Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date - 26 January 2025
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक २६ जानेवारी २०२५ दुपारी १.०० वा.
****
देशाचा ७६ वा प्रजासत्ताक दिन आज
साजरा होत आहे. राजधानी नवी दिल्लीत प्रजासत्ताकदिनाच्या कर्तव्य पथावरील मुख्य सोहळ्यात
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. सशस्त्र सेना, निमलष्करी दल, सहायक
नागरी दल, राष्ट्रीय छात्र सेना आणि राष्ट्रीय सेवा योजनेच्या
तुकड्यांची सलामी यावेळी राष्ट्रपतींनी स्वीकारली. “स्वर्णिम
भारत - विरासत और विकास” या संकल्पनेनुसार आधारित, विविध राज्यं, केंद्रशासित प्रदेश आणि केंद्रीय मंत्रालयं
आणि विभागांमधील, ३१ चित्ररथ, या सोहोळ्यात
सहभागी झाले. प्रजासत्ताक दिनाच्या संचलन सोहळ्याल्या यंदा प्रमुख पाहुणे म्हणून इंडोनेशियाचे
राष्ट्राध्यक्ष प्रबोवो सुब्रियांतो हे उपस्थित होते.
तत्पूर्वी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते
राष्ट्रीय युद्ध स्मारकावर पुष्पहार अर्पण करून आदरांजली अर्पण करण्यात आली.
****
देशाच्या ७६ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. पंतप्रधानांनी समाजमाध्यमांवर
लिहिले की, “सर्व
देशवासियांना प्रजासत्ताक दिनाच्या अनेक शुभेच्छा. या प्रसंगी, आम्ही त्या सर्व महान व्यक्तिमत्त्वांना आदरांजली अर्पण करतो ज्यांनी आपले
संविधान तयार करून, देशाचा विकास लोकशाही, त्याची प्रतिष्ठा आणि एकतेवर आधारित असल्याचे सुनिश्चित केले.”
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनीही
प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने देशाच्या नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत.
****
बांग्लादेश तसंच श्रीलंका इथं भारतातर्फे
नियुक्त उच्चायुक्तांच्या हस्ते आपल्या कार्यालयात ध्वजारोहण करण्यात आलं. तसंच राष्ट्रपती
द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्राला संबोधित अभिभाषणचा अंश उपस्थित भारतींयाना वाचून दाखवला.
****
राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन् यांच्या हस्ते मुंबईतील
शिवाजी पार्कवर ध्वजारोहण करण्यात आले. मुंबईत विधान भवन इथं विधान परिषद सभापती राम
शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. उपसभापती डॉक्टर नीलम गोऱ्हे यावेळी उपस्थित होत्या.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या
हस्ते वर्षा बंगल्यावर ध्वजारोहण करण्यात आले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते
पुण्यामध्ये तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ठाणे इथं ध्वजारोहण करण्यात आले.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा मुख्य
शासकीय सोहळा पोलीस आयुक्तालयाच्या देवगिरी या मैदानावर मोठ्या उत्साहात पार पडला.
राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते
ध्वजारोहण करण्यात आले. छत्रपती संभाजीनगर जिल्हा राज्यात अग्रेसर बनवू असा निर्धार
यावेळी शिरसाट यांनी व्यक्त केला. त्यासाठी सर्व समाजघटकांना सोबत घेऊन आपली वाटचाल
असेल. सगळ्यांनी जिल्ह्याच्या विकासात योगदान द्यावं, असे आवाहनही त्यांनी उपस्थितांना केले.
****
जालन्यात पालकमंत्री पंकजा मुंडे, नांदेडमध्ये पालकमंत्री अतुल सावे,
परभणीत पालकमंत्री मेघना बोर्डीकर, लातूरमध्ये
पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, हिंगोलीत पालकमंत्री नरहरी
झिरवाळ यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. बीड इथं क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे
यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
गोंदीया इथं जिल्ह्याचे पालकमंत्री
बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं.
****
छत्रपती संभाजीनगर विभागीय आयुक्त
कार्यालयात आयुक्त दिलीप गावडे यांच्या हस्ते तर विभागीय आणि जिल्हा माहिती कार्यालयात
जिल्हा माहिती अधिकारी डॉ. मिलिंद दुसाने यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. मुंबई
उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात वरिष्ठ न्यायमूर्ती मंगेश पाटील यांच्या हस्ते
ध्वजारोहण करण्यात आलं.
डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात
कुलगुरु डॉ विजय फुलारी यांच्या हस्ते, नांदेड इथं स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात
तर परभणी इथं वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात कुलगुरू डॉ इंद्र मणी यांच्या
हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं.
****
पुणे इथं काल गुलेन बॅरी सिंड्रोम-जी.बी.एस.
आजाराचं निदान झालेला एक रुग्ण दगावल्याचं वृत्त आहे. काही दिवसांपासून रुग्णालयात
उपचार घेत असलेल्या या रुग्णाच्या शवविच्छेदन अहवालानंतर याबाबत नेमकी माहिती मिळणार
असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
पुणे इथं काल या आजाराचे नऊ संशयित
रुग्ण नव्यानं आढळले. पुणे, पिंपरी-चिंचवड
शहरासह जिल्ह्यात जी.बी.एस. ची रुग्णसंख्या सध्या ७३ वर स्थिर असून यातील१४ रुग्ण व्हेंटिलेटरवर
आहेत.
कॅम्पिलोबॅक्टर जेजुनी या जीवाणुमुळं
होणारा आजार म्हणजे गुलेन बॅरी सिंड्रोम. दूषित पाणी अथवा अन्न खाल्यावर जिवाणूचा संसर्ग
होऊन अतिसार, ताप,
मळमळ - उलट्या तसंच ओटीपोटात वेदना होऊ शकतात. काही व्यक्तीची प्रतिकारशक्ती
मज्जातंतूंना लक्ष्य करते. एक ते तीन आठवड्यांत जीबीएसचं निदान होतं.
****
मराठवाडा साहित्य परिषदेच्या वतीने
न्यायमूर्ती आणि मराठवाडा साहित्य परिषदेचे विश्वस्त, साहित्यिक नरेंद्र चपळगावकर यांच्या निधनामुळे
त्यांची शोकसभा सभा बुधवारी, २९ जानेवारी रोजी सायंकाळी साडेपाच
वाजता होणार आहे. मराठवाडा साहित्य परिषदेच्या सभागृहात होणाऱ्या या शोकसभेत त्यांना
श्रद्धांजली वाहण्यात येईल.
****
लातूर जिल्ह्यातील ग्रामपंचायतींमध्ये
महिलांसाठीच्या विविध योजना-उपक्रमांची माहिती देण्यासाठी विशेष महिला सभा घेण्यात
आल्या. जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या संकल्पनेतून, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी
अनमोल सागर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातल्या सर्व ग्रामपंचायतींमध्ये हा उपक्रम
घेण्यात आला.
****
एकोणीस वर्षांखालील महिलांच्या आईसीसी
ट्वें-टी ट्वें-टी विश्वचषक स्पर्धेत आज भारत-बांग्लादेश दरम्यान सामना सुरु झाला आहे.
मलेशियाच्या क्वालालंपूर इथं, सुपर सिक्स ग्रुप एक मधील हा सामना आहे. थोड्यावेळेपूर्वीच नाणेफेक
जिंकून भारतानं प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे.
****
No comments:
Post a Comment