Thursday, 26 December 2024

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 26.12.2024 रोजीचे सकाळी 11.00 वाजताचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date 26 December 2024

Time 11.00 to 11.05 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक: २६ डिसेंबर २०२४ सकाळी ११.०० वाजता.

****

वीर बाल दिवस साजरा केला जात आहे. शीख धर्मियांचे दहावे गुरू, गुरू गोविंदसिंह यांची दोन धाकटी मुलं, बाबा जोरावरसिंह आणि बाबा फतेहसिंह यांच्या बलिदानाचं स्मरण करण्यासाठी हा दिवस पाळला जातो. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कारांचं आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते नवी दिल्लीत समारंभपूर्वक वितरण करण्यात आलं. कला तसंच संस्कृती, धाडस, नवोन्मेष, विज्ञान आणि तंत्रज्ञान, सामाजिक सेवा, खेळ आणि पर्यावरण अशा विविध सात श्रेणींमध्ये १७ बालकांना असाधारण कामगिरीसाठी हे पुरस्कार जाहीर झाले आहेत. राष्ट्रपतींच्या हस्ते या बालकांना पदक आणि प्रमाणपत्र प्रदान करण्यात आलं. दरम्यान, या पुरस्कार प्राप्त बालकांसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत नवी दिल्लीत आज राष्ट्रव्यापी वीर बाल दिवस समारंभाचं आयोजनही करण्यात आलं आहे. याच कार्यक्रमात सुपोषित ग्राम पंचायत अभियानाला पंतप्रधानांच्या हस्ते प्रारंभ होणार आहे.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एमटी वासुदेवन नायर यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. एमटी वासुदेवन नायर हे मल्याळी चित्रपट आणि साहित्यातील नामांकित व्यक्तिमत्व असल्याचं पंतप्रधान म्हणाले. नायर यांचे कार्य आगामी पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल, असं पंतप्रधानांनी आपल्या शोकसंदेशात म्हटलं आहे. 

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या २७ डिसेंबरला स्वामित्व योजनेचा शुभारंभ होत आहे. देशभरातील सर्व जिल्ह्यांत डिजिटल पद्धतीनं जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ऑनलाईन माध्यमातून हा कार्यक्रम होईल. भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपूर इथं ही माहिती दिली. पन्नास लाखांहून अधिक मालमत्ता कर्डांचं वितरण याद्वारे केलं जाणार आहे.

****

पारंपारिक पद्धतींवर आधारित सुगम आणि स्वस्त वैद्यकीय सेवेमुळे नागरिक सशक्त झाल्याचं, केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी म्हटलं आहे. राष्ट्रीय आयुष मिशन अंतर्गत समग्र स्वास्थ्य सेवा या चित्रपट श्रृंखलेचं जाधव यांनी काल दिल्लीत अनावरण केलं, त्यावेळी ते बोलत होते. ही श्रृंखला राष्ट्रीय आयुष मिशनची उल्लेखनीय प्रगती आणि परिवर्तनकारी परिणामांवर प्रकाश टाकते, आजारांना प्रतिबंध करून, निरोगी जीवनाला चालना देण्यात आयुष मंत्रालयाची भूमिका यातून विशद होत असल्याचं, जाधव यांनी नमूद केलं.

****

डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या १२६ व्या जयंती दिनानिमित्त अकोला इथं राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन, कृषी महोत्सव आणि चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलं आहे. डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात आयोजित या महोत्सवाचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हस्ते उद्या उद्‌घाटन होणार आहे. २९ डिसेंबरपर्यंत चालणाऱ्या या महोत्सवात फळबाग, भाजीपाला, फुलशेती तसंच वनौषधी, कापूस, ज्वारी, गहू, कडधान्य, तेलबिया, पाणलोट विकास, पशु संवर्धन आणि दुग्ध व्यवसाय, कृषी अभियांत्रिकी आणि अवजारे इत्यादी विभागांसोबतच कृषी विभाग इतर कृषी विद्यापीठं, संलग्न कृषी संस्था आणि शासनाच्या इतर विभागांची दालने आहेत. कृषी संलग्नित व्यवसाय, शेतीपूरक जोडधंदे तसंच कृषीमालाच्या प्रक्रिया उद्योगाविषयीची दालनं, हे या प्रदर्शनाचे मुख्य आकर्षण आहेत

****

अहिल्यानगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे छत्रपती शिवाजी महाराज राज्य साहित्य पुरस्कार काल प्रदान करण्यात आले. ठाण्याचे कवी गीतेश शिंदे यांचा 'सीसीटीव्हीच्या गर्द छायेत' हा कविता संग्रह, जयसिंगपूर इथले डॉ. महावीर रायाप्पा अक्कोळे यांचा 'संतांचा तो संग नव्हे भलतैसा' हा ग्रंथ, पुण्याचे देवा झिंजाड यांची 'एक भाकर तीन चुली' ही कादंबरी, पुण्याच्या दिपाली दातार यांचं 'पैस प्रतिभेचा' हे पुस्तक, तसंच सांगलीचे महादेव माने यांच्या 'वसप' हा कथा संग्रह, आदी साहित्यकृतींना अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. रवींद्र शोभणे यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. सन्मानचिन्ह, मानपत्र, आणि १० हजार रुपये, असं या पुरस्काराचं स्वरूप आहे.

****

भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात सुरू असलेल्या बॉर्डर गावसकर कसोटी क्रिकेट मालिकेतला चौथा सामना आज मेलबर्न इथं खेळवला जात आहे. यजमान संघानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे, अखेरचं वृत्त हाती आलं तेव्हा ऑस्ट्रेलियाच्या तीन बाद २३७ झाल्या होत्या. सॅम कोन्टास, उस्मान ख्वाजा आणि मार्कस लाबुशेन यांनी अर्धशतकी खेळी केली. जसप्रीत बुमराह आणि रवींद्र जडेजा यांनी प्रत्येकी एक बळी मिळवला. पाच सामन्यांच्या मालिकेत दोन्ही संघ एक एक सामना जिंकून बरोबरीत आहेत.

****

राज्यात आज आणि उद्या मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात गारपीट आणि पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. २९ डिसेंबरला विदर्भ आणि मराठवाड्यातील काही तुरळक ठिकाणं वगळता राज्यातील बहुतांश भागांत स्थिर हवामान राहील, त्यानंतर थंडीत वाढ होईल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. 

****

No comments: