Monday, 9 June 2025

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 09.06.2025 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date 09 June 2025

Time 11.00 to 11.05 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०९ जून २०२ सकाळी.०० वाजता

****

गेल्या ११ वर्षांत एनडीए सरकारच्या काळात, १४० कोटी भारतीयांच्या सामूहिक सहभागामुळं सुशासन आणि परिवर्तनावर स्पष्ट लक्ष केंद्रित केलं. त्यामुळं विविध क्षेत्रांमध्ये जलद प्रगती झाल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. 'सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, सबका प्रयास' या सुत्राच्या माध्यमातून सरकारनं संवेदनशीलतेनं अभूतपूर्व बदल घडवून आणले आहेत. आर्थिक वाढीपासून ते सामाजिक उन्नतीपर्यंत, सरकारनं लोककेंद्री, समावेशी आणि सर्वांगीण प्रगतीला प्राधान्य दिल्याचं मोदी यांनी समाजमाध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. भारत आज केवळ सर्वात वेगानं वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था नाही तर देशानं हवामान कृती आणि डिजिटल नवोपक्रम यासारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर जागतिक पातळीवर ठसा उमटवल्याचं पंतप्रधान म्हणाले.

****

काँग्रेस खासदार शशी थरुर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळानं आपला दौरा पूर्ण केला. शेवटच्या टप्प्यात या शिष्टमंडळानं अमेरिकेचे उपाध्यक्ष जे डी वेन्स आणि परराष्ट्रमंत्र्यांची भेट घेतली. यापूर्वी या शिष्टमंडळानं गयाना, पनामा, कोलंबिया आणि ब्राझीलचा दौरा केला होता. ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून भारतानं दहशतवादाविरोधी केलेल्या कारवाईची आणि पाकिस्तानच्या दहशतवादी कृत्यांची माहिती जगासमोर मांडण्यासाठी सात सर्वपक्षीय शिष्टमंडळांनी ३३ देशांचा दौरा केला.

****

केंद्रीय पृथ्वी विज्ञान मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी काल मोनाको इथं नॉर्वेचे परराष्ट्र मंत्री असमुंड ग्रोव्हर ओक्रस्ट यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी पहलगाम इथं  झालेल्या दहशतवादी हल्ल्याबद्दल पाठिंबा व्यक्त केला. सिंह यांनी काल याठिकाणी झालेल्या सागरी परिषदेला ही संबोधित केलं.

****

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई इथं 'छत्रपती शिवाजी महाराज भारत गौरव पर्यटन ट्रेन'चा हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ केला. याप्रसंगी त्यांनी शिवराज्याभिषेक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. आज  शिवराज्याभिषेक दिनी या रेल्वेचा पहिला मुक्काम रायगड इथं होणार आहे. त्यानंतर शिवनेरी, प्रतापगड, लाल महाल, पुणे इथली शिवसृष्टी आणि कोल्हापूरच्या अंबाबाईचे दर्शन करत अतिशय प्रेरणादायी यात्रा या ट्रेनच्या माध्यमातून यात्रेकरूंना करता येणार असल्याचं मुख्यमंत्री याप्रसंगी म्हणाले.

****

प्राथमिक आरोग्य सेवांचे जाळे निर्माण करण्याच्या दृष्टीने राज्यातील आरोग्य सेवेची पुर्नरचना करण्याचा निर्णय राज्य शासनानं घेतला असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. पुण्यात मावळ तालुक्यातील आंबी- तरंगवाडी इथं पुष्पलता डी. वाय. पाटील रुग्णालयाचं उद्घाटन फडणवीस यांच्या हस्ते काल झालं त्यावेळी ते बोलत होते.

****

पाण्याचा पुनर्वापर करून जलसंवर्धनातून विकसित महाराष्ट्र घडवू, असे प्रतिपादन महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं आहे. नागपूरच्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठात सुरू असलेल्या तीन दिवसीय विदर्भ पाणी परिषदेत यशोगाथांचे सादरीकरण या सत्रात ते काल बोलत होते. भविष्यातील पाणीटंचाई टाळण्यासाठी पाण्याचे योग्य व्यवस्थापन तसंच जल संवर्धन करण्यात सर्वांनी पुढाकार घेण्याची गरज असल्याचं बावनकुळे यावेळी म्हणाले.

****

शिक्षण क्षेत्रातल्या पीएम श्री तसंच सीएम श्री योजनेप्रमाणे आष्टी विधानसभा मतदार संघात आमदार श्री सुरु करण्यात येईल, असं आष्टीचे आमदार सुरेश धस यांनी सांगितलं. काल त्यांच्या हस्ते दहावी, बारावी आणि स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळवून आयएफएस झालेल्या अश्विनी देवराव परकाळे यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धा परिक्षांविषयी मार्गदर्शन केलं.

****

उद्या साजरा होणाऱ्या वटपौर्णिमेच्या सणाला प्रत्येक कुटुंबानं किमान दहा झाडं लावून पर्यावरण संवर्धनात योगदान द्यावं, तसंच महिलांनीही वृक्षारोपणासाठी पुढाकार घ्यावा, असं आवाहन लातूरच्या जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी केलं. राज्य सरकारनं दहा कोटी वृक्ष लागवडीचं उद्दिष्ट ठेवलं आहे. जिल्ह्यातील हरित क्षेत्र वाढवण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीनं वृक्ष लागवड आणि संवर्धनासाठी यासारखे विविध उपक्रम राबवण्यात येत असल्याचं त्या म्हणाल्या.

****

लातूर जिल्ह्यातल्या उदगीर सह दुय्यम निबंधक वर्ग - २ च्या नविन इमारत बांधकामाचं भूमिपूजन आमदार संजय बनसोडे यांच्या हस्ते काल झालं. याप्रकारच्या विविध शासकीय योजना राबवून उदगीर शहराचा विकास करणार असल्याचं बनसोडे यांनी यावेळी सांगितलं.

****

फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेत स्पेनच्या कार्लोस अल्काराझने पुरूष एकेरीचं विजेतेपद पटकावलं. अल्काराझनं सलग दुसऱ्यांदा हे विजेतेपद मिळवलं आहे. काल रात्री झालेल्या सामन्यात इटलीच्या जॅनिक सिन्नरचा त्यानं ४-६, ६-७, ६-४, ७-६, ७-६ असा पाच सेटमध्ये पराभव केला. या विजयासह अल्काराझनं पाचवे ग्रँड स्लॅम विजेतेपदही जिंकलं.

****

 

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 31.12.2025 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 31 December 2025 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छ...