Saturday, 5 July 2025

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 05.07.2025 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 05 July 2025

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०५ जुलै २०२ सकाळी ७.१० मि.

****

·      शूर योद्ध्यांचा इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचवणं आवश्यक-केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं प्रतिपादन-पुण्यात एनडीए परिसरात थोरले बाजीराव पेशव्यांच्या पुतळ्याचं अनावरण

·      शिक्षक आणि शिक्षकेतर बोगस भरती प्रकरणी गुन्हे दाखल करण्याचा सरकारचा निर्णय

·      सोमनाथ सूर्यवंशी मृत्यूप्रकरणी पोलिसांविरोधात गुन्हा दाखल करण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश

·      संतांच्या पालख्या पंढरपूरच्या वेशीवर दाखल-उद्या आषाढी एकादशी सोहळा

आणि

·      बर्मिंगम क्रिकेट कसोटीत भारताला २४४ धावांची आघाडी 

****

भारतीय संस्कृतीतल्या शूर योद्ध्यांचा इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचवणं आवश्यक असल्याचं प्रतिपादन, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलं आहे. पुण्यात राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी - एनडीएच्या परिसरात त्रिशक्ती प्रवेशद्वारावर थोरले बाजीराव पेशवे यांच्या भव्य अश्वारूढ पुतळ्याचं शहा यांच्या हस्ते काल अनावरण झालं, त्यावेळी ते बोलत होते. पुरुषार्थ, समर्पण आणि बलिदान याची प्रेरणा देणारं व्यक्तिमत्त्व म्हणजे बाजीराव पेशवे असल्याचं शहा यांनी नमूद केलं. ते म्हणाले..

बाईट – केंद्रीय गृहमंत्री अमित शहा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.

****

केंद्र सरकारने गेल्या १० वर्षांत सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग मंत्रालयाच्या माध्यमातून २८ कोटींपेक्षा अधिक रोजगारांच्या संधी निर्माण केल्याची माहिती केंद्रीय मंत्री जितनराम मांझी यांनी दिली. ते काल मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. प्रधानमंत्री रोजगार हमी योजनेतून ८० टक्के ग्रामीण भागात तर २० टक्के शहरी भागात रोजगार उपलब्ध करून दिल्याचं मांझी यांनी सांगितलं.

****

राज्यातल्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा बोगस पदभरती प्रकरणी, संबंधित विभाग आणि शिक्षणसंस्थांचे अधिकारी, कर्मचारी आणि पदाधिकाऱ्यांविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश शासनानं दिले आहेत. शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात ही माहिती दिली. या प्रकरणी एका महिन्याच्या आत राज्यस्तरीय चौकशी समिती स्थापन केली जाणार असल्याचंही भोयर यांनी सभागृहाला सांगितलं.

धाराशीव जिल्ह्यात पवनचक्की कंपन्या स्थानिक गुंड आणि पोलीस अधिकाऱ्यांशी हातमिळवणी करून शेतकऱ्यांची फसवणूक करत असल्याबद्दलच्या सर्व तक्रारींची पोलिस महानिरीक्षकाकडून उच्चस्तरीय चौकशी करायची घोषणा भोयर यांनी केली. यासंदर्भातील लक्षवेधी कैलास पाटील यांनी उपस्थित केली होती.

****

छत्रपती संभाजीनगर इथल्या अंमली पदार्थ तसंच गुटखा प्रकरणी कारवाईचा मुद्दा चिखलीच्या आमदार श्वेता महाले तसंच बदनापूरचे आमदार नारायण कुचे यांनी विधानसभेत उपस्थित केला. अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी यासंदर्भात कारवाईचं आश्वासन दिलं.

****

शेतकऱ्यांना पीककर्ज घेण्यासाठी अनेक अडचणी येत असल्याचं, विधान परिषदेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी म्हटलं आहे. नियम २६० अन्वये मांडलेल्या ठरावादरम्यान दानवे यांनी याकडे सदनाचं लक्ष वेधलं, ते म्हणाले...

बाईट – अंबादास दानवे, विधान परिषद विरोधी पक्षनेते

 

राज्यातल्या मालमत्ता खरेदी विक्रीच्या नोंदणीनंतर संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांना त्यांच्या हिश्शाची एक टक्का रक्कम त्वरित देण्यासाठी वेगळी यंत्रणा तयार केली जाणार आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल विधानसभेत एका लक्षवेधीच्या उत्तरात ही माहिती दिली.

****

मराठीचा अभिमान बाळगणं हे अजिबात चुकीचं नाही. पण, भाषेच्या मुद्द्यावरून कुणालाही मारहाण करणं चुकीचं असल्याचं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. काल मुंबईत वार्ताहरांशी बोलतांना त्यांनी अशा प्रकरणात कारवाईचा इशारा दिला. ते म्हणाले..

बाईट – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

दरम्यान, शालेय अभ्यासक्रमात तिसऱ्या भाषेच्या मुद्यावर मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षांचा आज मुंबईत मेळावा होत आहे. वरळी NSCI डोम इथं या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे.

****

परभणी इथल्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कोठडीतल्या मृत्यूप्रकरणी संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांविरोधात आठ दिवसांच्या आत गुन्हा दाखल करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं दिले आहेत. सूर्यवंशी यांच्या आई विजया सूर्यवंशी यांच्या याचिकेच्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने, सूर्यवंशी यांचा मृत्यू हृदयविकारानं झाल्याचा दावा फेटाळून लावत, गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले. सूर्यवंशी यांचे वकील तथा वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी ही माहिती दिली.

****

आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे निघालेल्या बहुतांश पालख्या पंढरपूरजवळ वाखरी इथं पोहोचल्या आहेत. काल बाजीराव विहीर इथं ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचं गोल रिंगण तसंच संत तुकाराम पालखीचा उभा रिंगण सोहळा पार पडला. संत एकनाथ महाराज यांच्या पालखीचं आज शिराढोण इथं उभं रिंगण पार पडल्यानंतर सायंकाळपर्यंत पालखी पंढरपुरात दाखल होईल.

दरम्यान आषाढी एकादशीचा सोहळा उद्या साजरा होत आहे. उद्या पहाटे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पांडुरंगांची सपत्निक शासकीय महापूजा होणार आहे. या पार्श्वभूमीवर सर्वत्र चोख बंदोबस्त आहे.

****

नांदेडमध्ये जिल्हा पोलीस दलाच्या वतीनं शालेय विद्यार्थी, बालकांसाठी आषाढी एकादशीनिमित्ताने काल निर्भया वारी काढण्यात आली. तर जिल्हा उपनिबंधक आणि सहकारी संस्था कार्यालयामार्फत काल सहकार दिंडी काढण्यात आली.

****

बर्मिंगहम इथं सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारताला २४४ धावांची आघाडी मिळाली आहे. यजमान संघ काल पहिल्या डावात ४०७ धावांवर तंबूत परतला. मोहम्मद सिराजनं सहा आणि आकाश दीपने चार बळी घेतले, यापैकी सहा फलंदाज शून्यावर बाद झाले. कालचा खेळ थांबला तेव्हा भारताच्या दुसऱ्या डावात एक बाद ६४ धावा झाल्या होत्या, यशस्वी जैस्वाल २८ धावांवर बाद झाला, तर केएल राहुल २८ आणि करुण नायर ७ धावांवर खेळत आहेत.

****

इंग्लंड इथं सुरू असलेल्या महिला क्रिकेट टी २० तिसऱ्या सामन्यात काल इंग्लंडने भारताचा पाच धावांनी पराभव केला. पाच सामन्यांच्या मालिकेत भारत २-१ ने आघाडीवर आहे. मालिकेतला पुढचा सामना बुधवारी नऊ जुलैला होणार आहे.

****

गोदावरी नदीचं प्रदूषण कमी करण्यासाठी छत्रपती संभाजीनगर जिल्हा प्रशासनानं सी एस आर बॉक्स या संस्थेशी सामंजस्य करार केला आहे. जिल्ह्यातील गोदावरी नदी परिसरात ही संस्था कार्य करेल. नाशिक ते नांदेड या दरम्यान गोदावरी नदीच्या स्वच्छतेसाठी ‘दी गोदावरी इनिशिएटीव्ह’ या नावानं अभियान राबविण्यात येत आहे.

****

नांदेड जिल्ह्याच्या आदिवासीबहुल किनवट परिसरातल्या साने गुरुजी रुग्णालयात सेवा देणारे डॉ. अशोक बेलखोडे यांना पुण्याच्या चिमणलाल गोविंददास मेमोरियल ट्रस्टचा सेवा गौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. या पुरस्काराबाबत डॉ बेलखोडे यांनी आपल्या भावना या शब्दांत व्यक्त केल्या...

बाईट - डॉ. अशोक बेलखोडे

****

छत्रपती संभाजीनगर इथल्या डॉ हेडगेवार रुग्णालयात एका बालकाच्या दोन्ही कानाची एकाच वेळी कॉकलर इम्प्लांट शस्त्रक्रिया करण्यात आली. या शस्त्रक्रियेसाठी अत्याधुनिक स्मार्ट नेवीगेशन तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला. अशा प्रकारची शस्त्रक्रिया होण्याची ही मराठवाड्यातली पहिलीच वेळ असल्याची माहिती डॉ. हेडगेवार रुग्णालयाचे वरिष्ठ कान नाक घसा तज्ञ डॉ. भारत देशमुख यांनी दिली.

****

अहिल्यानगरचे आमदार संग्राम जगताप यांचे नावाने त्यांच्या स्वीय सहाय्यकाला दिलेल्या धमकी प्रकरणी एका आरोपीला तेलंगणातून अटक करण्यात आली. अनिस शेख असं या आरोपीचं नाव असून, तो बीड जिल्ह्यातला रहिवासी आहे.

****

हवामान

येत्या २४ तासांत मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगर आणि जालन्यासह इतर काही जिल्ह्यांना हवामान विभागाने यलो अलर्ट दिला आहे.

****

No comments: