Tuesday, 26 November 2024

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 26.11.2024 रोजीचे सकाळी 07.10 वाजताचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 26 November 2024

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक २६ नोव्हेंबर २०२४ सकाळी ७.१० मि.

****

संविधान दिन आज देशभर होणार साजरा, राष्ट्रपतींच्या उपस्थितीत संसदेत मुख्य कार्यक्रमाचं आयोजन. 

केंद्रीय मंत्रिमंडळाची रेल्वेच्या तीन ‘मल्टीट्रॅकिंग’ प्रकल्पांना मंजुरी, अजिंठा-वेरुळ पर्यटनस्थळाला होणार लाभ. 

मुख्यमंत्रिपदाबाबत महायुतीतील तिन्ही पक्ष एकत्रित निर्णय घेऊ, अजित पवार यांचं प्रतिपादन तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या विधिमंडळ गटनेतेपदी आदित्य ठाकरे यांची निवड. 

आणि

बॉर्डर- गावस्कर कसोटी क्रिकेट मालिकेत भारताची विजयी सलामी, पर्थ कसोटीत ऑस्ट्रेलियावर २९५ धावांनी विजय. 

****

भारतीय संविधानाच्या अमृतमहोत्सवी वर्षाला आजपासून प्रारंभ होत आहे. या निमित्तानं आजपासून २५ नोव्हेंबर २०२५ पर्यंत वर्षभर विविध कार्यक्रम होणार आहेत. संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी काल नवी दिल्ली इथं ही माहिती दिली. हा उत्सव देशाचा असून नागरिकांनी त्यात उत्साहानं सहभागी व्हावं, असं आवाहन रिजिजू यांनी केलं. 

दिल्लीत संविधान सदनाच्या मध्यवर्ती सभागृहात आज एक भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या कार्यक्रमात संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीला संबोधित करणार आहेत. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्वोच्च न्यायालयानं आयोजित केलेल्या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. याच कार्यक्रमात पंतप्रधानांच्या हस्ते भारतीय न्यायपालिकेच्या वार्षिक अहवालाचे प्रकाशन करण्यात येणार आहे.

****

आजच्या संविधानदिनानिमित्त काल नवी दिल्लीत हमारा संविधान हमारा स्वाभिमान पदयात्रा काढण्यात आली. डॉ. मनसुख मांडवीय, पीयुष गोयल, किरेन रिजिजू, रक्षा खडसे या केंद्रीय मंत्र्यांसह अनेक खासदार आणि ऑलिम्पिकपटू, राष्ट्रीय छात्रसेना तसंच सेवायोजनेचे विद्यार्थी आणि इतर स्वयंसेवी संघटनांचे सदस्य मोठ्या संख्येने या पदयात्रेत सहभागी झाले होते. 

****

संविधान दिनानिमित्त आज धाराशिव इथं मतदार जनजागरण समिती आणि संविधान अमृतमहोत्सवी समितीच्या वतीने संविधान जनजागरण रॅलीचं आयोजन करण्यात आलं आहे, जिल्हाधिकारी सचिन ओम्बासे यांच्या हस्ते सकाळी साडे दहा वाजता हिरवा झेंडा दाखवून या रॅलीला सुरुवात होईल. डॉ. बी. आर. आंबेडकर प्रतिष्ठानच्यावतीने सायंकाळी भीमगीत गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. 

****

जालना महापालिकेच्यावतीने शहरातल्या नागरीकांसह सर्व शासकीय कार्यालय, सामाजिक, राजकीय पक्षाची कार्यालय यांना संविधान उद्देशिका भेट म्हणून देण्यात येत आहे. जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांना संविधान उद्देशिकाची फोटो फ्रेम भेट देऊन या उपक्रमाला प्रारंभ करण्यात आला. यासाठी महापालिकेने ६० हजार संविधान उद्देशिका छापल्या आहेत.

छत्रपती संभाजीनगर इथं आज भारतीय संविधान, सन्मान, सुरक्षा, संवर्धन समितीतर्फे रॅली काढण्यात येणार आहे. क्रांती चौक इथून सकाळी ११ वाजता ही रॅली निघेल. 

****

केंद्रीय मंत्रिमंडळानं रेल्वे मंत्रालयाच्या एकूण अंदाजे सात हजार ९२७ कोटी रूपयांच्या प्रकल्पांना काल झालेल्या बैठकीत मंजूरी दिली. यात जळगाव-मनमाड चौथी मार्गिका, भुसावळ-खांडवा तिसरी आणि चौथी मार्गिका, आणि प्रयागराज-माणिकपूर तिसरी मार्गिका यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश या तीन राज्यांमधल्या सात जिल्ह्यांचा समावेश असलेल्या तीन प्रकल्पांमुळे, भारतीय रेल्वेच्या विद्यमान संपर्क जाळ्याचा विस्‍तार सुमारे ६३९ किलोमीटरने वाढणार आहे. याचा लाभ अजिंठा आणि वेरूळ लेणी, देवगिरी किल्ला या पर्यटनस्थळांना होणार आहे. तसंच ज्योतिर्लिंग आणि धार्मिक स्थळांना हा रेल्वेमार्ग जोडला जाणार आहे. कृषी उत्पादने, खते, कोळसा, पोलाद, सिमेंट, मालवाहक कंटेनर इत्यादींच्‍या वाहतुकीसाठी हा आवश्यक मार्ग  आहे. त्‍यावरील वाहतुकीची क्षमता वाढवण्याच्या कामांमुळे प्रतीवर्ष ५१ दशलक्ष टनाची अतिरिक्त मालवाहतूक होवू शकणार आहे.

****

संसदेचं हिवाळी अधिवेशन कालपासून सुरु झालं. लोकसभेत कामकाज सुरु होताच दिवंगत खासदार वसंत चव्हाण, हरिश्चंद्र चव्हाण यांच्यासह सदनाच्या दिवंगत सदस्यांना आदरांजली अर्पण करण्यात आली. राज्यसभेतही कामकाज सुरु झाल्यावर दिवंगत सदस्यांना आदरांजली अर्पण करण्यात आली. अदानी उद्योग समूहाविरोधातल्या कथित लाचखोरी प्रकरणावरून विरोधकांनी गदारोळ केल्यानंतर संसदेच्या दोन्ही सभागृहाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. दरम्यान, संविधानदिनानिमित्त आज संसदेच्या दोन्ही सभागृहांची बैठक होणार नाही.  

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते काल आयसीए जागतिक सहकार परिषदेचं दिल्ली इथं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी पंतप्रधानांनी संयुक्त राष्ट्रांच्या आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष २०२५ चा प्रारंभ केला. जगासाठी सहकार हे एक मॉडेल असेल पण भारतासाठी ती एक संस्कृती आहे, असं प्रतिपादन पंतप्रधानांनी केलं. महात्मा गांधी यांच्या ग्रामस्वराज्य अभियानामुळे सहकार क्षेत्राला नवी ऊर्जा मिळाल्याचं, पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. 

महात्मा गांधीजी के ग्राम स्वराज ने सामुदायिक भागीदारी को .फिर से नई उर्जा दी। उन्होंने खादी और ग्रामोद्योग जैसे क्षेत्र मे सहकारीता के माध्यम से एक नया आंदोलन खडा किया और आज खादी और ग्रामोद्योग को हमारी को ऑपरेटीव्हज्‌ ने बडे बडे ब्रांच से भी आगे पहोंचा दिया है। 

ही परिषद सर्वांसाठी एकसंध, शांततापूर्ण आणि समृद्ध भविष्य घडवण्यासाठी सहकारी संस्थांची भूमिका जाणून घेणार आहे. या सहा दिवसीय परिषदेत भूतानचे पंतप्रधान दाशो शेरिंग तोबगे आणि फिजीचे उपपंतप्रधान मनोआ कामिकामिका यांच्यासह जवळपास तीन हजार विदेशी आणि भारतीय प्रतिनिधी सहभागी होत आहेत. 

केंद्रीय गृह तथा सहकार मंत्री अमित शहा यांनी या परिषदेत केलेल्या भाषणात, यंदा साजरं होत असलेलं सहकार वर्ष हे महिला, शेतकरी आणि गरीबांच्या सक्षमीकरणासाठी सहायक ठरेल, असा विश्वास व्यक्त केला. 

****

मुख्यमंत्रिपदासंदर्भात महायुतीतले तीनही पक्ष मिळून निर्णय घेऊ आणि राज्याला स्थिर सरकार देऊ, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी व्यक्त केला आहे. आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार, राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त काल कराड इथं प्रितीसंगम या त्यांच्या समाधीस्थळी अभिवादन केल्यानंतर अजित पवार बोलत होते. ज्यांच्या विचारधारा आणि आदर्शांवर आम्ही लोकसेवेचा वारसा पुढे नेत आहोत, चव्हाण यांच्या दूरदृष्टीतील समृद्ध महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी लोकसेवेच्या माध्यमातून योगदान देण्याचा दृढ संकल्प आपण केला असल्याचं, पवार यांनी म्हटलं आहे. 

****

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या विधिमंडळ गटनेतेपदी आमदार आदित्य ठाकरे यांची एकमताने निवड करण्यात आली. विधानसभेच्या गटनेतेपदी आमदार भास्कर जाधव यांची तर प्रतोदपदी आमदार सुनील प्रभू यांची निवड झाल्याची माहिती विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दिली. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत काल मातोश्री निवासस्थानी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. 

****

क्रिकेट 

बॉर्डर - गावस्कर कसोटी क्रिकेट मालिकेतला पहिला सामना भारतानं २९५ धावांनी जिंकला आहे. भारतानं विजयासाठी दिलेलं ५३४ धावांचं लक्ष्य गाठतांना यजमान संघ काल सामन्याच्या चौथ्या दिवशी दुसऱ्या डावात अवघ्या २३८ धावांवर सर्वबाद झाला. दुसऱ्या डावात कर्णधार जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराजने तीन-तीन, वॉशिंग्टन सुंदरने दोन तर हर्षित राणा आणि निशित रेड्डीने एक एक बळी घेतला. दोन्ही डावात मिळून आठ बळी घेणारा बुमराह, सामनावीर ठरला. मालिकेत पुढचा सामना सहा डिसेंबरपासून ॲडलेड इथं खेळवला जाणार आहे.  

****

अलिगड इथं महाराणी अहिल्याबाई होळकर क्रीडा मैदानावर सुरु असलेल्या राष्ट्रीय अजिंक्यपद खो - खो स्पर्धेत काल सलामीच्या सामन्यात महाराष्ट्राच्या मुलांच्या संघाने विदर्भावर ३७-२६ अशा फरकाने विजय मिळवला. तर मुलींच्या संघाने मध्यप्रदेशवर ४०-१२ फरकाने मात केली. या स्पर्धेत कुमार आणि मुली गटातून प्रत्येकी ३० संघ सहभागी झाले आहेत. 

****

छत्रपती संभाजीनगर विभागात जल प्रकल्पातल्या पाण्याचं सूक्ष्म नियोजन करण्याची सूचना, विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी केली आहे. कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत ते काल बोलत होते. यंदा पाऊस चांगला झाल्याने बहुतांश प्रकल्पात चांगला पाणीसाठा आहे. या पाण्याचं पिण्यासाठी, शेतीसाठी तसंच उद्योगासाठी सूक्ष्म नियोजन करण्याची सूचना त्यांनी दिली. 

दरम्यान, काही तांत्रिक कारणामुळे जायकवाडी प्रकल्पाच्या डाव्या कालव्यातून पाणी सोडण्यात येणार आहे. त्यामुळे कोणीही कालव्यात उतरू नये, आपापली लहान मुले तसंच पशुधनाची काळजी घेण्याचं आवाहन जलसंपदा विभागानं केलं आहे. 

****

सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे घेतल्या जाणाऱ्या ६३ व्या राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरी कालपासून जिल्हास्तरावरील विविध २४ केंद्रांवर सुरू झाली. नांदेड केंद्रावर १३ संघ सहभागी होणार आहेत. नांदेड शहरासह परभणी जिल्ह्यातल्या विविध संघांचे प्रयोग या केंद्रावर सादर होतील. ही स्पर्धा ६ डिसेंबरपर्यंत चालणार आहे. 

****

अंबाजोगाई इथल्या यशवंतराव चव्हाण स्मृती समितीच्या तीन दिवसीय यशवंतराव चव्हाण स्मृती समारोहाचं उद्घाटन काल  गांधीवादी विचारवंत तुषार गांधी यांच्या हस्ते झालं. विचार आणि आचार संकुचित होणा-या काळात यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांची गरज आहे असे मत गांधी यांनी यावेळी व्यक्त केलं.  यावेळी अध्यक्षस्थानी प्रख्यात सिनेअभिनेते तथा चित्रपट आणि मालिकांचे दिग्दर्शक किरण माने होते. या महोत्सवात कवी संमेलन, शालेय चित्रकला स्पर्धा, बाल आनंद मेळावा, गझल गायन महफिल, शेतकरी परिषद आदी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. 

****

छत्रपती संभाजीनगर, परभणी जिल्ह्यात कालपासून एकविसाव्या पशुगणनेस प्रारंभ झाला. २८ नोव्हेंबरपर्यंत चालणाऱ्या पशुगणना कालावधीत पशुगणनेसाठी येणाऱ्या प्रगणकास वस्तुनिष्ठ माहिती द्यावी, असं आवाहन पशुसंवर्धन विभागातर्फे करण्यात आलं आहे. 

****


No comments: