Friday, 29 November 2024

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 29.11.2024 रोजीचे सकाळी 07.10 वाजताचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 29 November 2024

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक २९ नोव्हेंबर २०२४ सकाळी ७.१० मि.

****

महायुतीच्या नेत्यांची दिल्लीत बैठक, मुख्यमंत्रिपदाबाबतचा निर्णय मुंबईतल्या बैठकीत होणार असल्याची एकनाथ शिंदे यांची माहिती. 

विधानसभा निवडणुकीत वाढलेल्या मतदानासंदर्भात काँग्रेस साशंक, मतदान आकडेवारीसंदर्भात निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण. 

राज्य कर्मचारी विमा महामंडळाअंतर्गतही मिळणार आयुष्मान भारत जनआरोग्य योजनेचे लाभ. 

५५ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा समारोप, लंपनला सर्वोत्कृष्ठ मराठी वेबसिरीजचा पुरस्कार. 

आणि

तुळजाभवानी मंदिर विकास कामासाठी पुरातत्व संचालनालयाची तांत्रिक मान्यता प्राप्त, सहा टप्प्यात होणार काम. 

****

राज्यात सरकार स्थापनेसंदर्भात काळजीवाहू मुख्यमंत्री शिवसेना नेते एकनाथ शिंदे, भाजप नेते देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी काल दिल्लीत केंद्रीत गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. सरकार स्थापनेसंदर्भातल्या अनेक बाबींवर यावेळी चर्चा करण्यात आली. भाजप अध्यक्ष जे पी नड्डा, राष्ट्रवादीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि प्रांताध्यक्ष सुनिल तटकरे यावेळी उपस्थित होते. 

या बैठकीनंतर फडणवीस यांनी सामाजिक माध्यमावरुन राज्यात विधानसभा निवडणुकीत केलेल्या सहकार्याबद्दल शहा यांचे आभार मानले. 

दरम्यान, ही बैठक अतिशय सकारात्मक झाली, यानंतर मुंबईत आणखी एक बैठक होणार आहे, त्यात मुख्यमंत्रिपदाबाबतचा निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली. 

****

महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक प्रक्रियेत मतदान कसं वाढलं, याचं उत्तर निवडणूक आयोगाने द्यावं, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली. ते काल मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. या प्रक्रियेत साडे सात टक्के इतकं मतदान वाढलं असून, मतदान प्रक्रियेतच संशय असल्याचं ते यावेळी म्हणाले. सायंकाळी साडे पाच ते रात्री साडे अकरा वाजेपर्यंत मतदान सुरू असलेल्या केंद्रांचा व्हिडीओ आणि फोटो आयोगाने द्यावा अशी मागणीही पटोले यांनी केली. 

****

दरम्यान, निवडणूक आयोगानं यासंदर्भात सविस्तर माहिती दिली आहे. राज्यात अनेक मतदान केंद्रांवर संध्याकाळी सहा वाजेनंतरही मतदारांच्या रांगा लागल्या होत्या, विशेषकरुन शहरी भागात संध्याकाळच्या वेळी मतदान करण्यासाठी गर्दी होते, २०१९ च्या निवडणुकीतही हीच परिस्थिती होती, असं आयोगानं सांगितलं आहे. राज्यात संध्याकाळी पाच वाजेपर्यंत सुमारे ५८ पूर्णांक २२ टक्के मतदान झालं होतं, तर अंतिम मतदानाची टक्केवारी ६६ पूर्णांक शून्य पाच इतकी होती. ही सामान्य बाब असून, शेवटच्या मतदाराने मतदान करेपर्यंत मतदान सुरु होतं, असं आयोगानं स्पष्ट केलं आहे.

****

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेअंतर्गत येणाऱ्या आरोग्य सुविधांचा समावेश, राज्य कर्मचारी विमा महामंडळाच्या सुरक्षा कवचात करून, त्याची व्याप्ती वाढवण्यात येणार असल्याचं, कामगार आणि रोजगार मंत्रालयानं आपल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे. या योजनेचा लाभ १४ कोटींपेक्षा जास्त लाभार्थ्यांना होईल, देशभरातल्या कर्मचाऱ्यांना चांगली आरोग्य सुविधा मिळेल, तसंच प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेअंतर्गत जोडलेल्या देशभरातल्या तीस हजारपेक्षा जास्त रुग्णालयांमधल्या सेवांचा लाभही त्यांना मिळेल असं या पत्रकात म्हटलं आहे. उपचार खर्चावर कोणतीही मर्यादा नसेल, तसंच देशातल्या धर्मादाय रुग्णालयांमध्येही या योजनेच्या लाभार्थ्यांना सेवा देण्यात येईल, असंही यात सांगण्यात आलं आहे.

****

केंद्र शासनाच्या निर्देशानुसार राज्यातल्या सर्व विद्यार्थ्यांना अपार आयडी उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने आज आणि उद्या राज्यातल्या सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये अपार दिवस साजरा करण्याच्या सूचना शिक्षण विभागानं दिल्या आहेत. सर्व जिल्ह्यांनी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचे अपार आयडी उपलब्ध करून देण्यासाठी विशेष प्रयत्न करावेत, अशा सूचना राज्य प्रकल्प संचालक आर. विमला यांनी दिल्या आहेत. 

****

५५ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव - इफ्फीचा काल गोव्यात समारोप झाला. दिग्दर्शक तथा निर्माते आशुतोष गोवारीकर यांच्या अध्यक्षतेखाली नऊ दिवस चाललेल्या या महोत्सवात ७५ देशांमधले २०० हून अधिक चित्रपट दाखवण्यात आले. समारोप सोहळ्यात ऑस्ट्रेलियातले दिग्गज चित्रपट निर्माते फिलिप नॉय्स यांचा सत्यजीत रे जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. लिथुआनियन चित्रपट टॉक्सिक ने इफ्फीचा सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठीचा सुवर्ण मयूर पुरस्कार पटकावला. नवज्योत बांदिवडेकर यांना ‘घरत गणपती’ या मराठी चित्रपटासाठी भारतीय चित्रपटासाठीचा 'पदार्पणातला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक'  पुरस्कार, मराठी वेब सिरीज ‘लंपन’ला सर्वोत्कृष्ट वेब सिरीजचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यंदाच्या इफ्फिमध्ये प्रतिष्ठित भारतीय दिग्दर्शक रमेश सिप्पी आणि प्रसिद्ध अभिनेत्री जया प्रदा यांचा त्यांच्या चित्रपटसृष्टीतल्या योगदानाबद्दल विशेष सत्कार करण्यात आला. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव संजय जाजू यावेळी उपस्थित होते. 

****

थोर समाजसुधारक, स्त्री शिक्षणाचे प्रणेते महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्मृतीदिनानिमित्त काल त्यांना सर्वत्र अभिवादन करण्यात आलं. काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महात्मा फुले यांना आदरांजली वाहिली.

छत्रपती संभाजीनगर इथं डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ तसंच सत्यशोधक समाज प्रतिष्ठानच्या वतीनं “फुले दाम्पत्याचे समग्र स्त्रीमुक्तीसाठी योगदान” या विषयावर व्याख्यान झालं. विविध संघटना तसंच सेवाभावी संस्थांतर्फे शहरातल्या औरंगपुरा परिसरातल्या महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आलं. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आणि महात्मा फुले प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने फुले यांच्या जीवन कार्यावर एक दिवसीय कार्यशाळा घेण्यात आली. 

****

अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेतर्फे दिला जाणारा ‘महात्मा फुले समता पुरस्कार’ काल प्रसिद्ध लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेते नागराज मंजुळे यांना प्रदान करण्यात आला. परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि आमदार छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली पुणे इथं हा पुरस्कार प्रदान सोहळा पार पडला. 

****

येत्या एक डिसेंबरला होणाऱ्या राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्वपरीक्षेसंदर्भात महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं परीक्षार्थींना नवीन प्रवेश प्रमाणपत्र जारी केलं आहे. आयोगाच्या संकेतस्थळावर यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे.  

****

श्री क्षेत्र आळंदी इथं काल संत ज्ञानेश्वर माऊलींचा ७२८ वा संजीवन समाधी सोहळा उत्साहात आणि भक्तीभावात पार पडला. सकाळी माऊलींच्या समाधीवर दुग्धअभिषेकाने सोहळ्याला सुरूवात करण्यात आली, त्यानंतर संत नामदेव महाराजांच्या हस्ते किर्तन सेवा देण्यात आली. संजीवन समाधी सोहळ्याची सांगता एक डिसेंबरला संत ज्ञानेश्वरांच्या छबीना मिरवणुकीनं होणार आहे. 

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पैठण तालुक्यात आपेगाव या संत ज्ञानेश्वर माउलींच्या जन्मगावी देखील संजीवन समाधी सोहळा साजरा करण्यात आला. संस्थानचे प्रमुख ज्ञानेश्वर विष्णू महाराज कोल्हापूरकर यांच्या काल्याच्या किर्तनाने या सोहळ्याची सांगता झाली. 

****

तुळजाभवानी मंदिर आणि परिसराच्या ५८ कोटी रुपयांच्या विकास कामासाठी पुरातत्व संचालनालयाची तांत्रिक मान्यता प्राप्त झाली असून, एकूण सहा टप्प्यात हे काम होणार आहे. श्री तुळजाभवानी मंदिर समितीचे अध्यक्ष तथा धाराशिवचे जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन ओंबासे यांनी काल तुळजापूर इथं पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. प्रत्येक टप्प्यामध्ये काम करताना पुजारी भाविक यांना येणाऱ्या अडचणी, सूचना प्रशासनाच्या लक्षात आणून द्याव्यात, असं त्यांनी सांगितलं.

****

जालना महानगरपालिका उजास प्रकल्पाच्या माध्यमातून महिला बचत गटांद्वारे उत्पादित केलेल्या मासिक पाळीत वापरण्यात येणाऱ्या सॅनिटरी पॅडची चौथी मागणी काल सातारा, वाशिम आणि वर्धा इथं रवाना करण्यात आली. दीनदयाळ अंत्योदय योजना आणि राष्ट्रीय उपजिविका अभियानांतर्गत जालना महापालिकेच्या माध्यमातून उत्पादित केल्या जाणाऱ्या या सॅनिटरी पॅडला इतर राज्यातूनही मागणी आहे. महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त प्रियंका राजपूत यांनी याबाबत माहिती दिली, 

हे सॅनिटरी पॅड आपल्याला पुन्हा पुन्हा वापरता येण्यासारखे आहेत. कमी किंमतीत आहेत. आणि अत्यंत हायजेनीक आहेत. या सर्व गोष्टीमुळे आपल्या महाराष्ट्रात नाही तर महाराष्ट्राच्या बाहेर सुध्दा गुजरात, मध्यप्रदेश, डेहरादून इत्यादी ठिकाणी त्याला मार्केट उपलब्ध झालेले आहे. आतापर्यंत जवळ जवळ २५ ते ३० हजार पॅड आपण तिकडे विक्री केलेले आहे. या पॅडमुळे लोकल महिलांना रोजगार सुद्धा मिळत आहे.

****

राज्यात सोयाबीन खरेदीला १५ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली असून, धाराशिव जिल्ह्यातल्या १७ हमीभाव केंद्रांवर २५ हजार क्विंटल सोयाबीनची खरेदी करण्यात आली आहे. मुदतवाढ मिळाल्यामुळे, शेतकनी सोयाबीन विकण्याची घाई न करता खरेदी केंद्राकडेच नोंदणी करावी, असं आवाहन आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी केलं आहे.

****

छत्रपती संभाजीनगर शहरात दुचाकीस्वार आणि सहप्रवाशाला हेल्मेट बंधनकारक करण्यात आलं आहे. अपर पोलीस महासंचालक, वाहतुक विभागाचे पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांनी याबाबतचे आदेश जारी केले. नियमांचं उल्लंघन करणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्यात येईल असं, या आदेशात नमूद करण्यात आलं आहे. 

****

बीड जिल्ह्यात अंबाजोगाई इथं यशवंतराव चव्हाण स्मृती समितीच्या वतीनं सुरू असलेल्या तीन दिवसीय यशवंतराव चव्हाण स्मृती समारोहाचा काल समारोप झाला. डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी.डी. पाटील यावेळी उपस्थित होते. 

****

केंद्र पुरस्कृत पंचवार्षिक २१ वी पशुगणना सुरू झाली असून, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ४९ पर्यवेक्षकांसह २५६ प्रगणकांच्या सहाय्याने पशुधनाची माहिती गोळा करण्यात येत आहे. पशुपालकांनी त्यांना पशुधनाची माहिती द्यावी, असं आवाहन छत्रपती संभाजीनगर जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ नानासाहेब कदम यांनी केलं आहे.

****

हवामान 

राज्यात पुढचे दोन दिवस सर्वत्र हवामान कोरडं राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. तसंच, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा तसंच विदर्भातल्या तापमानात सरासरीपेक्षा लक्षणीय घट होण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.

****


No comments: