Wednesday, 22 January 2025

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 22.01.2025 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date 22 January 2025

Time 11.00 to 11.05 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक: २२ जानेवारी २०२५ सकाळी ११.०० वाजता.

****

दावोस इथल्या जागतिक आर्थिक गुंतवणुकदार परिषदेत पहिल्या दिवशी महाराष्ट्राने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सहा लाख २५ हजार ४५७ कोटी रुपयांचे गुंतवणूक करार केले आहेत. एकाच दिवशी इतक्या मोठ्या रकमेचे करार होणं, हा एक नवा विक्रम आहे. आज दुसऱ्या दिवशी सुद्धा मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करार होणार आहेत. मुख्यमंत्री फडणवीस यांनी काल अनेक कंपन्यांच्या प्रमुखांच्या भेटी घेतल्या आणि त्यांना महाराष्ट्रात गुंतवणुकीसाठी निमंत्रित केलं. टाटा समूहाचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन, काल्सबर्ग समूहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी जेकब अरुप अँडरसन, रिटेल क्षेत्रात कार्यरत लुलू समूहाचे प्रबंध संचालक एमए युसुफ अली, रिन्यू पॉवरचे अध्यक्ष सुमंत सिन्हा यांची फडणवीस यांनी भेट घेतली. बीड जिल्ह्यात १५ हजार मेगा वॅट पाईपलाईन आणि पवनऊर्जा प्रकल्पाबाबत यावेळी चर्चा झाली.

****

मुलींची सुरक्षितता, शिक्षण आणि सक्षमीकरणासाठी राबवण्यात येणाऱ्या बेटी बचाओ बेटी पढाओ योजनेला आज दहा वर्ष पूर्ण झाले. त्यानिमित्त दिल्लीत एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं असून त्यात सशस्त्र दल, निमलष्करी दल, दिल्ली पोलिस, विद्यार्थिनी आणि अंगणवाडी सेविकांच्या महिला अधिकारी सहभागी होतील.

बेटी बचाओ बेटी पढाओ अभियानाचा भाग असलेल्या सुकन्या समृद्धी योजनेला देशात उत्तम प्रतिसाद मिळत असून, या योजनेत आत्तापर्यंत चार कोटीहून अधिक खाती उघडण्यात आली आहेत. अर्थमंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, योजनेला आठ पूर्णांक दोन दशांश व्याजदर दिला जातो.

****

विधिमंडळाचं कामकाज विनाअडथळा चालवत, गुणवत्तापूर्ण चर्चा घडवून आणण्याचा संकल्प पाटणा इथं आयोजित ८५ व्या अखिल भारतीय पीठासीन अधिकारी परिषदेत करण्यात आला. काल समारोपाच्या दिवशी या परिषदेनं पाच संकल्प केले. राज्यघटनेला ७५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त संविधानाचं महत्व सांगण्यासाठी देशभरातल्या विधिमंडळांचे सदस्य समाजाच्या सर्व स्तरात जातील, असं लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी परिषदनेनंतर वार्ताहरांशी बोलताना सांगितलं. देशातल्या २३ विधिमंडळातले ४१ पीठासीन अधिकारी या परिषदेत सहभागी झाले होते.

****

राज्यामध्ये कर्करुग्णांचं प्रमाण वाढत असून, स्तन आणि गर्भाशयमुख कर्करोगाच्या निदानासाठी राज्यात मोहीम राबवावी असे निर्देश आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी काल दिले. २०२५-२६ या वर्षाच्या नियोजनासाठी मुंबईत आयोजित बैठकीत ते बोलत होते. क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्याच्या तसंच कुष्ठरोग रुग्ण शोध मोहीमही प्रभावीपणे राबवण्याच्या सूचना आबिटकर त्यांनी दिल्या.

****

राज्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पहिल्या पंधरवड्यात चिकुनगुनियाच्या रुग्णसंख्येत दुपटीने वाढ झाली आहे. पहिल्या पंधरवड्यात चिकुनगुनियाचे सर्वाधिक २० रुग्ण अकोला महापालिकेत आढळले आहेत. हिवतापाचे सर्वाधिक १८५ रुग्ण बृहन्मुंबई महापालिकेत नोंदवण्यात आले असून, त्या खालोखाल गडचिरोलीत १३८ रुग्ण आढळून आले आहेत. डेंग्यूचे सर्वाधिक ४४ रुग्ण बृहन्मुंबई महापालिकेत नोंदवण्यात आल्याचं, आरोग्य विभागाच्या अहवालात नमूद आहे.

****

नेत्रदानातून अनेक दृष्टिहीनांना नवी दृष्टी मिळू शकते, त्यामुळे अधिकाधिक जणांनी नेत्रदानाचा संकल्प करावा, असं आवाहन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी केलं. नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड- नॅब या संस्थेच्या ७४ व्या स्थापना दिनानिमित्त मुंबईत आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. ही संस्था छापखाना, बोलकी पुस्तकं, प्रशिक्षणं अशा उपक्रमांद्वारे अंध, तसंच दृष्टिबाधितांना आशा आणि सक्षमीकरणाची हमी देणारी आहे, असंही त्यांनी नमूद केलं.

****

साखर उद्योगात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कारखान्यांना वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या वतीनं देण्यात येणाऱ्या पुरस्कारांची घोषणा काल संस्थेचे उपाध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आली. २०२३-२४ या वर्षाच्या गाळप हंगामासाठी, आंबेगावच्या भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याला, सर्वोकृष्ट ऊस विकास पुरस्कार जाहीर झाला आहे. संस्थेचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते उद्या हे पुरस्कार वितरीत केले जातील.

****

कोल्हापूर जिल्ह्यातल्या तृतीयपंथी, देवदासी, एचआयव्ही बाधित २० व्यक्तींना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते काल डिजिटल रेशन कार्ड वितरीत करण्यात आली. अशा व्यक्तींसाठी शासनाच्यावतीने अनेक योजना राबवण्यात येतात, शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी समाज कल्याण विभागाशी संपर्क साधण्याचं आवाहन येडगे यांनी यावेळी केलं.

****

इंडोनेशियात जकार्ता इथं सुरू असलेल्या इंडोनेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरीच्या सामन्यात आज भारताच्या पीव्ही सिंधूचा सामना व्हिएतनामच्या टीएल एन्गुयेनशी होणार आहे. तर, या स्पर्धेत, पुरुष एकेरीत भारताच्या किरण जॉर्जचा सामना कोरियाच्या जिओन ह्योक-जिन, तर लक्ष्य सेनचा सामना जपानच्या ताकुमा ओबायाशी याच्या विरुद्ध होईल. याच स्पर्धेत, काल महिला दुहेरीत भारताच्या तनिशा क्रेस्टो आणि अश्विनी पोनप्पा जोडीने थायलंडच्या जोडीचा, तर पुरुष दुहेरीत, सात्विक साइराज रांकि रेड्डी आणि चिराग शेट्टी जोडीने तैवानच्या जोडीचा पराभव केला.

****

No comments:

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 20.04.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 20 April 2026 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छ...