Friday, 29 November 2024

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक: 29.11.2024 रोजीचे दुपारी: 01.00 वाजताचे मराठी बातमीपत्र

 

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date - 29 November 2024

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक नोव्हेंबर २०२ दुपारी १.०० वा.

****

संसदेच्या हिवाळी अधिवेशनात विरोधी पक्षांच्या गदारोळामुळे कामकाज आजही बाधित झालं.

लोकसभेत कामकाज सुरु होताच एका खासगी उद्योग समुहाच्या कथित लाचप्रकरणाच्या मुद्यावर काँग्रेस, द्रविड मुनेत्र कळघम, समाजवादी पक्षासह इतर विरोधी पक्षाच्या सदस्यांनी घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. अध्यक्ष ओम बिर्ला यांनी गोंधळातच प्रश्नोत्तराचा तास पुकारला. मात्र गदारोळ वाढतच गेल्याने सदनाचं कामकाज एका तासासाठी स्थगित करण्यात आलं होतं. कामकाज पुन्हा सुरु झाल्यावर, हंगामी अध्यक्षांनी, सरकार चर्चेसाठी तयार असून, नियोजित कामकाज झाल्यावर चर्चा होईल, असं सांगितलं. मात्र गदारोळ वाढतच गेल्यानं लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी स्थगित झालं. 

राज्यसभेतही विरोधी पक्षांची चर्चेची मागणी फेटाळून लावत सभापती जगदीप धनखड यांनी कामकाज सुरु ठेवण्याचा प्रयत्न केला. धनखड यांनी सदनातल्या या सततच्या व्यत्ययाबद्दल चिंता व्यक्त करत, सदस्य वाईट उदाहरण घालून देत असल्याचं नमूद केलं. मात्र गदारोळ वाढत गेल्यानं, राज्यसभेचं कामकाजही दिवसभरासाठी स्थगित झालं.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून तीन दिवसांच्या ओडिशा दौऱ्यावर आहेत. भुवनेश्वर इथं होत असलेल्या पोलिस महासंचालक आणि पोलिस महानिरीक्षकांच्या अखिल भारतीय परिषदेला ते उपस्थित राहणार आहेत. सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचे पोलीस महासंचालक, तसंच केंद्रीय राखीव पोलिस बल, रॉ, राष्ट्रीय सुरक्षा दल - एनएसजी, गुप्तचर विभाग आणि विशेष सुरक्षा दल - एसपीजीचे प्रमुख या परिषदेला उपस्थित राहणार आहे. या परिषदेत अंतर्गत सुरक्षा, सायबर क्राईम, माओवाद, एआय टूल्समुळे निर्माण होणारी आव्हानं, ड्रोनचे नवीन धोके आणि दहशतवादाचा सामना यासारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होणार आहे.

****

केंद्र सरकारने देशातल्या प्रसिद्ध पर्यटन स्थळांना जागतिक मानकांच्या नुसार विकसित करण्यासाठी सुमारे तीन हजार ३०० कोटी रुपयांच्या ४० योजनांना मंजुरी दिली आहे. २३ राज्यातल्या या योजनांसाठी राज्यांना विशेष मदत दिली जाईल, ज्यावर पुढचे ५० वर्ष कोणतंही व्याज आकारलं जाणार नाही. यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यात जलसंग्रहालय, कृत्रिम प्रवाळ निर्मिती प्रकल्पासाठी ४६ कोटी रुपये, तर नाशिक इथं रामकाल मार्गासाठी ९९ कोटी रुपये मंजुर करण्यात आले आहेत. 

पर्यटनामध्ये अनेकांच्या जीवनात समृद्धी आणण्याची क्षमता असून, सरकार देशात पर्यटन पायाभूत सुविधा वाढवण्यावर भर देत राहील, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाजमाध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. 

****

पदवी अभ्यासक्रमाला प्रवेशित असणाऱ्या विद्यार्थांना त्यांचा पदवी अभ्यासक्रमाचा कालावधी कमी किंवा अधिक करता यावा यासाठी विद्यापीठ अनुदान आयोग - युजीसी पर्याय उपलब्ध करुन देणार आहे. या संदर्भातल्या प्रकियेसाठी नुकतीच यूजीसीने मान्यता दिली. यासाठी पदवी अभ्यासक्रमाला असणाऱ्या विद्यार्थांना त्यांच्या प्रत्येक सेमिस्टर मध्ये अधिक गुण घेऊन कमी कालावधीत तीन किंवा चार वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण करता येईल, असं आयोगाचे अध्यक्ष जगदीश कुमार यांनी सांगितलं.

****

भारतीय जनता पक्षाचे आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वात आज मुंबईत ईव्हीएम- मतदानयंत्राच्या समर्थनार्थ आंदोलन करण्यात आलं. पराभवाचं खापर विरोधक ईव्हीएमवर फोडत असल्याची प्रतिक्रिया सदाभाऊ खोत यांनी दिली. काँग्रेस पक्षानंही ईव्हीएम आणि एकूणच मतदान प्रक्रियेवर शंका व्यक्त केली आहे.   

****

६१ व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्काराच्या प्रवेशिकेला मुदतवाढ देण्यात आली असून, निर्मात्यांनी २७ डिसेंबरपर्यंत प्रवेशिका सादर करण्याचं आवाहन महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील यांनी केलं आहे. एक जानेवारी २०२३ ते ३१ डिसेंबर २०२४ या कालावधीत प्रमाणपत्र मिळालेल्या मराठी चित्रपटांच्या निर्मात्यांना या पुरस्कारासाठी अर्ज करता येणार आहे.

****

नांदेड इथल्या विद्युत महामंडळातले सहायक लेखापाल सोनाजी श्रीमंगले आणि विद्युत सहायक गजानन केंद्रे या दोघांना २० हजार रुपयांची लाच घेताना काल अटक करण्यात आली. तक्रारदाराला वीज बिल कमी करून देण्यासाठी त्यांनी ही लाच मागितली होती. याप्रकरणी नांदेड ग्रामीण ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

****

ओमानमधील मस्कत इथं काल झालेल्या पुरुषांच्या कनिष्ठ आशिया चषक हॉकी स्पर्धेत गतविजेत्या भारतानं जपानवर तीन - दोन अशा फरकानं विजय मिळवला. हा भारताचा पूल ए मधील सलग दुसरा विजय आहे. अंतिम सामन्यात रविवारी भारतीय संघाची गाठ कोरियाशी पडणार आहे.

****

No comments: