Wednesday, 25 December 2024

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 25.12.2024 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजताचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 25 December 2024

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २५ डिसेंबर २०२४ सायंकाळी ६.१०

****

·      सुशासन ही भाजप सरकारची ओळख-देशातल्या पहिल्या नदीजोड प्रकल्पाच्या पायाभरणी समारंभात पंतप्रधानांचं प्रतिपादन 

·      केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते दहा हजारांहून अधिक नवीन प्राथमिक बहुउद्देशीय सहकारी संस्था राष्ट्राला समर्पित

·      राज्यसरकार कडून आगामी शंभर दिवसांचं उद्दीष्ट निर्धारित-उद्दीष्टपूर्तीचा अहवालही तयार होणार

·      डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या केंद्रीय युवा महोत्सवाला प्रारंभ

आणि

·      नाताळचा सण सर्वत्र उत्साहात साजरा

****

सुशासन दिवस हा फक्त एका दिवसापुरता कार्यक्रम नसून, सुशासन ही भाजप सरकारची ओळख असल्याचं प्रतिपादन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. मध्यप्रदेशात खजुराहो इथं देशातील पहिल्या महत्त्वकांक्षी केन-बेतवा नदी जोड प्रकल्पाची पायाभरणी, आज करण्यात आली, त्यावेळी पंतप्रधान बोलत होते. केंद्रीय जलशक्ती मंत्री सी आर पाटील, मध्यप्रदेशाचे राज्यपाल मंगूभाई पटेल, मुख्यमंत्री डॉ मोहन यादव यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. या वेळी केलेल्या भाषणात पंतप्रधान म्हणाले

साथियों, हमारे लिए सुशासन दिवस सिर्फ एक दिन का कार्यक्रम भर नही है। गुड गव्हर्नन्स, सुशासन भाजपा सरकारों की पहचान है। देश की जनता ने लगातार तिसरी बार केंद्र मे भाजपा की सरकार बनाई।

 

माजी पंतप्रधान-भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांची शतक महोत्सवी जयंती आज साजरी होत आहे. यानिमित्तानं या कार्यक्रमात मोदी यांनी एक हजार, १५३ अटल ग्राम सुशासन भवनांची पायाभरणीही केली. दिवंगत वाजपेयी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ एका टपाल तिकिटाचं तसंच विशेष नाण्याचं अनावरणही पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात आलं. देशातील पहिल्या तरंगता सौरऊर्जा प्रकल्प  ओंकारेश्वर फ्लोटिंग सोलर योजनेचं उद्घाटनही पंतप्रधानांनी यावेळी केलं.

****

दरम्यान, सकाळी दिल्लीत, वाजपेयी यांचं समाधीस्थळ - सदैव अटल इथं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुष्पांजली अर्पण करून, अटलजींच्या स्मृतींना अभिवादन केलं. विविध राज्यांचे मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्रिमंडळातले सदस्य, वाजयेपी यांच्या दत्तक कन्या नमिता भट्टाचार्य यांच्यासह अनेक मान्यवरांनी यावेळी वाजपेयी यांच्या समाधीला अभिवादन केलं.

मुंबईत राजभवनात राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी तर नागपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रामगिरी या शासकीय निवासस्थानी अटलबिहारी वाजपेयी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली अर्पण केली.

मुंबईत मंत्रालयात राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी वाजपेयी यांच्या  प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केलं.

****

सुशासन दिनानिमित्त, अमरावती इथं आज सकाळी राज्यस्तरीय हाफ मॅरेथॉन अटल दौड स्पर्धा पार पडली.

धाराशिव इथं लोकसेवा समितीचे मराठवाडास्तरीय १५वे लोकसेवा पुरस्कार आज समारंभपूर्वक प्रदान करण्यात आले. बीड जिल्ह्याच्या ढेकणमोहा इथल्या पसायदान सेवा प्रकल्पाचे गोवर्धन दराडे, जालना जिल्ह्यातल्या लिखित पिंपरीच्या प्रेरणादायी शिक्षण संकुलाचे रामकिसन सोळंके आणि धाराशिव जिल्ह्यात नळदुर्गच्या पालावरची शाळा प्रकल्पाच्या मीराताई मोटे यांना या पुरस्कारानं गौरवण्यात आलं.

****

केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते आज दहा हजारांहून अधिक नवीन प्राथमिक बहुउद्देशीय सहकारी संस्था, दुग्धविकास आणि मत्सव्यवसाय सहकारी संस्था राष्ट्राला समर्पित करण्यात आल्या. नवी दिल्लीच्या पुसा इथं सहकारी संस्थांच्या राष्ट्रीय परिषदेदरम्यान आज दुपारी हा कार्यक्रम पार पडला. याप्रसंगी ‘सहकार से समृध्दी’ अंतर्गत नव्याने स्थापन झालेल्या संस्थांचा यात समावेश आहे.

नव्यानं स्थापन झालेल्या सहकारी संस्थांना नोंदणी प्रमाणपत्रे, रुपे किसान क्रेडिट कार्ड आणि मायक्रो एटीएमचे वितरण देखील शहा यांनी केलं. या माध्यमातून पंचायतींच्या स्तरावरील कर्ज वितरणासह अर्थिक समावेशनाला हातभार लागणार आहे. ग्रामीण जनतेला स्थानिक पातळीवर स्वविकास आणि आत्मनिर्भरतेतून राष्ट्राच्या आर्थिक प्रगतीत सहभागी होणं याद्वारे शक्य होणार आहे.

याच अनुषंगानं लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातही विशेष कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाला राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

****

राज्य सरकारनं आगामी शंभर दिवसांचं उद्दीष्ट निर्धारित केलं असून, या उद्दीष्टपूर्तीसंदर्भात आढावा घेऊन अहवाल तयार करणार असल्याचं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. ते आज नागपूर इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. हा अहवाल माध्यमांसमोर सादर केला जाईल, असं फडणवीस यांनी सांगितलं. ते म्हणाले

प्रत्येक खात्यांनी शंभर दिवसांचं आपलं टार्गेट घेतलेलं आहे. शंभर दिवसांत काय करायचं हा शंभर दिवसाचा प्लॅन आहे. शंभर दिवस पूर्ण झाल्यानंतर त्याचा रिपोर्ट आम्ही त्या ठिकाणी सादर करू आणि प्रत्येक खात्याने काय टार्गेट घेतलं होतं आणि त्यांनी काय पूर्ण केलं हे आपल्यापर्यंत पोहोचवू.

 

जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांच्या संदर्भात तीनही पक्षांच्या सहमतीनं निर्णय घेतला जाईल, असं सांगतानाच, गडचिरोलीचं पालकमंत्री होण्याची आपली इच्छा असल्याचं, फडणवीस यांनी सांगितलं.

सायबर सुरक्षा, ऊर्जा, लाडकी बहीण, आदी विषयांवर मुख्यमंत्र्यांनी संवाद साधला.

बीड तसंच परभणी इथल्या घटना गंभीर आहेत, त्यामुळेच राज्यसरकारच्या वतीनं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या ठिकाणी भेट दिल्याचं सांगत, अशा घटनांचं पर्यटन करू नये, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं

एखाद्या घटनेचं महत्त्व हे कोण गेलं यापेक्षा त्याला आपण काय रिस्पॉन्ड करतोय या माध्यमातून होतं. प्रत्येक ठिकाणी मुख्यमंत्री पोहोचतातच असं नाहीये. पण अजितदारांसारखे सीनियर मंत्री त्या ठिकाणी तेवढ्या करताच आम्ही पाठवले होते. आणि माझं नेहमी मत असतं की अशा प्रकारच्या घटना घडल्यानंतर सेन्सेटीव्ह असतात. तिथे कोणी ना कोणी शासनातर्फे कोणी विरोधी पक्षातर्फे गेलं पाहिजे पण त्याचं पर्यटन करून हा मात्र माझा नेहमी मत आहे.

****

स्वामित्व योजनेचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते परवा २७ डिसेंबरला होत आहे. देशभरातील सर्व जिल्ह्यांत डिजिटल पद्धतीनं जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ऑनलाईन माध्यमातून हा कार्यक्रम होईल. भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपूर इथं ही माहिती दिली. पन्नास लाखांहून अधिक मालमत्ता कार्डांचं वितरण याद्वारे केलं जाणार आहे.

****

छत्रपती संभाजीनगरच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या केंद्रीय युवा महोत्सवाला आजपासून प्रारंभ झाला. शहर पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांच्या हस्ते याचं उद्घाटन झालं, प्रसिद्ध सिनेदिग्दर्शक-अभिनेते मंगेश देसाई यावेळी उपस्थिती होते. तत्पुर्वी, सकाळी महापालिका आयुक्त तथा मुख्य प्रशासक जी श्रीकांत आणि विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर विजय फुलारी यांच्या उपस्थितीत शोभायात्रा काढण्यात आली. २८ डिसेंबरपर्यंत चालणाऱ्या या युवा महोत्सवात चार जिल्ह्यातील तीनशे महाविद्यालयांचे दोन हजार कलावंत विविध कला प्रकार सादर करणार आहेत.

****

मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी आज परभणीतील कथित हिंसाचारानंतर मृत्यू झालेल्या सोमनाथ सूर्यवंशी आणि विजय वाकोडे यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाचा सखोल तपास करावा, अशी मागणी त्यांनी केली. 

****

छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या शाळांमधून गुणवत्तेची पंचसूत्री हा उपक्रम आयुक्त तथा मुख्य प्रशासक जी श्रीकांत यांच्या संकल्पनेतून राबवला जाणार आहे. या पंचसूत्री अंतर्गत किशोरी मेळावा, इयत्ता पाचवी-आठवी शिष्यवृत्ती, इयत्ता सातवीसाठी स्पर्धा परीक्षा, बालवर्ग ते नववीसाठी गुणवत्ता विकास समिती आणि अभ्यास गट स्थापन करणं, यासह इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी तज्ञ व्यक्तींचं मार्गदर्शन शिबिर आयोजित केलं जाणार आहे.

****

प्रभु येशू ख्रिस्तांचा जन्मदिवस ख्रिसमस अर्थात नाताळ आज जगभरासह भारतात मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. या पार्श्वभूमीवर, सर्वत्र धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु, उपराष्ट्रपती जगदीप धनखड़ आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यानिमित्त देशवासीयांना शुभेच्छा दिल्या आहेत.

हा सण, प्रभु येशु यांनी दिलेल्या प्रेम, दया आणि करुणेच्या शाश्वत शिकवणीची आठवण करुन देतो असं राष्ट्रपती मुर्मू यांनी समाजमाध्यमांवर दिलेल्या आपल्या संदेशात म्हटलं आहे.

छत्रपती संभाजीनगरसह विविध ठिकाणी चर्चच्या प्रांगणात येशू जन्माचे देखावे, चर्च परिसरात विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. कॅरोल गायनासह अनेक कार्यक्रमांमध्ये ख्रिस्ती बांधव उत्साहाने सहभागी होत आहेत.

अहिल्यानगर शहर आणि जिल्ह्यातही अनेक घरं - चर्च, विद्युत रोषणाईने उजळले आहेत. जागोजागी दिसणारा सांताक्लॉज आणि नाताळ वृक्ष सर्वाचं लक्ष वेधून घेत आहेत.

धुळे शहरातील सेंट ऍन्स कॅथोलिक चर्च इथं आज सकाळी विशेष प्रार्थना सभा घेण्यात आली. यावेळी सर्व धर्मियांसह लोक प्रतिनिधींच्या उपस्थितीत केक कापून नाताळाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.

नाशिक शहरातील शरणपूर भागात ख्रिश्चन बांधवांची वसाहत असून या ठिकाणी विद्युत रोषणाई बरोबरच येशू जन्माचे देखावे तयार करण्यात आले आहेत.

****

जालना जिल्ह्याच्या शहागडनजिक छत्रपती संभाजीनगर-सोलापूर महामार्गावर मध्यरात्री उभ्या कंटेनरला पाठीमागून आयशरची धडक बसल्यानं झालेल्या अपघातात दोन जण ठार झाले.

आयशरचा चालक आणो सोबती यांचा मृतांमध्ये समावेश आहे.

****

सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यात वाघाचा वावर असल्याचं निदर्शनास आलं आहे. या अनुषंगाने वन विभागाच्या वतीने हालचाली वाढल्या असून, यावर उपाय योजना केली जाणार असल्याची माहिती सोलापूर जिल्ह्याचे उपवनसंरक्षक कुशाग्र पाठक यांनी दिली आहे.

****

हवामान

येत्या २७ आणि २८ डिसेंबर या दोन दिवसांत मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात गारपीट आणि मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यामुळे याभागात कमाल तापमानात थोडी घट होईल. मात्र खानदेश आणि मध्य महाराष्ट्रात हवामान स्थिर होण्यास सुरुवात होईल. त्यानंतर तीस डिसेंबरपासून थंडीत वाढ होईल असं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

No comments: