Regional
Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 20 June
2025
Time 7.10
AM to 7.20 AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक २० जून २०२५ सकाळी ७.१० मि.
****
·
राज्यातील महत्त्वाकांक्षी
११ प्रकल्पांच्या भूसंपादनासाठी ५३ हजार ३५४ कोटी रुपयांची तरतूद करण्याची
मुख्यमंत्र्यांची सूचना-प्रकल्पांसाठी भूसंपादन प्रक्रिया १५ दिवसात पूर्ण
करण्याचे निर्देश
·
QS
वर्ल्ड युनिव्हर्सिटी क्रमवारीत भारतातल्या ५४ शैक्षणिक
संस्थांना स्थान
·
संत ज्ञानेश्वर
महाराजांच्या पालखी सोहळ्याचं आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे प्रस्थान
·
आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या
पार्श्वभूमीवर जनजागृतीसह विविध कार्यक्रमांचं आयोजन
आणि
·
भारत-इंग्लंड कसोटी क्रिकेट
मालिकेला आजपासून इंग्लंडमध्ये प्रारंभ
****
राज्यातील महत्त्वाकांक्षी ११ प्रकल्पांच्या भूसंपादनासाठी
लागणाऱ्या ५३ हजार ३५४ कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करावी, अशा
सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या आहेत.
यासंदर्भात काल झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते.
भूसंपादनाअभावी एकही प्रकल्प रखडणार नाही याची दक्षता घेण्याची सूचना
मुख्यमंत्र्यांनी केली. या बैठकीत जालना - नांदेड द्रुतगती महामार्गासह राज्यातले
विविध रस्ते प्रकल्प,
वर्धा-नांदेड सह इतर रेल्वे प्रकल्प तर छत्रपती संभाजीनगरसह
राज्यातल्या विविध विमानतळांसाठीच्या भूसंपादन प्रक्रियेचा आढावा घेण्यात आला. या
सर्व प्रकल्पांची भूसंपादनाची प्रक्रिया १५ दिवसात पूर्ण करण्याच्या सूचनाही
मुख्यमंत्र्यांनी दिल्या.
****
२०४७ पर्यंत देशातून सिकलसेल रोगाचं उच्चाटन होईल, असा
विश्वास आदिवासी व्यवहार राज्यमंत्री दुर्गादास उईके यांनी व्यक्त केला आहे.
दिल्लीत एम्स रुग्णालयात जागतिक सिकलसेल दिनानिमित्त झालेल्या कार्यक्रमात ते काल
बोलत होते. सिकलसेल रोगावर औषध निर्माण करण्यासाठी आपलं मंत्रालय एक स्पर्धा
आयोजित करत असून,
या स्पर्धेतून निवडलेल्या औषध निर्मिती प्रकल्पाला दहा कोटी
रुपयांपर्यंत निधी दिला जाणार असल्याचं उईके यांनी सांगितलं.
****
QS वर्ल्ड युनिव्हर्सिटी क्रमवारीत भारतातल्या ५४ शैक्षणिक संस्थांना स्थान
मिळालं आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी समाज माध्यमावर
लिहिलेल्या पोस्टमधून ही माहिती दिली. महाराष्ट्रातल्या आयआयटी मुंबई, सावित्रीबाई
फुले पुणे विद्यापीठ,
मुंबई विद्यापीठ या संस्थांना या क्रमवारीत स्थान मिळालं
आहे. २०१४ मध्ये भारतातल्या फक्त ११ विद्यापीठांना QS क्रमवारीत
स्थान होतं आता यामध्ये लक्षणीय वाढ झाल्याचं प्रधान यांनी नमूद केलं. पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांनीही या क्रमवारीत भारतीय संस्थांच्या कामगिरीबद्दल समाधान व्यक्त
केलं.
****
शिवसेनेच्या ५९ वा वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त काल मुंबईत
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर सभेला संबोधित केलं. यावेळी त्यांनी
शिवसेना महिला आघाडीच्या वतीने राबवण्यात येणाऱ्या ‘हुंडामुक्त महाराष्ट्र’
अभियानाची घोषणा केली.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे
यांनीही पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त काल मुंबईत मेळावा घेतला.
****
पुणे जिल्ह्यात आळंदी इथून संत ज्ञानेश्वर महाराजांच्या
पालखीनं काल आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे प्रस्थान केलं. आज ही पालखी पुण्यात दाखल
होणार आहे. संतशिरोमणी तुकाराम महाराजांची पालखी काल आकुर्डीत मुक्कामी होती.
मराठवाड्यातूनही विविध पालख्या पंढरपूरकडे मार्गक्रमण करत
आहेत.
मुक्ताईनगर इथल्या संत श्री मुक्ताबाईंची पालखी काल बीड जिल्ह्यात दाखल झाली.
जिल्ह्याच्या हद्दीत प्रवेश करताचा मुक्ताईंच्या पादुकांना गोदास्नान घालण्यात
आलं. सायंकाळी ही पालखी गेवराईत येताच भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती.
या पालखीचा आज गढी इथल्या भवानी मंदिर परिसरात रिंगण सोहळा होणार आहे.
शेगावहून निघालेली संत श्री गजानन महाराजांची पालखी देखील काल बीड जिल्ह्यात
परळी वैजनाथ इथं पोहोचली.
नांदेड जिल्ह्यात कंधार इथल्या सुमारे तीनशे वर्षांची परंपरा असलेल्या श्री
संत साधू महाराज कंधारकर यांच्या पालखीनं काल पंढरपूरकडे प्रस्थान केलं.
****
केंद्र सरकारनं गेल्या ११ वर्षात केलेल्या कामांची आषाढी
वारीमध्ये माहिती देणाऱ्या वाहनाला केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी काल
पुण्यात हिरवा झेंडा दाखवला. विविध पोस्टर्स, आणि नाटिकांच्या माध्यमातून
सरकारच्या कामाची माहिती दिली जाणार आहे.
****
योगासनांमध्ये सूर्यनमस्कार हा सर्वांग योग अभ्यास म्हणून
ओळखला जातो. उद्या शनिवारी साजऱ्या होत असलेल्या अकराव्या आंतरराष्ट्रीय योग
दिनाच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर इथल्या योगशिक्षक डॉ स्मिता दीक्षित
यांनी दिलेली सूर्यनमस्काराविषयीची माहिती आपण आज जाणून घेऊ.
बाईट
- योगशिक्षक डॉ स्मिता दीक्षित
आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या पार्श्वभूमीवर छत्रपती
संभाजीनगर इथं काल विशेष जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. केंद्रीय संचार ब्यूरो, जिल्हा
प्रशासन, आणि भारतीय योग संस्थान यांच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या या
कार्यक्रमाअंतर्गत योग दिंडी काढण्यात आली. शिवदर्शन सांस्कृतिक शाहिरी संचाच्या
योग शाहिरीचं सादरीकरण तसंच योग प्रात्यक्षिकांचं सादरीकरण यावेळी करण्यात आलं.
योग दिनाचा जिल्हास्तरीय कार्यक्रम उद्या सकाळी बिबी का
मकबरा परिसरात होणार आहे.
****
लातूर इथं योग दिनाचा जिल्हास्तरीय कार्यक्रम जिल्हा क्रीडा
संकुलात सकाळी साडे सहा वाजता होणार आहे. नांदेड इथं पोलीस मुख्यालयाच्या कवायत
मैदानावर तर धाराशिव इथं श्री तुळजाभवानी जिल्हा क्रीडा संकुलातल्या बॅडमिंटन
हॉलमध्ये योग दिनाचा मुख्य कार्यक्रम होणार आहे, सकाळच्या
सत्रात होणाऱ्या या कार्यक्रमांमध्ये नागरिकांनी मोठ्या संख्येनं सहभागी होण्याचं
आवाहन प्रशासनानं केलं आहे.
****
प्रसिद्ध वन्य जीव अभ्यासक, अरण्यऋषी पद्मश्री
मारुती चितमपल्ली यांच्या पार्थिव देहावर काल सोलापूर इथं शासकीय इतमामात
अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पोलीस विभागाच्या वतीने बंदुकीच्या तीन फैरी
हवेत झाडून चितमपल्ली यांना मानवंदना देण्यात आली. चितमपल्ली यांचं परवा
वृद्धापकाळानं निधन झालं. ते ९४ वर्षांचे होते.
****
जालना जिल्ह्यात शासकीय अनुदान वाटप घोटाळा प्रकरणी आणखी ११
जणांवर जिल्हा प्रशासनाने काल निलंबनाची कारवाई केली. यामध्ये एक मंडळाधिकारी, सहा
तलाठी आणि चार महसूल सहायकांचा समावेश आहे. या प्रकरणी पहिल्या टप्प्यात दहा
तलाठ्यांवर निलंबनाची कारवाई झाली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी काही वरिष्ठ
अधिकाऱ्यांनाही कारणे दाखवा नोटिसा बजावल्या आहेत.
****
लातूर, बीड तसंच धाराशिव जिल्ह्यातल्या काही
भागाला पाणी पुरवठा करणाऱ्या मांजरा धरणात सध्या २८ टक्के इतका पाणी साठा शिल्लक
आहे. धरणातला जिवंत पाणीसाठा ४९ पूर्णांक ४९२ दशलक्ष घनमीटर इतका झाला आहे.
****
नांदेड जिल्ह्यात उमरी तालुक्यातल्या कौडगाव या सुमारे ६३२
लोकसंख्येच्या गावात जल जीवन मिशन अंतर्गत मंजूर झालेली ८१ लाख ५२ हजार रुपयांची
पाणीपुरवठा योजना यशस्वीपणे पूर्ण करण्यात आली आहेत. गावातल्या एकूण १४३ घरांना नळ
जोडणी देण्यात आली आहे. या योजनेच्या संचालनाची जबाबदारी आता ग्रामपंचायतीकडे
सुपूर्द करण्यात आली आहे.
****
क्रिकेट
भारत आणि इंग्लंडदरम्यान पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेला
आजपासून इंग्लंडमध्ये प्रारंभ होत आहे. या मालिकेतला पहिला सामना आज लीडस् इथं
खेळवला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी साडेतीन वाजता सामन्याला सुरूवात होईल.
या मालिकेत शुभमन गिल कर्णधार तर ऋषभ पंत उपकर्णधार पदाची जबाबदारी सांभाळणार आहे.
****
हवामान
छत्रपती संभाजीनगर तसंच जालना शहरासह जिल्ह्यातल्या बहुतांश
भागात काल दुपारपासून पावसाच्या सरी कोसळल्या. या दोन्ही जिल्ह्यांसह परभणी, हिंगोली
आणि नांदेडसह विदर्भातल्या अनेक जिल्ह्यांना आज यलो अलर्ट देण्यात आला आहे. नाशिक
जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे गोदावरी नदीला पूर आला आहे. त्यामुळे दारणा
आणि नांदूर मधमेश्वर धरणातून विसर्ग सुरु करण्यात आला आहे.
****
आज २० तारखेला आणि २५ तारखेला छत्रपती संभाजीनगर ते मनमाड
दरम्यान, नगरसोल- तरुर रेल्वेमार्गावर लाईन ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे काही
रेल्वेगाड्यांच्या वेळेत परिणाम होणार आहे. प्रवाशांनी याची नोंद घेण्याचं आवाहन
दक्षिण मध्य रेल्वेकडून करण्यात आलं आहे.
****
No comments:
Post a Comment