Thursday, 3 July 2025

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 03.07.2025 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date - 03 July 2025

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०३ जूलै २०२ दुपारी १.०० वा.

****

प्रत्येक जिल्हा रुग्णालयांमध्ये जिल्हा वार्षिक निधीमधून सीटी स्कॅन आणि एमआरआय मशीन देण्यात येतील, अशी माहिती उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी आज विधीमंडळात दिली. जिल्हा रुग्णालयांसाठी वार्षिक निधीतून तरतूद करण्याची अथवा विशेष निधी देण्याची सूचना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केली होती. त्यावर अजित पवार यांनी ही माहिती दिली.

बाईट - विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार

 

दरम्यान, ज्या जिल्हा रुग्णालयांतील असुविधांविषयी तक्रारी प्राप्त झाल्या आहेत, त्याची दखल घेऊन योग्य ती कारवाई करण्यात येईल, असं वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी प्रश्नोत्तराच्या तासात सांगितलं.

****

राज्यात शालेय विद्यार्थ्यांपैकी ८६ टक्के विद्यार्थ्यांच्या अपार आयडीचं काम पूर्ण झालं आहे. तर, विद्यार्थ्यांचे आधार संलग्न करण्याचे काम ९५ टक्के पूर्ण झाल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी आज विधीमंडळात दिली. शालाबाह्य विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी १ जुलै ते १५ जुलैदरम्यान विशेष मोहीम राबवण्यात येत असल्याचं त्यांनी सांगितलं. विद्यार्थ्यांना विविध सुविधा पुरवण्यावर सरकारचा भर असल्याचं भुसे यांनी सांगितलं, ते म्हणाले

बाईट - शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे

****

सार्वजनिक आरोग्य विभागाकडून कर्करोग निदानासाठीच्या आठ वाहन खरेदी प्रकरणात गैरव्यवहार झाला असून याबाबत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली. यावर अधिवेशन संपण्याआधी याबाबतचा अहवाल सभागृहासमोर सादर करण्याचे निर्देश विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी संबंधित विभागाच्या मंत्र्यांना दिले.

****

राज्यात विवाहपूर्व थालेसीमिया रोगाची चाचणी करणं बंधनकारक करण्यात येईल अशी ग्वाही सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी आज विधानसभेत दिली. याबाबत आमदार विकास ठाकरे यांनी प्रश्न उपस्थित केला होता. राज्यात बारा हजार आठशे थालेसीमिया रुग्ण असल्याचं सांगत, प्रत्येक जिल्ह्यात या रोगाची उपचार केंद्र सुरू करण्यात येतील अशी माहिती बोर्डीकर यांनी दिली.

****

नवी दिल्ली इथं आजपासून २९ व्या आंतरराष्ट्रीय प्रसारण आणि माध्यम तंत्रज्ञान परिषद आणि प्रदर्शन-बीईएस एक्सपो २०२५ चं आयोजन करण्यात आलं आहे. प्रसार भारतीचे अध्यक्ष नवनीत कुमार सहगल यांनी आज या परिषदेचं उद्घाटन केलं. यावेळी भरवण्यात आलेल्या प्रदर्शनातील विविध दालनांसह प्रसार भारतीच्या दालनाला नवनीत सहगल आणि प्रसार भारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव द्विवेदी यांनी भेट दिली.

****

बीड जिल्ह्यात धारूर तालुक्यातल्या तरनळी गावात मुलानं आईला केलेल्या मारहाणीत डोक्यात मार लागल्याने आईचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणात मुलाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

****

देशात पाकिस्तानी कलाकार आणि क्रिकेटपटूंच्या सामाजिक माध्यमांवरील अकाऊंस्‌वर शासनानं पुन्हा एकदा बंदी घातली आहे. मे महिन्यात भारताविरोधी चुकीच्या आणि खोट्या माहितीचा प्रसार केल्याबद्दल या अकाऊंट्सवर बंदी घालण्यात आली होती ती काही तांत्रिक कारणानं शिथील केली होती. त्यानंतर आता पुन्हा बंदी घालण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे.

****

पंढरपूर इथं आषाढी एकादशी निमित्त भाविकांच्या होणाऱ्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर दक्षिण मध्य रेल्वे पाच आणि सहा तारखेला विशेष गाड्या चालवणार आहे. यात नगरसोल-मिरज-नगरसोल, अकोला-मिरज-अकोला, अदिलाबाद -पंढरपूर-अदिलाबाद या गाड्यांचा समावेश आहे.

****

रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत जोरदार पाऊस झाला. यात राजापुर इथं सर्वाधिक १०३ पूर्णांक ६२ मिलिमीटर पाऊस झाला. हवामान विभागानं जिल्ह्याला आज ऑरेंज अलर्ट दिला आहे. मराठवाड्यात बहुतांश ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल, असं हवामान विभागानं सांगितलं आहे.

****

No comments: