Thursday, 26 December 2024

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 26.12.2024 रोजीचे सकाळी 07.10 वाजताचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 26 December 2024

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक २६ डिसेंबर २०२४ सकाळी ७.१० मि.

****

पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कारांचं आज नवी दिल्लीत राष्ट्रपतींच्या हस्ते वितरण 

सुशासन ही भाजप सरकारची ओळख-देशातल्या पहिल्या नदीजोड प्रकल्पाच्या पायाभरणी समारंभात पंतप्रधानांचं प्रतिपादन

केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते दहा हजारांहून अधिक नवीन प्राथमिक बहुउद्देशीय सहकारी संस्था राष्ट्राला समर्पित

राज्यसरकार कडून आगामी शंभर दिवसांचं उद्दीष्ट निर्धारित-उद्दीष्टपूर्तीचा अहवालही तयार होणार

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या केंद्रीय युवा महोत्सवाला प्रारंभ

आणि

नाताळचा सण सर्वत्र उत्साहात साजरा

****

पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कारांचं आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते नवी दिल्लीत समारंभपूर्वक वितरण केलं जाणार आहे. कला तसंच संस्कृती, धाडस, नवोन्मेष, विज्ञान आणि तंत्रज्ञान, सामाजिक सेवा, खेळ आणि पर्यावरण अशा विविध सात श्रेणींमध्ये १७ बालकांना असाधारण कामगिरीसाठी हे पुरस्कार जाहीर झाले आहेत. राष्ट्रपतींच्या हस्ते या बालकांना पदक तसंच प्रमाणपत्र प्रदान करण्यात यईल.

दरम्यान, या पुरस्कार प्राप्त बालकांसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत नवी दिल्लीत आज राष्ट्रव्यापी वीर बाल दिवस समारंभाचं आयोजनही करण्यात आलं आहे. याच कार्यक्रमात सुपोषित ग्राम पंचायत अभियानाला पंतप्रधानांच्या हस्ते प्रारंभ होणार आहे. 

****

सुशासन दिवस हा फक्त एका दिवसापुरता कार्यक्रम नसून, सुशासन ही भाजप सरकारची ओळख असल्याचं प्रतिपादन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. मध्यप्रदेशात खजुराहो इथं देशातील पहिल्या महत्त्वकांक्षी केन-बेतवा नदी जोड प्रकल्पाची पायाभरणी, काल करण्यात आली, या वेळी केलेल्या भाषणात पंतप्रधान म्हणाले...

‘‘साथियों, हमारे लिए सुशासन दिवस सिर्फ एक दिन का कार्यक्रम भर नही है। गुड गव्हर्नन्स, सुशासन भाजपा सरकारों की पहचान है। देश की जनता ने लगातार तिसरी बार केंद्र मे भाजपा की सरकार बनाई।’’


माजी पंतप्रधान-भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांची शतक महोत्सवी जयंती वर्षाला काल प्रारंभ झाला. यानिमित्तानं पंतप्रधानांनी एका टपाल तिकिटाचं तसंच विशेष नाण्याचं यावेळी अनावरण केलं.

****

दरम्यान, सकाळी दिल्लीत, वाजपेयी यांचं समाधीस्थळ - सदैव अटल इथं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुष्पांजली अर्पण करून, अटलजींच्या स्मृतींना अभिवादन केलं. विविध राज्यांचे मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्रिमंडळातले सदस्य, वाजयेपी यांच्या दत्तक कन्या नमिता भट्टाचार्य यांच्यासह अनेक मान्यवरांनी यावेळी वाजपेयी यांच्या समाधीला अभिवादन केलं.

मुंबईत राजभवनात राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी, मंत्रालयात राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी तर नागपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रामगिरी या शासकीय निवासस्थानी अटलबिहारी वाजपेयी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली अर्पण केली.

छत्रपती संभाजीनगर महापालिकेतही अटलजींच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करण्यात आली.

****

धाराशिव इथं लोकसेवा समितीचे मराठवाडास्तरीय १५वे लोकसेवा पुरस्कार काल समारंभपूर्वक प्रदान करण्यात आले. बीड जिल्ह्याच्या ढेकणमोहा इथल्या पसायदान सेवा प्रकल्पाचे गोवर्धन दराडे, जालना जिल्ह्यातल्या लिखित पिंपरीच्या प्रेरणादायी शिक्षण संकुलाचे रामकिसन सोळंके आणि धाराशिव जिल्ह्यात नळदुर्गच्या पालावरची शाळा प्रकल्पाच्या मीरा मोटे यांना या पुरस्कारानं गौरवण्यात आलं.

**

केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते काल नवी दिल्लीत दहा हजारांहून अधिक नवीन प्राथमिक बहुउद्देशीय सहकारी संस्था, दुग्धविकास आणि मत्सव्यवसाय सहकारी संस्था राष्ट्राला समर्पित करण्यात आल्या. ‘सहकार से समृध्दी’ अंतर्गत नव्याने स्थापन झालेल्या संस्थांचा यात समावेश आहे. नव्यानं स्थापन झालेल्या सहकारी संस्थांना नोंदणी प्रमाणपत्रं, रुपे किसान क्रेडिट कार्ड आणि मायक्रो एटीएमचं वितरणही शहा यांनी काल केलं.

लातूर जिल्हाधिकारी कार्यालयात याच अनुषंगानं काल विशेष कार्यक्रम घेण्यात आला. सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यावेळी उपस्थित होते. सहकारी संस्थांच्या बळकटीकरणासाठी महिलांचा सहभाग वाढवण्याचं आवाहन करत, मराठवाड्यात दुग्ध व्यवसायाला गती देण्यासाठी विविध उपक्रम राबवणार असल्याचं, पाटील यांनी नमूद केलं.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या २७ डिसेंबरला स्वामित्व योजनेचा शुभारंभ होत आहे. देशभरातील सर्व जिल्ह्यांत डिजिटल पद्धतीनं जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ऑनलाईन माध्यमातून हा कार्यक्रम होईल. भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपूर इथं ही माहिती दिली. पन्नास लाखांहून अधिक मालमत्ता कर्डांचं वितरण उद्या केलं जाणार आहे.

****

चित्रपटगृहात मिळणाऱ्या पॉपकॉर्नवर वस्तू आणि सेवा कराच्या दरात कोणतीही वाढ झालेली नाही.पाकिटबंद तसंच लेबल लावून विकल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थांवर १२ टक्के तर सुट्या खाद्यपदार्थांवर ५ टक्के जीएसटी लागू आहे, चित्रपटगृहात मिळणारे पॉपकॉर्न हे सुट्या स्वरुपात विकले जात असल्यानं, त्यावर पाच टक्के दरानेच जीएसटी आकारला जात असल्याचं, जीएसटी परिषदेनं स्पष्ट केलं आहे.

****

राज्य सरकारनं आगामी शंभर दिवसांचं उद्दीष्ट निर्धारित केलं असून, या उद्दीष्टपूर्तीचा आढावा घेऊन अहवाल तयार करणार असल्याचं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. ते काल नागपूर इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. हा अहवाल माध्यमांसमोर सादर केला जाईल, असं फडणवीस यांनी सांगितलं. ते म्हणाले..

‘‘प्रत्येक खात्यांनी शंभर दिवसांचं आपलं टार्गेट घेतलेलं आहे. शंभर दिवसांत काय करायचं हा शंभर दिवसाचा प्लॅन आहे. शंभर दिवस पूर्ण झाल्यानंतर त्याचा रिपोर्ट आम्ही त्या ठिकाणी सादर करू आणि प्रत्येक खात्याने काय टार्गेट घेतलं होतं आणि त्यांनी काय पूर्ण केलं हे आपल्यापर्यंत पोहोचवू.’’


सायबर सुरक्षा, ऊर्जा, लाडकी बहीण, आदी विषयांवर मुख्यमंत्र्यांनी संवाद साधला.

बीड तसंच परभणी इथल्या घटना गंभीर आहेत, त्यामुळेच राज्यसरकारच्या वतीनं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या ठिकाणी भेट दिल्याचं सांगत, अशा घटनांचं पर्यटन करू नये, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं...

‘‘एखाद्या घटनेचं महत्त्व हे कोण गेलं यापेक्षा त्याला आपण काय रिस्पॉन्ड करतोय या माध्यमातून होतं. प्रत्येक ठिकाणी मुख्यमंत्री पोहोचतातच असं नाहीये. पण अजितदारांसारखे सीनियर मंत्री त्या ठिकाणी तेवढ्या करताच आम्ही पाठवले होते. आणि माझं नेहमी मत असतं की अशा प्रकारच्या घटना घडल्यानंतर सेन्सेटीव्ह असतात. तिथे कोणी ना कोणी शासनातर्फे कोणी विरोधी पक्षातर्फे गेलं पाहिजे पण त्याचं पर्यटन करून हा मात्र माझा नेहमी मत आहे.’’

****

शिवसेनेचे प्रवक्ते तथा उपनेते डॉ राजू वाघमारे, तसंच मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी काल परभणीत सोमनाथ सूर्यवंशी आणि विजय वाकोडे यांच्या कुटुंबियांची स्वतंत्रपणे भेट घेऊन सांत्वन केलं. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाचा सखोल तपास करावा, अशी मागणी जरांगे यांनी केली, तर परभणी आणि बीडच्या घटनांचा संबंध जोडू नये, असं आवाहन वाघमारे यांनी केलं.

****

छत्रपती संभाजीनगरच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या केंद्रीय युवा महोत्सवाला कालपासून प्रारंभ झाला. शहर पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांच्या हस्ते या महोत्सवा उद्घाटन झालं, प्रसिद्ध सिनेदिग्दर्शक-अभिनेते मंगेश देसाई यावेळी उपस्थित होते. त्यापूर्वी सकाळी महापालिका आयुक्त तथा मुख्य प्रशासक जी श्रीकांत आणि विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर विजय फुलारी यांच्या उपस्थितीत शोभायात्रा काढण्यात आली. २८ डिसेंबरपर्यंत चालणाऱ्या या युवा महोत्सवात चार जिल्यातील तीनशे महाविद्यालयांचे दोन हजार कलावंत विविध कला प्रकार सादर करणार आहेत.

****

प्रभु येशू ख्रिस्तांचा जन्मदिवस ख्रिसमस अर्थात नाताळ काल सर्वत्र उत्साहात साजरा झाला. छत्रपती संभाजीनगर तसंच अहिल्यानगरसह विविध ठिकठिकाणी चर्चच्या प्रांगणात येशू जन्माचे देखावे साकारण्यात आले, तसंच चर्च परिसरात विद्युत रोषणाई करण्यात आली. कॅरोल गायनासह अनेक कार्यक्रमांमध्ये ख्रिस्ती बांधव उत्साहाने सहभागी झाले. 

****

हिंगोली इथं एका पोलिस कर्मचाऱ्याने आपल्याच कुटुंबावर केलेल्या बेछूट गोळीबारात त्याच्या पत्नीचा मृत्यू झाला, तर मुलीसह अन्य दोन जण गंभीर जखमी झाले. काल रात्री ही घटना घडली. विलास मुकाडे असं या पोलिसाचं नाव असून, घटनेनंतर तो फरार झाला आहे. 

****

लातूरच्या आयकॉन रुग्णालयाचा प्रमुख डॉ.प्रमोद घुगे याला न्यायालयानं ३० डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. आपल्याच रुग्णालयातला कर्मचारी बाळू डोंगरे याची हत्या केल्याप्रकरणी पोलिसांनी डॉ घुगे याला उत्तराखंडातून अटक करून काल न्यायालयासमोर हजर केलं. या प्रकरणातल्या अन्य एका आरोपीचा शोध सुरू आहे.

****

सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यात वाघाचा वावर असल्याचं निदर्शनास आलं आहे. या अनुषंगाने वन विभागाच्या वतीने हालचाली वाढल्या असून, यावर उपाय योजना केली जाणार असल्याची माहिती सोलापूर जिल्ह्याचे उपवनसंरक्षक कुशाग्र पाठक यांनी दिली.

****

भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात सुरू असलेल्या बॉर्डर गावसकर कसोटी क्रिकेट मालिकेतला चौथा सामना आज मेलबर्न इथं खेळवला जात आहे. यजमान ऑस्ट्रेलिया संघानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे, अखेरचं वृत्त हाती आलं तेव्हा ऑस्ट्रेलियाच्या एक बाद ११२ धावा झाल्या होत्या.

****

हवामान

राज्यात छत्रपती संभाजीनगरसह, अनेक जिल्ह्यात आजपासून तीन दिवस गारपीट आणि विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. खानदेश, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील शेतकऱ्यांनी हवामानाच्या अंदाजाची दखल घेऊन शेती कामांचं नियोजन करण्याचं आवाहन कृषी विभागाने केले आहे.

****

No comments: