Regional Marathi Text
Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 30 November
2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती
संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ३० नोव्हेंबर २०२४
सायंकाळी ६.१०
****
· राज्यात नवनिर्वाचित सरकारचा शपथविधी येत्या पाच डिसेंबरला होण्याचे संकेत
· देशात संसदीय लोकशाहीचं पालन नीट होत नसल्याची ज्येष्ठ नेते शरद पवार यांची टीका
· स्वामिनाथन् आयोगानुसार शेती उत्पादनाचा भाव ठरवावा- मेधा पाटकर यांची मागणी
आणि
· सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरीत पी व्ही सिंधूची अंतिम
फेरीत धडक
****
राज्यात नवनिर्वाचित सरकारचा शपथविधी येत्या
पाच डिसेंबरला होण्याचे संकेत ज्येष्ठ नेत्यांकडून मिळत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे
अध्यक्ष अजित पवार यांनी आज वार्ताहरांशी बोलतांना, अंदाजे पाच तारखेला शपथविधी
सोहळा होईल,
असं सांगितलं. खातेवाटपाचे सर्वाधिकार मुख्यमंत्र्यांचे असतात, शपथ
घेतल्यानंतर मुख्यमंत्री त्याबाबत निर्णय घेतील, आणि खातेवाटप जाहीर करतील, असं
पवार यांनी सांगितलं. इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांवर विरोधकांकडून होत असलेल्या आरोपांबाबत
बोलतांना, पराभवाचं खापर ईव्हीएमवर फोडलं जात असल्याचं सांगत, अशा
तक्रारी करणं योग्य नसून,
जे आरोप करतात, त्यांनी ते सिद्ध करून दाखवावेत, असं
पवार यांनी नमूद केलं.
****
भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर
बावनकुळे यांनीही विरोधकांनी पराभव स्वीकारावा, असं आवाहन केलं आहे. इलेक्ट्रॉनिक
मतदान यंत्रांवर विरोधकांकडून होत असलेल्या आरोपांबाबत बावनकुळे पत्रकारांशी बोलत होते.
लोकसभा निवडणुकीत जनतेने महायुतीला दिलेला कौल आम्ही मान्य केल्याचं बावनकुळे यांनी
नमूद केलं,
ते म्हणाले –
मला असं वाटतं की हा पराभव
त्यांनी मान्य केला पाहिजे. जसा आम्ही लोकसभेत झालेला पराभव मान्य केला, त्यातून आम्ही
शिकलो. त्यातून आम्ही पुढे काम करून जिंकलो. आमचे एवढे खासदार पराभूत झाले, आम्ही साफ
झालो लोकसभेमध्ये. आम्ही हा विचार नाही केला. आम्हाला केवळ तीन लाख, चार लाख मतं मिळाली
असती तर आम्ही तेव्हाच जिंकलो असतो. तेव्हाही निवडणूक ई व्ही एम वरच झाली ना. आम्ही
पराभव मान्यच केला. पुण्याच्या अधिवेशनातनं पराभव मान्य करून आम्ही पूढे गेला आणि आम्ही
जिंकलो.
****
देशात संसदीय लोकशाहीचं पालन नीट होत नसल्याची
टीका ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केली आहे. ते आज पुण्यात वार्ताहरांशी बोलत होते.
निवडणुकीच्या निकालानंतर लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात अस्वस्थता पसरली असून देशात हे
प्रथमच घडत असल्याचं पवार म्हणाले. मतदान यंत्राबद्दल काही शंका आहेत, मात्र
याबद्दल ठोस पुरावा नाही. काही जणांनी पुनर्मोजणीची मागणी केली आहे, मात्र
यातून काही निष्पन्न होईल,
अशी आशा नसल्याचं, पवार यांनी सांगितलं.
****
गोंदिया जिल्ह्यात शालेय विद्यार्थ्यांना
घेण्यासाठी जाणाऱ्या मानव विकास मिशनच्या बसला अपघात झाला. ही घटना आज सकाळी चिंचगडजवळ
घडली. ही बसं रिकामी असल्यामुळं जीवित हानी टळली. या अपघातात वाहक आणि चालक किरकोळ
जखमी झाले. कालच गोंदिया कोहमारा रस्त्यावर एसटी बसचा अपघात झाला, यामध्ये
अकरा लोकांचा मृत्यू झाला होता.
दरम्यान, मुंबई, पुणे
अशा मोठ्या शहरातून निकृष्ट बस पूर्व विदर्भात पाठवल्या जातात, त्यामुळे
गोंदियातला अपघात झाल्याचा आरोप काँग्रेसचे खासदार प्रशांत पडोळे यांनी केला आहे. ते
आज प्रसारमाध्यमांशी बोलत होते. चौकशी करुन अपघातातल्या दोषींवर कारवाई व्हावी, अन्यथा
आंदोलन करु असं पडोळे यांनी म्हटलं आहे.
****
सर्पदंशाची प्रकरणं अधिसूचित रोगांच्या श्रेणीत
समाविष्ट करण्याची सूचना केंद्रीय आरोग्य सचिव पुण्यसलिला श्रीवास्तव यांनी केली आहे.
याबाबत त्यांनी सर्व राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य सचिव तसंच अतिरिक्त
मुख्य सचिवांना पत्र लिहिलं असून, त्यात ही सूचना केली आहे. सर्पदंश
हा गंभीर विषय असून,
२०३० पर्यंत सर्पदंशामुळे होणाऱ्या मृत्यूंचं प्रमाण निम्म्यावर
आणण्याचं उद्दीष्ट निर्धारित केल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज ओडिशाच्या भुवनेश्वर
इथं पोलिस महासंचालक आणि पोलिस महानिरीक्षकांच्या अखिल भारतीय परिषदेत सहभागी होत आहेत.
काल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते या परिषदेचं उद्घघाटन झालं. सर्व राज्यं
आणि केंद्रशासित प्रदेशांचे पोलिस महासंचालक, तसंच केंद्रीय राखीव पोलिस बल, रॉ, राष्ट्रीय
सुरक्षा दल - एनएसजी,
गुप्तचर विभाग आणि विशेष सुरक्षा दल - एसपीजीचे प्रमुख या परिषदेला
उपस्थित आहेत. या परिषदेत अंतर्गत सुरक्षा, सायबर क्राईम, नक्षलवाद, कृत्रिम
बुद्धिमत्ता साधनांमुळे निर्माण होणारी आव्हानं, ड्रोनचे नवीन धोके आणि
दहशतवादाचा सामना यासारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. या परिषदेत
विशिष्ट सेवेसाठीचे राष्ट्रपती पोलिस पदकंही प्रदान करण्यात येणार आहेत.
****
महिला आणि बालविकास विभागाच्या वतीनं नोव्हेंबर
महिना हा आंतरराष्ट्रीय दत्तक महिना म्हणून पाळण्यात येतो. या दत्तक महिन्यानिमित्त
हिंगोली जिल्ह्यातल्या कळमनुरी, आखाडा बाळापूर इथले पोलिस ठाणे, बसस्थानक, उपजिल्हा
रुग्णालय आदी ठिकाणी काल जनजागृतीपर कार्यक्रम घेण्यात आले. यावेळी मुल दत्तक घेण्यास
इच्छुक असलेल्या पालकांना कायदेशीर दत्तक प्रक्रियेसंदर्भात माहिती देण्यात आली. दरम्यान, सोडून
दिलेल्या, अनाथ बालकांसंदर्भात माहिती मिळाल्यास तात्काळ जिल्हा महिला आणि बाल विकास अधिकारी
कार्यालय हिंगोली यांना संपर्क करावा, असं आवाहन जिल्हा बाल संरक्षण
अधिकारी सरस्वती कोरडे यांनी केलं आहे.
****
स्वामिनाथन् आयोगानुसार शेतकऱ्यांच्या उत्पादनाचा
भाव ठरवला गेला पाहिजे,
अशी मागणी नर्मदा बचाव आंदोलन कार्यकर्त्या आणि जन आंदोलनाच्या
राष्ट्रीय समन्वय मेधा पाटकर यांनी केली आहे. छत्रपती संभाजीनगर इथं महात्मा गांधी
भवनात शेतकरी कष्टकरी कार्यकर्त्यांबरोबर पाटकर यांनी आज संवाद साधला, त्यावेळी
त्यांनी ही मागणी केली. शेतकरी कुटुंबाच्या श्रमांची दखल या शेत मालाच्या भावामध्ये
धरली जावी,
श्रमाचं मूल्य-श्रमाची प्रतिष्ठा जोपासली जावी, श्रमजीवी
संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कायद्याचा अभ्यास करण्याची गरजही पाटकर यांनी व्यक्त केली.
दरम्यान, ज्येष्ठ कार्यकर्ते डॉक्टर बाबा आढाव यांच्या आत्मक्लेष उपोषणाच्या समर्थनार्थ आज छत्रपती संभाजीनगर इथं श्रमजीवी संघटनेच्या
वतीने एक दिवसीय उपोषण करण्यात आलं.
****
लखनऊ इथं सुरू असलेल्या सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय
बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरीत पी व्ही सिंधूने अंतिम फेरीत धडक मारली आहे. पुरुष
एकेरीच्या उपांत्य फेरीत लक्ष्य सेनची लढत जपानच्या शोगो ओगवा याच्याशी तर प्रियांशु
राजावत याची लढत सिंगापूरच्या जिया हेंग जेसन तेह याच्याशी होणार आहे. मिश्र दुहेरीत
ध्रुव कपिला आणि तनिषा क्रिस्तो या जोडीनं चीनच्या झोऊ झी होंग आणि योंग जी यी यांचा
२१-१६,२१-१५ असा पराभव करत अंतिम फेरीत धडक मारली आहे.
****
५३ वी आंतरजिल्हा आणि ८६ वी राज्य अजिंक्यपद
टेबल टेनिस स्पर्धा दोन ते सहा डिसेंबर दरम्यान पुण्यात होणार आहे. या स्पर्धेत २५
जिल्ह्यांमधील एक हजारांहून अधिक खेळाडू सहभागी होत आहेत.
****
अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या वतीनं
दिल्ली इथं होणाऱ्या ९८ वाव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला जाण्यासाठी केंद्र
सरकारने पुण्याहून विशेष रेल्वेची व्यवस्था केली आहे. केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ
यांनी याबाबत माहिती दिली. त्यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे आभार मानले.
२१, २२ आणि २३ फेब्रुवारी २०२५ रोजी हे साहित्य संमेलन होणार आहे.
****
राज्यात थंडीची तीव्र लाट पसरली असून, पुणे, नाशिक
आणि अहिल्यानगर जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक गारवा जाणवत आहे. येत्या तीन दिवसांत काही
जिल्ह्यांमध्ये थंडीची लाट येईल, असा इशारा हवामान खात्यानं दिला आहे. परभणी
जिल्ह्यात काल रात्री अकरा अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाल्याचं आमच्या वार्ताहरानं
कळवलं आहे. विदर्भातही पारा घसरला असून, अमरावती जिल्ह्यात सकाळी बारा
अंश सेल्सिअस,
धारणी-चिखलदरा इथं नऊ अंश सेल्सिअस तर नाशिक जिल्ह्याच्या निफाड
तालुक्यात आज सकाळी सात अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली, मुंबईत
काल किमान तापमान सोळा पूर्णांक पाच अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं असून गेल्या आठ
वर्षातला हा सर्वात थंड दिवस असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे.
****
नैऋत्य बंगालच्या उपसागरात तयार झालेलं फेंगल
चक्रीवादळ आज रात्री उत्तर तामिळनाडू किनारपट्टी ओलांडून पुद्दुचेरीजवळच्या कराईकल
आणि महाबलीपुरम्च्या किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे. सध्या हे चक्रीवादळ चेन्नईपासून
सुमारे ११० किलोमीटर तर पुद्दुचेरीपासून सुमारे १२० किलोमीटर दूर आहे. खबरदारीचा उपाय
म्हणून किनारपट्टी आणि सखल भागात राहणाऱ्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं
आहे. चेन्नईत होत असलेल्या मुसळधार पावसामुळे विमान उड्डाणांवर
परिणाम झाला आहे. वादळी वारे आणि पावसाचं पाणी साचल्याने विमानतळांवरील सेवा तात्पुरत्या
स्थगित करण्यात आल्या आहेत. चेन्नईहून उड्डाण करणाऱ्या आणि चेन्नईला उतरणाऱ्या सहा
विमानांचं उड्डाण रद्द करण्यात आलं आहे.
राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल, राज्य
आपत्ती प्रतिसाद दल,
नौदल आणि तटरक्षक दल सज्ज ठेवण्यात आलं आहे. किनारीभागात सुमारे
३०० पोलिसांची फौज तैनात आहे. सर्व सहा जिल्ह्यातले मोठे फलक हटवण्यात आले आहेत.
तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टालिन
यांनी वादळाच्या परिस्थितीचा आढावा घेतला. तिरुवल्लूर, कांचिपुरम, रानीपेट
आणि अन्य जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना आवश्यक त्या कार्यवाहीसंदर्भातल्या
सूचना देण्यात आल्या असल्याचं, स्टालिन यांनी माध्यमांना सांगितलं.
****
No comments:
Post a Comment