Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date - 28 November 2024
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक २८ नोव्हेंबर २०२४ दुपारी १.०० वा.
****
संसदेच्या दोन्ही सभागृहात आज कामकाजाला
प्रारंभ होताच काँग्रेससह सर्व विरोधी पक्षांनी एका खासगी उद्योग समुहाच्या कथित
लाचप्रकरणाच्या मुद्यावर हौद्यात येत गोंधळ घातला. विरोधी पक्षांनी जोरदार
घोषणाबाजी केली,
त्यामुळं लोकसभेचं कामकाज सुरुवातीला बारा वाजेपर्यंत
स्थगित करण्यात आलं. बारा वाजेनंतर कामकाजाला गोंधळात सुरुवात झाली. याच गोंधळात
वक्फसंबंधीच्या संसदीय समितीचा कार्यकाळ वाढवण्यासंबंधीचा प्रस्ताव सादर करण्यात
आला. त्यानंतर लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. राज्यसभेतही
काँग्रेस सदस्य प्रमोद तिवारी यांनी नियम २६७ अंतर्गत खासगी उद्योग
समुहाच्या कथित लाचप्रकरणावर चर्चेची मागणी केली. विरोधी पक्षांची मागणी फेटाळून
लावत राज्यसभा सभापती जगदीप धनकड यांनी सुरुवातीला बारा वाजेपर्यंत आणि नंतर
दिवसभरासाठी राज्यसभेचं कामकाज तहकूब केलं. नियमानूसार लोकसभा अध्यक्ष आणि
राज्यसभा सभापती यांच्या परवानगीनं पटलावर आलेल्या विषयांवर चर्चा करता येईल, असं
संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी यांनी म्हटलं आहे. त्यांनी विरोधी पक्षांच्या
भूमिकेबद्दल नाराजी व्यक्त केली.
दरम्यान, लोकसभेत आज नव्या
सदस्यांचा शपथविधी पार पडला. वायनाडमधून विजयी झालेल्या काँग्रेसच्या प्रियंका
गांधी-वाध्रा आणि नांदेडमधून विजयी झालेले रवींद्र चव्हाण यांना लोकसभेचे अध्यक्ष
ओम बिर्ला यांनी आज सदस्यत्वाची शपथ दिली.
****
तामिळनाडू दौऱ्यावर असलेल्या राष्ट्रपती
द्रौपदी मुर्मु यांनी वेलिंग्टन इथल्या डिफेन्स स्टाफ सर्विस कॉलेजच्या
कार्यक्रमात प्रशिक्षण संपवून सैन्यदलात दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांना संबोधित
केलं. राष्ट्रपती उद्या निलगिरी इथं आदिवासी समुदायाशी चर्चा करणार आहेत.
****
राष्ट्रीय तपास संस्था अर्थात एनआयएनं
मानवी तस्करीच्या गुन्ह्यांसंबंधी सहा राज्यातील २२ ठिकाणांवर छापे टाकले आहेत.
परदेशात नोकरी देण्याचं अमिष दाखवून मानवी तस्करी करण्यासंबंधीचे गुन्हे जुलै
महिन्यात दाखल करण्यात आले होते, त्यासंदर्भात छापेमारी करण्यात आली. या
तपासात म्यानमार आणि लाओस इथून कॉल सेंटर आणि क्रिप्टोकरन्सीच्या माध्यमातून
भारतीय नागरिकांची फसवणूक केली जात असल्याचं उघड झालं आहे.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातल्या
तरूणांना “विकसित भारत युवा नेतृत्व चर्चासत्र” या प्रश्नमंजुषेत भाग
घेण्याचं आवाहन केलं आहे. ही स्पर्धा चार स्तरांवर घेण्यात येत असुन यात १५ ते २९
वयोगटातल्या व्यक्ती भाग घेऊ शकतात. २५ नोव्हेंबर पासून या डिजिटल प्रश्नमंजुषा
स्पर्धेला सुरूवात झाली असून ही स्पर्धा पाच डिसेंबरपर्यंत चालणार आहे.
****
भारत-रशिया सैन्य सहकार्यासंबंधीची चौथी
बैठक मॉस्को इथं पार पडली. दोन्ही देशांतील रणनितीक सहकार्याला वृद्धींगत
करण्याच्या दृष्टीनं ही बैठक महत्त्वाची मानली जाते. दोन्ही देशांदरम्यान
सैन्यदलाच्या संयुक्त कवायतींचा विस्तार करणे, नियमितपणे तंत्रज्ञानाचे
हस्तांतरण करण्यावर बैठकीत भर देण्यात आला.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पैठण
इथल्या जायकवाडी धरणातील डाव्या कालव्यातून ४०० घनफूट प्रतिसेकंद पाण्याचा विसर्ग
सुरू आहे. यामुळे तालुक्यात गहू, हरभरा कांद्याच्या लागवडीचे क्षेत्र
वाढेल अशी शक्यता कृषी विभागानं व्यक्त केली आहे.
दरम्यान, नांदेड जिल्ह्यात
उर्ध्व पेनगंगा प्रकल्पांतर्गत इसापूर डावा कालवा आणि इसापूर उजवा कालव्यातून १
डिसेंबर पासून सिंचनासाठी पाणी सोडण्यात येणार आहे. प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील
पात्र लाभधारकांनी पिकांसाठी उपसा सिंचन योजनेद्वारे पाणी घेण्यासाठी विहीत
नमुन्यातील अर्ज शाखा कार्यालयात सादर करावा असं आवाहन पाटबंधारे विभागानं केलं
आहे.
****
पंचावन्नाव्या भारतीय आंतरराष्ट्रीय
चित्रपट महोत्सव - इफ्फीचा आज समारोप होत आहे. गोवा इथं दिग्दर्शक तथा निर्माते
आशुतोष गोवारीकर यांच्या अध्यक्षतेखाली नऊ दिवस चाललेल्या या महोत्सवात ७५
देशांमधले २०० हून अधिक चित्रपट दाखवण्यात आले. सिनेसृष्टीतील दिग्गजांचे
मास्टरक्लास,
आणि प्रेरणादायी पॅनेल चर्चेसह, अनेक
उपक्रम राबवण्यात आले. समारोप सोहळ्यात विविध पुरस्कारांचं वितरण होणार आहे.
****
आंतरराष्ट्रीय क्रिकेट नियामक मंडळ
आयसीसीच्या कसोटी क्रिकेट गोलंदाजांच्या मानांकनात भारताचा जसप्रीत बुमराह पहिल्या
स्थानावर आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी सामन्यात केलेल्या कामगिरीमुळे
बुमराहनं दक्षिण आफ्रिकेच्या कगीसो रबाडाला, तसंच दुसऱ्या क्रमाकांवर
असलेल्या ऑस्ट्रेलियाच्या जोश हेजलवुडला मागं टाकत पहिलं स्थान मिळवलं. तर, फलंदाजांच्या
यादीत यशस्वी जयस्वालनं दुसरं स्थान गाठलं आहे.
****
थोर समाजसुधारक, स्त्री
शिक्षणाचे अग्रणी महात्मा ज्योतिबा फुले यांचा आज स्मृतीदिन आहे. काळजीवाहू
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महात्मा फुले यांना आदरांजली वाहिली आहे.
****
No comments:
Post a Comment