Tuesday, 1 April 2025

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 01.04.2025 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date 01 April 2025

Time 11.00 to 11.05 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक: एप्रिल २०२ सकाळी .०० वाजता.

****

व्यावसायिक वापराच्या १९ किलो एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत तेल कंपन्यांनी कपात केली आहे. यानुसार दिल्लीत प्रती सिलिंडरच्या किमतीत ४१ रुपये, कोलकाता मध्ये ४४ रुपये ५० पैसे, तर मुंबईत ४३ रुपये ५० पैसे रुपयांची कपात करण्यात आली आहे. हे नवे दर आजपासून लागू झाले.

****

वफ्क सुधारणा विधेयक संसदेत सादर झाल्यावर त्यावरच्या चर्चेत सहभाग घेण्याचं आवाहन केंद्रीय अल्पसंख्यक व्यवहार मंत्री किरेन रिजीजू यांनी सर्व राजकीय पक्षांना केलं आहे. नवीदिल्लीत वार्ताहर परिषदेत ते बोलत होते. या विधेयकाविषयी काही राजकीय नेते अफवा पसरवत आहेत. नागरिकांची दिशाभूल करण्याचे हे प्रयत्न निंदनीय असल्याचं ते म्हणाले. संयुक्त संसदीय समितीत या विधेयकावर सविस्तर चर्चा झाली, या समितीनं विविध संघटना आणि नागरिकांची या विधेयकाबद्दलची प्रतिक्रिया जाणून घेतल्याचं रिजीजू यांनी सांगितलं.

****

समुद्र मार्गाने होणारा व्यापार हा भारतीय व्यापार तसंच अर्थव्यवस्थेचा कणा असून, २०४७ पर्यंत विकसित भारताचं लक्ष्य गाठण्यासाठी सागरी व्यापार क्षेत्राचा समग्र विकास होणं अतिशय आवश्यक आहे, असं प्रतिपादन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी केलं आहे. सागरी व्यापार क्षेत्रातर्फे साजरा केल्या जाणाऱ्या ६२व्या राष्ट्रीय सागरी दिवसाचं तसंच मर्चंट नेव्ही सप्ताहाचं उद्घाटन काल राज्यपालांच्या प्रमुख उपस्थितीत राजभवन इथं झालं, त्यावेळी ते बोलत होते.

****

 

अंमली पदार्थ तस्करीविरोधी पथक आणि दिल्ली पोलिसांनी एका टोळीकडून २७ कोटी रुपयांहून जास्त किमतीचे अंमली पदार्थ जप्त केले. या प्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली आहे. याबद्दल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पथकाचं कौतुक केलं.

****

पंजाबमध्ये तरनतारन इथं अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या एकाला पंजाब पोलिसांनी अटक केली असून, त्याच्याकडून १५ किलो हेरॉईन जप्त केलं आहे. आरोपी पाकिस्तान आणि अमेरिकेतल्या अंमली पदार्थांच्या तस्करीशी संबंधित आहे.

****

वायू प्रदूषण कमी करण्यासाठी इलेक्ट्रीक वाहनांचा उत्तम पर्याय असल्याचं, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. ठाणे इथं काल ई- बायसिकलचं लोकार्पण केल्यानंतर ते बोलत होते. इलेक्ट्रीक वाहनांच्या निर्मितीमध्ये २०३० मध्ये भारत अव्वल क्रमांकावर राहणार असून, आगामी काळात पेट्रोल, डिझेल आणि इलेक्ट्रीक कारची किंमतही सारखीच राहणार असल्याचं गडकरी यांनी सांगितलं.

****

मुंबई होणाऱ्या वेव्ह्ज परिषदेच्या दरम्यान वेव्ह्ज बाजारचंही आयोजन केलं जाणार आहे. यात चित्रपट, टीव्ही, ॲनिमेशन, व्हीएफएक्स, गेमिंग आणि कॉमिक्स यासारख्या क्षेत्रातले दिग्गज एकत्र येणार आहेत. यात भागिदारी, व्यवसाय विस्तार यासारख्या गोष्टींवर चर्चा होईल. त्यासाठी प्रक्षेपण व्यवस्था, खरेदीदार - विक्रेते यांच्यात बैठका, आंतर-देशीय भागिदारी यासाठी व्यवस्था उपलब्ध असेल. www.wavesbazaar.com या संकेतस्थळावर याविषयी अधिक माहिती उपलब्ध आहे.

****

राज्यात गेल्या पाच वर्षात अर्भक मृत्यु दरात घट होत असल्याचं सार्वजनिक आरोग्य विभागानं म्हटलं आहे. राज्याचा नवजात अर्भक मृत्युदर ११ टक्के असल्याचं केंद्र शासनाच्या संस्थांनी केलेल्या सर्वेक्षणातून समोर आलं आहे. राज्यातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये नवजात शिशूंसाठी ५५ विशेष काळजी कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. इथे उपचार घेऊन बरे झालेल्यांची संख्या मोठी असल्याचं आरोग्य विभागानं म्हटलं आहे.

****

महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास प्राधिकरण - म्हाडानं येत्या आर्थिक वर्षात १९ हजार ४९७ सदनिकांचं बांधकाम करण्याचं उद्दीष्ट ठेवलं आहे. त्यासाठी अर्थसंकल्पात ९ हजार २०२ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. सुमारे १५ हजार ९५७ कोटी रुपयांचा हा अर्थसंकल्प मंजूर झाला असून, चालू आर्थिक वर्षाच्या १० हजार ९०१ कोटी रुपयांच्या सुधारित अर्थसंकल्पालाही प्राधिकरणाची मंजुरी मिळाली आहे. यामध्ये छत्रपती संभाजीनगर मंडळाअंतर्गत एक हजार ६०८ सदनिकांचं बांधकाम करण्याचं प्रस्तावित असून, २३१ कोटी १० लाख  रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

****

पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक अशोक मिश्रा यांनी काल अंबाजोगाई इथं योगेश्वरी देवी मंदिराला भेट देऊन दर्शन घेतलं, यावेळी मराठवाडा जनता विकास परिषदेच्या अंबाजोगाई शाखेच्या वतीने अंबेजोगाई रेल्वे सेवेसंदर्भात त्यांना निवेदन सादर करण्यात आलं.

****

उन्हाळी हंगामासाठी लातूर विभागातून जादा बसेस सोडल्या जाणार असून १५ एप्रिल ते १५ जूनपर्यंत संगणकीय आरक्षण उपलब्ध करुन देण्यात आलं आहे. प्रवासी संबंधित बस स्थानकातील आरक्षण केंद्रावर किंवा बस रिझर्वेशन ॲपवरुन आसन आरक्षित करु शकतात, असं विभागातर्फे कळवण्यात आलं आहे.

****

परभणी जिल्हा परिषदेच्या महिला आणि बालविकास विभागाअंतर्गत जिल्ह्यातल्या आदर्श अंगणवाडी सेविका, मदतनीस, पर्यवेक्षिका आणि बाल प्रकल्प विकास अधिकारी यांना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नतिशा माथुर यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 05.04.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 05 April 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...