Friday, 29 November 2024

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक: 29.11.2024 रोजीचे सकाळी: 11.00 वाजताचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date 29 November 2024

Time 11.00 to 11.05 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक २९ नोव्हेंबर २०२४ सकाळी ११.०० वाजता.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून तीन दिवसांच्या ओडिशा दौऱ्यावर आहेत. भुवनेश्वर इथं होत असलेल्या पोलिस महासंचालक आणि पोलिस महानिरीक्षकांच्या अखिल भारतीय परिषदेला ते उपस्थित राहणार आहेत. सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचे पोलीस महासंचालक, तसंच केंद्रीय राखीव पोलिस बल, रॉ, एनएसजी, गुप्तचर विभाग आणि एसपीजीचे प्रमुख या परिषदेला उपस्थित राहणार आहे. पंतप्रधान मोदींसह केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल हे देखील या परिषदेला उपस्थित राहणार आहेत. या परिषदे अंतर्गत सुरक्षा, सायबर क्राईम, माओवाद, एआय टूल्समुळे निर्माण होणारी आव्हानं, ड्रोनचे नवीन धोके आणि दहशतवादाचा सामना यासारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होणार आहे.

****

दरम्यान, देशातल्या युवकांना सर्वोच्च स्थानावर पोहचण्यासाठी आणि आपल्या कारकिर्दीत उत्कृष्ट प्रदर्शन करण्यासाठी सर्व आवश्यक संधी देण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे, अस आश्वासन पंतप्रधान मोदी यांनी दिलं आहे. माय जी ओ व्ही हॅंडलवर त्यांनी हे आश्वासन दिलं. भारतीय युवा शक्ति मध्ये कोणताही चमत्कार करण्याचं सामर्थ्य आहे, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

****

भारतीय सुरक्षा दलांवर केवळ देशाच्या सुरक्षेची जबाबदारी नसून, सायबर युद्ध आणि दहशतवाद यासारखी नवी आव्हाने देखील असून त्यांना तोंड देण्यासाठी सक्षम होणं आवश्यक असल्याचं प्रतिपादन, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं आहे. तामिळनाडूतल्या वेलिंगटन इथल्या संरक्षण सेवा प्रशिक्षण महाविद्यालयात विद्यार्थी अधिकारी आणि शिक्षकांना संबोधित करताना काल त्या बोलत होत्या. आजच्या जगात वेगाने बदलणाऱ्या भू- राजनैतिक वातावरणात सर्व प्रकारच्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी आपण तयार असलं पाहिजे, असं राष्ट्रपती म्हणाल्या. 

****

व्यवसाय सुलभतेसाठी केंद्र सरकार विविध उपाययोजना करत असून, राष्ट्रीय एक खिडकी योजनेचा उद्योगक्षेत्राला मोठ्या प्रमाणावर फायदा झाला असल्याचं, केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पीयुष गोयल यांनी सांगितलं. नवी दिल्ली इथं काल भारतीय उद्योग महासंघातर्फे सुरु करण्यात आलेल्या ईझ ऑफ डुईंग बिझनेस अँड रेग्युलेटरी अफेअर्स पोर्टलचं उद्घाटन काल गोयल यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. व्यवसाय सुलभतेसाठी केंद्र सरकार आणि सीआयआय तर्फे उपलब्ध सुविधांची माहिती या पोर्टलवर मिळू शकेल. जनविश्वास टू पॉईंट झीरो या विधेयकाद्वारे ३०० पेक्षा जास्त कायदे शिथिल करण्यात येणार असल्याची माहिती, त्यांनी दिली.

****

राज्यात सरकार स्थापनेसंदर्भात काळजीवाहू मुख्यमंत्री शिवसेनेचे प्रमुख एकनाथ शिंदे, भाजप नेते देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी काल दिल्लीत केंद्रीत गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. सरकार स्थापनेसंदर्भातल्या अनेक बाबींवर यावेळी चर्चा करण्यात आली. भाजप अध्यक्ष जे पी नड्डा, राष्ट्रवादीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि प्रांताध्यक्ष सुनिल तटकरे यावेळी उपस्थित होते.

या बैठकीनंतर फडणवीस यांनी सामाजिक माध्यमावरुन राज्यात विधानसभा निवडणुकीत केलेल्या सहकार्याबद्दल शहा यांचे आभार मानले. पक्षाच्या कार्यकर्त्यांना प्रेरित करण्याचं काम शहा यांनी केल्याचं, फडणवीस यांनी म्हटलं आहे.

****

नांदेड इथल्या विद्युत महामंडळातले सहायक लेखापाल सोनाजी श्रीमंगले आणि विद्युत सहायक गजानन केंद्रे या दोघांना २० हजार रुपयांची लाच घेताना काल अटक करण्यात आली. तक्रारदाराला वीज बिल कमी करून देण्यासाठी त्यांनी ही लाच मागितली होती. याप्रकरणी नांदेड ग्रामीण ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

****

बीड जिल्ह्यात विशेष मोहिम राबवून सार्वजनिक रस्त्यावर रहदारीस अडथळा निर्माण होऊन आणि नागरीकांच्या जिवीतास धोका निर्माण होईल अशा  २१४ वाहन चालकांविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. जिल्हा वाहतूक शाखेच्या वतीनं ही कारवाई करण्यात आली.

****

संपूर्ण देशभरात बालविवाह मुक्त भारत हे अभियान राबवण्यात येत आहे. या अभियानाच्या निमित्ताने हिंगोली जिल्ह्यातल्या कळमनुरी तालुक्यात मसोड ग्रामपंचायत कार्यालय आणि खानापूर इथल्या विद्यासागर शाळेत जनजागृती कार्यक्रम घेण्यात आले.

****

सन २०२२-२३ या आर्थिक वर्षातल्या परभणी जिल्हा परिषदेअंतर्गत विविध विषयांची अहवाल वाचन बैठक काल विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. गावडे यांनी विविध विभागांच्या योजनांच्या कामकाजाबाबत तपशीलवार माहिती जाणून घेऊन त्यावर मार्गदर्शन केलं, तसंच जिल्हा परिषदेतल्या कामकाजाची पाहणी केली.  

****

ओमानमधील मस्कत इथं काल झालेल्या पुरुषांच्या कनिष्ठ आशिया चषक हॉकी स्पर्धेत गतविजेत्या भारतानं जपानवर तीन - दोन अशा फरकानं विजय मिळवला. हा भारताचा पूल ए मधील सलग दुसरा विजय आहे. यापूर्वी भारतानं थायलंडविरुद्ध ११ - शून्य असा जोरदार विजय मिळवला होता. भारताचा पुढील सामना उद्या तैवानशी होणार असून, अंतिम सामन्यात रविवारी भारतीय संघाची गाठ कोरियाशी पडणार आहे.

****

सिंगापूर इथं सुरु असलेल्या जागतिक बुद्धिबळ चॅम्पियनशिपमध्ये आज चौथ्या सामन्यामध्ये डी. गुकेशचा सामना चीनच्या डिंग लिरेनशी होईल. तिसरा सामना जिंकून त्यांनी मालिकेत बरोबरी साधली आहे.

****


No comments: