Tuesday, 1 July 2025

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 01.07.2025 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 01 July 2025

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – ०१ जूलै २०२५ सायंकाळी ६.१०

****

·      रोजगार संलग्न प्रोत्साहन योजनेला केंद्र सरकारची मंजुरी-राष्ट्रीय क्रीडा धोरणालाही मान्यता

·      बीड लैंगिक शोषण प्रकरणी विशेष तपास पथक स्थापन करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा

·      राज्यात प्रदूषण करणाऱ्या ३०४ उद्योगांवर दंडात्मक कारवाई तर ३१८ उद्योगांना टाळे

आणि

·      माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची जयंती आज सर्वत्र कृषी दिनम्हणून साजरी

****

रोजगार निर्मिती, कौशल्य विकास आणि सामाजिक सुरक्षेला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशानं केंद्र सरकारनं ‘रोजगार संलग्न प्रोत्साहन योजनेलामंजुरी दिली आहे. आज नवी दिल्लीत झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या योजनेतून, नोकरी देणाऱ्यांना तसंच पहिल्या वेळेस नोकरी धरणाऱ्यांना आर्थिक प्रोत्साहन दिलं जाणार आहे. ऑगस्ट २०२५ ते जुलै २०२७, या काळात निर्माण होणाऱ्या नोकऱ्यांसाठी हे प्रोत्साहन देण्यात येणार असून, पुढच्या दोन वर्षात देशात साडेतीन कोटी नवे रोजगार निर्माण करणं, हे या योजनेचं उद्दिष्ट आहे. या योजनेसाठी नव्व्याण्णव हजार चारशे शेहेचाळीस कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी पत्रकार परिषदेत याबाबत अधिक माहिती दिली. ते म्हणाले

बाईट – अश्विनी वैष्णव, केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री

 

याशिवाय, संशोधन विकास आणि नवोन्मेष योजनेलाही केंद्रीय मंत्रिमंडळानं आज मंजुरी दिली. खाजगी क्षेत्रातली गुंतवणूक वाढून देशाच्या संशोधन आणि नवोन्मेषाला बळकटी मिळावी या उद्देशानं मंजूर झालेल्या या योजनेसाठी एक लाख कोटी रुपयांची तरतूद केल्याचं वैष्णव यांनी सांगितलं.

 

राष्ट्रीय क्रीडा धोरण २०२५ ला आजच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. क्रीडाक्षेत्रातल्या जगातल्या पहिल्या पाच देशात भारताचा समावेश व्हावा, तसंच तंदुरुस्ती ही लोकचळवळ व्हावी, हा या राष्ट्रीय क्रीडा धोरणाचा उद्देश असल्याचं वैष्णव यांनी सांगितलं. ते म्हणाले

बाईट – अश्विनी वैष्णव, केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री

****

देशात आज डॉक्टर दिन आणि सनदी लेखापाल दिन साजरा केला जात आहे. या दोन्ही महत्त्वपूर्ण सेवांच्या योगदानाचा सन्मान करणं, हा या दिनाचा उद्देश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दिनाच्या औचित्यानं सर्व मेहनती डॉक्टर आणि चार्टर्ड अकाऊंटंट्सना शुभेच्छा दिल्या आहेत.

****

बीड इथल्या अल्पवयीन मुलीच्या लैंगिक शोषण प्रकरणी विशेष तपास पथक स्थापन करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. आज विधानसभेत सदस्य चेतन तुपे यांनी विचारलेल्या प्रश्नावर ते उत्तर देत होते. या प्रकरणातल्या दोषींना आणि त्यांना पाठीशी घालणाऱ्या सर्वांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला. ते म्हणाले -

बाईट – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

****

वैजापूर तालुक्यात चिंचडगाव इथं संगीता पवार या कीर्तनकार महिलेची २७ जूनला हत्या झाली. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी विधान परिषदेत, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली. हे प्रकरण जलदगती न्यायालयात चालवण्याची मागणी दानवे यांनी केली.

****

राज्यात प्रदूषण करणाऱ्या ३०४ उद्योगांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून, ३१८ उद्योग बंद करण्यात आले आहेत. पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी प्रश्नोत्तराच्या तासात ही माहिती दिली. याबाबतचे दोन स्वतंत्र प्रश्न भास्कर जाधव आणि अतुल भातखळकर यांनी उपस्थित केले होते.

****

पीक विम्याबाबत दोषी ठरलेल्या विमा कंपन्यांवर कठोर कारवाईचा इशारा कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिला आहे. अशा कंपन्यांना शासनाकडून ब्लॅकलिस्ट करण्यात येईल, असं कोकाटे यांनी आज विधानपरिषदेत चर्चेदरम्यान सांगितलं.

****

शिक्षण खात्यातल्या कथित भ्रष्टाचार प्रकरणी आतापर्यंत १९ अधिकाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल झाल्याची माहिती मंत्री दादा भुसे यांनी विधानसभेत दिली. आमदार प्रशांत बंब यांनी याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता.

****

क्षयरोग दूरीकरण कार्यक्रमात चाचण्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली असून, रुग्णांच्या संख्येत २७ टक्क्यांनी घट झाली आहे. मंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांनी विधानसभेत ही माहिती दिली. राज्यातल्या सात हजार ४०२ ग्रामपंचायती क्षयमुक्त म्हणून जाहीर झाल्या असून, संभाव्य रुग्णांना तसंच त्यांच्या कुटुंबीयांना क्षयरोगाची अतिरिक्त प्रतिबंधक मात्रा दिली जात असल्याचं, बोर्डीकर यांनी सांगितलं.

****

विधानसभेत अध्यक्षांचा राजदंड उचलण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी काँग्रेसचे नाना पटोले यांना अध्यक्षांनी दिवसभरासाठी निलंबित केलं. यावर निषेध व्यक्त करत विरोधी पक्षांनी सभात्याग केला आणि कामकाजावर बहिष्कार घातला.

****

पुणे जिल्ह्यात इंद्रायणी नदीवरच्या पूल दुर्घटनेचा मुद्दा आज विधान परिषदेत चर्चेला आला. या दुर्घटनेसंदर्भात त्रिसदस्यीय समिती नेमलेली असून, त्याअहवालानुसार कारवाईचं आश्वासन मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी दिलं. नवीन पुलाचं काम वर्षभरात पूर्ण होईल, असंही त्यांनी सांगितलं.

याच अनुषंगानं बोलताना चित्रा वाघ यांनी, धोकादायक पर्यटनस्थळी नो सेल्फी झोन संदर्भात माहिती फलक लावण्याचा मुद्दा मांडला, तर आमदार प्रज्ञा सातव यांनी हिंगोली शहराजवळ कयाधु नदीवरच्या जीर्ण पुलाला पर्यायी नवीन पूल उभारण्याची मागणी केली.

****

हरित क्रांतीचे प्रणेते, राज्याचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची जयंती आज कृषी दिनम्हणून साजरी केली जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वसंतराव नाईक यांना आदरांजली वाहत बळीराजाला कृषी दिनाच्या शुभेच्छा दिल्या. या पार्श्वभूमीवर राज्यभरात विविध कृषी संबंधित उपक्रम राबवण्यात आले.

मुंबईत कृषी विभागाची महाकृषी ए. आय. धोरणया विषयावर कार्यशाळा पार पडली. कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी या कार्यशाळेत बोलतांना, शेतीसाठी कमी खर्चात नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा वापर करत उत्पादन वाढवून शेतकऱ्यांना समृद्ध करण्यावर शासनाचा भर असल्याचं नमूद केलं.

****

छत्रपती संभाजीनगर इथं जिल्हा परिषदेचा कृषी विभाग तसंच कृषी विज्ञान केंद्राच्या वतीनं प्रगतीशील शेतकरी सत्कार सोहळा घेण्यात आला. राज्य सरकारचा युवा शेतकरी पुरस्कारप्राप्त पैठण तालुक्यातले प्रगतीशील युवा शेतकरी यज्ञेश कातबने यांच्यासह जिल्ह्यातल्या अनेक शेतकऱ्यांना यावेळी गौरवण्यात आलं.

****

आषाढी एकादशी निमित्त श्रीक्षेत्र पंढरपूर इथे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या सेवेसाठी तैनात केलेल्या एसटीच्या पाच हजार दोनशे बसेसचे चालक, वाहक, देखभाल कर्मचारी, पर्यवेक्षक आणि अधिकारी या सर्वांच्या चहा, नाष्टा आणि जेवणाची नि:शुल्क व्यवस्था, परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी केली आहे. एसटीचे सुमारे तेरा हजार कर्मचारी या व्यवस्थेचा लाभ घेतील, असं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यानं पुणे जिल्ह्यातल्या सराटी इथून आज सोलापूर जिल्ह्यात प्रवेश केला. माळशिरस तालुक्यातल्या अकलूज इथे पोलिस विभागाच्या बँड पथकानं पालखीचं स्वागत केलं. पालखीचं पहिलं गोल रिंगण अकलूज इथं पार पडलं. नेत्रदीपक असा अश्व रिंगण सोहळाही झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात हिंगोली जिल्ह्यात आज रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं.  भाटेगाव इथे करण्यात आलेल्या या आंदोलनामुळे सुमारे एक तास वाहतूक खोळंबल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

परभणी जिल्ह्यात ३१ गावातल्या शेतकऱ्यांनी या महामार्गाला विरोध दर्शवला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आज जिल्ह्यात रास्तारोको आंदोलन करण्यात आले.

****

नांदेडच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात व्यसनमुक्ती केंद्राची स्थापना करण्यात आली आहे. नशाबंदीबाबत जनजागृती आणि प्रशिक्षण आयोजित करण्याच्या उद्देशानं हे केंद्र सुरू करण्यात आलं आहे, असं या रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर सुधीर देशमुख यांनी म्हटलं आहे.

****

No comments:

Text - آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر‘علاقائی اُردو خبریں: بتاریخ: 20 دسمبر 2025‘ وقت: صبح 09:00 تا 09:10

  Regional Urdu Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 20 December-2025 Time: 09:00-09:10 am آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر علاقائی خب...