Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 01 April 2025
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०१ एप्रिल २०२५ सायंकाळी ६.१०
****
· डिजिटल आर्थिक व्यवहारांमध्ये भारताला जागतिक पातळीवर अग्रणी करण्यात रिझर्व्ह
बँकेची भूमिका महत्त्वाची-राष्ट्रपतींचं प्रतिपादन
· पीएफमधून निधी काढण्याच्या मर्यादेत वाढ-पाच लाख रुपयांपर्यंतची रक्कम काढता येणार
· भारत नेट प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यात प्रत्येक ग्रामपंचायतीपर्यंत संपर्क प्रस्थापित
करण्याचे निर्देश
आणि
· पश्चिम विभागाच्या विकासासाठी अधिकाधिक उद्योग आणण्याची सीआयआयची ग्वाही
****
डिजिटल आर्थिक व्यवहारांमध्ये भारताला जागतिक
पातळीवर अग्रणी बनवण्यात भारतीय रिझर्व्ह बँकेनं महत्त्वाची भूमिका बजावल्याचं प्रतिपादन, राष्ट्रपती
द्रौपदी मुर्मू यांनी केलं आहे. मुंबईत आज भारतीय रिझर्व्ह बँकेच्या नव्वदाव्या वर्षपूर्ती
सोहळ्याचा समारोप राष्ट्रपतींच्या उपस्थितीत झाला, त्यावेळी त्या बोलत होत्या.
नाबार्ड, आयडीबीआय आणि नॅशनल हाऊसिंग बँक यासारख्या संस्था स्थापन करून भारतीय रिझर्व्ह
बँकेनं देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकटी दिल्याचं, सांगत, आरबीआयच्या
आर्थिक स्थैर्य राखण्याच्या कार्याची त्यांनी दखल घेतली.
या समारंभाला राज्यपाल सी पी राधाकृष्णन, रिझर्व्ह
बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री
एकनाथ शिंदे,
उपमुख्यमंत्री अजित पवार यावेळी उपस्थित होते.
या कार्यक्रमानंतर दुपारच्या सुमारास राष्ट्रपतींनी
मुंबईहून दिल्लीला प्रस्थान केलं.
****
घर, विवाह, शिक्षण
आणि आरोग्यसंदर्भातल्या खर्चासाठी भविष्य निर्वाह निधीतली रक्कम मुदतपूर्व काढण्याची
मर्यादा पाच लाख रुपये करण्यात आली आहे. ही मर्यादा पूर्वी एक लाख रुपये, इतकी
होती. या निर्णयाचा देशातल्या साडेसात कोटी कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे. याशिवाय, आता
पीएफची रक्कम यूपीआयद्वारे काढण्यासाठी नवीन प्रणाली सादर करण्यात येणार असून, साधारण
जूनअखेरपर्यंत पीएफची रक्कम यूपीआय आणि एटीएमद्वारे काढता येऊ शकेल, असं
वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे.
****
लोकसभेत उद्या वक्फ सुधारणा विधेयक चर्चा
आणि पारीत होण्यासाठी सादर केलं जाणार आहे. संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी
आज संसद परिसरात पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली. या विधेयकाबाबतच्या सर्व प्रश्नांची
उत्तरं देण्यास सरकार तयार असल्याचं सांगत, विरोधी पक्ष आपल्या तुष्टिकरणाच्या
राजकारणामुळे या विधेयकाच्या विरोधात असल्याचं रिजिजू यांनी म्हटलं.
दरम्यान, वक्फ सुधारणा विधेयकामुळे
देशातल्या कोणत्याही मुस्लीम बांधवाचं अहित होणार नाही, असं
भारतीय जनता पक्षाचे नेते, माजी मंत्री शाहनवाज हुसैन यांनी म्हटलं आहे.
या विधेयकाबाबत काही लोक जनतेमध्ये गैरसमज पसरवत असल्याचं हुसैन यांनी सांगितलं, ते
म्हणाले –
बाईट – शाहनवाज हुसैन
****
भारत नेट प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यात
महाराष्ट्राल्या उर्वरित प्रत्येक ग्रामपंचायतीपर्यंत संपर्क यंत्रणा प्रस्थापित करण्यात
यावी, असे निर्देश केंद्रीय दळणवळण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी दिले आहेत. आज मुंबईत
यासंदर्भात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी
बोलतांना, राज्यामध्ये गडचिरोलीसह दुर्गम आणि अतिदुर्गम भागात संपर्क यंत्रणा निर्माण करण्यास
राज्यशासन केंद्राला संपूर्ण सहकार्य करेल, अशी ग्वाही दिली.
****
मुंबई महानगरपालिकेच्या प्रस्तावित घनकचरा
कराचा आमदार आदित्य ठाकरे यांनी विरोध दर्शवला आहे. ते आज यासंदर्भातल्या पत्रकार परिषदेत
बोलत होते. यासंदर्भात महापालिकेला पत्र पाठवणार असल्याचं, आदित्य
ठाकरे यांनी सांगितलं. ते म्हणाले –
बाईट – आदित्य ठाकरे
दरम्यान, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या
करनिर्धारण आणि संकलन विभागाने मालमत्ता कर संकलनाचे आजवरचे सर्व विक्रम मोडीत काढून
सन २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी सहा हजार १९८ कोटी ०५ लाख रुपये इतका मालमत्ता कर संकलित
केला आहे. अतिरिक्त दंडाच्या स्वरुपात १७८ कोटी ३९ लाख रुपये बीएमसीने संकलित केल्याचं, आमच्या
प्रतिनिधींनी कळवलं आहे.
****
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या मालमत्ता
व्यवस्थापन विभागाने सन २०२४ - २०२५ या वर्षात एकूण ११ कोटी, ७२
लाख रुपयांची करवसुली केली आहे. गेल्या पाच वर्षांत ही सर्वाधिक कर वसुली असल्याचं, याबाबतच्या
वृत्तात म्हटलं आहे.
****
येत्या २ ते ४ मे कालावधीत तीन दिवसीय महाबळेश्वर
पर्यटन महोत्सवाचं आयोजन करण्यात येणार आहे. आज मुंबईत सह्याद्री अतिथीगृह इथं या महोत्सवाच्या
बोधचिन्हाचं अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलं.
****
भारतीय उद्योग महासंघ अर्थात सीआयआयनं पश्चिम
विभागामध्ये आर्थिक आणि औद्योगिक वाढीसाठी धोरण तयार केलं असून, छत्रपती
संभाजीनगरसह संपूर्ण पश्चिम विभागात अधिकाधिक उद्योग आणण्याकडे लक्ष देणार असल्याचं, सीआयआय
पश्चिम विभागाचे नवनिर्वाचित अध्यक्ष ऋषीकुमार बागला यांनी सांगितलं आहे. ते आज छत्रपती
संभाजीनगर इथे पत्रकार परिषदेत बोलत होते. ते म्हणाले –
बाईट – ऋषीकुमार बागला
छत्रपती संभाजीनगर शहरात येत्या एक वर्षांत
कौशल्य केंद्र उभारण्यात येणार असून त्याचा अनेक बेरोजगार युवकांना कौशल्य आणि रोजगार
मिळण्यासाठी उपयोग होईल,
असा विश्वासही बागला यांनी वर्तवला.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात खुलताबाद इथं
असलेल्या औरंगजेबाच्या कबरीभोवती कोणतीही सजावट किंवा सुशोभीकरण असू नये, अशी
मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं करण्यात आली आहे. मनसेचे जिल्हाध्यक्ष सुमीत
खांबेकर आणि पदाधिकाऱ्यांनी आज छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांना
याबाबतचं निवेदन सादर केलं. ही कबर दाखवण्यासाठी शालेय विद्यार्थ्यांच्या सहली आणाव्यात, औरंगजेबाला
इथं दफन केलं असल्याचं मुलांना सांगावं असंही या निवेदनात म्हटलं आहे.
****
बीड तालुक्यातल्या बोरफडी गावामध्ये विहीर, पाईपलाईन
आणि टाकीच्या कामांमध्ये गुत्तेदार आणि अधिकाऱ्यांनी संगनमतानं मोठा भ्रष्टाचार केल्याच्या
आरोप करत गावकऱ्यांनी आज आत्मदहनाचा इशारा देत आंदोलनाची तयारी केली, मात्र
पोलिस आणि प्रशासनाने परिस्थिती वेळीच नियंत्रणात आणल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं
आहे.
याशिवाय, बीड जिल्ह्यात शिरूर
कासार तालुक्यात दगडवाडी इथेही ग्रामस्थांनी गायरान जमिनीची विक्री थांबवण्याच्या मागणीसाठी
सामूहिक आत्मदहनाचा प्रयत्न केला, हे आंदोलन पोलिसांनी वेळीच थांबवल्याचं वृत्त
आहे.
****
बीड जिल्ह्यात अंबाजोगाई इथे आज सकाळी चार
युवकांनी एका युवकाची हत्या केली. वैयक्तिक वादातून हा प्रकार घडल्याचं आमच्या वार्ताहरानं
कळवलं आहे. या प्रकरणी या चौघांविरोधात अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला
आहे.
****
लातूर जिल्ह्याच्या उदगीर तालुक्यातल्या
अवलकोंडा तलावात प्रमोद मडिवाळ या तरुणाचा पाण्यात बुडून आज मृत्यू झाला. पाण्याचा
अंदाज न आल्यानं ही दुर्घटना घडल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
पर्यावरणपूर्वक वीज निर्मितीची गरज असून,यासाठी
सर्व ग्रामस्थांनी पुढाकार घ्यावा, असं आवाहन छत्रपती संभाजीनगरचे
जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी केलं आहे. आज गंगापूर तालुक्यातल्या रांजणगाव शेणपुंजी
इथे, ‘हर घर सोलर,
घर घर उजाला’, ‘पंतप्रधान सूर्यघर योजना’ याबाबतच्या
मार्गदर्शन कार्यशाळेच्या उद्घाटनाच्या वेळी ते बोलत होते. गंगापूर खुलताबादचे आमदार
प्रशांत बंब यांनी यावेळी बोलतांना, गावातल्या सर्व कुटुंबांनी आपापल्या
घरांच्या छतांवर सोलर पॅनल बसवण्यासाठी सक्ती करणार असल्याचं सांगितलं.
****
छत्रपती संभाजीनगरच्या मुकुंदवाडीतल्या संत
रोहिदास आरोग्य केंद्रात आज दिव्यांगासाठी ऑन द स्पॉट कृत्रिम अवयव वाटप शिबिर घेण्यात
आलं. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या हस्ते यात शहाऐंशी दिव्यांगांना कृत्रिम हात, पाय
आणि कॅलिपर्सचं वाटप करण्यात आलं.
****
No comments:
Post a Comment