्यांना अन्न, निवारा आणि मूलभूत मदत दिली जात आहे.

जलाशयातील पाण्याची पातळी सातत्याने वाढत आहे. दरम्यान, चक्रीवादळाचा विमानसेवेवर परिणाम झाला असून जोरदार वारे आणि धावपट्टीवर पाणी साचल्याने विमानतळ तात्पुरते बंद करण्यात आले आहे. चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी आज परिस्थितीचा आढावा घेतला तसंच चेन्नई इथल्या चक्रीवादळ नियंत्रण केंद्राला त्यांनी भेट दिली. सरकारने तिरुवल्लूर, कांचीपुरम, राणीपेट आणि इतर जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना आवश्यक कार्यवाही करण्यासाठी आवश्यक त्या सूचना दिल्या आहेत असं यावेळी ते म्हणाले.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज ओडिशाच्या भुवनेश्वर इथं पोलिस महासंचालक आणि पोलिस महानिरीक्षकांच्या अखिल भारतीय परिषदेत सहभागी होत आहेत. काल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते या परिषदेचं उद्घघाटन झालं. सर्व राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांचे पोलिस महासंचालक, तसंच केंद्रीय राखीव पोलिस बल, रॉ, राष्ट्रीय सुरक्षा दल - एनएसजी, गुप्तचर विभाग आणि विशेष सुरक्षा दल - एसपीजीचे प्रमुख या परिषदेला उपस्थित आहेत. या परिषदेत अंतर्गत सुरक्षा, सायबर क्राईम, नक्षलवाद, कृत्रिम बुद्धिमत्ता साधनांमुळे निर्माण होणारी आव्हानं, ड्रोनचे नवीन धोके आणि दहशतवादाचा सामना यासारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होणार आहे.

****

सध्याचं जग भारताकडे शांतता दूत म्हणून पाहत असून, भारताचे विचार आणि मतं केवळ ऐकले जात नाही तर त्याचा अनेक कृती आराखड्यांमध्ये स्वीकार केला जातो, असं, राज्यसभेचे उपसभापती हरिवंश सिंह यांनी म्हटलं आहे. दिल्ली इथं आकाशवाणीच्या प्रतिष्ठीत डॉ. राजेंद्र प्रसाद स्मृती व्याख्यानमालेअंतर्गत काल वैश्विक क्षितीजावर भारताची वाढती भूमिका या विषयावर ते बोलत होते. २०४७ पर्यंत देश ‘विकसित' होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे, आणि भारत ही वाटचाल भविष्यातला दृष्टीकोन बाळगून करत असल्याचं देखील हरिवंश सिंह यांनी म्हटलं आहे.

****

गोंदिया जिल्ह्यात शालेय विद्यार्थ्यांना घेण्यासाठी जाणाऱ्या मानव विकास मिशनच्या बसला अपघात झाला. ही घटना आज सकाळी चिंचगडजवळ घडली. ही बसं रिकामी असल्यामुळं जीवित हानी टळली. या अपघातात वाहक आणि चालक किरकोळ जखमी झाले. कालच गोंदिया कोहमारा   रस्त्यावर एसटी बसचा अपघात झाला, यामध्ये अकरा लोकांचा मृत्यू झाला होता. 

दरम्यान, मुंबई, पुणे अशा मोठ्या शहरातून निकृष्ट बस पुर्व विदर्भात पाठवल्या जातात, त्यामुळे गोंदियातला अपघात झाल्याचा आरोप काँग्रेसचे खासदार प्रशांत पडोळे यांनी केला आहे. ते आज प्रसारमाध्यमांशी बोलत होते. चौकशी करुन अपघातातल्या दोषींवर कारवाई व्हावी, अन्यथा आंदोलन करु असं पडोळे यांनी म्हटलं आहे.

****

महिला आणि बालविकास विभागाच्या वतीनं नोव्हेंबर महिना हा आंतरराष्ट्रीय दत्तक महिना म्हणून साजरा केला जातो. या दत्तक महिन्यानिमित्त हिंगोली जिल्ह्यातल्या कळमनुरी, आखाडा बाळापूर इथले पोलिस ठाणे, बसस्थानक, उपजिल्हा रुग्णालय आदी ठिकाणी काल जनजागृतीपर कार्यक्रम घेण्यात आले. यावेळी मुल दत्तक घेण्यास इच्छुक असलेल्या पालकांना कायदेशीर दत्तक प्रक्रियेसंदर्भात माहिती देण्यात आली. दरम्यान, सोडून दिलेले, अनाथ बालकांसंदर्भात माहिती मिळाल्यास तात्काळ जिल्हा महिला आणि बाल विकास अधिकारी कार्यालय हिंगोली यांना संपर्क करावा, असं आवाहन जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सरस्वती कोरडे यांनी केलं आहे.

****

५३ वी आंतरजिल्हा आणि ८६ वी राज्य अजिंक्यपद टेबल टेनिस स्पर्धा परवा दोन ते सहा डिसेंबर दरम्यान पुण्यात होणार आहे. या स्पर्धेत २५ जिल्ह्यांमधील एक हजारांहून अधिक खेळाडू सहभागी होत आहेत.

****

१९ वर्षांखालील आशिया चषक स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यातील अ गटातील एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना संयुक्त अरब अमिरातीतील दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर सुरू आहे. नाणेफेक जिंकून पाकिस्ताननं प्रथम फलंदाजी निवडली. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा पाकिस्तानने ३४ षटकांत २ बाद १७३ धावा केल्या आहेत.

दरम्यान, याच गटातील दुसऱ्या एका सामन्यात, संयुक्त अरब अमिरातीनं जपानविरुद्ध नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. शारजाह क्रिकेट स्टेडियममध्ये हा सामना सुरु असून शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा संयुक्त अरब अमिरातीच्या ३६ षटकात ३ बाद २२८ धावा झाल्या आहेत.

****

ऑस्ट्रेलियातील कॅनबेरा इथं आजपासून भारतीय क्रिकेट संघ आणि पंतप्रधान इलेव्हन यांच्यातील दोन दिवसीय सराव सामना खेळवला जात आहे. दरम्यान पावसानं हजेरी लावल्याचं वृत्त आहे. पंतप्रधान इलेव्हन बरोबरचा हा भारताचा चौथा आणि गेल्या २० वर्षातील पहिला सामना आहे. भारतीय संघाचं नेतृत्व रोहित शर्मा करत आहे.

****

No comments:

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 14.08.2025 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 14 August 2025 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत्...