Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date - 27 November 2024
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक २७ नोव्हेंबर २०२४ दुपारी १.०० वा.
****
संसदेच्या दोन्ही सभागृहात विरोधकांनी
आज उत्तर प्रदेशातील संभल प्रकरणावरुन गोंधळ घातला. राज्यसभेचं कामकाज आज
दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. लोकसभेतही कामकाज सुरु झाल्यानंतर सुरुवातील बारा
वाजेपर्यंत गोंधळामुळं कामकाज तहकूब करण्यात आलं होतं. त्यानंतर कामकाज सुरु होताच
पुन्हा गोंधळाला सुरुवात झाल्यानंतर लोकसभेचंही कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात
आलं.
****
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
तामिळनाडूच्या चार दिवसांच्या दौऱ्यासाठी आज कोईम्बतूर इथं पोहोचल्या आहेत. त्या
उद्या ऊटीत सुरक्षा सेवा स्टाफ महाविद्यालयाच्या एका कार्यक्रमात भाग घेतील.
यावेळी त्या प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांना संबोधित करतील. या दौऱ्यात राष्ट्रपती
मुर्मू परवा शुक्रवारी नीलगिरीमध्ये विविध जनसमुहाशी चर्चा करतील. तामिळनाडूतील
खराब हवामानामुळे राष्ट्रपती या हवाई मार्गाने प्रवास करणार नाहीत, त्यामुळे
कोईम्बतूर आणि ऊटी परिसरात कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे.
****
विकसित भारत २०४७ च्या संकल्पाला जोडूनच
बालविवाहमुक्त भारताचे लक्ष्य असल्याचं केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री
अन्नपूर्णा देवी यांनी म्हटलं आहे. गेल्या दहा वर्षात महिला सक्षमीकरणासाठी
सरकारनं लिंग समानतेसाठी जेंडर बजेटसारखी विविध पावलं उचलली आहेत, असं
त्या म्हणाल्या. दिल्ली इथं त्यांच्या उपस्थितीत आजपासून देशभरात बालविवाह मुक्त
भारत अभियानाची सुरुवात झाली. बालविवाहासारख्या प्रथेचं देशातून समूळ उच्चाटन करणं, हा
या अभियानाचा उद्देश आहे. या कार्यक्रमात बालविवाह मुक्त भारत पोर्टलची सुरुवात
करण्यात आली. जागरुकता वाढवणं, तसंच
बालविवाहासारख्या घटनांची त्वरीत माहिती मिळण्यासाठी या पोर्टलचा उपयोग होणार आहे.
****
पंचावन्नाव्या आंतरराष्ट्रीय चित्रपट
महोत्सवाचा उद्या समारोप होत आहे. गोवा इथं दिग्दर्शक तथा निर्माते आशुतोष
गोवारीकर यांच्या अध्यक्षतेखाली सुरु असलेल्या या महोत्सवात तपन सिन्हा यांच्या
हार्मोनियन या चित्रपटासह जवळपास ७० चित्रपट आज दाखवले जातील. महोत्सवातल्या
शताब्दी सत्रात,
तपन सिन्हा यांची फिल्मोग्राफी, कथावाचनाची
अनोखी शैली आणि भारतीय चित्रसृष्टीत त्यांचं योगदान यावर चर्चा होईल. अर्जुन
चक्रवर्ती,
एन मनु चक्रवर्ती आणि प्रख्यात अभिनेत्री शर्मिला टागोर या
चर्चेत सहभाग घेतील.
****
शासकीय वसतीगृहात प्रवेश न मिळालेल्या
अनुसूचित जाती आणि नवबौध्द घटकांतील विद्यार्थ्यांसाठी राज्य शासनानं भारतरत्न डॉ.
बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत अर्ज करण्याची
अंतिम तारीख ३० नोव्हेंबर आहे. विद्यार्थ्यांनी या योजनेसाठी या योजनेसाठी एच एम ए
एस डॉट एम ए एच ए आय टी डॉट ओ आर जी या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करून अर्जाची
प्रत सर्व कागदपत्रांसह सहायक आयुक्त कार्यालयात जमा करावी, असं
आवाहन समाज कल्याण सहायक आयुक्त समाधान इंगळे यांनी केलं आहे.
****
नांदेड जिल्ह्यात २५ वर्षानंतर प्रथमच
लोकसभा पोटनिवडणूक आणि विधानसभेसाठी नागरिकांनी एका दिवशी दोन वेळा मतदान केलं.
मात्र मतदार यादी,
मतमोजणी, मतमोजणी केंद्राची रचना आणि त्यातील
सुविधा याबाबतीत एकही तक्रार प्रशासनाकडे आली नाही. त्यामुळे नांदेड जिल्हा
प्रशासनाने जनतेच्या सकारात्मक प्रतिसादाबद्दल आभार मानले आहेत.
****
नैऋत्य बंगालच्या उपसागरावरील खोल
दाबाचा पट्टा आज संध्याकाळपर्यंत फेंगल चक्री वादळात रुपांतरीत होत आहे. यामुळं
श्रीलंकेच्या बेटावर दोनशे मिलिमीटरपेक्षा जास्त मुसळधार पाऊस अपेक्षित असल्याचं
श्रीलंकेच्या हवामान विभागानं म्हटलं आहे.
नैऋत्य बंगालच्या उपसागरावरील खोल दाबाचा पट्टा सध्या चेन्नईच्या
दक्षिण-पूर्वेस ५९० किलोमीटर अंतरावर आहे. येत्या १२ तासांत हा पट्टा उत्तर-उत्तर
पश्चिमेकडे सरकत राहण्याची आणि चक्रीवादळात तीव्र रुपांतरीत होण्याची शक्यता आहे.
येत्या ४८ तासांत हा खोल दाबाचा पट्टा तामिळनाडू किनारपट्टी आणि श्रीलंकन किनारपट्टीकडे सरकत राहील. या
पार्श्वभूमीवर हवामान विभागानं तामिळनाडूमध्ये अत्यंत मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त
केला आहे.
****
भारताच्या राष्ट्रीय उत्तेजक विरोधी
संस्थेनं टोकियो ऑलिम्पिक कांस्यपदक विजेता बजरंग पुनियाला चार वर्षांसाठी निलंबित
केलं आहे. बजरंग पुनियानं दहा मार्च रोजी राष्ट्रीय संघ निवड चाचणी दरम्यान डोपिंग
चाचणीसाठी नमुना देण्यास नकार दिला होता. यापूर्वी, या संस्थेनं २३
एप्रिल रोजी बजरंग पुनियाला तात्पुरतं निलंबित केलं होतं. त्यानंतर आता चार
वर्षांची बंदी त्याच्यावर घालण्यात आली आहे. यामुळं बजरंग पुनियाला कुस्ती
स्पर्धांमध्ये सहभाग घेता येऊ शकणार नाही तसंच आंतरराष्ट्रीय प्रशिक्षकापदासाठी
अर्जही करता येणार नाही.
****
No comments:
Post a Comment