Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 25 December 2024
Time: 11.00 to 11.05 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: २५ डिसेंबर २०२४ सकाळी ११.०० वाजता.
****
माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांची शतक महोत्सवी जयंती आज साजरी होत आहे. या निमित्तानं दिल्लीत सदैव अटल या त्यांच्या समाधीस्थळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुष्पांजली अर्पण करून, अटलजींच्या स्मृतिंना अभिवादन केलं. माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू, अटलजींच्या दत्तक कन्या नमिता भट्टाचार्य यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.
****
अटलजींच्या जयंतीनिमित्त सुशासन दिवस आज पाळण्यात येत आहे. देशभरात एक हजार,१५३ अटल ग्राम सुशासन भवनांची पायाभरणी आज पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते होत आहे. एका टपाल तिकिटाचं तसंच विशेष नाण्याचं अनावरणही पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. मध्यप्रदेशात खजुराहो इथं होणाऱ्या या कार्यक्रमात देशातल्या पहिल्या, केन आणि बेतवा अशा दोन नद्यांच्या जोडणी प्रकल्पाची पायाभरणीही मोदींच्या हस्ते आज होणार आहे
****
केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा आज दहा हजारांहून अधिक नवीन प्राथमिक बहुउद्देशीय सहकारी संस्था, दुग्धविकास आणि मत्सव्यवसाय सहकारी संस्था राष्ट्राला समर्पित करणार आहेत. दिल्लीत सहकारी संस्थांच्या राष्ट्रीय परिषदेदरम्यान नव्यानं स्थापन झालेल्या सहकारी संस्थांना नोंदणी प्रमाणपत्रे, रुपे किसान क्रेडिट कार्ड आणि मायक्रो एटीएमचे वितरण देखील त्यांच्या हस्ते होणार आहे. ‘सहकार से समृध्दी’ अंतर्गत नव्याने स्थापन झालेल्या बहुउद्देशीय संस्थांमध्ये पतसंस्था, दुग्धव्यवसाय आणि मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थांचा समावेश आहे.
याच अनुषंगाने लातूर जिल्हाधिकारी कार्यालयात आज दुपारपासून विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील उपस्थित राहणार आहेत. सहकारी संस्था जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून ही माहिती देण्यात आली.
****
निवडणूक नियमात केंद्र सरकारने केलेल्या दुरुस्तीला काँग्रेस पक्षानं सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. निवडणूकींशी संबधित इलेक्ट्रॉनिक दस्तऐवज सर्वसामान्यांना तपासणीसाठी उपलब्ध करुन द्यायला मनाई करणारी सुधारणा निवडणूक नियम १९६१ मध्ये करण्यात आली आहे. मात्र उमेदवारांनी मागणी केल्यास हे दस्तावेज त्यांना उपलब्ध करुन दिले जातील. आयोगाच्या शिफारसीवरुन ही सुधारणा केल्याचं केंद्र सरकारचं म्हणणं आहे. ही सुधारणा एकतर्फी आणि चर्चेविना केल्याचा आरोप काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी केला आहे. यामुळे निवडणुक प्रकियेची अखंडता धोक्यात येत असून, तिचं रक्षण करण्यासाठी न्यायालयच मदत करु शकेल असा विश्वास रमेश यांनी व्यक्त केला आहे.
****
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत डिसेंबर महिन्याच्या हप्त्याचं वितरण कालपासून सुरू झालं. महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी ट्विट संदेशातून ही माहिती दिली. येत्या चार ते पाच दिवसांत सर्व लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात ही रक्कम जमा होईल, असं तटकरे यांनी सांगितलं.
****
दुसरं विश्व मराठी संमेलन येत्या २७ फेब्रुवारी ते एक मार्च या कालावधीत पुण्यात होणार आहे. मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी काल पिंपरी चिंचवड इथं ही माहिती दिली. मराठी भाषा विभागाची आढावा बैठक घेतल्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते.
****
आदिवासी वसतीगृहातील विद्यार्थ्यांना थेट लाभ हस्तांतरणाद्वारे देय निधी नियमित मिळण्यासाठी येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विषय मांडून प्रयत्न करणार असल्याचं, आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांनी संगितलं आहे. काल नागपुरात कळमना भागातील आदिवासी मुलांच्या वसतीगृहाला डॉ. उईके यांनी भेट दिली, त्यावेळी ते बोलत होते. आदिवासी मुला- मुलींच्या वसतीगृहाला साप्ताहिक भेट देऊन त्यांच्या समस्या सोडवणार असल्याचंही उईके यांनी यावेळी सांगितलं.
****
भगवान येशू ख्रिस्ताचा जन्मदिवस ख्रिसमस अर्थात नाताळ आज साजरा होत आहे. या पार्श्वभूमीवर सर्वत्र उत्साहाचं वातावरण आहे, छत्रपती संभाजीनगरसह विविध ठिकठिकाणी चर्चच्या प्रांगणात येशू जन्माचे देखावे साकारण्यात आले असून, चर्च परिसरात विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. कॅरोल गायनासह अनेक कार्यक्रमांमध्ये ख्रिस्ती बांधव मोठ्या उत्साहाने सहभागी होत आहेत.
अहिल्यानगर शहर आणि जिल्ह्यात अनेक घरं तसंच चर्च, विद्युत रोषणाईने उजळले आहेत. जागोजागी दिसणारा सांताक्लॉज आणि नाताळ वृक्ष सर्वाचं लक्ष वेधून घेत आहेत.
****
उत्तर महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या नाशिक जिल्ह्यातल्या श्रीक्षेत्र सप्तश्रृंगी गडावरील घाट रस्ता काल २४ डिसेंबर ते ५ जानेवारीपर्यंत सुरळीतपणे सुरू राहणार आहे. देवस्थान न्यासातर्फे ही माहिती देण्यात आली. रस्त्याला अडथळा ठरणारे सैल खडक तसंच झुडपं काढण्याच्या कामासाठी हा घाट रस्ता आठवड्यात सोमवार, बुधवार आणि गुरुवार असे तीन दिवस पहाटे सहा ते साडे अकरा वाजेपर्यंत वाहतुकीसाठी बंद ठेवला जात होता. मात्र नाताळ आणि नववर्षानिमित्त येत्या ५ जानेवारीपर्यंत भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेऊन रस्ता खुला ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
****
No comments:
Post a Comment