Sunday, 1 June 2025

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 01.06.2025 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date 01 June 2025

Time 11.00 to 11.05 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०१ जून २०२ सकाळी .०० वाजता

****

महिला केंद्रित विकास हा आपल्या सरकारच्या प्रत्येक योजनेचा गाभा असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. मध्य प्रदेशातल्या भोपाळ इथं काल ‘अहिल्यादेवी होळकर महिला सशक्तीकरण महासंमेलनात’ ते बोलत होते. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे विचार प्रेरणादायी असून, त्यांच्या विचारांचं अनुकरण करण्याची गरज असल्याचं पंतप्रधान म्हणाले. अहिल्यादेवींचं नाव ऐकताच मनात श्रद्धाभाव निर्माण होतो, आणि कोणत्याही कठीण परिस्थितीत राज्य कसं पुढे न्यायचं, हे त्यांच्याकडून शिकण्यासारखं आहे, असंही त्यांनी नमूद केलं. गरीब आणि वंचितांच्या उत्थानासाठी त्यांचं मोठं योगदान असून, भारतीय वारश्याच्या त्या खूप मोठ्या संरक्षक होत्या, असं सांगून पंतप्रधानांनी अहिल्याबाईंच्या कार्याला उजाळा दिला.

****

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची ३०० वी जयंती काल सर्वत्र विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून साजरी झाली. अहिल्यानगर जिल्ह्यातल्या चौंडी या अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मगावी झालेल्या जयंतीच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, अतुल सावे उपस्थित होते. यावेळी अहिल्यादेवींची जन्मभूमी ते कर्मभूमी म्हणजेच चौंडी ते इंदौर या बस सेवेचा प्रारंभ करण्यात आला.

****

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नाशिकच्या दौऱ्यावर असून दुपारी बारा वाजता सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पूर्व तयारी संदर्भात आढावा बैठक घेणार आहेत. यावेळी नाशिक मधल्या तीन आणि त्र्यंबकेश्वर मधील दहा आखाड्यांचे महंत उपस्थित राहणार आहेत. नाशिकमधील कुंभमेळा पर्वणीच्या तारखा यावेळी घोषित करण्यात येणार आहेत. या नंतर महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ इथं एक्सलन्स सेंटरचं उदघाटन फडणवीस यांच्या हस्ते होईल.

****

कला, सामाजिक, राजकारण अशा विविध विभागांमध्ये आपला ठसा उमटवणाऱ्या व्यक्तींच्या कार्याचा गौरव मीडिया एक्सलेन्स अवॉर्ड्स २०२५देऊन केला जाणार आहे. दादर इथल्या स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृह इथं तीन जून रोजी दुपारी तीन वाजता हा पुरस्कार सोहळा रंगणार आहे. विधान परिषद सभापती प्रा.राम शिंदे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पद्मश्री, महाराष्ट्र भूषण ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे माजी अध्यक्षअभिनेते विजय पाटकर, बालरंगभूमी परिषदेच्या अध्यक्षा नीलम शिर्के - सामंत आदी मान्यवरांचा यावेळी 'विशेष सत्कार' केला जाणार आहे. विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांना साहित्य क्षेत्रातल्या ऐतिहासिक कार्यासाठी मीडिया एक्सलन्स अवॉर्ड आणि पत्रकारिता जीवनगौरव मीडिया एक्सलन्स अवॉर्ड' पुरस्कारानं नीतिन केळकर यांना गौरविण्यात येणार आहे. मीडिया एक्सलन्स अवॉर्डनं अभिनेते, सामाजिक कार्यकर्ते सयाजी शिंदे, अभिनेत्री वैदेही परशुरामी, वरिष्ठ पत्रकार किशोर आपटे, ज्येष्ठ छायाचित्रकार मोहन बने, ज्येष्ठ पत्रकार श्रीकांत बोजेवार यांना सन्मानित करण्यात येणार आहे.

****

नागपूरकडून भरधाव वेगात येणाऱ्या ट्रकनं रायपूर वरून नागपूरकडे जात असलेल्या कारला धडक दिल्याची घटना रात्रीच्या सुमारास रायपूर नागपूर महामार्गावरील भंडाऱ्याच्या सालेबर्डी इथं घडली. या अपघातात पती पत्नीसह मुलगी गंभीररित्या जखमी झाले आहेत. जखमींना भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालय इथं उपचारासाठी हलविण्यात आलं आहे.

****

गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातल्या गोठणगाव इथल्या एका सहा वर्षीय मुलीवर बिबट्याने हल्ला करत जखमी केल्याची घटना घडली आहे. युकत निखारे असं जखमी चिमुकलीचे नाव असून ती रात्री आठ वाजता अंगणात उभी असताना बिबट्याने हल्ला करून तिला जखमी केलं. दरम्यान चिमुकलीचा किंचाळण्याचा आवाज येताच, कुटुंबातील तसंच शेजारचे लोक धावून आल्यानं बिबट्या पळून गेला आणि मुलीचा जीव वाचला. मुलीच्या मानेवर आणि डोक्यावर बिबट्याची नखे खोलवर गेल्यानं बराच रक्तस्त्राव झाला. अर्जुनी मोरगाव ग्रामीण रुग्णालयात तिच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.

****

राज्यासाठी साडेपाच लाख मेट्रिक टन डाय- अमोनियम फॉस्फेट म्हणजे डीएपीची मागणी असताना केवळ ९४ हजार मेट्रिक टन खत साठा शिल्लक होता. म्हणजे मागणीच्या तुलनेत केवळ १७ टक्केच उपलब्धता आहे. परिणामी अनेक जिल्ह्यांमध्ये तुटवडा आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी डीएपीला बाजारात पर्यायी असलेली खतं वापरावीत, असं आवाहन कृषी विभागानं केलं आहे. डीएपीऐवजी युरिया अर्धी गोणी आणि एसएसपी तीन गोणी खतांचा वापर डीएपीला चांगला पर्याय आहे. एसएसपीसोबत संयुक्त खतांचाही वापर करावा असं आवाहन पुणे कृषी संचालक सुनील बोरकर यांनी केलं आहे.

****

आशियाई ॲथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत भारत आठ सुवर्ण, दहा रौप्य आणि सहा कांस्य पदकांसह एकूण २४ पदकं जिंकून दुसऱ्या स्थानावर राहीला. काल समारोपाच्या दिवशी भारतीय खेळाडुंनी तीन रौप्य आणि तीन कांस्य पदकांची कमाई केली. चार हजार मीटर रिले शर्यतीत श्राबनी नंदा, अभिनय राज राजन, स्नेहा एस एस आणि नित्या गंधे यांच्या संघानं, पाच हजार मीटर धावण्याच्या शर्यतीत पारुल चौधरीनं, तर पुरुषांच्या भालाफेक स्पर्धेत सचिन यादवने रौप्य पदक जिंकलं. धावण्याच्या शर्यतीत पूजा, अनिमेष कुजूर आणि विथ्या रामराज यांनी कांस्य पदक मिळवलं.

****

येत्या दोन दिवसांत कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. या काळात विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडेल, तर मराठवाड्यात हवामान कोरडं राहील असा अंदाज आहे.

****

No comments: