Friday, 29 November 2024

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 29.11.2024 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजताचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 29 November 2024

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २९ नोव्हेंबर २०२४ सायंकाळी ६.१०

****

·      पर्यटन स्थळांचा जागतिक मानकांनुसार विकास करण्यासाठी केंद्र सरकारकडून तीन हजार ३०० कोटी रुपयांच्या ४० योजनांना मंजुरी

·      संसदेच्या हिवाळी अधिवेशनात विरोधी पक्षांच्या गदारोळामुळे दोन्ही सदनांचं कामकाज आजही बाधित

·      गोंदिया जिल्ह्यात शिवशाही बसला भीषण अपघात-११ प्रवासी ठार तर ३३ प्रवासी जखमी

आणि

·      गदिमा प्रतिष्ठानच्या पुरस्कारांची घोषणा;आशा काळे यांना गदिमा पुरस्कार, तर अभिनेत्री प्रिया बेर्डे यांना गृहिणी सखी सचिव पुरस्कार जाहीर

****

देशातल्या प्रसिद्ध पर्यटन स्थळांचा जागतिक मानकांनुसार विकास करण्यासाठी केंद्र सरकारने सुमारे तीन हजार ३०० कोटी रुपयांच्या ४० योजनांना मंजुरी दिली आहे. २३ राज्यातल्या या योजनांसाठी देण्यात येणाऱ्या विशेष आर्थिक मदतीवर पुढची ५० वर्षं कोणतंही व्याज आकारलं जाणार नाही, असं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यात जलसंग्रहालय तसंच कृत्रिम प्रवाळ निर्मिती प्रकल्पासाठी ४६ कोटी रुपये, तर नाशिक इथं रामकाल मार्गासाठी ९९ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. पर्यटनामध्ये अनेकांच्या जीवनात समृद्धी आणण्याची क्षमता असून, सरकार देशात पर्यटन पायाभूत सुविधा वाढवण्यावर भर देत राहील, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे.

****

संसदेच्या हिवाळी अधिवेशनात विरोधी पक्षांच्या गदारोळामुळे दोन्ही सदनांचं कामकाज आजही बाधित झालं. लोकसभेत कामकाज सुरु होताच एका खासगी उद्योग समूहाच्या कथित लाचप्रकरणाच्या मुद्यावर काँग्रेस, द्रविड मुनेत्र कळघम, समाजवादी पक्षासह विरोधी पक्षाच्या इतर सदस्यांनी घोषणाबाजी सुरू केली. अध्यक्ष ओम बिर्ला यांनी गोंधळातच प्रश्नोत्तराचा तास पुकारला. मात्र गदारोळ वाढतच गेल्याने सदनाचं कामकाज एका तासासाठी स्थगित करावं लागलं, कामकाज पुन्हा सुरु झाल्यावर, तालिका अध्यक्षांनी, सरकार चर्चेसाठी तयार असून, नियोजित कामकाज झाल्यावर चर्चा होईल, असं सांगितलं. मात्र गदारोळ वाढतच गेल्यानं सदनाचं कामकाज दिवसभरासाठी स्थगित झालं.

राज्यसभेतही विरोधी पक्षांची चर्चेची मागणी फेटाळून लावत सभापती जगदीप धनखड यांनी कामकाज सुरु ठेवण्याचा प्रयत्न केला. धनखड यांनी सदनातल्या या सततच्या व्यत्ययाबद्दल चिंता व्यक्त करत, सदस्य चुकीचा पायंडा पाडत असल्याचं नमूद केलं. त्यानंतरही गदारोळ वाढत गेल्यानं, राज्यसभेचं कामकाजही दिवसभरासाठी स्थगित झालं.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून तीन दिवसांच्या ओडिशा दौऱ्यावर आहेत. भुवनेश्वर इथं होत असलेल्या पोलिस महासंचालक आणि पोलिस महानिरीक्षकांच्या अखिल भारतीय परिषदेला ते उपस्थित राहणार आहेत. सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचे पोलीस महासंचालक, तसंच केंद्रीय राखीव पोलिस बल, रॉ, राष्ट्रीय सुरक्षा दल - एनएसजी, गुप्तचर विभाग आणि विशेष सुरक्षा दल - एसपीजीचे प्रमुख या परिषदेला उपस्थित राहणार आहेत. या परिषदेत अंतर्गत सुरक्षा, सायबर क्राईम, माओवाद, एआय टूल्समुळे निर्माण होणारी आव्हानं, ड्रोनचे नवीन धोके आणि दहशतवादाचा सामना यासारख्या महत्त्वाच्या मुद्यांवर चर्चा होणार आहे.

****

पदवी अभ्यासक्रमाला प्रवेशित असणाऱ्या विद्यार्थांना त्यांचा पदवी अभ्यासक्रमाचा कालावधी कमी किंवा अधिक करता यावा यासाठी विद्यापीठ अनुदान आयोग - युजीसी पर्याय उपलब्ध करुन देणार आहे. या संदर्भातल्या प्रकियेसाठी नुकतीच यूजीसीने मान्यता दिली. यासाठी पदवी अभ्यासक्रमाला असणाऱ्या विद्यार्थांना त्यांच्या प्रत्येक सेमिस्टर मध्ये अधिक गुण घेऊन कमी कालावधीत तीन किंवा चार वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण करता येईल, असं आयोगाचे अध्यक्ष जगदीश कुमार यांनी सांगितलं.

****

भारतीय जनता पक्षाचे आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांच्या नेत्रृत्वात आज मुंबईत ईव्हीएम- मतदानयंत्राच्या समर्थनार्थ आंदोलन करण्यात आलं. विधानसभा निवडणुकीतल्या पराभवाचं खापर विरोधक ईव्हीएमवर फोडत असल्याची प्रतिक्रिया सदाभाऊ खोत यांनी दिली. काँग्रेस पक्षानंही ईव्हीएम आणि एकूणच मतदान प्रक्रियेवर शंका व्यक्त केली आहे.

काँग्रेसचे हे आरोप हास्यास्पद असल्याची टीका भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे. ते आज मुंबई इथं माध्यमांशी बोलत होते. ईव्हीएमविरोधात आंदोलनाचा इशारा देण्यापूर्वी महाराष्ट्रासह देशभरातील विविध निवडणुकांत विजयी झालेल्या काँग्रेस लोकप्रतिनिधींनी राजीनामा द्यायला हवा. त्यानंतरच, काँग्रेस नेते ईव्हीएमबाबत गंभीर असल्याचं मानलं जाईल, असं मुनगंटीवार म्हणाले. देशात ईव्हीएमवर निवडणुका घेण्याचा निर्णय काँग्रेस सरकारच्या काळात झाला, ईव्हीएमची खरेदीही काँग्रेस सरकारच्या काळातच झाल्याकडे मुनगंटीवार यांनी लक्ष वेधलं.

दरम्यान, राज्यात नव्या सरकारचा शपथविधी लवकरात लवकर होईल, असं मुनगंटीवार यांनी सांगितलं आहे.

****

गोंदिया जिल्ह्यात आज शिवशाही बसला भीषण अपघात होऊन ११ प्रवाशांचा मृत्यू झाला तर ३३ प्रवासी जखमी झाले. भंडारा -गोंदिया मार्गावरच्या बिंद्रावन टोला गावाजवळ चालकाचं नियंत्रण सुटल्याने बस रस्त्याच्या बाजूला जाऊन उलटली. दरम्यान, या अपघातातल्या मृतांच्या नातेवाईकांना राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने प्रत्येकी १० लाख रुपयांची मदत दिली जाईल, अशी घोषणा राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. अपघातातील जखमींवर शासकीय खर्चाने तातडीने उपचार देण्यात यावेत, अशी सूचना गोंदियाच्या जिल्हाधिकाऱ्यांना केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या अपघाताबद्दल दु:ख व्यक्त केलं आहे. अपघातात मृतांच्या वारसाला प्रत्येकी दोन लाख रुपये तर जखमींना प्रत्येकी ५० हजार रुपये मदत, त्यांनी जाहीर केली आहे.

****

गदिमा प्रतिष्ठानचे विविध पुरस्कार आज जाहीर झाले. कार्यकारी विश्वस्त आनंद माडगूळकर यांनी आज पुणे इथं पत्रकार परिषदेत याबाबत अधिक माहिती दिली. ज्येष्ठ अभिनेत्री आशा काळे यांना यंदाचा गदिमा पुरस्कार, तर अभिनेत्री प्रिया लक्ष्मीकांत बेर्डे यांना गदिमांच्या पत्नी विद्याताई माडगूळकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिला जाणारा गृहिणी सखी सचिव पुरस्कार देण्यात येणार आहे. प्रसिद्ध कथा, पटकथा, संवाद लेखक आणि गीतकार क्षितीज पटवर्धन यांना यंदाचा चैत्रबन पुरस्कार, तर प्रसिद्ध गायिका मनीषा निश्चल यांना विद्या प्रज्ञा पुरस्कार देण्यात येणार आहे, येत्या १४ डिसेंबरला पुण्यात टिळक स्मारक मंदिर सभागृहात समारंभपूर्वक या पुरस्कारांचं वितरण होणार आहे.

****

नाशिक जिल्ह्यातल्या कॉम्बॅट आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग स्कूलचा कॉम्बॅट एव्हिटर्स कोर्स ४२, एव्हिएशन हेलिकॉप्टर इन्स्ट्रॅक्टर कोर्स ४१ आणि बेसिक रिमोटली पायलोटेड एअरक्राफ्ट सिस्टीम इंटरनल पायलट कोर्स ४चा दीक्षान्त आज उत्साहात पार पडला. या समारंभात नेपाळसह नायजेरिया आणि भारतीय नौदलाच्या अधिकाऱ्यांसह चार महिला अधिकाऱ्यांनी हेलिकॉप्टर पायलट म्हणून पदवी प्राप्त केली.

****

क्रीडा आणि युवक सेवा संचालनालयाच्या राज्यस्तरीय शालेय कराटे क्रीडा स्पर्धेचं आज धुळे इथं उद्‍घाटन करण्यात आलं. या स्पर्धेसाठी १४, १७ आणि १९ वर्ष वयोगटातील मुलं आणि मुलींचे संघ धुळ्यात दाखल झाले आहेत. जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश टिळे, आणि क्रीडा अधिकाऱ्यांनी खेळाडूंना शपथ देत स्पर्धांना सुरुवात करण्यात आली.

****

राज्याच्या वेगवेगळ्या शहरातून बेपत्ता झालेली मुले, तसंच महिलांच्या शोधासाठी पोलिसांकडून ‘ऑपरेशम मुस्कान - १३’ ही विशेष मोहीम १ ते ३० डिसेंबर या कालावधीत राबवली जाणार आहे. पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी ही माहिती दिली. हरवलेली अल्पवयीन मुलं आणि महिलांचा शोध घेण्यासाठी राबवण्यात आलेला एक प्रभावी उपक्रम आहे. बेपत्ता झालेल्या व्यक्तींचा शोध घेण्यासाठी २४ तास आणि ३६५ दिवस प्राधान्य देण्यात येत असल्याचं, अमितेश कुमार यांनी सांगितलं.

****

नांदेड जिल्ह्यातल्या देगलूर तालुक्यातल्या प्राथमिक आरोग्य केंद्र, मरखेल अंतर्गत पेडपल्ली या गावात २३ नोव्हेंबर रोजी चिकुनगुनियाचे रुग्ण आढळून आले होते. या अनुषंगाने जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगिता देशमुख यांनी या गावाला भेट दिली. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. रमेश गवाले यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. यावेळी त्यांनी प्रत्यक्ष गृहभेटी देऊन, तात्काळ प्रतिबंधात्मक आणि उपचारात्मक बाबींची माहिती दिली तसच आरोग्य कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केलं.

****

परभणी इथल्या आरपी हॉस्पिटल आणि रिसर्च इन्स्टिट्यूट वैद्यकीय महाविद्यालयात आज एका ६५ वर्षीय महिलेवर शस्त्रक्रिया करत पोटातून दहा किलोचा गोळा काढण्यात डॉक्टरांनी यश मिळवलं आहे. पोटात सतत दुखत असल्याने महिलेने सोनाग्राफी तपासणी केली असता तीच्या पोटात गोळा जमा झाल्याचं दिसून आलं होतं. महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. प्रमोद शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली दोन तासापेक्षा अधिक चाललेल्या शस्त्रक्रियेनंतर महिलेच्या पोटातून दहा किलोचा गोळा आणि गर्भपिशवी काढण्यात आली.

****

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेतले वर्ग तीन आणि चार संवर्गातील १९ कर्मचारी नियत वयोमानाने आज सेवनिवृत्त झाले, अतिरिक्त आयुक्त रणजीत पाटील यांच्या हस्ते सेवा प्रमाणपत्र तसंच सामान्य भविष्य निर्वाह निधीचा धनादेश देत, या कर्मचाऱ्यांना निरोप देण्यात आला.

****

धुळे जिल्ह्यातल्या साक्री तालुक्यातील ईदगाव पाडा इथल्या ग्रामस्थांनी पिंपळनेर नगर परिषदेमधून वगळून गावाला स्वतंत्र ग्रामपंचायतीचा दर्जा द्यावा, अशी मागणी करत आज जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं. २५ फेबृवारी २०२२ च्या आदेशानुसार पिंपळनेर ग्रामपंचायतीचं नगरपरिषदेत रूपांतर केलं गेलं, त्यामुळे पिंपळनेर गावातल्या आदिवासी ग्रामस्थांना पेसा कायद्यानुसार सोयीसलवती मिळत नाहीत, म्हणून गावकऱ्यांनी ही मागणी केली.

****

केंद्र शासनाच्या आदेशानुसार पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय विभागामार्फत दर ५ वर्षांनी राज्यातील पशुधनाची गणना करण्यात येते. यानुसार सोलापूर जिल्ह्यात २५ नोव्हेंबर पासून पशुगणना मोहिम सुरु झाली आहे. ही पशुगणना २८ फेब्रुवारी २०२५ पर्यंत सुरू राहणार असून, या कालावधीत प्रगणक घरोघरी जाऊन पशुधनाची माहिती घेणार आहेत.

****

राज्यात थंडीची कडाका वाढत असून बऱ्याच ठिकाणी तापमानात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. परभणी जिल्ह्यात आज सर्वाधिक कमी ८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या हवामान विभागानं केली आहे. अमरावती शहरात देखील पारा १२ अंश सेल्सिअस पर्यंत तर धारणी-चिखलदऱ्यात पहाटे पारा ९ अं.से. पर्यंत घसरलाय. हवामान खात्यानं येत्या तीन दिवसात काही जिल्ह्यात थंडीच्या लाटेचा इशारा दिला आहे.

****

No comments: