Wednesday, 2 July 2025

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 02.07.2025 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date - 02 July 2025

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०२ जूलै २०२ दुपारी १.०० वा.

****

घाना हा देश ग्लोबल साऊथमध्ये भारताचा एक महत्वपूर्ण साथीदार असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. घानासह अन्य चार देशांच्या भेटीसाठी पंतप्रधान आज रवाना झाले, त्यापूर्वी ते बोलत होते. गुंतवणूक, ऊर्जा, आरोग्य, संरक्षण, क्षमता निर्माण आणि विकास भागीदारी क्षेत्रात घाना देशाकडून सहकार्य मिळण्याची आशा असल्याचं पंतप्रधानांनी म्हटलं आहे. या भेटीत पंतप्रधान आज घानाच्या संसदेला संबोधित करणार आहेत. नरेंद्र मोदी घानाला भेट देणारे ३० वर्षांतील पहिले भारतीय पंतप्रधान तर त्रिनिदाद आणि टोबॅगोच्या संसदेला संबोधित करणारे पहिले भारतीय पंतप्रधान ठरणार आहेत.

****

राज्यात वीज कोसळून मृत्युमुखी पडलेल्या शेतकरी किंवा शेतमजुरांच्या कुटुंबियांना दिली जाणारी चार लाख रुपयांची मदत वाढवून ती दहा लाख रुपये करावी, अशी मागणी काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवर यांनी आज विधानसभेत तारांकित प्रश्नोत्तराच्या तासात केली. याबाबत विचार करून मुख्यमंत्र्यांशी चर्चा करू, असं आश्वासन आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी दिलं.

****

राज्यात सोयाबीन खरेदीसाठी ५६२ केंद्रं निश्चित केली आहेत. यातून सुमारे पाच हजार पाचशे कोटी रुपयांची खरेदी झाली, अशी माहिती पणनमंत्री जयकुमार रावल यांनी आज विधासभेत दिली. सोयाबीन खरेदी केंद्रांची संख्या वाढवण्याची आवश्यकता असल्यास सरकार याबाबत अनुकूल असल्याचं रावल म्हणाले. आमदार रोहित पवार यांनी याबाबत प्रश्न उपस्थित केला होता. दरम्यान, राज्यात शेतकऱ्यांची होणारी फसवूणक रोखून त्यांना न्याय देण्यासाठी आर्थिक गुन्हे विभाग, ईओडब्ल्यू आणि ग्राहक न्यायालयाच्या धर्तीवर शेतकरी न्यायालय उभारण्यासाठी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीत निर्णय घेतला जाईल, अशी माहिती मंत्री रावल यांनी दिली. आमदार सुधीर मुनगंटीवर यांनी याबाबत प्रश्न उपस्थित केला होता.

****

महाराष्ट्र राज्य ट्रक, टेम्पो, टँकर्स, बस वाहतूक संघाच्या नेतृत्वाखाली वाहतूकदार संघटनांच्या समस्यांचं निराकरण करण्यासाठी एक समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. २५ जुलैपर्यंत ही समिती आपला अहवाल सादर करेल, तो पर्यंत वाहतूकदारांनी संप मागं घेण्याचं आवाहन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केलं आहे. ई-चलान कार्यप्रणालीच्या विरोधात माल वाहतूकदारांनी आजपासून संप पुकारण्याचा निर्णय घेतला आहे.

****

२०२२ ते जून २०२५ या कालावधीत मुंबई पोलीस दलातल्या ४२७ पोलीस अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला असून यापैकी २५ जणांनी आत्महत्या केल्याची माहिती गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी आज विधान परिषदेत दिली. आमदार सुनील शिंदे यांनी याबाबत प्रश्न विचारला होता. या घटनांमागे विविध कारणं असून पोलिसांच्या कल्याणासाठी सरकार विविध उपक्रम राबवत असल्याचं कदम यांनी सांगितलं.

पोलीस कर्मचाऱ्यांच्या घरांच्या अवस्थेबाबतचा मुद्दा विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी उपस्थित केला, यावर उत्तर देताना, पोलिसांसाठी मोठ्या प्रमाणात चांगल्या दर्जाची घरं बांधल्याचं आणि हे काम आणखी वाढवण्यासाठी मुंबईत योजना तयार केल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.

****

उत्तराखंड राज्यामध्ये नुकत्याच झालेल्या प्रचंड पावसानंतर आलेल्या महापुरामुळे रस्ते वाहून गेल्यानं जानकीचट्टी या ठिकाणी अडकलेल्या सुमारे दीडशे ते दोनशे मराठी पर्यटकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं आहे. या प्रवाशांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी संपर्क साधून मदतीची विनंती केल्यानंतर शिंदे यांनी उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांच्याशी संपर्क साधून याबाबत विनंती केली होती.

****

 

अमेरिकेत वॉशिंग्टन इथं झालेल्या क्वाड देशांच्या परराष्ट्रमंत्र्यांच्या बैठकीमध्ये, २२ एप्रिलच्या पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा निषेध करण्यात आला आहे. क्वाड संघटना सीमेपलीकडून होणाऱ्या दहशतवादासह सर्व प्रकारच्या दहशतवाद आणि हिंसेचा निषेध करते, असं, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, भारत आणि जपान या चार देशांच्या या संघटनेच्या संयुक्त निवेदनात म्हटलं आहे.

****

स्टेल्थ फ्रिगेट प्रकल्प १७ अ ची दुसरी युद्धनौका उदयगिरी काल भारतीय नौदलाकडे सोपवण्यात आली. या नौकेची बांधणी माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडनं केली आहे. ही लहान युद्धनौका अत्याधुनिक हत्यारं आणि सेन्सर्सने सुसज्ज असून, रडारवर न दिसता काम करण्यासाठी सक्षम आहे. नियोजित वेळेआधी सदोतीस महिने, अशा विक्रमी कालावधीत ही युद्धनौका नौदलाकडे सोपवण्यात आली.

****

२०२५ ग्रँड चेस टूर, या बुद्धिबळ स्पर्धेच्या तिसऱ्या टप्प्याला आज क्रोएशियामध्ये सुरुवात होत आहे. यामध्ये जागतिक क्रमवारीत प्रथम क्रमांकावर असलेल्या मॅग्नस कार्ल्सन आणि सध्याचा विश्वविजेता भारताचा डी.गुकेश यांच्यासह अनेक दिग्गज खेळाडू भाग घेत आहेत.

****

No comments: