Sunday, 6 July 2025

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 06 जूलै २०२५ रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 06 July 2025

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – ०६ जूलै २०२५ सायंकाळी ६.१०

****

·      आषाढी एकादशीचा राज्यभरात मोठा उत्साह, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा

·      राज्यावरची संकटं दूर करण्याची शक्ती देण्याचं मुख्यमंत्र्यांचं पांडुरंगाकडे साकडं

·      पंतप्रधान नरेंद्र मोदी आज ब्राझील इथं १७ व्या ब्रिक्स शिखर परिषदेत सहभागी होणार

·      येत्या पाच वर्षांत वैद्यकीय महाविद्यालयात ७५ हजार जागा वाढवण्याचं उद्दीष्ट - आरोग्यमंत्री नड्डा यांचं प्रतिपादन

आणि

·      पावसाच्या व्यत्ययानंतर भारत - इंग्लड कसोटी सामन्यातील पाचव्या दिवसाचा खेळ सुरु

****

आषाढी एकादशीचा सोहळा आज सर्वत्र मोठ्या उत्साहात भक्तिभावाने साजरा होत आहे. एकादशीचा मुख्य सोहळा पंढरपूर इथं साजरा होत असून लाखो भाविकांनी श्री विठ्ठल रुख्मिणीचं दर्शन घेतलं. आज पहाटे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या सुविद्य पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा करण्यात आली. यावेळी नाशिक जिल्ह्याच्या नांदगाव तालुक्यातल्या जातेगाव इथले कैलास उगले आणि कल्पना उगले यांना मानाचे वारकरी म्हणून मुख्यमंत्र्यांसह महापूजेत सहभागी होण्याची संधी मिळाली. महापूजेनंतर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मानाच्या वारकरी दाम्पत्याचा सत्कार करण्यात आला.

पांडुरंगाने राज्यावरची संकटं दूर करण्याची शक्ती द्यावी, सन्मार्गाने चालण्याची सुबुद्धी द्यावी, बळीराजा सुखी समाधानी व्हावा, यासाठी आशीर्वाद द्यावा, असं साकडं घातल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. वारीत प्रत्येक व्यक्ती इतरांमध्ये पांडुरंगाला पाहतो म्हणूनच आपली संस्कृती अलौकिक असल्याचंही ते म्हणाले.

****

दरम्यान, पंढरपूर शहरात पालिकेनं स्वच्छतेच्या दृष्टीनं साडे सोळाशे कर्मचारी नियुक्त केले आहेत. याठिकाणी वारकरी तसंच भाविकांच्या होणाऱ्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनातर्फे चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आषाढी एकादशीनिमित्त जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. भगवान विठ्ठल समाजाला आनंद आणि समृद्धी प्रदान करोया शब्दात त्यांनी समाजमाध्यमावर आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

****

आज मोहर्रमचा दहावा दिवस पैगंबर मुहम्मद यांचे नातू हजरत इमाम हुसेन आणि सत्य आणि न्यायासाठी करबलामध्ये आपले प्राण गमावलेल्या त्यांच्या शिष्यांच्या हौतात्म्याच्या स्मरणार्थ हा दिवस नेहमी पाळला जातो. हजरत इमाम हुसेन यांनी प्रतिकूल परिस्थितीतही लोकांना सत्यावर अढळ राहण्याची प्रेरणा दिलीअसं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या सामाजिक माध्यमावरील संदेशात म्हटले आहे.

दरम्यान, मोहरमच्या दिवशी ताजिया मिरवणूक काढली जाते आणि मजलिसचे आयोजन केले जाते.

मुस्लिम धर्मीयांच्या मोहर्रमचा आजचा दिवस श्रद्धापुर्वक वातावरणात पाळला जात आहे. ठिकठिकाणी ताजीयाची प्रतिकात्मक मिरवणूक तसंच प्रेषितांच्या शहिद झालेल्या नातेवाईकांच्या स्मृतींचं स्मरण केलं जात आहे.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रात्री ब्राझीलमधील रिओ दि जानेरो इथं सुरू होणाऱ्या १७ व्या ब्रिक्स शिखर परिषदेत सहभागी होतील. या शिखर परिषदेचा उद्देश आरोग्याशी संबंधित मुद्द्यांवर चर्चा करणं, जागतिक समस्या सोडवण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा नैतिक वापर, हवामान बदलाच्या आव्हानांना तोंड देण्यासाठी आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी बँकिंग व्यवस्थेत सुधारणा करणं आणि संतुलित आणि समावेशक जागतिक प्रशासनाला प्रोत्साहन देणं हा आहे. दोन दिवसांच्या शिखर परिषदेनंतर, पंतप्रधान मोदी ब्राझीलची राजधानी ब्राझिलियाला जाणार असून ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांसोबत, दोन्ही देशांमधील मजबूत धोरणात्मक संबंधांवर चर्चा करतील.

****

येत्या पाच वर्षांत ७५ हजार वैद्यकीय जागा वाढवण्याचं केंद्र सरकारचं लक्ष्य असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्री जगतप्रसाद नड्डा यांनी म्हटलं आहे. दिल्लीत आज बाराशेंहून अधिक नर्सिंग अधिकाऱ्यांना नियुक्ती पत्रांचं वाटप त्यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते.

२०१४ पर्यंत भारतात सात अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था - एम्स होत्या, परंतु आज २० एम्स कार्यरत आहेत, वैद्यकीय महाविद्यालयांची संख्या ३८७ वरून ७८० झाली असून वैद्यकीय जागांची संख्या ५१ हजारांवरून १ लाख १८ हजारांवर पोहचली आहे, आता पुढील पाच वर्षात आणखी ७५ हजार जागा वाढवण्याचं उद्दीष्ट असल्याचं ते म्हणाले.

माता मृत्युदर एक लाख प्रसुतीमागे १३० वरून ८८ पर्यंत कमी झाला असून बाल मृत्युदर प्रति १ हजार मुलांमागे ३९ वरून २६ पर्यंत खाली आला असल्याचं त्यांनी म्हटलं. पाच वर्ष वयोगटातील मृत्युदर १४ टक्क्यांच्या जागतिक घसरणीच्या तुलनेत ४२ टक्क्यांनी आणि नवजात मृत्युदरात ४० टक्क्यांनी घट झाल्याचं त्यांनी सांगितलं.

****

आज जागतिक प्राणीरोग प्रतिबंधक दिन आहे. प्राण्यांपासून मानवांमध्ये पसरणाऱ्या आजारांबद्दल लोकांना जागरूक करणं हा या दिनाचा उद्देश आहे. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद- आयसीएमआरच्या संशोधनातून २०३० पर्यंत कुत्र्यांचा रेबीज नष्ट करण्यासाठी जलद कृती करण्याची आवश्यकता असल्याचं सूचित करण्यात आलं आहे. भारतात दरवर्षी सुमारे पाच हजार सातशे लोकांचा रेबीजमुळे मृत्यू होतो तर देशात प्राण्यांच्या चाव्याच्या ९१ लाखांहून अधिक घटना घडतात, असं आयसीएमआरनं म्हटलं आहे.

****

प्रहार पक्षाच्या वतीनं उद्यापासून १४ जुलैपर्यंत सातबारा कोरापदयात्रा काढण्यात येणार आहे. अमरावती जिल्ह्यातल्या पापळ ते यवतमाळ जिल्ह्यातील चिलगव्हाणपर्यंत १३८ किलोमीटर ही पदयात्रा असेल. ही यात्रा राजकीय नसून शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी असल्याचं बच्चू कडू यांनी स्पष्ट केलं. यावेळी त्यांनी सरकारच्या धोरणांवरही टीका केली.

****

इंग्लंडमधल्या बर्मिंगहॅम इथं सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पाचव्या दिवसाचा खेळात पावसानं व्यत्यय आला. त्यामुळं आज दुपारी साडेतीनऐवजी सायंकाळी सव्वा पाच वाजता खेळ सुरु झाला, शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा इंग्लडच्या ५ गडी बाद १०४ धावा झाल्या होत्या. भारतानं इंग्लडला ६०८ धावांचं लक्ष्य दिलं असून विजयासाठी भारताला आणखी ५ गडी बाद करणं आवश्यक आहे.

****

शिर्डीतील श्री साईबाबा संस्थानतर्फे आषाढी एकादशीचा उत्सव आज साजरा करण्यात येत आहे, यानिमित्त साईबाबा मंदिर आणि परिसर फुलांनी आकर्षक सजवण्यात आला आहे.

****

छत्रपती संभाजीनगर इथल्या वाळूजवळील प्रतिपंढरपूर इथं श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात आज सकाळपासूनच असंख्य भाविकांची दर्शनासाठी रिघ लागली. दुपारपर्यंत दिंड्या आणि पालख्यांचं मंदिर परिसरात आगमन झालं. रिमझीम पावसातही पारंपरीक वेशात अबालवृद्ध इथं पायी जाण्यासाठी मार्गस्थ झाल्याचं दिसून आलं. तसंच या मार्गावर सेवाभावी संस्थांनी पिण्याचं पाणी- फराळ आदींची व्यवस्थाही केली होती.

****

आषाढी एकादशी निमित्त पैठण इथ संत एकनाथ महाराज यांच्या समाधीचं दर्शन घेण्यासाठी आज हजारो भाविकांनी गर्दी केली. आज पहाटे मोठ्या संख्येनं वारकऱ्यांनी गोदावरी नदीवर पवित्र स्नान केलं. दरम्यान, संत एकनाथ महाराज यांचं समाधी स्थळ वेगवेगळ्या फुलांनी सजवण्यात आलं आहे.

****

बीड इथं अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, बालरंगभूमी परिषद आणि केशरबाई सोनाजीराव क्षीरसागर महाविद्यालयातील संगीत विभाग यांच्या संयुक्त विद्यमानं आषाढी एकादशीनिमित्त दिंडी काढण्यात आली. या दिंडीत महिलांसह अबालवृद्धांनी सहभाग नोंदवला. यानंतर ‘अभंगवाणी’ हा भक्तिसंगीत गायन कार्यक्रम झाला. नाट्य परिषदेच्या अध्यक्षा डॉ. दीपा क्षीरसागर आणि डॉक्टर सारीका क्षीरसागर यांच्या यावेळी प्रमुख उपस्थिती होती.

****

विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संरक्षणाची जाणीव निर्माण करून झाडांचं महत्त्व व त्यांचं जीवनातील योगदान समजन्यायासाठी परभणी जिल्ह्यातील मानवत तालुक्यातील मानवत रोड इथं जिजाऊ ज्ञानतीर्थ विद्यालयात आषाढी एकादशीनिमित्त वृक्ष दिंडी हा पर्यावरणपूरक उपक्रम पार पडला. या दिंडीमध्ये शाळेचे विद्यार्थी विठ्ठल-रुक्मिणी तसंच पारंपरिक वारकऱ्यांच्या वेशभूषेत सहभागी झाले होते.

****

यंदाचे वर्ष आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष म्हणून साजरे करण्यात येत आहे. आजच्याच दिवशी केंद्रीय सहकार मंत्रालयाची स्थापना झाली होती. यानिमित्त सोलापूर इथं सहकार विभाग, जिल्हा उपनिंबधक कार्यालय आणि जिल्हा मध्यवर्ती बँक तसंच जिल्ह्यातील विविध बँकेच्या संयुक्त विद्यमानं आज सकाळी सहकार फेरी काढण्यात आली. या फेरीची सुरुवात जिल्हा उपनिंबधक किरण गायकवाड आणि जिल्हा बँकेचे प्रशासक कुंदन भोळे यांच्या हस्ते करण्यात आली.

****

धुळे जिल्ह्यात आज आषाढी एकादशी निमित्त विविध विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात भाविकांनी सकाळपासूनच दर्शनासाठी मोठी गर्दी केली. यावेळी जिल्ह्यात विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. शालेय विद्यार्थ्यांसह भाविकांनी पारंपारिक वेशभूषेत दिंडीत सहभाग घेत पालखी मिरवणूकही काढण्यात आली.

****

जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यात पिंपरुड-आमोदा रस्त्यावर इंदूर इथं आज पहाटे लक्झरी बसला अपघात झाला. या अपघातात एका प्रवाशाचा मृत्यू झाला असून जखमी झालेल्या प्रवाशांना तातडीनं उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आलं आहे.

****

नाशिक शहरासह जिल्ह्यात पावसाची संततधार सुरूच असून गंगापूर धरणातून विसर्ग वाढवण्यात आला आहे. नाशिक जिल्ह्यातील एकूण नऊ धरणांमधून विसर्ग सुरू आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणातून दुपारी विसर्ग वाढवण्यात आला असून सध्या पाच हजार १८६ तर दारणा धरणातून ९ हजार ९३२ आणि नांदूर मध्यमेश्वर बंधाऱ्यातून ३१ हजार १३५ क्युसेकनं विसर्ग सुरू आहे.

****

पुढील तीन ते चार तासांत मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे, अशी माहिती परभणी इथल्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या कृषी हवामान विभागाने दिली आहे.

****

No comments: