Tuesday, 1 July 2025

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 01.07.2025 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 01 July 2025

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०१ जुलै २०२ सकाळी ७.१० मि.

****

·      विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात - ५७ हजार ५०९ कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर 

·      वस्तू आणि सेवा कर प्रणालीला आज आठ वर्षं पूर्ण, करापोटी जमा होणारा महसूल गेल्या पाच वर्षांत दुप्पट

·      अधिकृत वापरकर्त्यांना आजपासून तत्काळ तिकिटं आरक्षित करण्याची परवानगी, लांब पल्ल्याच्या गाड्यांसाठीची रेल्वेची भाडेवाढ लागू

·      एसटीच्या लांब आणि मध्यम पल्ल्याच्या प्रवासासाठी आगाऊ आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना तिकीट दरात १५ टक्के सवलत देण्याचा निर्णय

आणि

·      महावितरणच्या गो-ग्रीन योजनेचा छत्रपती संभाजीनगर विभागात पाच लाखांचा टप्पा पार

****

राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला कालपासून मुंबईत सुरुवात झाली. विधानसभेचं कामकाज सुरू होताच, मुख्यमंत्र्यांनी नवनियुक्त मंत्री छगन भुजबळ यांचा सदनाला परिचय करून दिला. त्यानंतर विविध अध्यादेश सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात आले. दोन्ही सभागृहांनी संमत केलेल्या विधेयकांना राज्यपालांची अधिसंमती मिळाल्याची घोषणा विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केली. विविध खात्याच्या मंत्र्यांनी विविध शासकीय विधेयकं सभागृहासमोर ठेवली.

दिवंगत शास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर, माजी आमदार रोहिदास देशमुख यांच्या निधनाबद्दल विधानसभेत अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी तर विधान परिषदेत अरुणकाका जगताप आणि डॉ. रामदास आंबटकर यांच्या निधनाबाबत सभापती प्राध्यापक राम शिंदे यांनी शोकप्रस्ताव मांडला, त्यानंतर दोन्ही सभागृहाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं.

****

उपमुख्यमंत्री तथा वित्त आणि नियोजनमंत्री अजित पवार यांनी, ५७ हजार ५०९ कोटी ७१ लाख रुपयांच्या पुरवणी मागण्या काल विधिमंडळात सादर केल्या. हा निधी प्रामुख्याने रस्तेविकास, मेट्रो सेवा आणि सिंचनासारख्या पायाभूत प्रकल्प, तसंच सिंहस्थ कुंभमेळ्याचं नियोजन आणि अंमलबजावणीसह विविध योजनांसाठी वापरला जाणार आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जयंत पाटील यांनी या पुरवणी मागण्यांवर टीका करत, यामुळे राज्याची तूट वाढत जाईल, असं मत व्यक्त केलं. ते म्हणाले...

बाईट - जयंत पाटील

****

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाषेच्या मुद्यावरून सरकारवर टीका केली. मातृभाषेवरचं प्रेम हे पक्षाच्या पलिकडे असायला हव, असं ठाकरे यांनी म्हटलं आहे. ते काल वार्ताहरांशी बोलत होते. भाषेसंदर्भात निर्णयासाठी राज्य सरकारने नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आहे, शिक्षणाच्या समितीवर अर्थतज्ज्ञाची नियुक्ती करुन सरकार थट्टा करत असल्याची टीका ठाकरे यांनी केली.

****

राज्य सरकार फक्त महाराष्ट्राच्या जनतेला आणि भारतीय संविधानाला उत्तरदायी असल्याचं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. काल मुंबईत पत्रकारांशी बोलतांना, मुख्यमंत्र्यांनी ही बाब स्पष्ट केली. ते म्हणाले...

बाईट - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

****

वस्तू आणि सेवा कर प्रणालीला आज आठ वर्षं पूर्ण झाली. वस्तू आणि सेवा करापोटी जमा होणारा महसूल गेल्या ५ वर्षांत दुप्पट झाला आहे. २०२४-२५ या वर्षात २२ लाख ८० हजार कोटी रुपये उच्चांक करवसुलीत नोंदवला गेला. सरासरी दरमहा महसूल एक लाख ८४ हजार कोटी रुपये राहिला. २०१७ पासून लागू झालेल्या या प्रणालीमुळे करभरणा सुलभ झाला, तसंच वस्तू आणि सेवांचं आदानप्रदान देशभरात कोणत्याही राज्यांमध्ये सहज करता येऊ लागलं. करदात्यांची संख्याही सातत्याने वाढत असून, सध्या एक कोटी ५० लाख करदाते आहेत.

****

पंढरपूरच्या आषाढी वारी सोहळ्यासाठी पैठणहून निघालेला संत एकनाथ महाराजांचा पालखी सोहळा आज सोलापूर जिल्ह्यात बिटरगाव मुक्कामाहून पुढे मार्गस्थ होईल. या पालखी सोहळ्यातलं चौथं रिंगण आज कव्हेदंड इथं साजरं होणार आहे.

****

रेल्वेचा आरक्षण तक्ता आता रेल्वेगाडी सुटण्याच्या आठ तास आधी तयार करण्यात यावा, अशी सूचना रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेल्वे मंडळाला केली आहे. या निर्णयामुळे प्रतिक्षा यादीत असलेल्या प्रवाशांना प्रवासाकरता इतर पर्यायांचा विचार करण्यासाठी पुरेसा वेळ मिळणार आहे. आय आर सी टी सी संकेतस्थळ आणि मोबाइल ॲपवर आजपासून फक्त अधिकृत वापरकर्त्यांनाच तत्काळ तिकिटं आरक्षित करण्याची परवानगी असणार आहे. तसंच या महिन्याच्या अखेरीस तत्काळ आरक्षणासाठी ओटीपी-आधारित प्रमाणीकरण लागू केलं जाणार असल्याचं, रेल्वे मंत्रालयानं सांगितलं आहे.

दरम्यान, रेल्वे भाड्याचे सुधारित दर आजपासून लागू होत आहेत. पाचशे किलोमीटर अंतरापर्यंतच्या प्रवासभाड्यात कोणतीही वाढ करण्यात आलेली नसून, त्यापेक्षा अधिक अंतराच्या प्रवास भाड्यात श्रेणीनुसार प्रतिकिलोमीटर अर्धा पैसा ते दोन पैसे एवढी वाढ करण्यात आली आहे.

****

एसटीच्या लांब आणि मध्यम पल्ल्याच्या प्रवासासाठी आगाऊ आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना आजपासून प्रवास भाड्यात १५ टक्के सवलत मिळणार आहे. प्रवाशांना प्रत्यक्ष तिकीट खिडकीवर, एसटीच्या अधिकृत संकेतस्थळावर, तसंच ॲपवर आगाऊ आरक्षण करता येईल. दिवाळी आणि उन्हाळी सुट्ट्यांचा गर्दीचा काळ सोडता वर्षभर ही योजना सुरू राहील. मात्र, पूर्ण तिकीट काढणाऱ्या, कोणत्याही सवलतीचा लाभ न घेणाऱ्या प्रवाशांनाच या योजनेचा फायदा घेता येईल, तसंच जादा बसेससाठी ही सवलत लागू नसेल, असं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

बीड इथं अल्पवयीन मुलीवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणी अनुभवी महिला पोलिस अधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखाली विशेष तपास पथकाद्वारे स्वतंत्र चौकशी करावी, अशी मागणी आमदार धनंजय मुंडे यांनी केली आहे. मुंडे यांनी काल यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच उपमुख्यमंत्री तथा बीडचे पालकमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. यासंदर्भात पोलिस महासंचालकांनी विचार करून योग्य निर्णय घेण्याची सूचना केल्याचं, मुख्यमंत्र्यांनी माध्यमांना सांगितलं.

****

महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास प्राधिकरण-म्हाडाच्या छत्रपती संभाजीनगर, बीड तसंच नाशिक इथल्या विविध गृहनिर्माण योजनेअंतर्गत, एक हजार ४१८ निवासी सदनिका तसंच भूखंडांच्या ऑनलाइन संगणकीय सोडतीद्वारे विक्रीकरिता म्हाडाच्या नोंदणी आणि अर्ज भरणा प्रक्रियेला कालपासून प्रारंभ झाला. यामध्ये छत्रपती संभाजीनगर विभागात प्रधानमंत्री आवास योजना शहरी अंतर्गत एक हजार १४८ सदनिका, म्हाडा गृहनिर्माण योजनेअंतर्गत १६४ सदनिका, तर २० टक्के सर्वसमावेशक योजनेअंतर्गत ३९ सदनिका तसंच भूखंडांचा समावेश आहे.

****

बीड इथं वेठबिगारी, मानव तस्करी आणि नालसा योजना यासंदर्भात कार्यशाळा पार पडली. प्रमुख जिल्हा आणि सत्र न्यायाधीश तसंच जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष आनंद यावलकर यांच्या हस्ते या कार्यशाळेचं उद्घाटन झालं. न्यायमूर्ती यावलकर यांनी यावेळी केलेल्या भाषणात वेठबिगारी सारख्या प्रथा संपुष्टात आणण्याची गरज व्यक्त करत, प्राधिकरणाने स्पेशल सेलच्या माध्यमातून गेल्या वर्षभरात २८ वेठबिगारांची मुक्तता केल्याचं, तसंच त्यांच्या पुनर्वसनाचं काम सुरू असल्याची माहिती दिली.

****

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर इथे कार्यरत सहायक अभियंता अरुणसिंह ठाकूर काल सुमारे ३६ वर्षांच्या सेवेनंतर निवृत्त झाले. ठाकूर यांनी या प्रदीर्घ कालावधीत मुंबई, दमण तसंच छत्रपती संभाजीनगर इथं सेवा दिली. ठाकूर यांच्यासह प्रकाश वेळंजकर तसंच विजय सोनवणे हे कर्मचारीही काल आकाशवाणीच्या सेवेतून निवृत्त झाले, छत्रपती संभाजीनगर केंद्रात झालेल्या छोटेखानी समारंभात या सर्वांना निरोप देण्यात आला.

****

वीजबिलांसाठी छापील कागदाचा वापर पूर्णपणे बंद करत केवळ 'इमेल' आणि 'लघुसंदेश अर्थात-एसएमएस' या पर्यायांची निवड करणाऱ्या ग्राहकांनी महावितरणच्या गो-ग्रीन योजनेमध्ये ५ लाखांचा टप्पा गाठला आहे. या ग्राहकांना वीज देयकात प्रति महिना १० रुपये सूट देण्यात येते. या सर्व ५ लाख ३ हजार ७९५ वीजग्राहकांना, वार्षिक ६ कोटी ४ लाख ५५ हजार रुपयांचा एकूण लाभ होत आहे.

****

No comments: