Wednesday, 22 January 2025

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 22.01.2025 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date - 22 January 2025

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक २२ जानेवारी २०२ दुपारी १.०० वा.

****

बेटी बचाओ बेटी पढाओ योजना हा एक परिवर्तनकारी, लोकसक्षम उपक्रम बनल्याचं आणि जीवनाच्या सर्व स्तरातील लोकांचा यात सहभाग असल्याचं, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. या योजनेला आज दहा वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त त्यांनी सामाजिक माध्यमावर हा संदेश जारी केला. बेटी बचाओ बेटी पढाओ ही मोहीम लिंगभेदावर मात करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असल्याचं, आणि त्याच वेळी मुलीला शिक्षण आणि तिची स्वप्नं साध्य करण्यासाठी संधी मिळतील यासाठी योग्य वातावरण निर्माण करत असल्याचं पंतप्रधानांनी नमूद केलं. लोकांच्या आणि विविध सामाजिक संस्थांच्या समर्पित प्रयत्नांमुळे या अभियानानानं उल्लेखनीय टप्पे गाठले आहेत, ऐतिहासिकदृष्ट्या लिंग गुणोत्तर कमी असलेल्या जिल्ह्यांमध्ये लक्षणीय सुधारणा झाल्या आहेत आणि जागरुकता मोहिमांनी लैंगिक समानतेच्या महत्त्वाची सखोल जाणीव निर्माण केली आहे, असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे.

बेटी बचाओ बेटी पढाओ अभियानाचा भाग असलेल्या सुकन्या समृद्धी योजनेलाही देशात उत्तम प्रतिसाद मिळत असून, या योजनेत आत्तापर्यंत चार कोटीहून अधिक खाती उघडण्यात आली आहेत.

****

प्रयागराज इथं आयोजित महाकुंभमेळ्यात आज सुमारे तीस लाख सत्तेचाळीस हजार भाविकांनी त्रिवेणी संगमावर अमृतस्नान केलं. आतापर्यंत एकूण सुमारे सव्वानऊ कोटी भाविकांनी कुंभमेळ्यात अमृतस्नान केल्याची माहिती उत्तर प्रदेश सरकारनं दिली आहे.

****

हैदराबाद मुक्तिसंग्रामाचे प्रणेते, थोर स्वातंत्र्यसेनानी, शिक्षणतज्ज्ञ स्वामी रामानंद तीर्थ यांचा आज स्मृतीदिन आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वामी रामानंद तीर्थ यांना अभिवादन केलं आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही स्वामी रामानंद तीर्थ यांना अभिवादन केलं असून, आध्यात्मिकता आणि राजकारण यांचा विलक्षण संयोग साधणाऱ्या या लोकप्रिय नेतृत्वाला नमन, अशा शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

****

शिवसेनेचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त पुढील वर्षभर राज्यभरातल्या एसटीच्या सर्व बसस्थानकांवर हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियान राबवण्यात येणार आहे. राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी याबाबतची घोषणा केली. या अभियानाचा शुभारंभ उद्या सरनाईक यांच्या हस्ते कुर्ला नेहरूनगर बस स्थानकावर होणार आहे. यानिमित्तानं राज्यभरात प्रत्येक बसस्थानकावर शालेय विद्यार्थी, सामाजिक संस्था आणि एसटी कर्मचाऱ्यांच्या सहकार्यातून सखोल स्वच्छता मोहीम राबवण्यात येणार आहे. वर्षभर चालणाऱ्या या अभियानामध्ये दर तीन महिन्यांनी प्रत्येक बसस्थानकाचं मूल्यमापन होणार असून, शहरी गटातून पहिल्या येणाऱ्या बसस्थानकाला १ कोटी, निमशहरी गटातून पहिल्या येणाऱ्या बसस्थानकाला ५० लाख तर ग्रामीण गटातून पहिल्या येणाऱ्या बसस्थानकाला २५ लाख रुपयांचं बक्षीस दिलं जाणार आहे.

****

संतोष देशमुख हत्या प्रकरणात मकोका खाली अटकेत असलेला आरोपी वाल्मीक कराड याला आज बीड जिल्हा सत्र न्यायालयानं चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. याआधीची पोलीस कोठडीची मुदत संपल्यावर आज कराड याला जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात आलं, त्यावेळी विशेष सत्र न्यायाधीशांनी हा निर्णय दिला.

दरम्यान, केज इथल्या खंडणी प्रकरणाची सुनावणी उद्या गुरुवारी होणार आहे.

****

महावितरणच्या छत्रपती संभाजीनगर परिमंडलाने वीजचोरीविरोधात धडक कारवाई केली आहे. गेल्या ९ महिन्यांत जवळपास साडेतीन हजार प्रकरणांत महावितरणने पावणेसात कोटी रुपयांची वीजचोरी उघडकीस आणली आहे. वीजचोरी हा गंभीर स्वरूपाचा गुन्हा असून या गुन्ह्यात तीन वर्षे कारावास किंवा दंड अथवा या दोन्ही शिक्षांची तरतूद आहे. नागरिकांनी ही बाब लक्षात घेऊन कोणत्याही प्रकारे विजेचा चोरटा किंवा अनधिकृत वापर कटाक्षाने टाळावा, असं आवाहन छत्रपती संभाजीनगर परिमंडलाचे महावितरणचे मुख्य अभियंता पवनकुमार कछोट यांनी केलं आहे.

****

भारतीय संविधानाला ७५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त भारतीय जनता पक्षाच्या वतीने देशभर संविधान गौरव अभियान राबवण्यात येणार असून त्या अनुषंगाने लातूर जिल्ह्यातही हे अभियान राबवलं जाणार आहे. लातूर शहरात संविधान गौरव सभेचं आयोजनही करण्यात येणार असल्याची माहिती भाजपच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्त्या तथा संविधान गौरव अभियान समितीच्या सदस्या प्रेरणा होनराव यांनी दिली. त्यानिमित्ताने विद्यार्थ्यांसाठी निबंध-वक्तृत्व स्पर्धा, विविध शैक्षणिक उपक्रम राबवले जाणार असून, नागरिकांना माफक शुल्कात संविधानाच्या प्रतीही उपलब्ध करून दिल्या जाणार असल्याचं होनराव यांनी सांगितलं.

****

नांदेडमध्ये काल पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यात आठ कंपन्यांनी ९३१ रिक्त पदांसाठी आपला सहभाग नोंदवला होता. यात १५२ उमेदवारांची प्राथमिक तर ५० उमेदवारांची ‍अंतिम निवड करण्यात आली.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 19.04.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 19 April 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...