Thursday, 10 July 2025

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 10.07.2025 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 10 July 2025

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक १० जुलै २०२ सकाळी ७.१० मि.

****

·      पंतप्रधानांना नामिबियाचा सर्वोच्च नागरी सन्मान, पाच देशांच्या दौऱ्यानंतर पंतप्रधान मायदेशी रवाना

·      छत्रपती संभाजीनगर इथल्या अल्पवयीन मुलींवर अत्याचार प्रकरणी जिल्हा बालविकास अधिकाऱ्यांचं तत्काळ निलंबन-संबंधित संस्थेची मान्यता रद्द करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

·      राज्यात तुकडेबंदी कायदा शिथिल-पंधरा दिवसांत कार्यपद्धती जाहीर करण्याची महसूल मंत्र्यांची घोषणा

·      शेतकऱ्यांच्या पीक कर्जासाठी छत्रपती संभाजीनगर जिल्हा प्रशासनाचं ‘अर्ज द्या, कर्ज घ्या’ अभियान

आणि

·      भारत-इंग्लंड दरम्यान तिसरा क्रिकेट कसोटी सामना आजपासून लॉर्डसच्या मैदानावर खेळवला जाणार

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी घाना, त्रिनिदाद आणि टोबॅगो, अर्जेंटिना, ब्रझील आणि नामिबिया या पाच देशांच्या यशस्वी यात्रेनंतर मायदेशी परतत आहेत.

पंतप्रधानांना नामिबियाचा सर्वोच्च नागरी सन्मान, 'ऑर्डर ऑफ द मोस्ट एन्शियंट वेल्वित्चिया मिराबिलिस' काल प्रदान करण्यात आला. त्यांना परदेशात मिळालेला हा २७ वा तर त्यांच्या सध्याच्या दौऱ्यातला चौथा पुरस्कार आहे. त्यांनी या पुरस्काराबाबत नामिबिया सरकार आणि जनतेचे आभार मानत, हा पुरस्कार भारत आणि नामिबिया यांच्यातल्या चिरस्थायी मैत्रीचं प्रतीक असल्याची भावना व्यक्त केली. पंतप्रधानांच्या नामिबिया दौर्याविषयी अधिक माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी,

‘‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नामिबिया दौरा हा त्यांच्या पाच देशांच्या प्रवासातील शेवटचा टप्पा होता जो भारत-नामिबिया द्विपक्षीय संबंधांच्या दृष्टीने महत्वपूर्ण ठरला. जवळपास ३० वर्षांनंतर भारताचा पंतप्रधानांचा नामिबियाला हा पहिलाच दौरा होता. दोन्ही देशांमधील आरोग्यसेवा, यूपीआय सारख्या डिजिटल पेमेंट सिस्टीमची सुरुवात आणि कौशल्य विकास यासारख्या क्षेत्रात भागीदारी हे या दौऱ्याचे मोठे यश म्हणता येईल. नामिबियाच्या विकासात  भागीदारी वाढविण्या बरोबरच भारताचे आफ्रिकेशी संबंध मजबूत करण्यात या भेटीचे योगदान राहील. एकूणच, ही भेट केवळ द्विपक्षीय संबंध मजबूत करण्यापुरती मर्यादित नव्हती तर आरोग्य, तंत्रज्ञान आणि शिक्षण यासारख्या क्षेत्रात एकत्र काम करून भारताच्या "ग्लोबल साउथ" धोरणाला वेग देणारी ठरली.’’

अपर्णा खुंट, आकाशवाणी बातम्या, विंडहोक

****

छत्रपती संभाजीनगर इथं विद्यादीप बालसुधारगृहात अल्पवयीन मुलींवर अत्याचार प्रकरणी जिल्हा बालविकास अधिकाऱ्यांना तत्काळ निलंबित करण्यात आलं असून, संबंधित संस्थेची मान्यता रद्द करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. आमदार चित्रा वाघ यांनी काल अल्पसूचना प्रश्नाद्वारे हा मुदा विधान परिषदेत उपस्थित केला होता.

विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी यासंदर्भात बोलतांना, या बालगृहात अल्पवयीन मुलींना, मारहाण तसंच अमानवी छळासह त्यांच्यावर धर्मांतराचा दबाव असल्याचा आरोप केला. या प्रकरणी चौकशी करण्यासाठी तीन वरिष्ठ महिला पोलीस निरीक्षकांची समिती स्थापन केली असून, ही समिती आज आपला अहवाल सादर करणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. ते म्हणाले...

बाईट – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

****

राज्याची आर्थिक स्थिती भक्कम असून, उत्पन्नाचे नवनवीन स्रोत निर्माण करण्यावर आपला भर असल्याची माहिती, उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी दिली. ते काल विधानसभेत पुरवणी मागण्यांवरील चर्चेला उत्तर देत होते. पुरवणी मागण्यांचा निधी विकास योजनांवर खर्च होत असल्याने, त्यातून राज्याच्या साधनसंपत्तीत भर पडणार असल्याचं पवार यांनी सांगितलं. राज्याचा कारभार आर्थिक शिस्तीचं काटेकोर पालन करत सुरु असून, तिजोरीवरील वित्तीय भारही मर्यादेत असल्याचं त्यांनी नमूद केलं.

****

शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर पेरा नसताना, कृषी उत्पन्न बाजार समितीचे अधिकारी किंवा कर्मचारी पिकांचा उल्लेख दाखवून भ्रष्टाचार करत असल्याचा मुद्दा अंबादास दानवे यांनी काल सदनात उपस्थित केला. या अधिकाऱ्यांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी दानवे यांनी केली, ते म्हणाले..

बाईट – अंबादास दानवे, विरोधी पक्षनेते, विधान परिषद

****

राज्यात तुकडेबंदी कायदा शिथिल केला जाणार असून, भविष्यात हा कायदा रद्द करण्यासाठी योग्य कार्यपद्धती ठरवली जाईल, अशी घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल विधानसभेत केली. एक जानेवारी २०२५ पर्यंत नागरी क्षेत्रांमध्ये जे तुकडे झाले आहेत, त्यांना कायदेशीर मान्यात देण्यासाठी हा निर्णय घेतल्याचं त्यांनी सांगितलं. या संदर्भात चार सदस्यीय समिती गठित करून, १५ दिवसांत कार्यपद्धती जाहीर केली जाईल, ही समिती प्रत्येक भागातल्या परिस्थितीचा अभ्यास करून शिफारसी करेल, असं बावनकुळे यांनी सांगितलं.

****

चालू वर्षात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात एक लाख ५४ हजार ७७० शेतकऱ्यांना, एक हजार ५९६ कोटी ६३ लाख रुपयांचं पीक कर्ज वाटपाचं उद्दिष्ट आहे. त्यापैकी ९३ हजार १०२ शेतकऱ्यांना ७३० कोटी रुपये कर्ज वाटप झालं आहे. शेतकऱ्यांना वेळेत पीक कर्ज उपलब्ध व्हावं, यासाठी छत्रपती संभाजीनगर जिल्हा प्रशासनाने ‘अर्ज द्या, कर्ज घ्या’, हे अभियान सुरु केलं आहे. याअंतर्गत काल चित्तेगाव इथं झालेल्या कर्ज मेळाव्याला जिल्हाधिकारी दिलीप स्वामी उपस्थित होते. शेतकऱ्यांनी जुन्या पीक कर्जाचं नूतनीकरण करुन घेण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं.

****

गुरुपौर्णिमेचा सण आज साजरा होत आहे. या निमित्तानं सर्वत्र गुरुपूजनासह विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. शिर्डीत गुरुपौर्णिमा उत्सवाला कालपासून प्रारंभ झाला. काल श्रींची प्रतिमा, पोथी तसंच विणेची मिरवणूक काढण्यात आली.

****

पैठणचे संत भानुदास महाराजांचा पुण्यतिथी सोहळा काल पंढरपूर इथं साजरा झाला. संत एकनाथ महाराजांचे पणजोबा असलेले भानुदास महाराज यांनी, पंढरपूरच्या पांडुरंगाची हम्पी इथं नेलेली मूर्ती पंढरपुरात परत आणून स्थापन केल्याचं सांगितलं जातं. पैठण इथंही नाथमंदिरात काल हा सोहळा पार पडला.

****

लातूर शहरात मध्यवर्ती ठिकाणी तसंच छत्रपती शिवाजी महाराज चौक इथं पार्किंग व्यवस्थेसह सुसज्ज बसस्थानक उभारण्याची मागणी आमदार अमित देशमुख यांनी केली आहे. त्यांनी काल परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची भेट घेऊन, ही मागणी केली. सरनाईक यांनी सर्व मागण्यांना अनुकूलता दर्शवत संबंधितांना सूचना केल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

बीड जिल्ह्यातल्या परळी इथं काल जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर घेण्यात आलं. नागरिकांनी दर सोमवारी आणि गुरुवारी दुपारी बारा ते दोन या वेळेत होणाऱ्या जनता दरबारमध्ये आपल्या समस्या रास्तपणे प्रशासनाकडे मांडव्यात, त्यांचं निराकरण तात्काळ करण्यात येईल, असं जिल्हाधिकार्यांनी सांगितलं. शेतकरी, विद्यार्थी, नागरिकांचा या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

****

भारत आणि इंग्लंड दरम्यान तिसरा क्रिकेट कसोटी सामना आजपासून लंडन इथं लॉर्डस् मैदानावर खेळवला जाणार आहे. पाच सामन्यांच्या मालिकेत दोन्ही संघ एक - एकनं बरोबरीत आहेत. गोलंदाज जसप्रीत बुमराह या सामन्यात खेळणार असल्याचं भारतीय संघ व्यवस्थापनानं जाहीर केलं आहे.

****

खरीप २०२४ मधील काढणी पश्चात पिकांच्या झालेल्या नुकसानीपोटी धाराशिव जिल्ह्यातल्या ७५ हजार ६७७ शेतकऱ्यांना ५५ कोटी मिळणार आहेत. यासाठी आवश्यक निधीस मंजूरी मिळाली असल्याची माहिती आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी दिली.

****

कामगार कायद्याच्या विरोधात काल छत्रपती संभाजीनगर इथं भारतीय ट्रेड युनियनच्या वतीने बंद पुकारून निदर्शनं करण्यात आली. बीड इथंही काल सिटूच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.

****

हवामान

मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी आज पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता असून, ताशी ३०-४० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.

****

No comments: