Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 05 July 2025
Time 11.00 to
11.05 AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक
बातम्या
दिनांक ०५ जूलै २०२५ सकाळी ११.०० वाजता
****
पाच देशांच्या दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी त्रिनिनाद
आणि टोबॅगोनंतर अर्जेंटिना इथं पोहोचले आहेत. या दौऱ्यात आज दोन्ही देशात विविध क्षेत्रातलं
सहकार्य आणि भागीदारी वाढवण्यासंदर्भातल्या उपायांवर चर्चा होणार आहे. तत्पुर्वी भारतीय
समुदायाच्या सदस्यांनी पंतप्रधान मोदी यांचे कथ्थक, भरतनाट्यम् आणि ओडिसी नृत्य सादरीकरणानं स्वागत केलं. भारतीय
पंतप्रधानांचा गेल्या ५७ वर्षांतला हा पहिलाच अर्जेंटिना दौरा आहे. या दौऱ्यानंतर पंतप्रधान
ब्राझील दौऱ्यावर जाणार आहेत.
****
आषाढी एकादशी
निमित्त राज्याच्या कानाकोपऱ्यातून निघालेल्या विविध साधुसंतांच्या पालख्या आता पंढरपूरात
दाखल होत आहेत. संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी वाखरी इथं मुक्कामी असून संत तुकाराम
महाराज, सोपान काका महाराज, संत मुक्ताई, संत गजानन महाराज यांच्या पालख्या
पंढरपूर जवळ पोहोचल्या आहेत. काल बाजीराव विहीर इथं ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचं
गोल रिंगण तसंच संत तुकाराम पालखीचा उभा रिंगण सोहळा पार पडला. याठिकाणी वारकरी तसंच
भाविकांच्या होणाऱ्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनातर्फे चोख बंदोबस्त ठेवण्यात
आला आहे.
****
बीड इथं आषाढी एकादशीनिमित्त आज ‘अभंगवाणी’ या भक्तिसंगीत
कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, बालरंगभूमी परिषद आणि केशर काकू महाविद्यालयातील
संगीत विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम होणार आहे. केशर काकू महाविद्यालयाच्या
सभागृहात होणाऱ्या या कार्यक्रमात ३० स्थानिक कलावंत सहभागी होणार आहेत.
****
जम्मू काश्मीर इथं श्री अमरनाथ यात्रेला सुरूवात झाली
आहे. काल काश्मीर इथल्या पहलगाम आणि बालटाल बेस कॅम्पकडे जाणाऱ्या दोन्ही मार्गांवरून
१० हजार ७०० हून अधिक यात्रेकरूंना पवित्र भगवान शंकराच्या मंदिराकडे जाण्याची परवानगी
देण्यात आली आहे. सकाळपासूनच जम्मूमधील भगवती नगर बेस कॅम्प इथून २९१ वाहनांमधून ६
हजार हून अधिक यात्रेकरूंच्या नवीन तुकडीला रवाना करण्यात आलं. ही यात्रा ३८ दिवस चालणार
आहे.
****
वस्तू आणि सेवा कर -जीएसटी उत्पन्नाच्या विश्लेषणासाठी
पहिली बैठक गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखाली काल नवी दिल्ली
इथं पार पडली. या बैठकीला राज्य महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे, छत्तीसगड आणि पंजाबचे अर्थमंत्री
आणि यांच्यासह अकरा राज्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. या बैठकीत राज्यनिहाय महसूल
प्रवृत्ती, आर्थिक घटकांचा प्रभाव, करचोरीविरोधी उपाय आणि धोरणात्मक
शिफारशींवर सविस्तर चर्चा झाली.
****
महाराष्ट्राचे सुपुत्र आणि देशाचे 'सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण रामकृष्ण
गवई' यांचा महाराष्ट्र विधानमंडळातर्फे
सत्कार करण्यात येणार आहे. हा गौरव सोहळा येत्या मंगळवारी ८ जुलैला दुपारी दोन वाजता, मुंबईतील विधानभवनाच्या मध्यवर्ती
सभागृहात पार पडणार आहे.
****
आदिवासी विभागाच्या वसतिगृहांमध्ये राहून उच्च शिक्षण
घेणाऱ्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या विविध भत्त्यांमध्ये मोठी वाढ
करण्यात आली आहे. आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी विधानसभेत काल निवेदनाद्वारे ही माहिती दिली.
****
प्रधानमंत्री सूर्य घर- मोफत वीज योजनेची अंमलबजावणी
प्रभावीपणे करण्यासाठी ऊर्जा विभागाशी समन्वय साधून, सकारात्मक कार्यवाही करण्याचे निर्देश सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी दिले. या योजनेच्या अंमलबजावणीसंदर्भात विधानभवन इथं काल
झालेल्या बैठकीत ते बोलत होते. यासाठी आयुक्तालयामार्फत यंत्रणा राबवावी असे निर्देश
त्यांनी संबंधित यंत्रणांना दिले.
****
जालना-तिरुपती-जालना या विशेष रेल्वे गाडीला वातानुकुलीत
तृतीय श्रेणीचे दोन डबे कायम स्वरूपी वाढवण्यात येत आहेत. जालना इथून सात जुलै पासून
सुटणाऱ्या आणि तिरुपती इथून आठ जुलै पासून सुटणाऱ्या गाडीला हे डबे जोडले जाणार आहेत, अशी माहिती दक्षिण मध्य रेल्वेच्या
नांदेड विभागानं दिली आहे.
****
क्रोएशिया इथं सुरू असलेल्या सुपर युनायटेड रॅपिड अँड
ब्लिट्झ स्पर्धेत भारताच्या डी. गुकेशनं रॅपिड बुद्धिबळ स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं
आहे. या स्पर्धेत गुकेशनं अंतिम फेरीत अमेरिकेच्या वेस्ली सोचा पराभव केला. १८ पैकी
१४ गुण मिळवून गुकेशनं रॅपिड फॉरमॅट मध्ये पहिलं स्थान पटकावलं. या स्पर्धेचा ब्लिट्झ
टप्पा आजपासून सुरू होणार आहे.
****
बर्मिंगहम इथं सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट
सामन्याच्या चौथ्या दिवशी आज भारत आपल्या दुसऱ्या डावातील खेळाची सुरुवात करेल. भारताकडून
केएल राहुल २८ आणि करुण नायर ७ धावांवर खेळत आहेत. काल तिसऱ्या दिवसअखेर भारतानं दुसऱ्या
डावात इंग्लंडविरुद्ध २४४ धावांची आघाडी घेतली आहे. इंग्लंडनं पहिल्या डावात ४०७ धावा
केल्या. यात मोहम्मद सिराजनं सहा आणि आकाश दीपने चार बळी घेतले. इंग्लंडच्या जेमी स्मिथने
नाबाद १८४ धावा तर हॅरी ब्रूकने १५८ केल्या.
****
No comments:
Post a Comment