Monday, 25 November 2024

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक: 25.11.2024 रोजीचे सकाळी: 11.00 वाजताचे मराठी बातमीपत्र

 

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date 25 November 2024

Time 11.00 to 11.05 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक २५ नोव्हेंबर २०२ सकाळी .०० वाजता.

****

संसदेचं हिवाळी अधिवेशन आजपासून सुरु झालं. अधिवेशनापूर्वी संसद भवन परिसरात वार्ताहरांशी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, संसदेत चांगली चर्चा झाली पाहिजे, अधिकाधिक खासदार चर्चेत सहभागी झाले पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली. सदनात नवीन सदस्यांना बोण्याची संधी मिळत नसल्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली. संसदेचं हे सत्र अनेक प्रकारे विशेष असून, संविधानाच्या ७५व्या वर्षात आपण पदार्पण करत असल्याचं पंतप्रधान म्हणाले. 

या अधिवेशनात वक्फ दुरुस्ती विधेयकासह १६ महत्त्वाची विधेयकं मांडण्याचं नियोजन आहे. वायूयान, आपत्ती व्यवस्थापन, रेल्वे, बंदरे आदी विधेयकांवरही या अधिवेशनात चर्चा होण्याची शक्यता आहे. हे अधिवेशन २० डिसेंबरपर्यंत चालणार असून, उद्या संविधान दिनानिमित्त सदनाचं कामकाज होणार नाही.

****

केंद्र सरकारचं महिला आणि बालविकास मंत्रालय, ग्रामीण विकास मंत्रालय यांच्यातर्फे, आजपासून अब कोई बहाना नही, या अभियानाचा प्रारंभ करण्यात येणार आहे. या अभियानात नागरीक, सरकार तसंच प्रमुख संबंधितांना लिंगाधारित हिंसा समूळ नष्ट करण्यासाठी प्रयत्न करण्याचं आवाहन करण्यात येणार आहे. लिंगाधारित हिंसेला समाप्त करण्यासाठी नागरीकांमध्ये जागरुकता निर्माण करणं, हा या अभियानाचा उद्देश आहे. दरवर्षी २५ नोव्हेंबर हा दिवस जागतिक महिला हिंसा निर्मूलन दिवस म्हणून पाळण्यात येतो.

****

नागपूर इथं अखिल भारतीय अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती रेल्वे कर्मचाऱ्यांच्या राष्ट्रीय मेळाव्याचं उद्घाटन आज रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते झालं. कोविडमुळे गेली पाच वर्ष संघटनेचा मेळावा होऊ शकला नव्हता. या संघटनेचे देसभरातले सुमारे ३० हजार कर्मचारी मेळाव्यात सहभागी होण्याची अपेक्षा असल्याची माहिती, संघटनेचे विभागीय अध्यक्ष एम चंद्रमोहन यांनी दिली.

****

येत्या १५ जानेवारी रोजी साजऱ्या होणाऱ्या लष्कर दिनाच्या पार्श्वभूमीवर लष्कराच्या संचलनाची झलक असलेल्या ध्वनिचित्रफितीचं अनावरण काल गोव्यात भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव - इफ्फीमध्ये करण्यात आलं. भारतीय लष्कराचे पहिले भारतीय कमांडर - इन - चीफ म्हणून फील्ड मार्शल के एम करिअप्पा यांची १९४९ मध्ये नियुक्ती झाली, त्या घटनेच्या स्मरणार्थ लष्कर दिन संचलन आयोजित केलं जातं. यावेळी लष्कर दिनाचं यजमानपद पुण्याकडे असून, बॉम्बे इंजिनिअरिंग ग्रूप आणि सेंटर इथं लष्कराचं संचलन होणार आहे. यामध्ये ड्रोन आणि रोबोटिक्स सारख्या अत्याधुनिक संरक्षण तंत्रज्ञानाच्या प्रात्यक्षिकांसह, युद्धसराव प्रात्यक्षिकांचा समावेश असेल.

****

शिवसेनेच्या विधीमंडळ पक्षनेतेपदी एकनाथ शिंदे यांची एकमतानं निवड करण्यात आली. मुंबईत काल झालेल्या शिवसेनेच्या नवनिर्वाचित आमदारांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीत अन्य तीन प्रस्ताव देखील पारित करण्यात आले. पक्षाला उत्तम यश मिळाल्याबद्दल शिंदे यांचं अभिनंदन, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी सहकार्य केल्याबद्दल त्यांचं अभिनंदन, आणि महायुतीवर विश्वास दाखवल्याबद्दल जनतेचे आभार व्यक्त करण्याच्या प्रस्तावाचा यात समावेश आहे.

दरम्यान, लाडक्या बहिणींनी काल मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी जाऊन एकनाथ शिंदे यांचं औक्षण करुन, त्यांचं अभिनंदन केलं.

****

निवडणुकीत महायुतीला मिळालेला महाविजय फक्त भाजप-महायुतीचा नाही, तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक नागरिकाच्या विश्वासाचा असल्याचं, भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर जारी केलेल्या पत्रकात त्यांनी, जनतेने दाखवलेल्या या विश्वासासाठी आणि दिलेल्या प्रेमाबद्दल आभार मानले. हे यश आपल्या महाराष्ट्राला एक प्रगतीशील आणि सर्वसमावेशक भवितव्यासोबत, विकसित महाराष्ट्राचं स्वप्न साकार करण्यासाठी प्रेरणा देत राहील, असं फडणवीस यांनी या पत्रात म्हटलं आहे.

****

राज्य विधानसभा निवडणुकीत आमच्या अपेक्षेप्रमाणे निकाल लागला नाही, असं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे. ते काल कराड इथं निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर वार्ताहरांशी बोलत होते. उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी केलेल्या भाषणामुळे मतांचं ध्रुवीकरण झाल्याचा आरोप त्यांनी केला. हा लोकांनी दिलेला निर्णय असल्याने, त्याची कारणमीमांसा करु, यावर अभ्यास करुन पुन्हा नव्या उत्साहाने लोकांसमोर येऊ, असं पवार म्हणाले. महायुतीनं लोकांसमोर प्रभावीपणे त्यांचा कार्यक्रम मांडला, आपल्याकडून प्रचारात कमतरता राहिल्याचं त्यांनी नमूद केलं.

****

राज्यातल्या विधानसभा निवडणुकांची जाहीर झालेल्या निकालाची अधिसूचना, निवडून आलेल्या सदस्यांची यादी आणि राजपत्राची प्रत काल राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांना सादर करण्यात आली. भारत निवडणूक आयोगाचे उपमुख्य निवडणूक आयुक्त हिरदेश कुमार, राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी काल राज्यपालांना ही अधिसूचना सुपूर्द केली.

****

No comments: