Tuesday, 1 July 2025

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 01.07.2025 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date - 01 July 2025

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०१ जूलै २०२ दुपारी १.०० वा.

****

बीड इथल्या अल्पवयीन मुलीच्या लैंगिक शोषण प्रकरणी विशेष तपास पथक स्थापन करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. आज विधानसभेत सदस्य चेतन तुपे यांनी विचारलेल्या प्रश्नावर ते उत्तर देत होते. वरिष्ठ दर्जाच्या महिला आयपीएस अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली विशेष तपास पथक स्थापन करून, सदर प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल, कालबद्ध पद्धतीने चौकशी पूर्ण करून प्रकरणाचा छडा लावला जाईल तसंच दोषींना आणि त्यांना पाठीशी घालणाऱ्या सर्वांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला.

****

विधानसभा अध्यक्षांच्या आसनाकडे धावून जात राजदंडाला स्पर्श केल्याप्रकरणी काँग्रेस सदस्य नाना पटोले यांना दिवसभरासाठी सभागृहातून निलंबित करण्यात आलं आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सभागृहात याबाबतची घोषणा केली. या निर्णयावर नाराजी व्यक्त करत विरोधकांनी दिवसभराच्या कामकाजावर बहिष्कार टाकत सभात्याग केला.

****

विधानसभेच्या विरोधी पक्षनेत्याच्या नियुक्तीत सरकारची काहीही भूमिका नसून, हा पूर्णपणे विधानसभा अध्यक्षांचा निर्णय असतो, असं गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी म्हटलं आहे. ते आज विधानभवन परिसरात पत्रकारांशी बोलत होते.

दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी जनसुरक्षा कायद्यावर टीका करत, या कायद्यामुळे, सरकारच्या चुकीच्या निर्णयांविरोधात आंदोलन करण्याचा हक्कही हिरावला जाईल, असा आरोप केला.

दरम्यान, शक्तिपीठ महामार्गाच्या विरोधात महाविकास आघाडीच्या आमदारांनी आज विधिमंडळाच्या पायऱ्यांवर जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन केलं.

****

हरित क्रांतीचे प्रणेते, राज्याचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची जयंती आज 'कृषी दिन' म्हणून साजरी केली जात आहे. हरितक्रांती, श्वेतक्रांती, पंचायतराज आणि रोजगार हमी योजनेचे जनक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वसंतराव नाईक यांचं राज्याच्या कृषी क्षेत्रात अमूल्य योगदान आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वसंतराव नाईक यांना आदरांजली वाहत बळीराजाला कृषी दिनाच्या शुभेच्छा दिल्या. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रालयात वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करत अभिवादन केलं. या पार्श्वभूमीवर राज्यभरात विविध कृषी संबंधित उपक्रमांचे आयोजन करण्यात आलं आहे.

छत्रपती संभाजीनगर इथं आज जिल्हा परिषदेचा कृषी विभाग तसंच कृषी विज्ञान केंद्राच्या वतीनं प्रगतीशील शेतकरी सत्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे.

****

राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सदस्यपदासाठी राजीव निवतकर, दिलीप भुजबळ-पाटील आणि महेंद्र वारभुवन यांची निवड केली आहे. याबाबतची अधिसूचना आज जारी करण्यात आली.

****

डिजिटल इंडिया अभियानाचा दशकपूर्ती सोहळा आज देशात साजरा केला जात आहे. नव्या तंत्रज्ञानाचा वापर करत प्रशासनात सुधारणा करणं आणि नागरिकांचं एकूण जीवन सुलभ करणं, या उद्देशानं २०१५ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे अभियान सुरू केलं होतं. यासंदर्भात समाजमाध्यवार जारी केलेल्या संदेशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, एकशे चाळीस कोटी भारतीयांच्या सामूहिक संकल्पामुळे देशानं डिजिटल पेमेंट्स मध्ये मोठी झेप घेतल्याचं नमूद केलं.

****

वस्तू आणि सेवा कर प्रणालीला आज आठ वर्षं पूर्ण झाली. वस्तू आणि सेवा करापोटी जमा होणारा महसूल गेल्या पाच वर्षांत दुप्पट झाला आहे. २०१७ पासून लागू झालेल्या या प्रणालीमुळे करभरणा सुलभ झाला, तसंच वस्तू आणि सेवांचं आदानप्रदान देशभरात कोणत्याही राज्यांमध्ये सहज करता येऊ लागलं. करदात्यांची संख्याही सातत्याने वाढत असून, सध्या एक कोटी ५० लाख करदाते आहेत.

****

दूरसंचार विभाग, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या सहयोगानं, एका नव्या मोबाईल इशारा प्रणालीची चाचणी करत आहे. ही प्रणाली, देशभरातल्या लोकांना आणीबाणीच्या स्थितीत इशारा संदेश पाठवण्यात मदत करेल. सेल ब्रॉडकास्ट सिस्टीम, या नावाची ही प्रणाली, भूकंप, त्सुनामी, विजा पडणे, वायुगळती आणि रासायनिक धोके, अशा प्रकारच्या आणीबाणीच्या प्रसंगांनी प्रभावित होणा-या भागांमध्ये तात्काळ मोबाईल फोनवर ॲलर्ट संदेश पाठवेल. येत्या दोन ते चार आठवड्यात या प्रणालीची देशभरात चाचणी होणार असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

नांदेडच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात व्यसनमुक्ती केंद्राची स्थापना करण्यात आली आहे. नशाबंदीबाबत जनजागृती आणि प्रशिक्षण आयोजित करण्याच्या उद्देशानं हे केंद्र सुरू करण्यात आलं आहे. या केंद्राच्या माध्यमातून व्यसनी व्यक्तींना व्यसनातून बाहेर पडण्यासाठी समुपदेशन, उपचार आणि प्रेरणा मिळेल, असं या रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर सुधीर देशमुख यांनी म्हटलं आहे.

****

No comments: