Wednesday, 22 January 2025

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 22.01.2025 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजताचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 22 January 2025

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २२ जानेवारी २०२५ सायंकाळी ६.१०

****

·      राष्ट्रीय आरोग्य अभियानाला २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्याचा केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय

·      निवडणुकीतल्या उत्तम कामगिरीसाठी महाराष्ट्राला केंद्रीय निवडणूक आयोगाचा पुरस्कार जाहीर

·      मकोकाअंतर्गत अटकेतील आरोपी वाल्मीक कराड याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

आणि

·      बेटी बचाओ बेटी पढाओ’ योजनेचा दहावा वर्धापनदिन विविध कार्यक्रमांनी साजरा

****

केंद्रीय मंत्रिमंडळानं राष्ट्रीय आरोग्य अभियानाला २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. आज नवी दिल्लीत मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. २०२३-२४ या आर्थिक वर्षात या मोहिमेअंतर्गत देशात आयुष्मान आरोग्य मंदिरांची संख्या १ लाख ७२ हजार झाली आहे, तर सरकारच्या डायलिसीस मोहिमेचा साडेचार लाख रुग्णांना लाभ झाल्याची माहिती केंद्रीय मंत्री पीयुष गोयल यांनी दिली. ते म्हणाले

नॅशनल हेल्थ मिशन के द्वारा जिस प्रकार के ऐतिहासिक टार्गेटस्‌ को मिट करने का काम गत दस वर्षों मे माननीय प्रधानमंत्रीजी के नेतृत्व मे हुआ है, लगबग बारा लाख हेल्थ केअर्स के वर्कर्स 2021 से 22 के बीच मे नॅशनल हेल्थ मिशन के साथ जुडे। दो सौ बीस करोड से अधिक कोविड-19 के वॅक्सिन डोसेज्‌ देशभर मे दिये गये। 2023-24 तक 1,72,000 आयुष्यमान आरोग्य मंदिर सेंटर्स खुल चुके है।

 

२०२५-२६ च्या पणन हंगामासाठी कच्च्या तागाच्या किमान हमी भावात प्रति क्विंटल तीनशे पंधरा रुपयांची वाढ करण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळानं आजच्या बैठकीत घेतला. या निर्णयामुळे कच्च्या तागाला यावर्षी पाच हजार सहाशे पन्नास रुपये प्रति क्विंटल, असा किमान हमी भाव मिळेल. या निर्णयाचा ईशान्य भारतातल्या सुमारे चाळीस लाख शेतकरी कुटुंबांना फायदा होईल, असं पियुष गोयल यांनी सांगितलं.

****

निवडणूक काळात उत्तम कामगिरी केल्याबद्दल केंद्रीय निवडणूक आयोगानं महाराष्ट्राला पुरस्कार जाहीर केला आहे. मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. २०२४-२५ या वर्षासाठी महाराष्ट्रासोबत जम्मू आणि काश्मिर तसंच झारखंडलाही पुरस्कार जाहीर झाला आहे.

छत्रपती संभाजीनगरचे विभागीय आयुक्त दिलीप गावडे आणि जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांना टपाली मतपत्रिका देवाण-घेवाण कार्यवाहीसाठी उत्कृष्ट नियोजनाचा पुरस्कार जाहीर झाला असून सिल्लोडचे उपविभागीय अधिकारी लतिफ पठाण यांना उत्कृष्ट निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून पुरस्कार जाहीर झाला आहे.

याशिवाय मुंबई शहरचे जिल्हाधिकारी संजय यादव आणि मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांना विशेष श्रेणीत पुरस्कार जाहीर झाला आहे. येत्या शनिवारी, राष्ट्रीय मतदार दिनी नवी दिल्लीत हे पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत.

****

केईएम रुग्णालय हे मुंबई आणि आसपासच्या रहिवाशांचा आधारवड असून, रुग्णांना जागा कमी पडू नये यासाठी केईएममध्ये आयुष्मान शताब्दी टॉवर उभे करावेत, असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. सेठ गोवर्धनदास सुंदरदास वैद्यकीय महाविद्यालय आणि केईएम रुग्णालयाचा नव्याण्णवावा वर्धापन दिन सोहळा रुग्णालयाच्या प्रांगणात आज झाला, त्यावेळी ते बोलत होते. रुग्णालय आणि महाविद्यालयाच्या कार्याचा शिंदे यांनी आपल्या भाषणातून गौरव केला.

****

मैत्री कायद्याला अधिक बळकट करण्यासाठी राज्यसरकार एक विशेष पोर्टल तयार करत असल्याचं, उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सांगितलं आहे. ते आज दावोस इथून पत्रकारांशी बोलत होते. या पोर्टलबाबत अधिक माहिती देतांना सामंत म्हणाले

हे पोर्टल आल्यानंतर उद्योजकांना कमीत कमी वेळेमध्ये सगळे दाखले मिळायला त्याचा उपयोग होणार आहे. देशातलं हे पहिलं पोर्टल असं आहे, की ॲप्लीकेशन कसं करायचं आणि ॲप्लिकेशन केल्यानंतर ते ॲप्लिकेशन नक्की कुठे आहे हे दाखवणारं पोर्टल पुढच्या आठ दिवसांमध्ये कॅबिनेटच्या निमित्तानं आम्ही महाराष्ट्रामध्ये आणतोय. त्याचं देखील अनेक उद्योजकांनी स्वागत केलेलं आहे.

 

अयोध्येतल्या श्रीराम मंदिरात श्रीरामललांच्या प्राणप्रतिष्ठेला आज एक वर्ष पूर्ण होत असल्याच्या औचित्यानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. नागपूर इथे आजच्या या दिनाच्या निमित्तानं जयस्तुते फाउंडेशनतर्फे महाल परिसरात अकरा हजार दिव्यांनी दीपोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी आकर्षक रांगोळीच्या माध्यमातून धनुष्यबाण, शंख, गदा, कलश आणि स्वस्तिक अशी मंगलचिन्हं साकारण्यात आली होती.

****

हैदराबाद मुक्तिसंग्रामाचे प्रणेते, थोर स्वातंत्र्यसेनानी, शिक्षणतज्ज्ञ स्वामी रामानंद तीर्थ यांचा आज स्मृतीदिन आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वामी रामानंद तीर्थ यांना अभिवादन केलं आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही स्वामी रामानंद तीर्थ यांना अभिवादन केलं, आध्यात्मिकता आणि राजकारण यांचा विलक्षण संयोग साधणाऱ्या या लोकप्रिय नेतृत्वाला नमन, अशा शब्दात शिंदे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

****

 

नागपूरहून ते गोव्यापर्यंत जाणाऱ्या आणि कोल्हापूरची अंबाबाई, तुळजापूरची तुळजाभवानी, माहूरची रेणुकादेवी ही तीन शक्तीपीठं जोडणाऱ्या शक्तिपीठ महामार्गासाठीच्या भूसंपादनाला आता गती आली आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळानं यासाठीच्या पर्यावरणीय परवानग्यांची प्रक्रिया सुरू केली असून आता मराठवाड्यातल्या काही जिल्ह्यात भूसंपादन प्रक्रियेला सुरुवात करण्यात आल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे.

****

शिवसेनेचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त पुढील वर्षभर राज्यभरात राज्य परिवहन महामंडळ-एसटीच्या सर्व बसस्थानकांवर “हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियान” राबवण्यात येणार आहे. राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ही घोषणा केली. यानिमित्तानं राज्यभरात प्रत्येक बसस्थानकावर शालेय विद्यार्थी, सामाजिक संस्था आणि एसटी कर्मचाऱ्यांच्या सहकार्यातून स्वच्छता मोहीम राबवण्यात येणार आहे. या अभियानामध्ये दर तीन महिन्यांनी प्रत्येक बसस्थानकाचं मूल्यमापन होणार असून, शहरी गटातून पहिल्या येणाऱ्या बस स्थानकास एक कोटी, निमशहरी गटातून पहिल्या येणाऱ्या बस स्थानकास ५० लाख तर ग्रामीण गटातून पहिल्या येणाऱ्या बस स्थानकाला २५ लाख रुपये बक्षीस दिलं जाणार आहे.

****

संतोष देशमुख हत्या प्रकरणात मकोका खाली अटकेत असलेला आरोपी वाल्मिक कराड याला आज बीड जिल्हा सत्र न्यायालयानं चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. याआधीची पोलीस कोठडीची मुदत संपल्यावर आज कराड याला जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात आलं, त्यावेळी विशेष सत्र न्यायाधीशांनी हा निर्णय दिला. दरम्यान, केज इथल्या खंडणी प्रकरणाची सुनावणी उद्या गुरुवारी होणार आहे.

****

जालना इथल्या प्रसिद्ध योग शिक्षक संगीता आलोक लाहोटी यांच्या हत्येप्रकरणी त्यांचा नोकर भीमराव धाडे याला जिल्हा आणि सत्र न्यायाधीश वर्षा मोहिते यांनी जन्मठेप आणि आर्थिक दंडाची शिक्षा सुनावली आहे. १४ डिसेंबर २०२१ रोजी लाहोटी यांची राहत्या घरी हत्या झाली होती. विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांनी या खटल्याचं काम पाहिलं.

****

बेटी बचाओ बेटी पढाओ’ या योजनेचा दहावा वर्धापनदिन आज सर्वत्र विविध कार्यक्रमांनी साजरा झाला.

प्रत्येक क्षेत्रात महिलांचा सहभाग हा पुरुषांच्या बरोबरीनं असायला हवा, तरच देशाची खऱ्या अर्थाने प्रगती होईल, असं मत छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी व्यक्त केलं आहे. जिल्हा नियोजन समिती सभागृहात आज ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ या योजनेच्या दशकपूर्तीनिमित्त महिला आणि बालविकास विभागाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. जिल्ह्यात मुलींचा घटता जन्मदर ही चिंतेची बाब असल्याचं त्यांनी नमूद केलं.

परभणी इथं जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या उपस्थितीत कार्यक्रम घेण्यात आला. या दशकपूर्तीनिमित्त जिल्हाभरात मानसिक स्वास्थ्य आणि कौशल्य विकास अशा विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या महिला आणि बाल कल्याण विभागाच्या उपमुख्य कार्यकारी रेखा काळम यांनी यावेळी दिली.

नाशिक तसंच धुळ्यातही आज बेटी बचाव बेटी पढाओ’ या अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. या अभियानात मुलींचं संरक्षण, शिक्षणाला प्रोत्साहन, लिंगभेद निर्मूलन यासाठी जनजागृतीपर उपाय करण्यात येणार आहेत.

****

भारत आणि इंग्लंड यांच्यादरम्यान पाच सामन्यांच्या टी ट्वेंटी मालिकेतला पहिला सामना आज होणार आहे. कोलकाता इथल्या ईडन गार्डन मैदानावर संध्याकाळी सात वाजता हा सामना सुरू होईल. सूर्यकुमार यादव भारतीय संघाचं नेतृत्व करत आहे. तसंच भारताचा जलदगती गोलंदाज मोहम्मद शमी दुखापतीतून बाहेर येऊन या सामन्याद्वारे पुनरागमन करत आहे.

****

राज्यस्तरीय ग्राफलिंग शालेय कुस्ती स्पर्धेत धाराशिवची महिला मल्ल पौर्णिमा खरमाटे हिने सुवर्ण पदकाची कमाई केली. १७ आणि १८ जानेवारी रोजी नाशिक इथं या स्पर्धा पार पडल्या. या विजयामुळे पौर्णिमाची १९ वर्षाखालील राष्ट्रीय क्रीडा कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 19.04.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 19 April 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...