Thursday, 28 November 2024

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 28.11.2024 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजताचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 28 November 2024

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २८ नोव्हेंबर २०२४ सायंकाळी ६.१०

****

·      संसदेच्या हिवाळी अधिवेशनात आजच्या तिसऱ्या दिवशीही विरोधी पक्षांच्या गदारोळानंतर कामकाज तहकूब

·      महाराष्ट्रात सरकार स्थापनेसंदर्भात महायुतीच्या घटक पक्षांच्या नेत्यांची आज नवी दिल्लीत बैठक

·      विधानसभा निवडणुकीत मतदान वाढल्यासंदर्भात निवडणूक आयोगाने उत्तर देण्याची काँग्रेसची मागणी, मतदान आकडेवारीसंदर्भात आयोगाचं स्पष्टीकरण

·      थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांना स्मृतिदिनानिमित्त विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून अभिवादन, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचा पुरस्कार दिग्दर्शक नागराज मंजुळे यांना प्रदान

·      श्री क्षेत्र आळंदी इथं संत ज्ञानेश्वर माऊलींचा ७२८वा संजीवन समाधी सोहळा उत्साहात साजरा

आणि

·      छत्रपती संभाजीनगर शहरात दुचाकीस्वार आणि सहप्रवाशाला हेल्मेट बंधनकारक

****

संसदेच्या हिवाळी अधिवेशनात आजच्या तिसऱ्या दिवशीही विरोधी पक्षांच्या गदारोळानंतर दोन्ही सभागृहाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं.

लोकसभेचं कामकाज सुरू झाल्यावर एका खासगी कंपनीच्या लाचखोरी प्रकरणासह इतर मुद्यांवरून विरोधी पक्षांच्या सदस्यांनी गदारोळ केला. विरोधी पक्ष देशाच्या हिताशी संबंधित नसलेले मुद्दे उचलत आहे, असं म्हणत अध्यक्ष ओम बिर्ला यांनी घोषणाबाजी करणाऱ्या सदस्यांना त्यांच्या जागेवर परतायला सांगितलं, आणि प्रश्नोत्तराचा तास पुकारला. मात्र गदारोळ चालूच राहिल्यानं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करावं लागलं. राज्यसभेतही या मुद्यावर चर्चा करण्याची मागणी काँग्रेस खासदार प्रमोद तिवारी यांनी केली. मात्र, सभापती जगदीप धनखड यांनी हा प्रस्ताव फेटाळून लावल्यानं विरोधकांनी गदारोळ केला. त्यामुळे कामकाज तहकूब झालं.

दरम्यान, वक्फ सुधारणा विधेयक २०२४ वरचा अहवाल सादर करण्याची मुदत २०२५ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवसापर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव संयुक्त संसदीय समितीचे अध्यक्ष जगदंबिका पाल यांनी ठेवला होता, तो सभागृहानं संमत केला.

****

केरळच्या वायनाड लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत विजयी झालेल्या काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी वड्रा आणि नांदेड लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार रविंद्र चव्हाण यांनी आज लोकसभेचे सदस्य म्हणून शपथ घेतली.

****

केंद्र शासनाने प्रत्येक विद्यार्थ्याला ३० नोव्हेंबरपर्यंत अपार आयडी उपलब्ध करून देण्याबाबत निर्देश दिले आहेत. त्यानुसार आतापर्यंत राज्यातल्या ६५ लाख विद्यार्थ्यांना अपार आयडी उपलब्ध करून देण्यात आले आहेत. उर्वरित विद्यार्थ्यांनाही लवकरच हे आयडी द्यावेत, अशा सूचना शिक्षण विभागाकडून करण्यात आल्या आहेत. त्या अनुषंगाने उद्या आणि परवा राज्यातल्या सर्व व्यवस्थापन आणि सर्व माध्यमाच्या शाळांमध्ये अपार दिवस साजरा करण्यात यावा, अशा सूचना सर्व संबंधितांना देण्यात आला आहेत.

****

झारखंड मुक्तीमोर्चाचे नेते हेमंत सोरेन यांनी आज चौथ्यांदा झारखंडचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. राज्यपाल संतोष कुमार गंगवार यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. इंडिया आघाडीचे नेते यावेळी उपस्थित होते.

****

महाराष्ट्रात सरकार स्थापना आणि मुख्यमंत्री कोण होणार याविषयी निर्णय घेण्यासंदर्भात महायुतीच्या घटक पक्षांच्या नेत्यांची आज नवी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याबरोबर संयुक्त बैठक होणार आहे. त्यानंतर राज्यात सरकार स्थापनेसंचं चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

****

महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक प्रक्रियेत मतदान कसं वाढलं, याचं उत्तर निवडणूक आयोगाने द्यावं, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली. ते आज मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. या प्रक्रियेत साडे सात टक्के इतकं मतदान वाढलं असून, मतदान प्रक्रियेतच संशय असल्याचं ते यावेळी म्हणाले. सायंकाळी साडे पाच ते रात्री साडे अकरा वाजेपर्यंत मतदान सुरू असलेल्या केंद्रांचा व्हिडीओ आणि फोटो आयोगाने द्यावा अशी मागणीही पटोले यांनी केली.

****

दरम्यान, निवडणूक आयोगानं यासंदर्भात सविस्तर माहिती दिली आहे. राज्यात अनेक मतदान केंद्रांवर संध्याकाळी सहा वाजेनंतरही मतदारांच्या रांगा लागल्या होत्या, विशेषकरुन शहरी भागात संध्याकाळच्या वेळी मतदान करण्यासाठी गर्दी होते, २०१९ च्या निवडणुकीतही हीच परिस्थिती होती, असं आयोगानं सांगितलं आहे. राज्यात संध्याकाळी पाच वाजेपर्यंत सुमारे ५८ पूर्णांक २२ टक्के मतदान झालं होतं, तर अंतिम मतदानाची टक्केवारी ६६ पूर्णांक शून्य पाच इतकी होती. ही सामान्य बाब असून, शेवटच्या मतदाराने मतदान करेपर्यंत मतदान सुरु होतं, असं आयोगानं स्पष्ट केलं आहे.

****

थोर समाजसुधारक, स्त्री शिक्षणाचे प्रणेते महात्मा ज्योतिबा फुले यांचा आज स्मृतीदिन. काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महात्मा फुले यांना आदरांजली वाहिली. महात्मा फुले यांच्या स्मृतीदिनानिमित्त राज्यभरात त्यांना अभिवादन करण्यात येत आहे. छत्रपती संभाजीनगर इथं डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ तसंच सत्यशोधक समाज प्रतिष्ठानच्या वतीनं “फुले दाम्पत्याचे समग्र स्त्रीमुक्तीसाठी योगदान” या विषयावर व्याख्यान झालं. विविध संघटना तसंच सेवाभावी संस्थांतर्फे शहरातल्या औरंगपुरा परिसरातल्या महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आलं. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आणि महात्मा फुले प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने फुले यांच्या जीवन कार्यावर एक दिवसीय कार्यशाळा घेण्यात आली.

****

 

अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेतर्फे दिला जाणारा ‘महात्मा फुले समता पुरस्कार’ यावर्षी प्रसिद्ध लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेते नागराज मंजुळे यांना आज प्रदान करण्यात आला. अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि आमदार छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली पुणे इथं हा पुरस्कार प्रदान सोहळा झाला. एक लाख रुपये, फुले पगडी, मानपत्र, शाल आणि स्मृतीचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे.

****

येत्या एक डिसेंबरला होणाऱ्या राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्वपरीक्षेसंदर्भात महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं परीक्षार्थींना नवीन प्रवेश प्रमाणपत्र जारी केलं आहे. आयोगाच्या संकेतस्थळावर यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे.

****

श्री क्षेत्र आळंदी इथं आज संत ज्ञानेश्वर माऊलींचा ७२८ वा संजीवन समाधी सोहळा उत्साहात आणि भक्तीभावात पार पडला. सकाळी माऊलींच्या समाधीवर दुग्धअभिषेकाने सोहळ्याला सुरूवात करण्यात आली, त्यानंतर संत नामदेव महाराजांच्या हस्ते किर्तन सेवा देण्यात आली. यावेळी मुख्य समाधी मंदिरावर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी, नामदेव महाराजांचं संजीवन समाधी सोहळ्याचं किर्तन हे कार्यक्रम झाले. संजीवन समाधी सोहळ्याची सांगता एक डिसेंबरला संत ज्ञानेश्वरांच्या छबीना मिरवणुकीनं होणार आहे.

****

जालना महानगरपालिका उजास प्रकल्पाच्या माध्यमातून महिला बचत गटांद्वारे उत्पादित केलेल्या मासिक पाळीत वापरण्यात येणाऱ्या सॅनिटरी पॅडची चौथी मागणी आज सातारा, वाशिम आणि वर्धा इथं रवाना करण्यात आली. दीनदयाळ अंत्योदय योजना आणि राष्ट्रीय उपजिविका अभियानांतर्गत जालना महापालिकेच्या माध्यमातून उत्पादित केल्या जाणाऱ्या या सॅनिटरी पॅडला मध्यप्रदेश, गुजरात, डेहरादून, कालाहंडी, तेलंगना, चंद्रपूर या भागात मागणी असून, आजपर्यंत या गटानं ३० हजारांहून अधिक सॅनिटरी पॅड उत्पादनाचा टप्पा गाठल्याची माहिती महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त प्रियंका राजपूत यांनी दिली.

****

 

छत्रपती संभाजीनगर शहरात दुचाकीस्वार आणि सहप्रवाशाला हेल्मेट घालणं बंधनकारक करण्यात आलं आहे. अपर पोलीस महासंचालक, वाहतुक विभागाचे पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत. नियमांचं उल्लंघन करणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्यात येईल असं, या आदेशात नमूद करण्यात आलं आहे.

****

केंद्र पुरस्कृत पंचवार्षिक २१ वी पशुगणना सुरू झाली असून, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ४९ पर्यवेक्षकांसह २५६ प्रगणकांच्या सहाय्याने पशुधनाची माहिती गोळा करण्यात येत आहे. पशुपालकांनी त्यांना पशुधनाची माहिती द्यावी, असं आवाहन छत्रपती संभाजीनगर जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ नानासाहेब कदम यांनी केलं आहे.

सर्वांना कळवू इच्छितो की, दिनांक २५ नोव्हेंबर २०२४ ते २८ फेब्रुवारी २०२५ या काळात २१वी पंचवार्षिक पशुगणना मोबाईल ॲप द्वारे करण्यात येणार आहे तरी सर्व पशुपालकांनी त्यांच्याकडील असलेले पशुधनाची सर्व माहिती आपल्याकडे पशुगणना करण्यासाठी येणाऱ्या प्रगणकांना देऊन सहकार्य करावे.

****

बीड जिल्ह्यात अंबाजोगाई इथं यशवंतराव चव्हाण स्मृती समितीच्या वतीनं सुरू असलेल्या तीन दिवसीय यशवंतराव चव्हाण स्मृती समारोहाचा आज समारोप झाला. डॉ.डी.वाय.पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ.पी.डी.पाटील यावेळी उपस्थित होते. यशवंतराव चव्हाण यांनी सामाजिक, राजकीय, साहित्य, औद्योगिक, सांस्कृतिक आणि इतर सर्वच क्षेत्रात केलेलं काम आज दिशादर्शक आहे, असं मत पाटील यांनी यावेळी व्यक्त केलं.

****

धुळे जिल्ह्यात सप्तशृंगी बहुद्देशीय महिला संस्थेमार्फत ’बालविवाह मुक्त भारत’ अभियान राबवण्यात येत आहे. जिल्ह्यातल्या ५० गावांमध्ये संस्थेमार्फत जनजागृती करून बालविवाह शंभर टक्के थांबवण्यासाठी नियोजन करण्यात आलं आहे. त्यामुळे बालविवाह मुक्त भारत चळवळीत सर्वांनी सहभाग नोंदवावा, असं आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात येत आहे.

****

No comments: