Thursday, 23 January 2025

TEXT -आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक २३ जानेवारी २०२५ सकाळी ११.०० वाजता.

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक २३ जानेवारी २०२ सकाळी.०० वाजता.

****

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली आहे. सुभाषचंद्र बोस यांची जयंती पराक्रम दिवस म्हणून साजरी केली जाते. देशाच्या स्वातंत्र्यचळवळीत सुभाषचंद्र बोस यांचं योगदान अतुलनीय असल्याचं पंतप्रधान मोदी म्हणाले.

दरम्यान, सांस्कृतिक मंत्रालयाकडून तीन दिवसांचा उत्सव नेताजींच्या जन्मस्थानी ओडिशातल्या कटक इथं आयोजित केला जाणार आहे.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बाळासाहेब ठाकरे यांना जयंतीनिमित्त आदरांजली अर्पण केली आहे. महाराष्ट्राचा विकास आणि सार्वजनिक कल्याणाप्रतीची बाळासाहेबांची वचनबद्धता स्मरणीय असल्याचं मोदी यांनी समाजमाध्यमावरील संदेशात म्हटलं आहे.

****

परभणी इथं वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचा सव्वीसावा दीक्षांत समारंभ आज होणार आहे. राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती सी. पी. राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली दीक्षांत समारंभ होणार आहे. कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी आणि जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना राज्यपालांच्या हस्ते मानद डॉक्टरेट पदवी देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.

****

बुलढाणा जिल्ह्यात अवैधरित्या उपसा करणाऱ्या बोटी महसूल प्रशासनाकडून नष्ट करण्याच्या कारवाई करण्यात येत असून, आतापर्यंत एकूण १५ बोटींवर कारवाई झाली आहे. बुधवार आणि आज गुरुवारी सिंदखेडराजाचे उपविभागीय अधिकारी संजय खडसे आणि बुलढाणा यांच्या सयुक्त पथकाने जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांच्या मार्गदर्शनात, जिल्हास्तरीय शोध पथकाच्या साहाय्याने अवैध वाळूउपसा करणाऱ्यां विरुद्ध देऊळगावराजा तालुक्यातील शिनगाव जहागीर भागात दोन बोटी, इसरूळ बायगाव शिवारात एक बोट अशा तीन बोटी जिलेटिन च्या मदतीने उदध्वस्त केल्या. तसंच शिनगाव इथे बोटीत तीन मजूर सापडले, त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे आज सकाळी देऊळगावराजा परिसरातून जाफ्राबादच्या किनारी भागात गेलेल्या सहा बोटीं सोबत सहा छोटया बोटी अशा एकूण बारा बोटी देखील या पथकाने उद्ध्वस्त केल्या.

****

राज्यात २२ जानेवारी ते येत्या ८ मार्च या कालावधीत बेटी बचाओ - बेटी पढाओ योजना दशकपूर्ती अभियानाचा शुभारंभ झाला असून या निमित्ताने जिल्ह्यात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती परभणी जिल्हा परिषदेच्या महिला आणि बाल कल्याण विभागाच्या उप मुख्य कार्यकारी रेखा काळम यांनी काल दिली. परभणी इथे जिल्हाधिकारी कार्यालयात यानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. राज्यभरात सर्वत्र काल या अभियानानिमित्त अनेक ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं

अकोला शहरात आज यानिमित्त महिला आणि बालविकास विभागातर्फे मोटरसायकल रॅली काढण्यात आली. या रॅलीला जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी हिरवा झेंडा दाखवला.

****

राज्य शासनाच्या प्रशासनिक विभागांसाठी निश्चित करण्यात आलेल्या शंभर दिवसांच्या आराखड्यानुसार विभागातील सर्व क्षेत्रीय शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांनी कार्यवाही करावी,असे निर्देश विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी दिले आहेत.काल विभागीय आयुक्त कार्यालयात यासंदर्भात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. विभागातील सर्व कार्यालयांनी आपल्या संकेतस्थळावरील माहिती अद्ययावत ठेवावी, नागरिकांकडून कार्यालयाला प्राप्त झालेल्या सर्व तक्रारींचा तत्परतेनं निपटारा करण्यात यावा, आदी सूचना त्यांनी केल्या.

****

देशाच्या शहात्तराव्या प्रजासत्ताक दिन समारंभानिमित्त छत्रपती संभाजीनगर इथे मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळा २६ जानेवारी रोजी सकाळी सव्वानऊ वाजता पोलीस आयुक्तालयाच्या देवगिरी मैदानावर आयोजित करण्यात आला आहे. मुख्य ध्वजारोहण जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते होणार असल्याचं सामान्य प्रशासन विभागाचे अपर आयुक्त अरविंद लोखंडे यांनी कळवलं आहे.

****

लातूरच्या जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांना राज्यस्तरीय उत्कृष्ट निवडणूक निर्णय अधिकारी पुरस्कार जाहीर झाला आहे. यासोबत नंदुरबारच्या जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी मनिषा खत्री, अकोल्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अजित कुंभार, आणि गडचिरोलीचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी संजय दैने, यांनाही हा पुरस्कार जाहीर झाला आहे.

****

राज्य शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या आश्रम शाळांमधील विद्यार्थ्यांच्या दोन दिवसीय विभागीय क्रीडा स्पर्धेचा आज उदगीर इथे समारोप होत आहे. लातूर, धाराशिव, नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यातील आश्रमशाळेतील विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या दोन दिवसीय विभागीय क्रीडा स्पर्धेत या ०४ जिल्ह्यांच्या १४ ते १७ वयोगटातील आश्रम शाळेतील ६०० विद्यार्थी-विद्यार्थिनी सहभागी झाले आहेत. जिल्हा स्तरावर विजयी झाले संघ या विभागीय स्पर्धेत सहभागी झाले असून सांघिक आणि वैयक्तिक स्पर्धा होत आहेत.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 13.04.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 13 April 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...